सोज्वळ सौंदर्यातील मूर्तिमंत ‘ग्रेस’

‘बहारों की मलिका..’ हे अभिनेत्री साधनावरील संपादकीय (२६ डिसें.) वाचून तिच्या कारकीर्दीला उजाळा मिळाला.

sadhana
साधनाने कारकीर्दीच्या उत्तरार्धात अनेक ‘इस्टमन कलर’ चित्रपटांतही काम केले होते

‘बहारों की मलिका..’ हे अभिनेत्री साधनावरील संपादकीय (२६ डिसें.) वाचून तिच्या कारकीर्दीला उजाळा मिळाला. साधनाने कारकीर्दीच्या उत्तरार्धात अनेक ‘इस्टमन कलर’ चित्रपटांतही काम केले होते, पण तिच्या चाहत्यांच्या कायम लक्षात राहील ती कृष्णधवल पडद्यावरची साधना. अंगभर नेसलेली पाचवारी साडी, कोपरापर्यंत बाह्य़ांचा ब्लाऊज, सलसर अंबाडा किंवा वेणी, त्यावर क्वचित कधी गजरा, ही खरे तर अजिबात ग्लॅमर नसलेली अशी पारंपरिक (काहींच्या मते काकूबाई थाटाची!) वेशभूषा म्हटली पाहिजे. पण अशा वेशात अगदी कुठल्याही काळातील तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवू शकेल अशी ‘ग्रेस’ साधनाच्या त्या रूपात होती. ‘चलती हूं मैं तारों पर, फिर क्यूं मुझ को लगता है डर’ असे म्हणत शांतपणे एकेक पाऊल टाकत चालत असतानाची तिची अदा कुठल्याही कॅटवॉकला लाजवणारी अशी होती.
चाहत्यांच्या मनात आपले तेच रूप राहावे ही तिची इच्छा एका परीने तिचे चाहत्यांवरचे प्रेम दाखवते असे वाटते. म्हणूनच तिच्या कठीण काळात कोणीच चाहता तिच्या बाजूने उभा राहिला नाही ही घटना चुटपुट लावून जाते. जाणूनबुजून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेली साधना आता काळाच्या पडद्याआडही गेली. ‘तेरा मेरा प्यार अमर’ म्हणणाऱ्या साधनाची स्मृती मात्र तिच्या चाहत्यांच्या मनात नक्कीच अमर राहील.
– विनीता दीक्षित, ठाणे

शेतकऱ्यांचा सच्चा नेता
शरद जोशी यांच्या इच्छापत्रासंदर्भातील बातमी (२६ डिसें.) वाचली आणि डोळ्यांत टचकन पाणी आले. मात्र लगेच अभिमानाने छातीही फुगून आली. राजकारणातील पदाचा गरवापर करत अक्षरश: अब्जावधींची काळी संपत्ती जमविण्याच्या या काळात हा अजब माणूस आपली सरळ मार्गाने मिळालेली संपत्ती चक्क सामान्य लोकांना वाटून टाकतो, ही केवळ अचंबित करणारी गोष्ट आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या या गोष्टींत कुणाचीही मक्तेदारी नसते हे खरे आहे; पण निरपेक्षपणे समíपत भावनेने आयुष्य पणाला लावण्याची एखाद्याची मक्तेदारी असू शकते हे शरदरावांनी शब्दांनी नव्हे तर कृतीने दाखवून दिले, तेही कुठलाही गाजावाजा न करता. शरद जोशी शेतकऱ्यांचे सच्चे नेते होते. तुम्ही कुठे लौकिक अर्थाने अधिराज्य गाजविले अथवा नाही याला महत्त्व नाही, पण आपण लाखोंच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवले, म्हणून जोशीसाहेबांना सलाम!
– अरिवद वैद्य, सोलापूर

मोदींच्या धक्कातंत्रामुळे पाकवर सकारात्मक दबाव!
मोदींच्या नुकत्याच झालेल्या पाकभेटीचा अर्थ लावताना त्यांनी अवलंबलेले धक्कातंत्र किंवा त्यांच्या कारकीर्दीतील भारत-पाक संबंधांतील उलटसुलट वळणांच्या पलीकडे जाऊन या भेटीचा अन्वयार्थ लावायला हवा. २००८ च्या मुंबई हल्ल्यामुळे पाकची प्रतिमा अधिकच डागाळली. नुकत्याच फ्रान्समधील भीषण हत्याकांडानंतर तर एकूणच जग इस्लामिक राष्ट्रांकडे संशयित दृष्टीनेच बघत आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम पाकिस्तानला भारताबाबतीत पुनर्वचिार करायला लावणारा असल्यास त्याचे नवल वाटायचे कारण नाही. शिवाय मोदी सरकारने सत्ता ग्रहण करण्याच्या वेळेपासून पाककडे मत्रीचा हात पुढे केला होता. पाकला आíथक खाईतून बाहेर पडण्यासाठी भारताशी व्यापार वृिद्धगत करण्याची कधी नव्हे एवढी आज गरज आहे. या सगळ्याचा विचार करून भारताने पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे भान ठेवून पावले टाकलेली दिसतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट, परराष्ट्रमंत्र्यांची भेट आणि आता परराष्ट्र सचिवांची भेट होण्यापूर्वी योग्य वातावरणनिर्मितीसाठी तयारी म्हणून मोदींनी जर पाकला भेट दिली असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. मोदींच्या भेटीमुळे लगेच भारत-पाक संबंध सुधारतील किंवा सीमेवरील घुसखोरी थांबेल असे दिवास्वप्न पाहाणे वेडेपणाचे ठरेल; परंतु निदान या भेटीमुळे पाकवर सकारात्मक दबाव राहील असे वाटण्याइतकी परिस्थिती बदललेली आहे हे निश्चित. भारताची युनोच्या सुरक्षा मंडळावर कायम स्वरूपाची जागा मिळण्याची शक्यता हे आणखी एक फलित या भेटीमुळे साध्य होण्याची शक्यताही दुणावली आहे, असे या भेटीचे युनोने केलेल्या स्वागतावरून वाटते.
– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

