scorecardresearch

लोकमानस : राजकारण व खेळ यांचा मिलाफ वाईटच

राजकारण आणि खेळ यांचा मिलाफ हा वाईट आणि तेवढाच दुर्दैवीसुद्धा. अनेक प्रतिभावान खेळाडूंचे बळी या यज्ञात गेले.

Loksatta readers response letter

खुद्द सचिन तेंडुलकर ज्याला भर सभेमध्ये स्वत:चा वारसदार म्हणून घोषित करतो, खुद्द विवियन रिचर्डस ज्याला ‘राजा’ (किंग) अशी हाक मारतात आणि कसोटी क्रिकेट क्रमवारीत क्रमांक सातवरून क्रमांक एकवर जो देशाला नेतो असा विराट कोहली, हा सर्व प्रकारच्या कर्णधारपदांवरून पायउतार करण्याइतका सामान्य क्रिकेटपटू तर नक्कीच नाही, हे त्याचे दुश्मनसुद्धा मान्य करतील. या घडामोडींमध्ये कोण सामील आहे वा कोण नाही हे येणारा काळच ठरवेल. पण न राहवून शंकेची पाल चुकचुकते आणि सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेला ‘द वॉल’ आणि बीसीसीआयचा मुख्य ‘दादा’ यांच्याविषयी असलेला आदर नकळतपणे कमी होऊ लागतो. या प्रकरणाला आपल्या गृहमंत्र्यांच्या चिरंजीवांची लाभलेली किनार, आपसूकच डोळय़ात खुपते. राजकारण आणि खेळ यांचा मिलाफ हा वाईट आणि तेवढाच दुर्दैवीसुद्धा. अनेक प्रतिभावान खेळाडूंचे बळी या यज्ञात गेले. खेळरूपाने दिसणारी अनेक मानवी रत्ने याचमुळे आपण गमावली. प्रतिभा आणि कला यांना दैवी देणगी मानतात. त्याच प्रतिभा आणि कला यांचा उत्तम संयोग घेऊन क्रिकेटच्या मैदानात वावरणाऱ्या खेळाडूला निव्वळ राजकारणापोटी पदच्युत करणे, हे आज लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनाला चटका लावणारे ठरले असेल. असो. पण वर्ल्ड कप मिळवण्याच्या नादात, एक धडाडीचा आणि सच्चा ‘कर्णधार’ या देशाने गमावला हे मात्र नक्की.  – प्रसाद बंगे, घाटकोपर (मुंबई)

कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देणारा कर्णधार

भारतीय कसोटी क्रिकेट संघांचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली याने अचानकपणे कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वाना चकित केले. ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय क्रीडा प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर कसोटी क्रिकेटकडे विराट लक्ष केंद्रित करेल असे वाटत असतानाच हा धक्कादायक निर्णय आला. रटाळ वाटणारे कसोटी क्रिकेट विराटच्या नेतृत्वाखाली मनोरंजक वाटू लागले होते. कसोटी सामने अनिर्णित राहण्याची परंपरा मोडीत काढून जास्तीत जास्त सामान्यांचा निकाल लागणारे कसोटी सामने विराटच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळाले. काहीसा चिडखोर आणि अति आक्रमक म्हणून विराटवर अनेक वेळा टीका होत गेली, परंतु खेळाशी असणारा प्रामाणिकपणा आणि मैदानावर १०० टक्के योगदान देण्याची निष्ठा हे त्याचे गुण निर्विवाद. आक्रमकतेमुळेच कसोटी सामने अधिक मनोरंजक वाटतात. परदेशात कसोटी सामने जिंकण्याची सवय विराटच्याच नेतृत्वाखाली लागली. कसोटी क्रिकेटला एका वेगळय़ा उंचीवर घेऊन जाण्यात विराटने मोलाची भूमिका बजावली आहे. पदाला किंवा संघातील स्थानाला कायमचे चिकटून राहणारे, जागा न सोडणारे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपण मागील काळात अनुभवत आहोत, परंतु या सर्वापासून दूर असणारा विराट सर्वाना पुरून उरणारा ठरला. त्याला तू चालता हो म्हणण्याआधीच त्याने स्वत:हून कर्णधारपद सोडत युवा पिढीला संधी देत त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण करून दिला. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉ आणि रिकी पॉंटिंग यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया संघाने क्रिकेट जगतावर राज्य केले त्याच धर्तीवर गेली सात वर्षे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जगभर आपला ठसा उमटविला. आगामी काळात कसोटी क्रिकेटचा विचार करता विराटच्या आक्रमक, कल्पक, जिद्दी नेतृत्वाला भारतीय कसोटी संघ निश्चितच मुकणार.  – श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे

आता द्रविडला नव्याने संघबांधणीचे काम! 

