‘लोभसतेचा गौरव!’ हा अग्रलेख (२ नोव्हेंबर), आधुनिकतेसाठीच्या स्वाभाविक स्थित्यंतरात हरवल्या गेलेल्या वा लुप्त होत चाललेल्या सणोत्सवातील सात्त्विक प्रथा-परंपरांची आठवण करून देतो. एरवी करू शकत नसलेल्या गोष्टी किंवा मजा सणाच्या निमित्ताने करण्याची संधी लाभायची, तसेच एरवी सहजासहजी प्राप्त न होणाऱ्या गोष्टी जेव्हा उपभोगण्याची संमती मिळायची, तेव्हा तो आलेला योग उत्सव रूपात साजरा व्हायचा. दिवाळीसाठी नवीन कपडे मिळण्याची उत्सुकता किंवा दिवाळीच्या खरेदीसाठी सहकुटुंब सहपरिवार बाहेर पडण्याचा आनंद काय असतो, हे या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही. कारण त्या खरेदीसाठी बाजारात जाऊन, ५० दुकाने धुंडाळून आणि शेकडो कपडे नजरेखालून घातल्यानंतर शेवटी एखाद्या ढिगाऱ्याखालून एक जोड विकत घेण्याचे ‘राहणीमान’ आता कालबाह्य झाले आहे. ‘स्टेटस सिम्बॉल’च्या स्पर्धेत वर्षभर घराची सजावट होत असल्याने दिवाळीची साफसफाई आता अंगावर काटा आणणारी राहिलेली नाही. ऑनलाइन शॉपिंग माध्यमातून सर्व काही २४ तास उपलब्ध असताना दिवाळी-पहाटेला खाल्ल्या जाणाऱ्या दिवाळी फराळातील पदार्थांची चव वेगळी ती काय! पहिल्या आंघोळीच्या पहाटेचा पहिला सुतळी बॉम्ब फोडून सर्वांना दचकून जागे करणे आता गुन्हा व पर्यावरणद्रोही ठरू शकते. समाजमाध्यमांवर तुमचे कंदिलाच्या अवतीभोवती पणती पेटवताना किंवा रांगोळीशेजारी बसल्याचे फोटो (पुरावे) नसतील तर तुम्ही संस्कृतीशी प्रतारणा करत असल्याचे आरोप होऊ शकतात. फराळाच्या चित्राच्या पाश्र्र्वभूमीवर लिहिलेला ‘हॅपी-दिवाळी’ मेसेज, कॉन्टॅक्ट-लिस्टमधील सर्वांना पाठविला की आज तेच समाधान मिळते, जे पूर्वी चाळीतील सर्वांना भेटून फराळ देण्यात असायचे. असो. परिस्थितीनुरूप बदलण्यालाच प्रगती म्हणतात. आधुनिकतेच्या संस्कारात आज साजरे होणारे सण हे उद्याच्या संस्कृतीच्या प्रथा-परंपरा म्हणून अंकुरणार. पणती, रांगोळी, कंदिलामुळेच जाणवणाऱ्या आजच्या दिवाळीने मात्र पूर्वीचा तो सात्त्विक स्पर्श व सण-सुगंध हरवू न देणे ही ‘सांस्कृतिक जोपासना’ ठरेल. – अजित कवटकर, मुंबई

पूर्वीचे ते मोरपंखी दिवस परत आठवले

‘लोभसतेचा गौरव!’ हे संपादकीय वाचून ‘झक्कास’ हाच एकमेव शब्द आठवला. थेट ४० वर्षांपूर्वीच्या काळात जाऊन पोहोचलो. आताशा बऱ्याचशा गोष्टी केवळ आठवणी ठराव्यात इतक्या इतिहासजमा होऊ लागल्यात. माझ्या आयुष्यातली सुरुवातीची २५ वर्षे मी मोरीत आंघोळ केलीय. दिवाळीच्या दिवसांत तीच मोरी एकदम निराळी वाटायची. अभ्यंगस्नान झाल्यावर आई, नाही तर बहीण ओवाळायची. आताच्या चकचकीत बाथरूममध्ये तो फील येत नाही. आपण याचे खापर काळावर फोडले तरी मनात कालवाकालव होतेच. नुसती दिवाळीच कशाला, कोणताही सण घ्या. एक विशिष्ट अदब ठेवून, पावित्र्य सांभाळून, परंपरेचे अवडंबर न करता ते साजरे होत. कारण त्यात धंदा आणि राजकारण नव्हते शिरलेले. कोणत्याही सणाचा इव्हेन्ट झालेला नव्हता. साध्या पोस्टकार्डवर नुसते पणतीचे चित्र काढून ‘शुभ दीपावली’ लिहून आलेलं ग्रीटिंग बघण्यात निराळी मजा होती. आता शुभेच्छासुद्धा रेडिमेड मिळतात. आपण फक्त त्या फॉरवर्ड करायच्या. सगळे कृत्रिम आणि एक काम पार पाडल्यासारखे. भावनाबिवना गेल्या तेल लावत. नरकचर्तुदशीला आम्ही पहाटे चार वाजता उठावे  म्हणून आई नरकाची भीती घालायची आणि ती खरी मानून आम्हीही मुकाट उठायचो. आता  झोपण्याच्या, जेवणाच्या वेळा माणसांसारख्या बदलल्या. एकीकडे आपण संस्कृती, परंपरा यांचे गोडवे गातो आणि दुसरीकडे लगेच त्यावर बोळा फिरवतो. काळाचा महिमा तो हाच. काळ खरेच इतका निष्ठुर असतो का, माहीत नाही. आता फक्त आठवणी. संपादकीयामुळे त्यावर हलकीच झुळूक फिरली.  आमचे मोरपंखी दिवस आमच्यासमोर आणल्याबद्दल आभार. – संजय जाधव,  धुळे

