‘वामन परत यावा…’ हा अग्रलेख (६ डिसेंबर) वाचला. डॉ. जयंत नारळीकर यांचे सात्त्विक बहुमूल्य विचार त्यांना याचि देही याचि डोळा पाहताना ऐकायला मिळावे यासारखे भाग्य नाही! त्यास त्यांचे प्रकृतिअस्वास्थ्य हे कारण असावे यासारखे नाशिककरांचे दुर्दैव नसावे, हे मात्र खरे. जयंतरावांनी मांडलेला ‘साहित्याचे विषय लिहिणारा परिस्थितीपासून फारकत घेऊ शकत नाही’ हा मुद्दा खरा असला तरीही अर्थशास्त्र, भांडवली बाजार, व्यापार, वाणिज्य, वैद्यकीय व्यवस्थापनशास्त्र इ. विषयांचे दुर्दैवाने मराठीत सुलभीकरण झाले नाही. दुसरा मुद्दा इंग्रजी शब्दांच्या वापराचा… याला कारण म्हणजे मराठी? पालकांचे विषयांतील ‘खोली’पेक्षा इंग्रजी माध्यमातील ‘बोली’वरच असलेले विशेष प्रेम! विषयाची खोलीच कळली नाही तर विचारांत खोली येणार कुठून?… हे गेले काही दशके देशी धाटणीच्या, ‘आंतरराष्ट्रीय’ शाळेत आपल्या पाल्याला घालणारे मराठी पालक विसरले आहेत. या मूलभूत चुका दुरुस्त करण्यासाठी जयंत नारळीकरांसारख्या वैचारिक बैठकीच्या विद्वानांची, पुढे येणाऱ्या अनेक साहित्य संमेलनांना नितांत गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– प्रवीण आंबेसकर, ठाणे</p>

‘शास्त्र जाणणाऱ्या’ची अनुपस्थिती अयोग्य नाही

‘वामन परत यावा’ हा अग्रलेख लोकसत्ता’ला साजेसा! फक्त नारळीकर सरांनी ‘प्रकृतिअस्वास्थ्य’ असूनही समक्ष हजर राहायला हवे होते ही अपेक्षा पटली नाही. सध्या जे काही करोनादी साथीचे वातावरण आहे त्यात ‘शास्त्र’ जाणणाऱ्या व्यासंगी व्यक्तीने हजर न राहणे हा निर्णय योग्य वाटतो. प्रसिद्धी ही त्यांची प्राथमिकता नसणारच. त्यांच्या प्रकृतीला काय कितपत त्रास होईल याचा उत्तम अंदाज त्यांना व त्यांच्या डॉक्टरांना असणारच, तसेच त्यांचे कुटुंब सदस्यसुद्धा आहेतच!! त्यांनी व्यक्त केलेल्या विचारावर मंथन होऊन त्यातून आपण काही शिकले पाहिजे हे मात्र खरे!!

– मधुकर घारपुरे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

म्हणे आयुकामध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉमी नव्हे अ‍ॅस्ट्रॉलॉजी!

‘वामन परत यावा’ अग्रलेख वाचून डॉ. जयंत नारळीकर यांच्या एका मुलाखतीतील मजेदार गोष्ट आठवली. जयंतरावांनी स्थापन केलेल्या ‘द इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स’ (आयुका) या संस्थेचे नाव पुण्याच्या टेलिफोन डिरेक्टरीत समाविष्ट करावयाचे होते. संस्थेतील संबंधित व्यक्तींनी यासाठीचा अर्ज भरून तो टेलिफोन एक्स्चेंजमध्ये दिला. प्रत्यक्ष डिरेक्टरी हाती आल्यावर जयंतरावांना आश्चर्याचा धक्काच बसला.

‘आयुका’ संस्थेचे नाव पुणे टेलिफोन डिरेक्टरीत ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी आणि अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स’ (ज्योतिषशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र) असे छापून आले होते. जयंतरावांनी याबाबत टेलिफोन विभागाकडे चौकशी केली असता, टेलिफोन विभागातील एका अधिकाऱ्याने, ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ हा शब्द आयुकाकडून नजरचुकीने लिहिला गेला असून तो ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ असाच असला पाहिजे, हे स्वत:च ठरवून तो बेधडक बदलला नि छापूनही आणला. जयंतरावांनी त्यांच्या एका मुलाखतीत अगदी खेळकरपणे याचा उल्लेख केला आहे. जिज्ञासूंनी ही यूट्यूबवर उपलब्ध असलेली मुलाखत पाहावी.

