‘१९४७ सालात भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही ब्रिटिशांनी दिलेली भीक होती (आणि २०१४ मध्ये मिळाले ते खरे स्वातंत्र्य)’ असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने १५० वर्षे पारतंत्र्यात असलेल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या देशभक्तांनी लढा दिला, तुरुंगवास भोगला, प्राणार्पण केले त्या स्वातंत्र्यसैनिकांचा, नेत्यांचा अवमान केला आहे. नुकताच तिला भारत सरकारने ‘पद्माश्री’ हा मानाचा पुरस्कार देऊन सत्कार केला आहे, तो सरकारने मागे घेऊन देशाचा व स्वातंत्र्यसैनिकांचा  अवमान केलेल्या या करोना राणावतवर देशद्रोहाची कलमे लावून कठोर कारवाई केली पाहिजे. – अनंत आंगचेकर, भाईंदर

‘बोलवित्या धन्यां’ची निवडणूक -नीती

स्वातंत्र्याबाबत कंगना राणावतने उधळलेली मुक्ताफळे पहाता पद्मा पुरस्काराचे किती अवमूल्यन झाले आहे, देणारे व घेणारे कोणत्या पातळीपर्यंत खालावले आहेत, हेच दिसून येते. कंगनाच्या वक्तव्यामागील ‘बोलविता धनी’ कोण असावा हे वाचकांनीच ठरवावे. २०२२ साली पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक प्रचाराची दिशा काय असेल हे या वक्तव्यातून दिसून येते. कंगनाचे वक्तव्य हा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग आहे हे वाचकांनी समजून घ्यावे.   –  जयंत दिवाण, गोरेगाव पश्चिम (मुंबई)

प्रसिद्धी देणे हाही उद्देशांना पाठिंबाच!

‘लोकसत्ता’ने पहिल्या पानावर रंगीत फोटो सकट कुणा अभिनेत्रीच्या निर्बुद्ध, विकृत आणि केवळ प्रसिद्धीलोलुप वक्तव्याला दिलेली प्रसिद्धी बघून अतिशय वेदना झाल्या. या अभिनेत्रीने केवळ हेडलाइन मिळण्यासाठी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत आपल्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या लाखो सैनिकांचा भर व्यासपीठावर अपमान केला आहे. त्यावर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवाव्या हे तर अतिशय लाजिरवाणे आहे. ‘भक्त’गणांच्या – आणि ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग राहू द्या पण समर्थन देण्याचेही नाकारले अशांच्या-  व्हॉट्सअ‍ॅप जगात मिरवणाऱ्या या वाक्यांना ठळक प्रसिद्धी देणे हेच तिच्या स्वार्थी उद्देशांना प्रत्यक्षात आणण्यासारखे, म्हणून चुकीचे ठरते.  – मीनल उत्तुरकर, ठाणे</strong>

मोक्याच्या जागा व मालमत्तांसाठी सारे काही…

‘नवे गिरणी कामगार’ हे संपादकीय वाचले. तुटेपर्यंत ताणायचे नसते हे खरे असले तरी आज हा संप कुठल्याच कामगार नेत्याच्या हातात राहिलेला नसून तो फरपटत जाऊन राजकीय झालेला आहे. कालच्या व आजच्या राज्यकर्त्यांनी एसटीच्या मोक्याच्या जागा व मालमत्ता पाहून राबविलेली धोरणे व वाढते खासगीकरण यामुळे एसटीचा तोटा वाढत आहे. अतिशय इमानेइतबारे कर्तव्य करणाऱ्या कामगारास याची शिक्षा होत असेल व तुटपुंज्या पगारामुळे कामगारांच्या आत्महत्या वाढत असतील तर सरकारने त्यांना चांगले वेतन मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.   – शीला संजय नाईकवाडे [केंद्रीय उपाध्यक्षा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना]

 सैन्याचा गणवेश योग्य ठरतो का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवर सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करतात, ही बाब अतिशय चांगली आहे. ‘लोकसत्ता’सारखी दैनिके त्याची दखलही घेतात. सैन्याला प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मोदी प्रयत्न करतात यात आनंदच आहे; परंतु हे करताना मोदींनी सैन्याचा गणवेश परिधान करणे कितपत योग्य वाटते? सैनिकांचा गणवेश परिधान करण्यासाठी आणि भारतीय राजमुद्रा असलेली टोपी घालण्यासाठी एक विशिष्ट अर्हता प्राप्त करावी लागते.    – केदार किरण कुलकर्णी, औरंगाबाद</strong>

हा प्रवास विनाशाकडे…

‘किधर जाओगे लोगो?’ हा अग्रलेख (११ नोव्हेंबर) वाचला. विविध क्षेत्रांतील प्रगती पाहता जग आता एक झाले आहे. त्याचबरोबर नानाविध समस्याही डोके वर काढत आहेत. नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा पुरविणे स्थानिक प्रशासन, शासनाची जबाबदारी आहे. परंतु दररोज लोकांचे, नागरिकांचे लाखोंचे लोंढे महानगरे, शहरांकडे येत असल्याने सर्वांना चांगल्या सुविधा मिळतील याची शाश्वती नाही किंबहुना त्या मिळतच नाही. शहर वाढताना त्याचे पूर्ण नियोजन केले तर अनेक समस्या सुटू शकतात, परंतु आपल्या येथे नियोजन तर सोडाच याबाबत दूरदृष्टीचाच अभाव आहे. त्यामुळे समस्यांचा विळखा वाढतो. दरम्यान, शहरी भागात सातत्याने उद्भवत असलेली पूर परिस्थिती आगामी काळात खूप मोठे गंभीर रूप धारण करू शकते, याचा सखोल अभ्यास करून हे कशा पद्धतीने रोखता येईल, हे तातडीने पाहणे अनिवार्य आहे. अन्यथा विनाश अटळ आहे.  – वैभव विक्रम पुरी, मुरुड ( ता. जि. लातूर)

विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करणे गरजेचे…

‘शिष्यवृत्तीची रक्कम तुटपुंजीच, परीक्षा शुल्कात मात्र वाढ’ ही बातमी (लोकसत्ता-१२ नोव्हेंबर) वाचली. नव्या शासन निर्णयानुसार काही प्रमाणात शिष्यवृत्ती परिक्षा फी वाढवण्यात आली असून त्यासाठी विविध कारणे देखील देण्यात आली आहेत. परंतु सद्य करोना परिस्थिती लक्षात घेता, सरकारने ही फी वाढ तात्काळ न करता काही काळाने केली तर सर्वसामान्य विद्याथ्र्यंना नक्कीच दिलासा मिळेल. फी वाढ करताना ज्या प्रकारे सरकारने कारणे दिली त्याच प्रमाणे परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, कारणे जाणून सरकारने शिष्यवृत्ती रकमेत देखील वाढ करणे गरजेचे आहे असे मला वाटते. कारण विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करणे देखील गरजेचे आहे. – हर्षल सुरेश देसले, धुळे</strong>

 उपचार पाहिजेत कोणाला?

‘इतरांना जबाबदार धरणे हीच खरी समस्या’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस १० नोव्हेंबर) वाचले. भावना दुखावण्यावर लोकांना औषध पाहिजे आहे असे त्यांनी गृहीत धरले आहे; परंतु भावना दुखावून घेणे हे तर आमचे शस्त्र आहे!  जितक्या जास्त लोकांच्या भावना दुखावतील, तितके ते शस्त्र अधिक धारदार होणार. अर्थात उपचार नकोच आहेत, उलट आजार जितका बळावेल, तितके उत्तम! – सुभाष आठले, पुणे

loksatta@expressindia.com