‘भूमिका आणि प्रवृत्ती’ या ‘अन्वयार्था’त (२४ जानेवारी) ‘महात्मा गांधींच्या खुन्याने आपल्या कृत्याचे कितीही समर्थन केले, तरी त्यावर आधारलेले नाटक/चित्रपट हे कलात्मक अभिव्यक्ती ठरतात की निव्वळ एका हीन प्रवृत्तीचा प्रचार, खुनाचे अप्रत्यक्ष समर्थन?’ हा जो मूलभूत मुद्दा उपस्थित केला आहे तोच संबंधितांनी उपस्थित करायला हवा होता. वास्तविक नथुरामने त्याच्या खुनाच्या समर्थनार्थ जी कारणे दिली आहेत ती किती तकलादू आणि असत्य आहेत आणि खरे कारण गांधी आणि मुस्लिमद्वेषच कसा हे अनेक सिद्धहस्त लेखकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. नथुरामचा अपिलाचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर चालला त्यापैकी न्या. जी.डी. खोसला यांनीसुद्धा त्यांच्या ‘द मर्डर ऑफ द महात्मा’ या पुस्तकात नथुरामच्या न्यायालयातील विद्वेषी आणि असत्य जबानीसंदर्भात सविस्तर मत नोंदविले आहे. पण या सर्वाचा कसलाच प्रतिवाद न करता पुन:पुन्हा नथुरामच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तो कलाविष्कार असूच शकत नाही. या संदर्भात डॉ. श्रीराम लागू यांचा दृष्टिकोन कुठल्याही कलाकारासाठी मार्गदर्शक ठरू शकेल. ‘लोकमान्य ते महात्मा’ ह्या द्विखंडात्मक ग्रंथात डॉ. सदानंद मोरे यांनी तो मांडला आहे.

‘नथुरामवरील नाटक लिहिणारा लेखक नथुरामच्या भूमिकेची सुपारी घेऊन डॉक्टरांकडे आला होता. लागू हे गांधींच्या बाजूचे असल्यामुळे ते गांधींना गोळी घालून मारणाऱ्याचे काम करतील का, अशी शंका लेखकाला होती. लागूंनी या नाटकात नथुरामची भूमिका करायचे नाकारले, परंतु ते गांधींच्या बाजूचे असल्यामुळे नव्हे. आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘माझी स्वत:ची राजकीय, सामाजिक मते काय आहेत, याचा मी नाटकात करीत असलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही. प्रश्न मी कोणाच्या बाजूचा आहे, हा नसून भूमिका-नाटक कसे आहे, हा आहे!’’ प्रस्तुतचे नाटक वाचल्यावर लागूंच्या असे लक्षात आले की, नाटकात फक्त नथुरामचा एकांगी विचार (अथवा अविचारच) मांडलेला आहे. ‘‘ज्या विचाराशी त्याचा संघर्ष आहे, असा दावा आहे, तो गांधीविचार मुळी मांडलेलाच नाही. गांधींचे पात्र इतका थोडा वेळ नाटकात आहे आणि इतके फालतू आहे की, इतक्या फालतू माणसाला मारणारा माणूस मोठा शूरवीर हुतात्मा कसा काय होऊ शकतो?.. नथुरामच्या तोंडी गांधींविषयी इतकी असत्य विधाने एकामागून एक घातली होती की या लेखनाला नाटक न म्हणता धादांत असत्य प्रचार करणारे, म्हणजे हिटलरच्या जर्मनीत गोबेल्सच्या प्रचारतंत्राचा जो प्रकार होता, त्या प्रकारचे ‘पथनाटय़’ म्हणता येईल. वैचारिकता, सत्यकथन, प्रामाणिक मनोविश्लेषण इत्यादी कुठल्याच निकषावर नाटक टिकत नव्हते’’ असा निष्कर्ष नोंदवून लागू विचारतात, ‘‘मग इतके धडधडीत एकांगी, सत्यापलाप करणारे नाटक लेखकाने का लिहिले असावे?’’ प्रश्नाचे उत्तरही लागूच देतात, ‘‘त्याचे कारण मला असे दिसते की, ‘गांधीविरोध’ हा एक विशिष्ट वर्गाला झालेला नायटा आहे! हे एक जुनाट चामडीचे दुखणे आहे..कधी कधी त्याला एकदम खूप खाज सुटते आणि खाजवले म्हणजे अगदी अमानुष आनंद मिळतो.’’’ ( पृष्ठ : १०११/१०१२)

डॉ. लागूंचे वरील ‘चिंतन’ हे फक्त कलाकारांसाठीच उपयुक्त आहे असं नाही तर एक प्रेक्षक म्हणून अशी नाटकं किंवा चित्रपट ‘सत्यकथन’ म्हणून स्वीकारायचे का, हे ठरविण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे.

