scorecardresearch

लोकमानस : दमन आणि प्रलोभन दोन्हीचा धोका

‘प्रबुद्ध प्रजासत्ताकवादापासून आपण दूरच..’ हा देश-काल या सदरातील योगेंद्र यादव यांचा लेख (१५ एप्रिल) वाचला. भारताने लोककल्याणकारी शासन पद्धतीची संकल्पना स्वीकारताना त्यास कायद्याच्या चौकटीत बसवताना संवैधानिक दर्जा दिला.

Loksatta readers response letter

loksatta@expressindia.com

‘प्रबुद्ध प्रजासत्ताकवादापासून आपण दूरच..’ हा देश-काल या सदरातील योगेंद्र यादव यांचा लेख (१५ एप्रिल) वाचला. भारताने लोककल्याणकारी शासन पद्धतीची संकल्पना स्वीकारताना त्यास कायद्याच्या चौकटीत बसवताना संवैधानिक दर्जा दिला. लोकांनी, लोकांकडून आणि लोकांसाठी चालवलेली प्रजासत्ताक राज्यव्यवस्था आपण खरेच निर्माण करू शकलो आहोत का? कारण मागील काही वर्षांपासून गणतंत्राची जागा गणांवर नियंत्रण ठेवण्यात होऊ पाहत असल्याचे प्रकर्षांने जाणवते. एका बाजूला तंत्राचे संचलन तर दुसरीकडे गणांच्या सीएएविरोधातील आंदोलकांना ‘आंदोलनजीवी – परजीवी’, तीन वादग्रस्त कृषी कायद्याविरोधातील आंदोलकांना ‘खलिस्तानवादी’, बुद्धिजीवींना ‘शहरी नक्षली’ अशी लेबले सरकारकडून लावली जात आहेत. अशा प्रकारें प्रजासत्ताकाचा विचार लोप पावत असून प्रजेवरच सत्ता गाजवण्याची मानसिकता बळावत चाललेली दिसते.

लोककल्याणकारी राज्याची संकल्पना हे प्रजासत्ताक व्यवस्थेचे मुख्य सूत्र असले तरी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली प्रजासत्ताक व्यवस्था आपल्याकडे खरेच रुजली आहे का? अशी प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण करण्यात आपण किती प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत? याचा प्रामाणिकपणे ऊहापोह करायचा ठलवला तर वस्तुस्थिती नेमकी उलटी दिसते. अहमदाबाद विद्यापीठात याबाबत चिंता व्यक्त करताना स्वत: आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जी काही वैदिक – मनुव्यवस्था आहे ती उत्तरेकडे जात असेल तर संविधानाची व्यवस्था दक्षिणेकडे जात असते. या दोन्हीपैकी एक व्यवस्था स्वीकारावी लागेल. जर या दोन्ही व्यवस्था, सामाजिक किंवा संसदीय अंगांनी स्वीकारल्या गेल्या नाहीत तर लोकशाहीचा हा डोलारा कोसळेल आणि तो तसा कोसळला तरी मला याचे काही विशेष नवल वाटणार नाही’’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची नवीनच व समर्पक व्याख्या केली आणि ती म्हणजे, आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तविरहित मार्गानी क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि राजकीय भाष्यकार जॉन स्टुअर्ट मिल यांच्या भाषणाचा सारांश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय बांधवांना सावधानतेचा इशारा देत असे म्हटले होते की, ‘‘जनतेने आपले स्वातंत्र्य कितीही मोठा नेता असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की आपल्या प्राप्त अधिकाराचा वापर तो जनतेच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी करेल’’. याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘‘धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल कदाचित पण लोकशाहीतील भक्ती ही लोकशाही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’’ देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, ‘‘लोकशाहीत नागरिकांची सततची जागरूकताच लोकशाही प्रगल्भ, सुदृढ आणि सक्षम करणारी असते’’, तर महात्मा गांधींनी एके ठिकाणी नोंदवून ठेवले आहे की,‘‘हुकूमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते.’’ आज मात्र दमन आणि प्रलोभन या दोन्हीचाही धोका जाणवतो आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