आताचे सुखवस्तू की तेव्हाचे कमनशिबी?

‘लोभसतेचा गौरव’ संपादकीय वाचून जणू आठवणींच्या तिमिर समुद्रात न्हाऊन गेलो. दिवाळी सणाची आतुरता, रंग, रूप, नवीन कपड्याचे कुतूहल सारेच जणू विलोभनीय होते. सहामाही परीक्षांचा शेवटचा दिवस आणि किल्ला बनवण्याचा श्रीगणेशा एकाच दिवशी. गल्लीतील मुले एकेका घरी जाऊन माती, दगड, विटा आणून सुबक किल्ला करायची आणि त्यांच्या बहिणी त्या किल्ल्याभोवती सुंदर रांगोळी काढायच्या. पहिली पणती किल्ल्यावर अशी ताकीदच असायची तिला. सर्वात जास्त कुणाच्या दारात फटाक्यांचा कचरा होतोय यावरून लहानग्यांमध्ये चुरस असायची. सर्व मुले एकमेकांच्या घरी सकाळी फराळ करायला जायची. आजच्या कॉर्पोरेट जमान्यात ५०-५० ग्राम काजू, बदाम, पाच पाच रुपयांच्या बॉक्समध्ये टाकून ज्याचा आणि दिवाळीचा शतकानुशतके संबंध नाही अशा वस्तूंवर ‘हॅपी दिवाली’ लिहून आपणच आपली संस्कृती भरकटवत आहोत.

ते सगळे काल्पनिकच वाटावे इतका आता काळ बदलला आहे. तेव्हा होती निखळ नाती, जिव्हाळा, ऋणानुबंध. शेजारधर्म होता आणि तो चोख पाळलाही जायचा. दिवाळीला आम्ही आजोळी जायचो. नवीन कपडे, खायचे लाड, रोज मेजवानी असायची. आजकाल कोणी रक्ताचे नातेवाईकही एकमेकांकडे सुट्टीला जात नाहीत. मावसभाऊ- बहीण, आतेभाऊ- बहीण, मामा-मामी ही नाती केवळ व्हॉट्सअ‍ॅप फॅमिली ग्रुपपुरतीच राहिली आहेत. आजच्या जगातल्या लोकांनी आत्मशोध घ्यावा की ते २१व्या शतकातील सुखवस्तू आहोत की २०व्या शतकात न जन्मलेले कमनशिबी आहेत?  – व्यंकटेश नंदकुमार भोईटे, फलटण

लहानपणीची ती दिवाळी पुन्हा गवसली…

सोमवारी सायंकाळी लेकीने प्रश्न विचारला, दिवाळीत एवढे काय विशेष असते? आम्ही पती-पत्नी भांबावलो. दिवाळीतील पदार्थ आता खाऊ म्हणून नेहमी मिळतात आणि कारणाशिवाय सतत कपड्यांची खरेदी होते. आजूबाजूला प्रकाशच एवढा की दिवाळीतील दिवे उपचार झालेत. त्यातूनही पूर्वी कसे अप्रूप होते ते सांगण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तो तोकडा होता. मंगळवारी सकाळी तिनेच ‘लोकसत्ता’चे संपादकीय आमच्यासमोर ठेवले आणि ती दिवाळी पुन्हा गवसली.   – राहुल तांबोळी, भुईंज (जि. सातारा)