– अभिजीत भाटलेकर, मुंबई

मराठी भाषेचे कुणालाच गांभीर्य नाही…

‘वामन परत यावा’ या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलेली मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयीची चिंता रास्त आहे. मराठी भाषा पहिली ते बारावीपर्यंत सगळ्यांना सक्तीची राहील असा आदेश काढला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. साहित्य संमेलन आले की मराठीच्या भविष्याविषयी चर्चा आणि एरवी काहीच नाही. आपल्या भाषेवर प्रेम करणे, तिच्याविषयी अभिमान बाळगणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. नवीन पिढी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेते. तिला मराठी भाषेचा गंध नाही, ही वस्तुस्थिती आहे.

– प्रा. राजेश कुमार झाडे, चंद्रपूर</p>

साहित्य संमेलन आणि बरेच काही…

नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा आढावा घेणाऱ्या बातम्या ‘लोकसत्ता’त वाचल्या. कार्यक्रमांमधून एक आक्रोशाचा किंवा तक्रारींचा सूर जाणवला. आणि थोडेसे बरेच वाटले की किमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने का होईना, अनेक सामाजिक प्रखर समस्यांना साहित्यिक, विचारवंतांकडून हात घातला गेला, परंतु हा आवाज फक्त संमेलनापुरताच मर्यादित न राहता त्याची एक चळवळ उभी करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

झुंडशाही, दडपशाही नष्ट करावयाची असेल तर साहित्यिक, लेखक, कलाकार आणि जनता या सर्वांनी मिळून एक आंदोलन उभे केले पाहिजे. पण काही अपवाद वगळता सगळ्यांनीच ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ हे समाजघातकी धोरण अवलंबलेले दिसते. ते समाजसंवर्धनास मारक ठरते आणि म्हणूनच समाजातील विघातक घटकांचे फावते. कै. लेखक प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक कुप्रथा, अन्याय, अत्याचार यांना वाचा फोडली व तत्सम, तत्कालीन साहित्य समाजसुधारणेस पोषक ठरले. सध्या समाज काळानुरूप पुढे गेलाय. प्रगत, आधुनिक झालाय. परंतु अजूनही अनेक जुन्या समस्या शिल्लक आहेत आणि नव्या उद्भवल्या आहेत. त्यांचे वास्तविक प्रतिबिंब सद्य साहित्यात व्यक्त होताना दिसत नाही याची खंत वाटते. तीच गोष्ट प्रसारमाध्यमांची. ती केवळ लांगूलचालन तर मालिका केवळ कौटुंबिक कलह दाखवण्यातच गुंतून पडल्या आहेत. अशा वेळी समाजाला त्याचे आजचे विद्रूप रूप दाखवण्याचे धाडस कोण करणार आणि कसे? असेच चालत राहिले तर भारतीय लोकशाही, तिच्या कथा, गाथा फक्त इतिहासातच वाचावयास मिळतील.

– विद्या पवार, मुंबई

निषेध कुणाचाही करा, पण तो लोकशाही मार्गाने

नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आलेले ‘लोकसत्ता’ दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संमेलनस्थळी बुक्का फेकण्याचा प्रकार घडला. कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजी महाराजांची बदनामी केली असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांनी बुक्का फेकून कुबेर यांचा निषेध केला. हा प्रकार निषेधार्ह आहे. आधी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांनी त्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाबाबत लेखकाशी चर्चा करावयास हवी होती व नंतर निषेधाची कृती लोकशाही मार्गाने करावयास हवी होती.

– नंदकुमार आ. पांचाळ, चिंचपोकळी, मुंबई

पुरेशी बदनामी करण्यात कुबेरांना अपयश

‘रेनेसान्स स्टेट’ हे गिरीश कुबेर यांनी इंग्रजीत लिहिलेले पुस्तक चाळले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी यांचा गौरव करून लिहिले आहे की, मुद्रेवर राजाचे नाव न लावता स्वराज्याबद्दल लिहिणारा राजा म्हणून शिवाजी प्रसिद्ध आहेत. पुस्तक प्रा. नरहर कुरुंदकर यांना समर्पित केले आहे. २८३ पानांच्या या पुस्तकात १८ भाग आहेत. त्यात महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल मांडणी आहे. संदर्भग्रंथांच्या सूचीमध्ये ३० ग्रंथांचा उल्लेख आहे. त्यात गोळवलकर, वि. दा. सावरकर, गो. ग. आगरकर, य. दि. फडके, सुहास पळशीकर, ऑक्सफर्डमधील हसन झोया, धनंजय कीर, मे. पु. रेगे, आ. ह. साळुंखे व मुंबई विद्यापीठातील मराठा इतिहासाचे ग्रंथ, महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित झालेले मध्ययुगीन कालखंड इत्यादी, याशिवाय आणखीही अनेक ग्रंथ वाचून हे पुस्तक लिहिले आहे.