आधी शैक्षणिक धोरण नीट राबवणे गरजेचे

दुहेरी पदवीची कल्पना उत्तमच आणि काळाची गरज आहे! कारण ती विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन भौतिक पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रमासह एकत्रितपणे पाठपुरावा करण्यास मदत करते. त्यामुळे, अभियांत्रिकी पदवी मिळवणारा विद्यार्थी एकाच वेळी डेटा सायन्समध्ये बीएस्सी करू शकेल. विद्यार्थ्यांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परंतु हे सर्व सत्यात उतरण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण किती प्रभावीपणे अमलात येते हे महत्त्वाचे! वास्तविक पाहता, विद्यार्थ्यांने शारीरिक अभ्यासक्रमासह ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाची निवड करण्याची अधिक शक्यता असते, कारण नंतरचा अभ्यासक्रम किती गहन असू शकतो, हे सर्वज्ञात आहे. दुहेरी पदवीचा पर्याय कोणत्याही विद्यापीठ/महाविद्यालयासाठी अनिवार्य नाही आणि विद्यापीठातील वैधानिक संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केल्यानंतर आणि नवीन प्रणाली सुलभ केल्यानंतरच तो लागू होईल अशी अपेक्षा.

– राकेश सुरगोंड, कोल्हापूर

आपल्याकडे सामावून घेण्याची परंपरा आहे?

‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृतीच!’ हा लेख (१५ एप्रिल) लेख वाचला. या लेखात रवींद्र साठे यांनी काही वरवर आणि विसंगत विधानं केली आहेत. त्यामुळे हा लेख प्रचारकी वाटतो. पहिल्याच वाक्यात ते म्हणतात, भारतीय/हिंदु संस्कृतीची स्वीकार करण्याची मोठी परंपरा आहे. पुढे म्हणतात, (भारतीय) समाजाने अनादीकाळापासून अनेक संप्रदायांना सामावून घेतले आहे. हे खरे असेल तर शेकडो वर्षे दलितांना अस्पृश्यतेची वागणूक का मिळाली? शेकडो वर्षे वर्णव्यवस्था का टिकली? मनुस्मृतीसारख्या भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या ग्रंथाला धिक्कारण्यासाठी विसावे शतक का उजाडावे लागले? 

एका ठिकाणी ते म्हणतात, अमेरिकेत राष्ट्रीय म्हणून राहायचे असेल तर तेथील राष्ट्रीय मानिबदू, अमेरिकेचा जाहीरनामा, राज्यघटना, राष्ट्रीय ग्रंथांना मानावे लागते. राष्ट्रीयत्वाच्या या अटी भारतात तंतोतंत लागू करायच्या झाल्या तर त्या परस्पर विसंगत ठरतील. कोणी म्हणाला, मला माझ्या पूर्वजांबद्दल अभिमान वाटत नाही, पण मी भारतीय राज्यघटना मानतो तर तो राष्ट्रीय ठरतो की नाही? कोणी म्हणाला, राष्ट्रीय ग्रंथ माझ्यासाठी दखलपात्र नाहीत, पण मी भारतीय राज्यघटना मानतो तर तो राष्ट्रीय ठरतो की नाही? तर्काने या प्रश्नांची उत्तरं होय अशीच द्यावी लागतील. म्हणून प्रस्तुत लेखकाने सांगितलेल्या अटी संकुचित वाटतात. याउलट, ‘मला माझ्या परंपरांचा अभिमान आहे, मी माझ्या धर्मग्रंथांना प्रमाण मानतो; पण मी भारतीय राज्यघटना मानत नाही’ असं म्हणणाऱ्याला बिगर-राष्ट्रीय ठरवायचे का? तेही संकुचितच ठरेल.

– तुषार अरविंद कलबुर्गी, धनकवडी, पुणे

हिंदु म्हणजे नेमके काय?

‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृतीच!’ या रवींद्र माधव साठे यांच्या लेखात अतिशय महत्त्वाची आणि प्राचीन माहिती आहे. यातील हिंदु आणि संस्कृती या दोन शब्दांबद्दल अधिक माहिती म्हणून हा लेखनप्रपंच. ‘हिंदु’ या शब्दाच्या उत्पत्तीबाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदु शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) ‘वेदाकडे परत चला’ असे म्हटले होते तर अरिवद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदु या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात,  the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. याउलट वि. दा. सावरकर यांनी आपल्या साहित्याद्वारे हिंदु या शब्दाची फारच स्तुती केलेली दिसते. सावरकर हे हिंदु शब्दाची उत्पत्ती व विकास बहुजन समाजापासून लपवून ठेवण्याची कारस्थानी करतात. भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात ‘हिंदु’ हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौद्ध धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुद्ध, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदु हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. ‘हिंदु’ कसल्याही प्रकारे धार्मिक शब्द नसून कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही.        

– कृष्णा बलभीम गलांडे (स्पर्धा परीक्षा विद्यार्थी) गेवराई, जि. बीड

आणखी कोणता राष्ट्रवाद अपेक्षित आहे?

‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृतीच!’ हा लेख वाचून काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • ‘कोणत्याही गोष्टीस आत्मसात करणे ही हिंदूंची परंपरा आहे’, असे लेखकाचे म्हणणे आहे. तसे असते तर चार्वाक, बौद्ध, जैन विचारांना आणि नंतरच्या बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनादेखील या देशातील हिंदूंनी आत्मसात केले असते. पण तसे चित्र काही दिसत नाही.
  • घटनाकारांनीसुद्धा संविधानात भारतीय शब्दाऐवजी ‘हिंदु कोड बिल’ शब्दप्रयोग केला आहे, असे लेखक म्हणतात. परंतु संविधानाच्या सॉफ्ट कॉपीमध्ये हा शब्दप्रयोग सापडत नाही. ‘हिंदु कोड बिल’ हे महिलांना समान न्याय, अधिकार देणारे वेगळे बिल मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत मांडले होते. यात हिंदु शब्दाचा अर्थ हिंदु धर्मीय असा अभिप्रेत होता, ‘भारतीय’ नव्हे. तेव्हा, भारतीय म्हणजे हिंदुच हा युक्तिवाद कोलमडून पडतो. 
  • अमेरिका आणि फ्रान्सची लेखकांनी दिलेली उदाहरणे पूर्णत: गैरलागू आहेत. तिथे कोणी आपली संस्कृती दुसऱ्यांवर लादताना दिसत नाहीत. भारतातून परदेशात गेलेले हिंदु मात्र तिथे आपली संस्कृती घेऊन जातात. तिथेही ते आपली मोठमोठी हिंदु देवळे बांधतात. ते सोबत आपला धर्म, संस्कृतीच नव्हे तर जाती-व्यवस्थासुद्धा घेऊन जातात. सिलिकॉन व्हॅलीतील जातीआधारित भेदभावाचे प्रकरण आणि त्यानंतर अनुसूचित जातीजमातीच्या लोकांशी भेदभाव केल्याची शेकडो प्रकरणे नंतर पुढे आली आहेत.
  • अनेक समाजसुधारकांचे कालबाह्य रूढी त्यागण्याचे आवाहन समाजाने ऐकले असते तर आज अधिक योग्य चित्र दिसले असते यास पश्चातबुद्धी म्हणावे काय? आज  समाजाला पुन्हा जुन्या रूढींकडे, ग्रंथप्रामाण्याकडे, व्यक्तिप्रामाण्याकडे घेऊन जाण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. कालबाह्य रूढींना विरोध करणाऱ्या किंवा परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांना प्रखर विरोध केला जात आहे. नास्तिक संमेलनास विरोध केला जात आहे. यात सुधारणा करण्यास अजून खूप वाव आहे. त्यावर काम न करता परधर्मीयांच्या राष्ट्रनिष्ठेवर संशय घेणे बंद केले तरी पुरेसे आहे.

– उत्तम जोगदंड, कल्याण 

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion ysh 95