स्वराधीन जोग आता दैवाधीन झाले

गायकांच्या गळ्यामध्ये गंधार असतो, आणि त्यामधून निघणाऱ्या स्वरांनी तो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो. त्याप्रमाणेच काही वादकांच्या बोटांना जणू डोळे असतात आणि मग ही बोटे वाद्याच्या ज्या अंगाला स्पर्श करतात, त्यातून वेगवेगळे सूर अन् ताल बाहेर पडतात, आणि ऐकणाऱ्याला मोहवून टाकतात. प्रभाकर जोग हे यापैकी एक. खेळण्याशी गट्टी करण्याच्या वयात आजीने दिलेल्या व्हायोलिनशी त्यांचे सूर  जमले आणि तेच त्यांच्या आयुष्यातील दैवत झाले. व्हायोलिनला गायला लावणारे जोग असे त्यांचे प्रारब्ध ठरले. आपल्या डाव्या खांद्यावर व्हायोलिन आणि उजव्या हातामध्ये बो स्टिक घेऊन, प्रभाकर जोग मंचकावर अवतरले, की एखाद्या गायकाच्या गळ्यातून जसे सूर बाहेर पडतात तसेच प्रभाकर जोगांच्या व्हायोलिनमधून गाणे बाहेर यायचे आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन जायचे.

 प्रतिभासंपन्न कवी गदिमा आणि गायकीचे वरदान लाभलेले बाबूूजी यांच्या सोबतीने ‘गीतरामायण’चे जे स्वर्गीय लेणे मराठी मुलखात सादर झाले, त्याने जवळपास तीन पिढ्यांचे सांगीतिक पोषण केले. कुठेही लांबच्या प्रवासाला जाताना गाडीमध्ये प्रभाकर जोग यांची सीडी लावावी. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य बघत, जोगांचे गाणारे व्हायोलिन ऐकत लांबचा प्रवास कधी संपतो ते पण कळत नाही. शिवाय जोगांच्या संगीताने त्या प्रवासाचा शीणही जाणवत नाही ते वेगळेच. पुलंच्या भाषेत सांगायचे तर आपल्या कारकीर्दीचा उत्तुंग वारसा मागे ठेवून ‘स्वराधीन जोग आता दैवाधीन झाले आहेत’. या मनस्वी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली, – अनिल साखरे, ठाणे</strong>

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी अनेक प्रयत्न गरजेचे

‘२०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य’ (२ नोव्हेंबर) हे वृत्त वाचले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रकारे प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात भारताचे महत्त्वाचे योगदान आहे. कारण आपण मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जेच्या वापरातून नवीकरणीय ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देत आहोत. ग्रामीण भागांतील प्रदूषणाचा वाटा कमी करण्यासाठी स्वयंपाकाचा गॅस उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून पुरवला जातो. त्याचबरोबर सीएनजीधारक वाहनांनादेखील चालना दिली जात आहे. परंतु हे सर्व करत असताना आज देशात स्वयंपाकाच्या गॅसची वाढती किंमत आणि सीएनजी पंपाची खूप कमी प्रमाणात असणारी संख्या हे आपल्या २०७० साठीच्या ध्येयप्राप्तीसाठी अडथळा ठरू शकतात. कारण गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्याला प्राधान्य दिले जात आहे आणि यातून पुन्हा प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून पुरवला जाणाऱ्या गॅसच्या किमती देशपातळीवर नियंत्रणात आणायला हव्यात. त्याचबरोबर हे कार्बन संबंधित ध्येय गाठण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे गरजेचे आहे आणि संबंधित पायाभूत सुविधा जसे की चार्जिंग स्टेशनसारख्या सुविधांची योग्य प्रमाणात स्थापना केली पाहिजे. – योगेश संपत सुपेकर, निघोज, (ता. पारनेर, जि. अहमदनगर)

पाणी, शेती हे विषय अभ्यासक्रमात हवेत

‘पाण्याची नवी गाणी’ हा मिहिर शाह यांचा लेख (२ नोव्हेंबर) वाचला. प्राथमिक शिक्षणापासून पाणी हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. भाषा, विज्ञान, गणित या मूलभूत विषयांसारखाच कृषी हा विषयदेखील महत्त्वाचा आहे. पाणी संवर्धनासोबतच माती संवर्धन करणे महत्त्वाचे आहे हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. त्यावरचे संशोधन, उपाय यांचे महत्त्व पटवून देऊ तेव्हाच समस्येवर मात करणे काही प्रमाणात शक्य होईल.  – सूरज भगत, भेंडगाव (जि. अकोला)

loksatta@expressindia.com