एकदिवसीय संघाचे कर्णधारपद बेमालूमपणे हिसकावून घेतल्यामुळे पडलेल्या ठिणगीने वणवा चेतवला गेला. अध्यक्ष- कर्णधार यांच्या विसंवादाच्या तेलाने भडका उडाला. त्यानंतर कसोटी कर्णधारपदही सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाने अधिक होरपळ न होता सारे शांत झाले आहे असे समजू या! विजयासाठीच खेळायचे ही आक्रमकता स्थायीभाव असलेल्या विराटने कर्णधारपदाच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत ६८ कसोटी सामन्यांपैकी ४० सामन्यांत भारतास विजयाचे मानकरी केले. २० शतके लगावली. या दोन वर्षांत मात्र तिन्ही प्रकारच्या नेतेपदाच्या ताणामुळे शतकी खेळी करण्याएवढी एकाग्रता तो टिकवू शकला नाही. कर्णधार म्हणून गोलंदाजीत केलेले निर्णायक बदल, वेळोवेळी त्यांना दिलेले प्रोत्साहन वैशिष्टय़पूर्ण होते. संघ निवडीचे, नाणेफेकीचे काही निर्णय हेकेखोरपणे घेतले, पण संघास यश मिळवून देण्यात कधीच कुचराई होऊ दिली नाही. ६० टक्के यश मिळविणाऱ्या विराटला आयसीसी कप विजेतेपद हुलकावणी देत राहिले. मुख्य प्रशिक्षक आता राहुल द्रविडला नव्याने संघबांधणीचे द्राविडी प्राणायाम करावे लागणार. विराट कोहलीला आता संघात टिकून राहण्यासाठी टिच्चून फलंदाजी करावीच लागेल, कारण पुजारा- रहाणेएव्हढा तो नक्कीच सुदैवी नाही! – हेमंतकुमार मेस्त्री, वसई रोड

पालक, शिक्षकांसह तज्ज्ञांचीही जबाबदारी..

‘ केवळ शाळेवर विसंबून चालेल ?’ हा लेख ( रविवार विशेष – १६ जानेवारी ) वाचला. करोना साथ अशीच राहिली तर मुलांच्या शिक्षणाचे भवितव्य काय हा प्रश्न आहेच, पण लेखात भर दिल्याप्रमाणे केवळ शाळेवर विसंबून राहणे चालणारे नाही. यासाठी पालकांनी स्वत: जबाबदारी घ्यायला हवी. कारण शिक्षण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे शेतकरी शेतात बीजरोपण करून स्वस्थ बसत नाही, त्याचप्रमाणे पालकांची जबाबदारी केवळ मूल शाळेत दाखल केले एवढीच नसते. शाळा व शिक्षकांच्या समन्वयाने मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर टाकण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी  लागते. मुलांच्या शाळेतील उपस्थितीवर लक्ष ठेवणे, पाल्याला नीटनेटका गणवेश करून शाळेत पाठवणे, घरचा अभ्यास करून घेणे, शाळेत  शिक्षकांची भेट घेऊन पाल्याची शैक्षणिक प्रगती तपासणे, ही पालकांची जबाबदारी असते.

या काळात शिक्षकाची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. पूर्वी घोडय़ाला पाण्याजवळ नेणे एवढेच त्याचे काम होते. मात्र  आज शिक्षकाला त्या मुलात शिकण्याची तहान निर्माण करण्याची आहे. छोटय़ा छोटय़ा बाबींचे, जे मुलांना येते त्याचे मूल्यमापन त्याच्या क्षमता विकसित करायला हव्यात. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिक चांगले मूल्यमापन साहित्य तयार करायला हवे. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी करून आपणास करोनाकाळातही शैक्षणिक प्रगती अबाधित राखता येईल.  – नवनाथ जी. डापके, खेडी/लेहा (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद)

कृतिपुस्तिकांसारखे उपक्रम उपयोगी ठरतील..

