लोकमानस : विष्णुशर्माकृत पंचतंत्राचे धडे आजही..

आर्थिक आणि राजकीय फायदा यांच्यापुढे विचारधारा व पक्षनिष्ठा इतिहासजमा झालेल्या आहेत.

Loksatta readers response letter
संग्रहित छायाचित्र

‘‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!’ हा अग्रलेख (२२ जून) वाचला. वास्तविक आज जे घडतंय त्याची बीजे अडीच वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. राजकारणात साम, दाम, दंड आणि भेद हे सगळे चालते. अगदी विष्णुशर्माने अनेक शतकांपूर्वीच्या ‘पंचतंत्रा’त हे लिहिलेले आहे. भाजपसारखा आज देशभरात प्रबळ असणारा पक्ष हे तंत्र वापरणार याचा अंदाज होताच. आपण कुठलेही मार्ग वापरून सत्ता खेचण्याचे राजकारण केले तर दुसऱ्या कोणीही तसेच मार्ग वापरून आपली सत्ता खेचू नये हा भाबडेपणा कोणीही करू नये.

मोहन भारती, ठाणे

राजेशाही आणि लोकशाहीत फरक काय राहिला?

‘‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!’(२२ जून) या अग्रलेखात उल्लेख झालेले, ‘आठवडय़ापूर्वी लिहिलेल्या अग्रलेखातील भाकीत’ जसेच्या तसे प्रत्यक्षात उतरणे आनंददायी निश्चितच नाही, असे प्रगत लोकशाहीची अपेक्षा करणारा वाचक म्हणून मला वाटते. भारतीय राजकारणात मोरारजी देसाई यांच्या पहिल्या आघाडी सरकारपासून ते नंतर अनेक केंद्र, राज्य सरकारे, अगदी १३ दिवसांचे वाजपेयी यांचे सरकार, यांचा आढावा घेता आपली राजकीय संस्कृती दिवसेंदिवस बेभरवशाची होत असून त्यात समाजहित, मूल्य, निष्ठा वगैरे दुय्यम स्थानावर केव्हाच गेल्या असून महत्त्वाकांक्षा हाच एक घटक पुन:पुन्हा पुढे येतो. ‘कसेही करून सत्ता मिळवायची’ किंवा त्यात वरचे स्थान पटकवायचे हेच राजकीय ध्येय. मला प्रश्न पडतो मग लोकशाहीपूर्व राजेशाही ज्यात लढाया वगैरे, दगाफटका करून राज्य मिळवायचे आणि वर्तमान परिस्थिती यात फरक तो काय? या बाबतीत आपल्या देशाचा प्रवास अधोमार्गी आहे आणि हे दु:खद आहे.

सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

याला शिवसेना नेतृत्वच कारणीभूत!

‘‘संघटना राहिल्याची शिक्षा!’ हा अग्रलेख (२२ जून) वाचला. पक्षसंघटना म्हणजे भावना, इच्छा, आकांक्षा नसलेले यंत्र नव्हे. आक्रमक भाषणे आणि विरोधी नेत्यांवर सातत्याने केलेली टीका म्हणजे संघटन नव्हे. पक्षातील नेत्यांच्या व सहकाऱ्यांच्या भावना, मन सांभाळण्याबरोबरच त्यांच्या शक्य त्या प्रकारे आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करणे संघटनेच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. त्याचबरोबर नेतृत्व हे आपले महत्त्व अधोरेखित करत असते, असे पक्षातील नेत्यांना सातत्याने वाटत राहिले पाहिजे. पक्षातील आमदारांची नाराजी ठाकरेंना ज्ञात नव्हती, असे नाही. पण या नेतृत्वाला या नाराजीचे स्वरूप आणि कारणेच समजली नाहीत. ही नाराजी त्यांना दूर करता आली नव्हती हे वरचेवर जे नाराजीचे सूर उमटत होते त्यावरून स्पष्ट होण्यासारखे होते.