कोल्हापूरचाच प्रश्न एवढा गहन कसा?
‘फक्त कोल्हापूरच का? हा ‘अन्वयार्थ’ (२५ डिसें.) कोल्हापूर महापालिकेच्या आíथक कुवतीचा प्रश्न मांडणारा आहे. निकृष्ट दर्जामुळे नागरिकांनी टोलवसुलीस विरोध केला असेल तर ती महापालिकेचीच नामुष्की आहे. कारण कंत्राटदाराच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी टाळता कशी येईल? आता पथकरवसुली बंद झाल्यानं कंत्राटदाराशी केलेला करार संपुष्टात येताना द्यावयाची पूर्ण रक्कम उभी करावी लागणार. त्यामुळे महापालिका करात वाढ होण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरच्या रसायनीसारख्या ठिकाणीही प्रवेशरस्त्यावर उत्तम रस्ता करून घेऊन पथकरवसुली काही र्वष चालू होती. सांगलीलाही प्रवेश करताना सांगलवाडीच्या अलीकडे पथकरवसुली होत होती, तीही बंद झाली, ती बहुतेक बीओटीचं रूपांतर ‘बायबॅक’मध्ये करून. जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतले रस्ते पथकरवसुलीतून मुक्त केले जाऊन नागरिक विनाकर रस्ते वापरू शकतात तर मग कोल्हापूरचाच प्रश्न एवढा गहन कसा?
-श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

देशात पुन्हा सामंतशाही आणावयाची का?
‘पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीमुळेच देशी शिक्षण व्यवस्थेला धक्का’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन (२६ डिसें.) भाबडेपणाचे व बालिश आहे.
मेकॉले यांनी इंग्रजीचा पाया देशात घातला. त्या नंतर खऱ्या अर्थाने देशाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर जगाच्या व्यासपीठावर संस्कृतमुळे नव्हे तर इंग्रजीच्या माध्यमातून पोहोचले. मेकॉले यांनी इंग्रजी आणली खरी पण तिचा प्रचार या देशात उच्चवर्णीयांनीच केला. इंग्लंडचा राजा, राणी लंडनला तर गव्हर्नर जनरल दिल्लीत बसत. राज्यात त्यांचा गव्हर्नर असे. बाकी जिल्हाधिकारी ते तलाठी सारे ब्राह्मणच होते. त्यांनीच इंग्रजी देशात रुजवली. देशातील मिशनरी शाळांतून सर्वत्र ब्राह्मण मंडळी इंग्रजीचे धडे देत होती. आता त्यातलाच मुख्यमंत्री सांगतो, चला आपण देशी म्हणजे िहदी, संस्कृत शिकू या. याला विरोध नको, पण इंग्रजी हटाव म्हणजे पुन्हा या देशात सामंतशाही आणावयाची का?
– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

विहिरींच्या कामांची पडताळणी करावी
‘विहिरींचीच चोरी’ ही बातमी (२५ डिसें.) वाचली. यावरून विहिरी खोदल्याच नव्हत्या हे सिद्ध होते. कोणत्याही कामाचे बिल अदा करताना झालेल्या कामाची मापे प्रत्यक्ष घेतली व लिहिली असा दाखला मापे लिहिणाऱ्याने द्यावा लागतो. अशा बाबतीत ज्यांनी मापे लिहिली तो पूर्णपणे जबाबदार राहील. नुकतेच दहा हजार विहिरी बांधून पूर्ण केल्या असे वाचण्यात आले. त्याबाबतीत खऱ्या किती, असा संशय येत राहील. तेव्हा अशा कामाची पडताळणी होणे जरूर आहे व ती खरोखर काम करणाऱ्यास त्रास न होईल अशी व्हावी. या अगोदर राज्यभरात शाळांची पटपडताळणी झाली होती. तेव्हा असंख्य शाळांचे संस्थाचालक बोगस विद्यार्थी व शिक्षकांची नावे देऊन शासनाची लूट करत असल्याचे उघड झाले होते.
– वि. म. मराठे, सांगली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta redars latter