‘केवळ शाळेवर विसंबून चालेल?’ हा लेख (१६ जानेवारी) वाचला. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असलेली शाळेची दारे काही दिवसांसाठी उघडली आणि पुन्हा बंद झाली. किती दिवस बंद राहील हेही ठाऊक नाही अशा परिस्थितीत पालक, शाळा आणि समाज यांनी शिक्षण प्रक्रियेतील नव्या वाटांचा शोध घेऊन ही प्रक्रिया अखंड सुरू ठेवायला हवी, किंबहुना यासाठी कृतिकार्यक्रम राबवायला हवा. ऑनलाइन स्क्रीन टाइम कमी करून विद्यार्थ्यांच्या हाती कृतिपुस्तिका देण्याची गरज आहे, पालकांनी मुलांचे मार्गदर्शक होऊन या कृतिपुस्तिका सोडवून घ्याव्यात. प्रसंगी शिक्षकांशी संवाद साधून चर्चा करावी. केवळ ऑनलाइनने अपेक्षित अध्ययन अनुभव रुजवता येणार नाहीत.  – गणेश रघुनाथ राऊत, जळगाव

शाळा कधी सुरू करणार, याची चर्चा हवी..

‘केवळ शाळेवर विसंबून चालेल?’  हा लेख (१६ जानेवारी ) वाचला . अशा किती जरी आपत्ती आल्या तरी (ऑफलाइन) शाळेला पर्याय नाही व विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी हाडामासाच्या शिक्षकाला पर्याय नाही . तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ऑनलाइन शिक्षण किंवा कोणतेही अ‍ॅप शाळेतील शिक्षकांची जागा घेऊ शकत नाहीत! राहिला प्रश्न त्यांनी सांगितलेल्या रोहिणी लोखंडे व रमेश पानसे या शिक्षणप्रेमींनी केलेल्या शैक्षणिक प्रयोगांचा .. असे प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहेत पण ते सार्वकालिक व सार्वत्रिक यशस्वी ठरतीलच असे नाही! लेखकाने सांगितलेला ‘होम स्कूलिंग’चा पर्याय खेडय़ापाडय़ात व मुंबईसारख्या शहरांतील झोपडपट्टीत अजिबात यशस्वी ठरणार  नाही. सुस्थितीतले, शहरी पालक वेळेअभावी किंवा अन्य काही कारणांमुळे आपल्या मुलांना इतरत्र शिकवणी वर्गाला किंवा कोचिंग क्लासला पाठवतात तिथे ‘होम स्कूलिंग’चा पर्याय कसा यशस्वी ठरेल ? मागच्या आठवडय़ात सोलापूर येथील प्राथमिक शिक्षण विभागातील एका शिक्षण अधिकाऱ्याने ऑनलाइन शिक्षणासाठी गावातील प्रतिष्ठितांकडून भ्रमणध्वनी घेण्याचा अजब सल्ला दिला होता. परिपत्रक काढणे, आदेश देणे सोपे असते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती ( ग्राउंड रिअ‍ॅलिटी ) वेगळी असते हे या अधिकाऱ्यांना कोण सांगणार ? अशा चर्चापेक्षा, राज्यातील शाळा सरसकट बंद न करता स्थानिक परिस्थिती पाहूनच शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशी रास्त मागणी शिक्षक व पालक करत आहेत, त्याकडे लक्ष वेधण्याची गरज तातडीची आहे. – टिळक उमाजी खाडे (माध्यमिक शिक्षक), नागोठणे  (ता . रोहा , जि. रायगड)

चली चली रे पतंग मेरी चली रे..

दिवंगत संगीतकार चित्रगुप्त यांची आठवण ठेवणारा लेख ( रविवार विशेष- १६ जानेवारी) आवडला; पण त्यात चित्रगुप्त यांच्या आणखी गाण्यांचा उल्लेख हवा होता. निदान ‘रंग दिलकी धडकन भी लाती तो होगी’ आणि ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ ही गाणी तरी हवीच होती.  – रघुनाथ शिरगुरकर, पुणे

 loksatta@expressindia.com

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas poll opinion reader akp 94

ताज्या बातम्या