‘हिंदू-मुस्लीम यांचे पूर्वज एकच’ हे डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य समरसता निर्माण करायला कितपत कारण ठरेल याबाबत शंकाच आहे. आईबाप एक असलेल्या भावंडांमध्येसुद्धा तंटेबखेडे होतात, अगदी कोर्टात जाण्यापर्यंत ते वाढतात. तर न पाहिलेल्या खूप मागच्या भूतकाळात जमा झालेल्या पूर्वजांचे काय चालणार? मुस्लिमांचेच कशाला, भारतातील बहुसंख्य धर्मातरितांचे पूर्वज हिंदूच होते, पण हे अप्रस्तुत म्हणून कुचकामी ठरते हे लक्षात घ्यायला हवे. माणसे सुखासुखी धर्मातर करत नाहीत. हिंदू धर्मातील जातिभेद, विषमता इ. गोष्टींविषयी चीड असल्याने आणि त्यात बदल होण्याची जराही शक्यता नसल्याने तळच्या समजल्या गेलेल्या जातींतील अनेक लोक परधर्मात गेले. अनेक जातिधर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात, हे अनेक वर्षे पाठय़पुस्तकात आम्हीही वाचत आलो. पण वर्तमानाचे चित्रण वृत्तपत्रात येत असते त्यात वेगळेच काही आढळते. ही ढळढळीत विसंगती शाळेत शिकतानाही जाणवत होती.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

ते अतिरेकी विचारांना थारा देणार नाहीत

‘धर्मापेक्षा देशहिताला प्राधान्य द्या: सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन’ (७ सप्टेंबर) हे वृत्त वाचले. सरसंघचालक मोहन भागवत यांची अपेक्षा रास्त आहे. धर्मावर आधारलेली राष्ट्रे लयाला जातात असे इतिहास सांगतो. लोकशाही आणि हुकूमशाही व्यवस्था असलेली जगभरातील मुस्लीम राष्ट्रे आज असफल होताना दिसतात. याचा गैरफायदा मुस्लीम कट्टरपंथीय संघटना घेत असून मूळ ‘शुद्ध’ स्वरूपातील इस्लाम हाच सर्वसामान्य मुस्लिमांचे भले करेल असे ‘ब्रेनवॉशिंग’ करून शरीयतचे कायदे लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातून मुस्लीम समाज अश्मयुगाकडे ढकलला जाऊन त्याचे अपरिमित नुकसान होईल. ‘पॅन इस्लामिझम’चा धोका मुस्लीम आणि मुस्लिमेतर या दोहोंना आहे. भारतीय मुस्लीम सुज्ञ आहेत. ते अशा अतिरेकी विचारधारेला थारा देणार नाहीत.

– डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

यातून संघाचा दुटप्पीपणाच उघड होतो

‘समन्वय हवाच’ (७ सप्टेंबर) हा ‘अन्वयार्थ’ वाचला. ‘पांचजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकातून इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान उद्योग समूहावर राष्ट्रविरोधी शक्तीशी हातमिळवणीचा आरोप करण्यात आला आहे. केंद्रात सरकार बदलल्यानंतर बहुसंख्यांच्या राष्ट्रवादाचा फार बोलबाला आहे. परंतु अनेक धर्म, तसेच जाती, पंथांचे लोक या देशात राहतात. देशाच्या जडणघडणीत त्यांनी सगळ्यांनीच मोठे योगदान दिले आहे. देशभक्तीचा ठेका कोण्या एका संघटनेकडे नाही. आज अशी भाषा जे करतात, त्यांचा पूर्वेतिहास भारतीय जनतेला माहीत आहे. आपण मानत असलेली विचारधारा तेवढी योग्य आणि तिच्यामध्ये कधीही खोट निर्माण होऊ शकत नाही, असा समज होणे याला जगातले कोठलेही धर्म आणि विचारधारा अपवाद नाही. म्हणून प्रत्येकाने विवेकवादी, तर्कसंगत राहिले तर आपण गैरसमजापासून दूर राहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य आंदोलनापासून दूर राहून आता आज लोकांना देशभक्ती शिकवत आहे. त्यांच्या या दुटप्पीपणामधून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही होणार नाही.

– प्रभाकर धात्रक, नासिक

भाजपला किती मदत मिळाली तेही शोधा

‘इन्फोसिसने नक्षलवादी, डावे, तसेच तुकडे तुकडे टोळीला आर्थिक मदत केली. मात्र त्याबाबतचे पुरावे नाहीत. इन्फोसिस देशविरोधी शक्तींना मदत करते का?’ असा प्रश्नांकित लेख ‘पाञ्चजन्य’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध करण्यात आला आहे. इन्फोसिस कंपनीने भाजपला किती आर्थिक मदत / देणग्या दिल्या आहेत याचीही माहिती ‘पाञ्चजन्य’ने मिळवावी आणि प्रसिद्ध करावी. भाजपाला काहीच दिले नाही म्हणून हा आकस आहे, तेही जनतेला समजले पाहिजे. एका नामांकित कंपनीबाबत असा संभ्रम निर्माण करण्याचा आणि कंपनीला बदनाम करण्याचा काही लोकांचा हेतू दिसतो आहे.  लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे देशविरोधी शक्तींना मदत हाही गुन्हाच आहे. गृह खात्याने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे.

-डॉ. हिरालाल खैरनार, खारघर, नवी मुंबई.

मुंबई-गोवा महामार्गास ‘समृद्धी’च नाही

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा झाली. मुळात मार्ग चांगला असल्यास प्रवासी मनापासून पथकर भरतील. त्यामुळे अशी सवलत देण्यापेक्षा तो महामार्ग सुस्थितीत कसा राहील आणि प्रवाशांचा प्रवास नेहमी सुखकर कसा होईल याकडे लक्ष का दिले जात नाही? कित्येक कोकणवासी पुणेमार्गे प्रवास करत कोकणात जातात. त्यामुळे या घोषणेचा लाभ किती जणांना होणार? म्हणे, खड्डे बुजवण्याची कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिले आहेत. पण हवामान विभागाने कोकणात मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. काही ठिकाणी तसा पाऊस सुरू आहे. त्यात कसे खड्डे भरणार? मुंबई-गोवा हा असमृद्ध महामार्ग आहे. त्याला समृद्धी येण्याची प्रतीक्षा आहे. कोकणचा विकास वेगाने होण्यात वाईट रस्ते बाधक ठरत आहेत. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेला हा महत्त्वाचा प्रदेश पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यात मागे राहिला आहे. नवीन महामार्ग, उड्डाणपूल आदींचे उद्घाटन करण्यासाठी नेत्यांची गर्दी असते. मात्र त्यांची दुरवस्था झाल्यावर काय होते, याचा अनुभव घेण्यासाठी जनतेला भाग पाडले जाते.

– जयेश राणे, भांडुप (मुंबई)