अनिल मुसळे, ठाणे

नायक म्हणून कोणाचे उदात्तीकरण करणार?

‘खासदार अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसे याच्या भूमिकेवरून वादंग’ ही बातमी (२२ जानेवारी) तसेच ‘भूमिका आणि प्रवृत्ती’ हा ‘अन्वयार्थ’ (२४ जानेवारी) वाचला. कलाकाराने कोणती भूमिका करावी याचे जरी त्याला स्वातंत्र्य असले तरीही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला नायकत्व देणाऱ्या चित्रपटात विचारी कलाकाराने भूमिका करणे मात्र आक्षेपार्हच ठरते.

‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या चित्रपटात नथुरामाचे उदात्तीकरण करण्यास हातभार लावलेले अमोल कोल्हे महाशय, उद्या ‘मी संभाजीला का मारले?’ असा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा चित्रपट निघाला तर त्यात औरंगजेबाचे काम करण्याचे धारिष्टय़ एक कलाकार म्हणून दाखवतील काय?

अमोल कोल्हे आता म्हणतात की, ‘गांधीहत्येला माझे समर्थन नाही’ तरीही कलाकार म्हणून ही आव्हानात्मक भूमिका मी केली. या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रीराम लागू यांचे उदाहरण डोळय़ासमोर ठेवावे. ‘नथुराम’च्या भूमिकेसाठी स्पष्ट नकार देताना डॉ. लागू म्हणाले होते- ‘‘नथुराम हा हैवान होता. त्याचे पडद्यावर, पडद्याबाहेर कुठेही कधीच समर्थन होऊ शकत नाही.’’ प्रभाकर पणशीकरांनी नाटकात, तर डॉ. श्रीराम लागू यांनी एका चित्रपटात औरंगजेबाची भूमिका स्वीकारली. पण त्यात औरंगजेबाला नायक म्हणून पेश केले नव्हते. निळू फुले यांच्या खलनायकी भूमिकाही लोकांनी खलनायक म्हणूनच स्वीकारल्या होत्या. 

परंतु येथे गेल्या काही वर्षांमध्ये नथुराम गोडसेची इतिहासातील भूमिका कशी योग्य व गांधीजींची कशी अयोग्य होती, हे पटवून देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. नथुराम गोडसेची नायक म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा व त्याचे देऊळ बांधून उदात्तीकरणाचा पुष्कळ प्रयत्न झालाय, तर गांधीजींना खलनायक दाखवण्याचा आटापिटा सुरू आहे.

थोडक्यात काय तर, नराधम नथुरामचा उदोउदो करून गांधीद्वेषाची कितीही परिसीमा गाठली तरी गांधीजी कधीही मरत नाहीत.. मरणार नाहीत याचे वैषम्य काही विशिष्ट लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. परिणामी जागतिक स्तरावर मोदींनाही दिखाव्यासाठी का होईना पण गांधीजींना वंदन करावे लागते.

जगदीश काबरे, बेलापूर, नवी मुंबई</strong>

कोल्हे-पवार यांनी थेट बोलावे

सिनेमा – नाटक मग ते कलावादी, जीवनवादी वा प्रचारकी काहीही असो, त्यातील विचाराशी सहमत असो नसो, त्यात भूमिका करण्याचे स्वातंत्र्य कलावंताला घटनेने दिले आहे. एखाद्या पक्षात गेल्यावर, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावरही हे त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहते. पक्षाच्या भूमिकेविरोधातल्या भूमिकेचा प्रचार करणारा कलावंत आपल्या पक्षात ठेवायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच पक्षालाही आहे. कलावंत म्हणून एखादी भूमिका करणे म्हणजे त्या भूमिकेचे असणे नव्हे, ही बाब अमोल कोल्हे व शरद पवार दोघेही मानतात. मात्र त्याच वेळी ही घटना म्हणजे फिल्म कोल्हे पक्षात येण्याच्या आधीची आहे, असेही कोल्हे व पवार आवर्जून नमूद करतात. याचा अर्थ, आता अशी भूमिका आल्यास ती कोल्हे करणार नाहीत, असा होतो. कलावंत म्हणून अशी भूमिका करण्याचे स्वातंत्र्य पक्षात आल्यावरही का असू नये, याचे उत्तर हे दोघेही देत नाहीत. म्हणजेच जी भूमिका कोल्हेंनी केली आहे, तिच्यातून ज्या विचारांचा प्रचार जनतेत होतो, ती त्यांच्या पक्षाला अडचणीची आहे.

अशा वेळी अमोल कोल्हे यांचे निवेदन पुढीलप्रमाणे असायला हवे : ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसताना ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या सिनेमामध्ये मी नथुराम गोडसेची भूमिका केली. तो माझा भूतकाळ आहे. आता अशी भूमिका मी करणार नाही. या सिनेमामधून तसेच माझ्या भूमिकेतून जो संदेश जातो, तो अत्यंत गैर आहे. राष्ट्रविघातक आहे. स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून उत्क्रांत झालेल्या मूल्यांना – आयडिया ऑफ इंडियाला- उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तींचा प्रतिनिधी म्हणून नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली, असे माझे स्पष्ट मत आहे.’

कलावंत म्हणून सहमत असण्या-नसण्याचा, अफजलखानादी खलनायकांची भूमिका कलावंतांनी करण्याचा गोलमोल मुद्दा कोल्हे वा पवारांनी मांडू नये.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोल्हे असताना काय असायला हवे ते थेट बोलावे.  देश ज्या पायावर उभा केला गेला, तो उखडून टाकण्याच्या आजच्या फॅसिस्ट राजकारणाचा नथुरामचा प्रकट व प्रच्छन्न उदोउदो हा कळीचा घटक आहे. हे लक्षात घेता कोल्हेंचा मुद्दा कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य एवढय़ापुरता राहत नाही, हे समजण्याचे ‘जाणतेपण’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही असे कोण म्हणेल?

सुरेश सावंत, मुंबई

केंद्र सरकारने मनमानी थांबवावी

‘आकार आणि आशय’ हे संपादकीय वाचले. त्यावरून हे कळते की केंद्र सरकार कोणताही निर्णय घेण्याआधी त्यासंबंधी त्याचा पूर्वेतिहास, सद्य:स्थिती अथवा भविष्यात होणाऱ्या परिणामाच्या मीमांसेबाबत विचार करून मुळीच प्रगल्भता दाखवत नाही. शेती सुधारणा, जमीन हस्तांतरणबाबत केंद्राचा निर्णय पूर्णपणे फसला. आताही तेच घडत आहे, या निर्णयाने केंद्र-राज्य संबंधास बाधा तर निर्माण होईलच त्याहीपेक्षा प्रशासकीय व्यवस्थेचं हे नुकसान होईल त्याचं काय? या अशा निर्णयाने केंद्र-राज्य संबंधामध्ये दरी निर्माण होईल यात शंका नाही. केंद्र आपल्या सोयीने वागेल तर राज्येसुद्धा आपल्या सोयीने वागतील. यामुळे केंद्र सरकारने घटनाकारांनी घटनेत नमूद केलेल्या केंद्र-राज्य संबंधांत  बाधा येईल असे निर्णय घेणे म्हणजे घटनाविरोधीच. यात वेळेत सुधारणा व्हावी.

राहुल प्र. स्वामी, अक्कलकोट (जि. सोलापूर)

या भू माफियांना थोपवण्याची गरज

‘मिठागरांच्या जागेवर नजर का?’ हे मंगल हनवते यांचे विश्लेषण वाचले. आज मिठागरांवर विकासकांचा डोळा आहे. त्याविरोधात जनजागृती झाली पाहिजे. अलीकडच्या काळात मुंबईत दर पावसाळ्यात पूर येतो, त्यासाठी प्लास्टिक, शहरी कचरा कारणीभूत आहेच. पण समुद्रातून भरती होऊन येणारे पुराचे पाणी पाणी थोपवण्याचे काम ही मिठागरे करतात. या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भू माफियांना थोपविलेच पाहिजे.

– अशोक सीताराम पवार, वडाळा, मुंबई