‘संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज’ ही डॉ. अभय बंग यांची परखड टीका वाचली. (लोकसत्ता : ११ एप्रिल) अशा ‘नोम चॉम्सकी’ बाण्याची नितांत आवश्यकता होतीच. या द्वेषाची बीजे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी घातली आणि त्याला खतपाणीदेखील त्यांनीच घातले. त्यांची ‘बंच ऑफ थॉट्स’ व ‘वुई अँड अवर नेशनहूड डिफाइन्ड’ ही दोन पुस्तके त्याचा भक्कम पुरावाच म्हणता येईल. 

‘देशातील धार्मिक विद्वेषाची स्थिती बदलण्यासाठी गांधी विचारांच्या लोकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे,’ हे डॉ.बंग यांचे म्हणणे कितीही स्तुत्य असले तरी ते काम मोठे आव्हानात्मक आहे. परधर्मद्वेषाधारित हिंदूत्वाचा विचार सर्वदूर पोहोचवायचा असेल, त्याची विश्वासार्हता वाढवायची असेल तर गांधी मरून भागणार नसून गांधी आणि गांधीविचार आम हिंदूंमध्ये बदनाम व्हायला हवा, हे संघाने बरोब्बर ताडले. त्यानुसार गांधी म्हणजे मुस्लीमधार्जिणा, सातत्याने हिंदूहिताचा बळी देणारा आणि हिंदूंना बुळेपणाचे डोस देणारा, असे चित्र संघपरिवाराने सातत्याने आणि चिकाटीने उभे केले. गांधीवाद्यांच्या बौद्धिक आळसामुळे त्याचा फारसा प्रतिवाद केला न गेल्यामुळे संघाला यात यश मिळत गेले. अलीकडच्या आणि आत्ताच्या पिढीने संघपरिवाराने आजवर विकृत स्वरूपात पेश केलेले गांधीच वाचले आहेत, ऐकले आहेत. (गांधींचा ‘प्रात:स्मरणीय’ नामावळीत समावेश करण्याचा धूर्त दुटप्पीपणाही संघाने केला ) त्यामुळे या पिढीच्या मनात गांधीजींविषयी एक प्रकारचा आकस आहे, तुच्छताही आहे. तेव्हा अशा पिढीला गांधीविचारांकडे आकृष्ट करणे हे फार मोठे आव्हान आहे.

समाजात धार्मिक द्वेषाचे बीज पेरण्याने संघपरिवाराला अजून एक फायदा झाला. सवर्णानी, विशेषत: पुरोहितवर्ग, सावकार-जमीनदार यांनी कनिष्ठ जातीतील आणि वर्गातील लोकांवर इतिहासात जे अनन्वित अत्याचार केले, त्याची चर्चा बोथट झाली, झाकोळली गेली (आणि फक्त आक्रमकांच्या अत्याचारांचीच जोरदार चर्चा होत राहिली.) आणि नेमका हाच वर्ग संघपरिवाराचा सर्वात मोठा समर्थक आणि चाहता आहे..

अनिल मुसळे, ठाणे पश्चिम

संघाची समाजसेवा, संस्कार; पण भाजप?

डॉ. अभय बंग यांनी मांडलेल्या विचारांवर (बातमी : लोकसत्ता – ११ एप्रिल) मतमतांतरे असूच शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजसेवेसाठी अनेक उपक्रमांद्वारे निश्चितच चांगले काम केले आहे आणि संस्कारक्षम पिढी असावी या हेतूने दिशाही देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. तरीही या जडणघडणीतून जन्माला आल्याचा वारंवार दावा करणारा भाजप राजकारणात शुचिर्भूतता का ठेवत नाही हा खरा प्रश्न आहे. सत्तेसाठी इतर पक्षातील वादग्रस्त, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचे पायघडय़ा टाकून आपल्या पक्षात पुनर्वसन करायचे आणि सत्ताधाऱ्यांना राजभवनाद्वारे, केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे सळो की पळो करणे हे अलीकडील महाराष्ट्रातील राजकीय चित्र विदारक आहे. महागाईचा भस्मासुर, युवापिढीवर आलेली प्रचंड बेरोजगारीची समस्या यांवर उपाय नसल्याने जनतेचे चित्त दुसरीकडे गुंतवून ठेवून काय साध्य होणार?