आधी खड्डे घालवा, मग पथकर घ्या

‘कोकणात जाणाऱ्यांना पथकरात सवलत’, (७ सप्टेंबर) हे वृत्त वाचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना पथकरात सवलत देऊन मोठा दिलासा दिला आहे. नाही तर गावी जाणाऱ्या लोकांना पथकरासाठी रांगेत वाहन उभे करणे, ही मोठी डोकेदुखीच असते. वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे, वाहनधारकांचा अर्धा ते पाऊण तास वाया जातो. ज्यांच्याकडे फास्ट टॅगची सुविधा आहे, अशांनासुद्धा तांत्रिक बिघाडामुळे समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यात आणि वाहनधारकांमध्ये वादसुद्धा होतात. एका बाजूने वाहनचालक इमानदारीने पथकर भरत असताना, दुसऱ्या बाजूने गावी जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था मात्र बिकट आहे. जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे तुफान वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर म्हणजे, काही अतिशहाणे वाहनचालक, यातून आपली लवकर सुटका व्हावी म्हणून, आपली वाहने विरुद्ध दिशेच्या रांगेमधून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. याला कोठे तरी चाप बसणे आवश्यक आहे. रस्त्यातील खड्डय़ांमुळे माणसाची हाडे तर खिळखिळी होतातच, पण वाहनांच्या टायरचे तसेच वाहनांच्या भागांचे नुकसान होते. भाविकांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड, पाटण चिपळूणमार्गे, कोकणात जाणारा महामार्ग तसेच इतर अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम, येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, ते ठीक आहे. पण ही कामे शेवटच्या क्षणी उरकण्यापेक्षा, ती एक महिना आधी पूर्ण झालेली असली पाहिजेत. तेव्हा रस्त्यातील खड्डे प्रथम दूर करा, मगच लोकांकडून नियमानुसार पथकर घ्या.

गुरुनाथ मराठे, बोरिवली, (मुंबई)

अपंग खेळाडूंचाही उचित गौरव करावा

नुकत्याच झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच दोन आकडी म्हणजे तब्बल १९ पदके जिंकून नवा इतिहास रचला. निसर्गदत्त किंवा अपघातामुळे आलेल्या शारीरिक व्यंगावर मात करून  पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा ब्रॉन्झ असे घवघवीत यश त्यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे, दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे! अपघातामुळे वयाच्या ११ व्या वर्षी अर्धांगवायूग्रस्त झालेली अवनी लेखरा अचूक नेम साधत सुवर्णवेध घेते, कार अपघातात गुडघ्याखालून डावा पाय निकामी झाला तरी न डगमगणारा सुमित अंटील भालाफेकीत सुवर्णपदक मिळवतो, वयाच्या केवळ आठव्या वर्षी विद्युत तारेच्या धक्कय़ाने एक हात गमावणारा देवेंद्र झाझरीया भालाफेकीत रौप्य पदक कमावतो तर अर्धांगवायू झालेला योगेश कथुनिया थाळीफेकमधील रौप्य पदक पटकावतो! अशीच  कामगिरी करणाऱ्या सुंदरसिंह गुर्जर, भाविना पटेल अशा सर्व विजेत्यांना मानाचा मुजरा! अत्यंत कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत देशलौकिक वृद्धिंगत करणारे यश मिळवणारे हे खेळाडू क्रिकेटमधील करोडोंची कमाई करणाऱ्या खेळाडूंपेक्षा यांचे जास्त कौतुक वाटते. धनाढय़ भारतीय क्रिकेट बोर्ड जसे क्रिकेटवीरांच्या पाठीशी आहे तद्वत राज्य सरकारने, केंद्र सरकारने या अपंग खेळाडूंना भरघोस आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा उचित गौरव करावा.

हेमंतकुमार मेस्त्री, वसई रोड.

अपंग खेळाडूंनाही पायाभूत सुविधा द्या..

‘दृष्टिकोन बदलावा.. आम्हीच!’ ( ७ सप्टेंबर) हे संपादकीय वाचले. १९७२ पासून आतापर्यंत भारताने पॅरालिम्पिकमध्ये केवळ १२ पदके मिळवली होती. मात्र यंदा नेत्रदीपक कामगिरी करून भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक यशाची मोहर उमटवली. करोनाच्या काळात सर्वच खेळांच्या सरावाला आणि स्पर्धाना खीळ बसली होती. परंतु त्यावरही मात करीत भारतीय खेळाडूंनी मिळविलेले यश निश्चितच ऐतिहासिक आहे. परंतु अशा खेळांना अन्य देशांत जसे महत्त्व आणि उत्तेजन दिले जाते, तसे आपल्याकडे होत नाही. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. तसेच पायाभूत सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत. तरच भविष्यात भारतदेखील क्रीडा शक्ती म्हणून ओळखला जाऊ शकतो.

– सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)