‘होती तीही गेली’ हे संपादकीय (२३ जून) वाचले. सहकारी बँकांबद्दल असा निर्णय घेण्याचा सल्ला रिझव्‍‌र्ह बँक व अर्थमंत्र्यांना कोणी  दिला? मोदी सरकारने शरद पवार यांच्या पायाशी सपशेल लोटांगण का बरे घातले?  सर्वोच्च न्यायालयाने सांगूनदेखील रिझव्‍‌र्ह बँकेने, अर्थमंत्र्यांनी का उशीर लावला?  पूर्वीच्या निर्णयामुळे राजकीय नेत्यांचा काळा पैसा बाहेर येणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायलाच हवीत. सहकारी बॅँकांवर र्निबध घातल्याने तेव्हा राजकीय नेत्यांबरोबर गरीब शेतकरीदेखील  भरडला गेला.असंख्य शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली, त्यांचे  संसार उघडय़ावर आले. त्यामुळे  असा बिनडोक निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी.

– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वेसावे (मुंबई)

 

मोदींचा तापदायक हट्टयोग

लखनौमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या योग शिबिरात अचानक झालेल्या पावसामुळे काहींची प्रकृती बिघडली आणि अनेकांना सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याची बातमी (२२ जून) वाचली. खरेच हाच योगाचा संदेश आहे का? योग हा केवळ शारीरिक पातळीवरच केला जातो असे नाही, तर तो करत असताना विवेक जागृत असणेही तितकेच महत्त्वाचे असते. म्हणजे तो मानसिक पातळीवरही केला जातो. त्यासाठीचे यम आणि नियमही माहीत असणे गरजेचे आहे. अन्यथा पाऊस पडत असताना योग करणे उचित नाही हे कोणाही योगकर्त्यांला त्याच्या विवेकबुद्धीने सांगितलेच असते व तात्काळ योगसत्र पाऊस बंद होईपर्यंत थांबवणेच योग्य ठरले असते;  परंतु पंतप्रधान मोदींनीच योगसत्र सुरूच ठेवून हट्टयोगाचे चांगलेच प्रदर्शन घडविले. त्यामुळे अनेकांना योगसाधनेनंतर उपचारासाठी दवाखान्यात पाठवावे लागले.

खरे तर हे टाळता आले असते, परंतु इव्हेंटप्रिय मोदींना ते कसे पटणार आणि कोण समजावणार हाही मोठा प्रश्न आहे. त्यांनी भर पावसात योगसत्र सुरूच ठेवले. म्हणून योग हा केवळ उत्सवासारखा एक दिवसापुरता साजरा न करता साधकबाधक पद्धतीने जीवनशैली म्हणून अंगीकारण्यातच खरे शहाणपण आहे, अन्यथा योग केल्यानंतर दवाखान्यात जावे लागणे हे खूपच हास्यास्पद आहे.

– सचिन वाळीबा धोंगडे, अकोले (अहमदनगर)

 

जलयुक्त शिवार व मतभिन्नता

जलयुक्त शिवार योजनेत महाराष्ट्रात २७ जिल्ह्य़ांत प्रत्येकाला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने घेण्यात आला. मराठवाडय़ात आठ जिल्ह्य़ांसाठी आठ कोटी रुपये अलीकडेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ही बातमी वाचत असतानाच मराठवाडय़ातील जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी जलयुक्तमध्ये साठलेल्या पाण्याचे दावे फसवे असल्याचे परभणीतील सभेत म्हटले. जलव्यवस्थापनात महाराष्ट्राचे तीनतेरा वाजले असून मराठवाडा वाळवंटीकरणाकडे वाटचाल करीत असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले. या क्षेत्राचे ज्ञान नसलेल्या सामान्य माणसांनी यातले काय खरे समजावे? या विषयातील गाढा अभ्यास असणारे धुरीण यावर काही प्रकाश टाकतील का?

– शरद लासूरकर, औरंगाबाद</strong>

 

‘ऐतिहासिक घोडचुकी’चे कवित्व

१९९६-९७ च्या सुमारास ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्याची विनंती बिगरकाँग्रेस व बिगरभाजप पक्षांनी केली होती; परंतु मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने ती फेटाळली. त्यानंतर २००७ मध्ये अमेरिकेशी ‘अणुकरार’ करण्याच्या मुद्दय़ावरून दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी अविचाराने मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या दोन्ही वेळी कम्युनिस्टांनी ‘ऐतिहासिक घोडचूक’ केली असे म्हटले गेले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘ऐतिहासिक घोडचूक’ हा शब्दप्रयोग पुन्हा एकदा ऐकायला मिळाला. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकजुटीने उमेदवार उभा करायला हवा, अशी आग्रही भूमिका प्रथम नितीशकुमार यांनीच घेतली.  पण भाजपने  कोविंद यांचे नाव  जाहीर केल्यावर नितीशकुमार यांनी  टोपी फिरवली व कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. यावर प्रतिक्रिया देताना लालूप्रसाद यादव यांनी कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीशकुमार ‘ऐतिहासिक घोडचूक’ करत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत कम्युनिस्टांशिवाय इतरांच्या बाबतीत हा ठेवणीतला शब्दप्रयोग ऐकायला मिळाला, हेही नसे थोडके.

– जयश्री कारखानीस, मुंबई

 

अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांना दिलासा

अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडितांना सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने सरकारला सादर केला आहे. तसेच बढतीत आरक्षण व वयोमर्यादेतही सवलत अशा शिफारशी प्रस्तावात केल्याने पीडितांना दिलासा मिळाला आहे. अ‍ॅसिडहल्ल्यातील पीडित आजही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या पीडितांची चूक नसतानाही आयुष्यभर त्यांना शिक्षा भोगावी लागते. अशा वेळी स्वत:चे अस्तित्व घडविण्यासाठी समाजात धडपडत असताना शिक्षण, नोकरी या क्षेत्रांमध्येही त्यांच्या पदरी आता निराशा येणार नाही.

– विवेक तवटे, कळवा

 

मुस्लिमांमध्ये नाव लिहिण्याची पद्धत वेगळी

मुस्लीम जगतात (अरब तसेच मलेशिया, इंडोनेशियासारख्या दक्षिण-पूर्व देशांतसुद्धा) व्यक्तीचे नाव लिहिताना प्रथम स्व-नाम व नंतर पित्याचे नाव लिहिण्याची पद्धत आहे. मोहम्मद बिन सलमान म्हणजे सलमान यांचा पुत्र मोहम्मद (रझिया बिन्ती सलमान म्हणजे सलमान यांची मुलगी/पुत्री रझिया). मुस्लीम जगतात आडनावे लिहिण्याची प्रथा नसल्याने व्यक्तीची अचूक ओळख पटण्यासाठी व्यक्तीच्या नावापुढे पित्याचे नाव लिहिणे अत्यावश्यक ठरते.

ब्रिटिश राजवटीत मुंबईतल्या गिरणी कामगारांची नावे लिहिताना अशीच (आडनाव न लिहिता) स्व-नामानंतर पित्याचे नाव लिहिण्याची पद्धत होती.

२२ जूनच्या अग्रलेखात जिथे जिथे ‘राजपुत्र सलमान’ असा उल्लेख आहे तिथे तिथे तो ‘राजपुत्र मोहम्मद’ असा असायला हवा होता. त्यामुळे अग्रलेखाचा मथळाही ‘सलमान आणि मोहम्मद’ असा असायला हवा होता.

– डॉ. विभावरी निगळे, गोरेगाव (मुंबई)