राम राजे, नागपूर

सकारात्मक विचारांचे बीज रुजवावे

संघ हिंदूत्वाचा विखारी प्रचार करत आहे ही खरी समस्या असली तरी डॉ. अभय बंग यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना संघाबद्दल आपले परखड मत मांडण्यास एवढा वेळ लागावा हीसुद्धा तितकीच गंभीर समस्या आहे, हेही मान्य करावे लागेल.

कोणत्याही नकारात्मक विचारसरणीला प्रतिउत्तर देण्यासाठी सकारात्मक विचारसरणी हाच उपाय आहे. पण आज बंग यांच्यासारखे अनेक एतद्देशीय विचारवंत संघाच्या सर्व कारवाया पाहात असूनही त्याविरुद्ध जनमानस निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत (ग्रेगरी स्टॅन्टन भारतात लवकरच नरसंहार होणार असे इशारे देऊ शकत पण भारतीय विचारवंत मात्र या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात शहाणपण समजतात). संघप्रणीत राजकीय पक्षांना १९८४ मध्ये लोकसभेत केवळ २ जागांवर विजय मिळणे इथपासून ते २०१४ मध्ये त्या जागा ४०० पर्यंत वाढणे हे संघाचे प्रयत्न किती अधिक आहेत हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, पण आज याचे विश्लेषण करणाऱ्यांना या गोष्टीचे आकलन आजच झाले असेल असे नाही. किमान ३०-४० वर्षांपूर्वीच ते लक्षात आले असावे पण ते लोकांना सांगण्याचे धाडस या विचारवंतांनी केले नाही.

तिकडे राजस्थान, मध्य प्रदेश,इ. ठिकाणी धार्मिक दंगली होणे व त्याच वेळी इकडे महाराष्ट्रात राज ठाकरेंसारख्यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध बोलणे (मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार लादला पाहिजे या आशयाचा जळगाव येथील एक व्हिडीओ समाजमाध्यमांतून फैलावतो आहे) हा योगायोग नसून सर्व भारतभर पराकोटीच्या विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होय.

‘बालमनावर रुजविले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल..’ हे डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन फारच निराशाजनक असले तरीही वास्तवदर्शी आहे असे वाटते. तेव्हा प्रत्येक मानवतावाद्याने, राष्ट्रवाद्याने, विचारवंताने वेळ न दवडता सकारात्मक विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवर विशेष जबाबदारी आहे.

–  सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

मुस्लीमधार्जिणेपणा हेच द्वेषाचे बीज

 ‘संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज’ हे वृत्त (११ एप्रिल) वाचले. म.गांधींनीच खरे तर धार्मिक द्वेषाचे बीज पेरले होते. स्वतंत्र चळवळीच्या काळात बॅ. जिनांनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना पुढे आणली. त्यांच्यामुळेच धर्मावर आधारित पाकिस्तानची निर्मिती झाली. पण त्या चळवळीत गांधींनी मुस्लीमधार्जिण्या भूमिकेचा अंगीकार केला होता. पाकिस्तान निर्मितीनंतर पाकिस्तानात लाखो हिंदूंची हत्या होऊनही गांधींनी हिंदूंना शांत राहण्याचा संदेश दिला. गांधीवादाचा नेहरूंनीच अव्हेर केला होता. ग्रामोद्योग आणि ग्रामोद्धार ही गांधींची तत्त्वे (नेहरूंनी) बासनात बांधली. आजही मुस्लीम पुढारी भारताला इस्लामीस्थान करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात; तेव्हा स्वत:स पुरोगामी म्हणवणारे हिंदू विचारवंत मूग गिळून असतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि हिंदूत्ववाद्यांवर तुटून पडतात. हिंदूत्वावर टीका करणे म्हणजे पुरोगामित्व अशीच जणू या तथाकथित विचारवंतांची धारणा झाली आहे.                                                                                              

रमेश नारायण वेदक, चेंबूर (मुंबई)

परकीय हातनेहमीचाच, पण.. 