सहाव्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्व नमूद केले आहे. सातव्या प्रकरणात त्यांच्यानंतरचे दख्खन याविषयी लिहिताना संभाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून दोन लाखांच्या फौजेसह आलेल्या औरंगजेबाचा पराभव केला व अंतर्गत विरोधाची बंडाळी मोडून काढली हे मांडले आहे. पृष्ठ क्रमांक ८५ वर एकच वाक्य आहे की, संभाजी महाराजांनी सोयराबाई यांना व त्यांच्या निष्ठावंतांना जिवे मारले व अंतर्गत बंडाळी मोडून काढली. पुढे कुबेर असे लिहितात की शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर प्रचंड मुघल सैन्य दख्खनवर चालून आले. औरंगजेबाने बहादूर खान, त्याच्यानंतर शहाबुद्दीन आणि १६८१ मध्ये हुसेन अली खान याला संभाजी महाराजांविरोधात लढण्यासाठी पाठवले. परंतु यापैकी कोणासही यश मिळाले नाही.

संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी अतुलनीय पराक्रम गाजवले. शेवटी मार्च १६८२ मध्ये औरंगजेब स्वत: दक्षिणेकडे चाल करून आला. संभाजींचा व मराठ्यांचा पाडाव करून निवृत्ती स्वीकारायची हा त्याचा मनसुबा संभाजी व त्यांच्या सैन्याने उधळून लावला. संभाजींना मुघल, सिद्दी आणि पोर्तुगीज या तिघांशी लढावे लागले. या सर्वांनी संभाजींच्या सामर्थ्यास कमी लेखले. संभाजीराजांनी गनिमी काव्याचा नेमका वापर करून मुघल सैन्यास हैराण केले. संभाजींचा पराक्रम इतका होता की औरंगजेबास चार वर्षांत एकही युद्ध जिंकता आले नाही.

१६८४ मध्ये औरंगजेबाने रागाने मुकुट भिरकावून दिला आणि संभाजीस पराभूत करत नाही तोपर्यंत मुकुट परिधान करायचा नाही असे ठरवले. पण त्याला परत मुकुट घालता आलाच नाही. मराठ्यांचा पराक्रम असा की, त्यांच्यावर मात करण्याच्या आपल्या योजनेत बदल करून बादशहा आदिलशाही आणि कुतुबशाहीची कमकुवत राज्ये घेण्यास निघून गेला. १६८७ मध्ये तो पुन्हा आला, परंतु तोपर्यंत संभाजी राजांनी १७ ठिकाणी मुघलांविरोधात आघाडी उघडली होती. गिरीश कुबेर यांनी जाणीवपूर्वक संभाजींचा अपमान करण्यासाठी पुस्तक लिहिलेले नाही हे मला त्यांच्या पुस्तकाच्या वाचनातून सरळपणे समजून आले. गिरीश कुबेर यांच्यावर बुक्का फेकला त्यांना पुस्तकातील कितव्या पानावर वादग्रस्त मजकूर आहे आणि पुस्तकाचे नाव काय आहे हेदेखील सांगता आले नाही.

२८३ पानांचे हे पुस्तक महाराष्ट्र हे राज्य कसे घडले हे दाखवण्यासाठी न लिहिता संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी लिहिले असेल, तर वारंवार संभाजी महाराजांच्या बदनामीचे किस्से त्यात असायला हवे होते. निदान संभाजी महाराजांवरील प्रकरणात तरी तशी मांडणी हवी होती. मात्र संभाजी महाराजांची पुरेशी बदनामी करण्यास गिरीश कुबेर यांना अपयश आले असे म्हणण्यास वाव आहे.

– योगेश विद्याधर फडतरे, पुणे

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers response letter abn 97
First published on: 07-12-2021 at 00:04 IST