आता भाजप नेत्यांना कितीही  दोष दिले तरी त्यांनी फायदा घ्यावा अशी स्थिती निर्माण करून त्यांच्यासमोर ठेवण्यास शिवसेना नेतृत्वच कारणीभूत आहे हे सहज स्पष्ट होण्यासारखे आहे. एकनाथ शिंदे यांचे हे बंड यशस्वी होईल किंवा नाही; पण परिस्थितीचा फायदा घेण्याचे फडणवीस यांचे आणि एकंदरच भाजपचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहेच. आर्थिक आणि राजकीय फायदा यांच्यापुढे विचारधारा व पक्षनिष्ठा इतिहासजमा झालेल्या आहेत. आणि ही बाब बहुतेक सर्व पक्षांना सारखीच लागू आहे.

ह. आ. सारंग, लातूर

भाजपसोबत गेले तरी घुसमटच..

‘लोकसत्ता’च्या बातम्या आणि ‘लोकसत्ता.कॉम’वर घडामोडी वाचतो आहेच, पण गेल्या अडीच वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.. आता भाजपबरोबर जाणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीचे आहे. एकतर ते स्वत: आमदार आहेत, त्यामुळे व्यक्तिश:देखील त्यांना इतरांचे नेतृत्व मान्य करावे लागेल.

एकनाथ शिंदेंच्या आग्रहानुसार देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद देऊन,  त्यांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी काम करणार का? शिवसैनिकाला हे रुचेल का? शिवसैनिकाची अवस्था आज तरी ‘न घरका न घाटका’ अशी झाली आहे. सत्तेत असल्यामुळे आपली ‘राडा’ संस्कृती त्यांना गुंडाळून ठेवावी लागते आहे. एकनाथ शिंदे उद्या भाजपसोबत गेले तरी सत्तेत शिवसैनिकांची घुसमटच होणार. त्यासाठी विरोधात राहूनसुद्धा महाराष्ट्रावर आपलाच रिमोट कंट्रोल ठेवला तर त्याचा फायदा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा होईल.

नितीन चौबळ, नाशिक

हिंदूत्व जागे होण्याची वेळ’..

‘संघटना राहिल्याची शिक्षा!’ (२२ जून) हे संपादकीय वाचले. अडीच वर्षांपूर्वीच जेव्हा चर्चा सुरू झाली की ‘तीन पक्षाचे हे सरकार पाच वर्षे टिकेल काय?’ तेव्हाच, ‘महापालिका निवडणुकीवेळी ठिणगी पडणार,’ याबद्दल सर्वाच्याच मनात साशंकता होती. हा मुद्दा विसरता येणार नाही. ठाणे महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये झालेला वाद, त्यातच शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर काढलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट – त्यातली एकनाथ शिंदे यांची भूमिका, त्यावरील उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, त्यानंतर शिंदे यांना विधान परिषद निवडणुकीतील पक्षांतर्गत प्रक्रियेतून दूर ठेवणे या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच महत्त्वाची ‘धर्मवीर’ प्रदर्शित करण्याची वेळ (टायिमग) ठरते. युती सरकारच्या काळात खिशात राजीनामे घेऊन फिरणारे तर होतेच, परंतु तो खिशातून बाहेर काढून दाखवणारे आणि उपस्थितांना नाटय़मय भावनिक साद घालणारे एकमेव एकनाथ शिदे होते. मग आज अडीच वर्षांनंतर महापालिका निवडणुकीआधी अचानक हिंदूत्व कसे जागे झाले?

आदित्य भागे, नांदेड

हिंदूत्व धोक्यातहे ढोंग..