‘‘पुराना’ पुराण ’ (११ एप्रिल ) हा अग्रलेख वाचला. वास्तविक आपली सत्ता टिकवण्यासाठी कुणीही राज्यकर्ता परकीय हातास दोष देतो हा तसा देशोदेशींचा इतिहास आहे हे खरेच; याप्रमाणे इम्रान खाननेही रशियाच्या ताज्या दौऱ्याला जागून कुणाही धूर्त व मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे आपल्या अपयशाचे खापर खोटय़ा कथानकाने ‘परक्या बडय़ा शक्तीचा हस्तक्षेप’ म्हणून अमेरिकेच्या माथी फोडून, त्या देशाला लक्ष्य केलेच. शिवाय जाता जाता स्वदेशी मूलतत्त्ववादी व प्रतिगामी वर्गाची सहानुभूती मिळवण्याचा दुहेरी प्रयत्नही केला!

त्यातल्या त्यात भारताच्या दृष्टीने आशेचा अंधुकसा कवडसा म्हणजे नवाज घराणे आणि भुत्तो कुटुंबीय सत्तास्थानी येत आहेत. त्यांची आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची काश्मीरबाबत भूमिका भारतासाठी (सध्या तरी) आश्वासक राहिली आहे. तिचे सत्य स्वरूप भविष्यात आपणास पाहावयास मिळेलच, तोपर्यंत वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे!

बेंजामिन केदारकर , नंदाखाल ( विरार )

वीजगळती कोणामुळे? कारवाई काय?

‘वीज महाग – ग्राहकांवर अतिरिक्त बोजा’ ही बातमी (लोकसत्ता- ११ एप्रिल) वाचली. कोळसा दरवाढीमुळे मार्च २०२२ ते मे २०२२ या कालावधीत वापरलेल्या वीज युनिट वापरावर १० ते २५ पैसे प्रतियुनिट अतिरिक्त भार लावण्यात येणार आहे. शेजारीच वीजगळतीचीही माहिती दिली असून ती सर्वात कमी भांडुप (०६.०६ टक्के) तर सर्वाधिक जळगांव परिमंडळात (२६.१८ टक्के) आहे. या गळतीसंदर्भात वीज वितरण कंपनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई काय करते याची माहितीसुद्धा ग्राहकांना कळली पाहिजे कारण यांच्या निष्क्रियतेमुळे वीजगळतीचा बोजा ग्राहकावरच पडतो. भांडुप परिमंडळातील वीजगळती सामान्य धरून यापेक्षा जास्त वीजगळती होणाऱ्या परिमंडळांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावीच पण त्यांची नावेही जाहीर व्हावीत. यामुळेच प्रस्तावित अतिरिक्त भार रक्कम कमी होईल. संबंधित मंत्री व ‘महावितरण’कडून योग्य कारवाई अपेक्षित आहे.

श्रीकांत सातपुते, डोंबिवली

फुकटेगिरीतून देशाचा पाकिस्तान, श्रीलंका कराल

‘मतदारांना भेटवस्तू देणे हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय’ असल्याचे निवडणूक आयोगाने न्यायालयात नमूद केल्याचे वृत्त (१० एप्रिल) वाचले. अश्विनीकुमार उपाध्याय या जागरूक नागरिकाने यासंदर्भात केलेल्या याचिकेवर आयोगाने न्यायालयात हे स्पष्टीकरण दिले आहे! 

प्रत्यक्षात अशा प्रकारची प्रलोभने मतदारांना दाखवून निवडणुकीचे निकाल आपल्या पदरात पाडून घेणे हेच लोकशाही संकल्पनेला मारक आहे! लोकांनी देशाच्या विकासकार्यासाठी आपल्या खिशातून भरलेला कररूपी पैसा, भेटवस्तूच्या रूपात देऊन, त्याचा लाभ मात्र पक्षाने ओरबाडण्यात कसला आला आहे ‘धोरणात्मक’ निर्णय? गोष्टी मोफत दिल्यास, आपल्या देशावरसुद्धा श्रीलंका अथवा पाकिस्तानसारखी वेळ येऊ शकते.

– अरुण गणेश भोगे, पुणे</strong>