शिवसेना आमदार एकनाथजी शिंदे गुपचूप एक नवीन ‘टीम’ काढून महाराष्ट्राच्या राजकारणात भरीव कामगिरी करण्याची मनीषा घेऊन सुरतमार्गे थेट गुवाहाटीत पोहोचून मोहीम फत्ते (गनिमीकावा?) करण्याच्या बेतात आहेत, याविषयीच्या बातम्या वाचल्या! सेना नेत्यांमागे ‘ईडी’ लावल्यामुळे त्यांची पाठराखण करणारे आपले त्राते ‘भाऊ’ आता आपली सोडवणूक करतील म्हणून संबंधित आमदार नक्कीच त्यांच्याकडे (लाळघोटय़ा) आशेने पाहात असतील! पण शिंदे यांनी ‘हिंदूत्व धोक्यात’ म्हणून जो कांगावा केला ते ढोंग! कारण भाजपशी युती असतानासुद्धा शिंदे यांनी वेगळे व्हायचा विचार केला होता. सुज्ञांस अधिक ते सांगावे काय?

लक्ष्मण शंकरराव भांडे, गोरेगाव पूर्व (मुंबई)

हिंदूत्वाच्या नावावर मतलबी विचार?

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्वाच्या नावाने गळा काढत ठाकरे सरकार व शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. मराठी मातीत जन्मलेल्यांना  हिंदूत्वाचा एवढा पुळका कशाला? एखाद्याची राजकीय अपरिपक्वता समजू शकते, परंतु लोकप्रतिनिधींनी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे की काय? छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी नटलेल्या आपल्या या राज्यात हिंदूत्वाच्या नावावर कुणी मतलबी व संकुचित विचाराने राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना वेळीच रोखायला हवे! ‘हे विश्वचि माझे घर’, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ अशा उदात्त विचारांनी भारलेल्या आपल्या भारतमातेच्या मातीची शिकवण आहे किंबहुना तशी तिची हाक आहे!

–  श्रीकांत मा. जाधव, अतीत (जि. सातारा)

हा पैसा जर लोकांसाठी वापरला असता..

राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक यांसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना निवडणुकीच्या आधीच हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली होती आणि आता आमदार फोडाफोडीमध्ये सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये हॉटेल वास्तव्य सुरूच आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना राजकारण्यांकडून हॉटेल निवासासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जाताहेत. हा एवढा भरमसाट खर्च राजकीय पक्ष का करतात?

सत्ता काबीज करण्यासाठी एवढा पैसा ओततात की बस्स. हा पैसा जर शेतकऱ्यांसाठी ओतला गेला असता, रोजगारनिर्मितीवर खर्च केला असता तर? हे राजकारणी एवढे निर्ढावलेले आहेत की यांना सामान्य माणूस दिसतच नाही, हे सर्व संतापजनक आहे.

विक्रम ब्रह्माजी गावडे, भांडुप पश्चिम (मुंबई)

हा असा वेग आणखी कुठे दिसतो

महाराष्ट्रासंदर्भात गुजरात आणि आता आसाममध्ये वेगाने राजकीय घडामोडी चालू आहेत. अशा राजकीय भानगडींकडे लक्ष देऊन लोकांना काय मिळणार? कोणीही आले आणि गेले तरी आम्हाला प्रतिदिन जो संघर्ष करावा लागतो त्यातून काही केल्या सुटका नाही. राजकीय घडामोडी ज्या वेगाने घडतात तो वेग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिसतो का? कोणत्याही कारणास्तव नाराजी असेल तर लोकप्रतिनिधी अन्य पक्षाची वाट निवडतात. पण ज्या लोकप्रतिनिधींमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि तरीही त्यांच्याकडे कोणीही ढुंकूनही पाहत नाही, त्या मायबाप जनतेने कुठे जावे? राजकीय वादविवादात, सांगायला जनतेच्या हिताचे कारण पुढे असते. पण त्यात किती तथ्य असते?

जयेश राणे, भांडुप (मुंबई)

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers reactions loksatta readers mail loksatta readers letters zws

Next Story
लोकमानस : समाधान अल्प खरे, पण सोशीकपणा हवाचLoksatta readers response letter
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी