‘धर्माचा अर्थ’ हा अग्रलेख (५ जाने.) वाचला. आज जगात सगळीकडेच अशांतता पसरलेली आहे. पश्चिम आशियात अशांतता, उत्तर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प, नॉर्थ कोरिया आणि इतर पूर्वेकडील देश, चीनची आक्रमकता आणि भारताची महत्त्वाकांक्षा हे सगळे पाहून दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीच्या वातावरणाची आठवण झाली आणि तिसरे महायुद्ध होऊ शकते असेच वाटू लागले. आज जगात अमेरिका सर्वात बलाढय़ देश आहे. सर्वात मोठी अर्थव्यवस्था, दरडोई उत्पन्न आणि लष्करी ताकद याबाबतीत अमेरिकेचे वर्चस्व जगात आहे आणि म्हणूनच अमेरिकेची जबाबदारीही तेवढीच आहे. पण ट्रम्प आल्यापासून सगळ्या जबाबदाऱ्या धुडकावून लावत आहेत. या अशांततेमागे अमेरिकेचा सिंहाचा वाटा आहे, पण याचे परिणाम अमेरिकेसह साऱ्या जगाला भोगावे लागणार हे नक्की.

– मोहन पंडित, औरंगाबाद</strong>

राक्षसी महत्त्वाकांक्षा सोडण्याची आवश्यकता

‘धर्माचा अर्थ’ हे संपादकीय (५ जाने.) वाचले. समर्थ धर्म जाणिवेस तितक्याच समर्थ अर्थविकासाची जोड नसेल तर काय होते, या इराण या आपल्या मित्रदेशाच्या अवस्थेवरून समजते. पश्चिम आशियातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभे राहण्यास सज्ज असलेले इराण व सौदी हे दोन देश, परंतु प्रतिस्पर्धी. अविवेकी महत्त्वाकांक्षेपोटी इराणची झालेली कुचंबणा हेरून सौदीने त्या देशातील सरकार उलथून टाकण्याचा केलेला प्रयत्न व त्यास अमेरिकेने केलेली मदत म्हणजेच अस्थिरतेला दिलेले आमंत्रण आहे. आपल्या देशातील लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सौदीने इराणच्या कारभारात ढवळाढवळ करणे  शहाणपणाचे नाही  शेजारील देशात वाद निर्माण करून त्यातून आपले हात शेकण्याची अमेरिकेची भूमिका काळाच्या ओघात बदलायला हवी होती. मोठा भाऊ म्हणून दुबळ्या देशांना अमेरिकेने मदत केल्यास जगात नक्कीच शांतता नांदेल, परंतु त्याआधी आवश्यकता आहे ती स्वत:कडे असलेली राक्षसी महत्त्वाकांक्षा सोडून देण्याची!

  – गणेश गदादे, श्रीगोंदा (अहमदनगर)

एमपीएससीने विश्वासार्हता जपणे आवश्यक

‘विक्रीकर निरीक्षकच तोतया परीक्षार्थी’ ही बातमी (५ जाने.) वाचली. हे धक्कादायक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी अनेक स्पर्धा परीक्षा आयोजित करते. त्यांचे काम अत्यंत व्यवस्थित चालू आहे. त्यासंबंधी कधीही तक्रारी येत नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मात्र उलटी स्थिती आहे. आयोगाच्या परीक्षेत सदैव काही ना काही घोळ होतच असतात. अनेक परीक्षांत असे तोतया लोक परीक्षा देऊन जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहेत. संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाने इतर परीक्षा पद्धतीनुसार सर्व परीक्षार्थीचे चित्रीकरण, बायोमेट्रिक उपस्थिती यासारख्या पद्धतींचा अवलंब करून शेवटी निवड झालेल्या उमेदवारांचीही खात्री करावी. असे प्रकार थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. एमपीएससीने आपली विश्वासार्हता जपणे गरजेचे आहे.

– सतीश भोसले,  विटा खुर्द (परभणी)

सर्वच नेत्यांनी गांधीजींच्या कृतीतून बोध घ्यावा

महात्मा गांधींनी शौचकूप या विषयावर व्यावहारिक दृष्टिकोनातून बरेच संशोधन केले होते. त्याची सफाई करण्यामागील अप्रतिष्ठा दूर करण्यासाठी ते स्वत: तर सफाई करीतच पण इतरांनाही हे काम करण्यास प्रवृत्त करीत. ‘त्यांच्यावर झालेल्या आजवरच्या अन्यायाबद्दल जर एखाद्या हरिजनाने माझ्या एका गालफडात मारले तर मी दुसरा गालही पुढे करीन.’ अशा अर्थाचे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. आपल्या असहकार आंदोलनादरम्यान चौरीचौरा येथे आंदोलकांनी िहसाचाराचा अवलंब करताच त्यांनी इतरत्र आपले आंदोलन स्थगित केले आणि लोकांचा रोष ओढवून घेतला. तेथेही आधी आंदोलकांवर हल्ला झाला होता. अर्थात असा असामान्य संयम आणि अिहसेवर श्रद्धा दुरापास्त आणि कठीणच! आपल्या नेतागणांनी, प्रांतीय आणि केंद्रीय सरकारांनी आपली ध्येयधोरणे ठरविताना मग ते स्वच्छता अभियान असो, दलितवर्गाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी म्हणा अथवा जनआंदोलन काबूत आणण्यासाठी असो-  दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या आपल्या गांधी या राष्ट्रपुरुषाचे मार्गदर्शन घ्यावे.

पशुपालन असो वा वैयक्तिक जीवनासंबंधी कायदे असोत याबाबत धोरणे ठरविताना लोकांचे अधिकाधिक हित हाच ऐहिक निकष मानायला हवा. तेथे धर्माची लुडबुड असू नये. धर्मच संकट म्हणून कसा उभा राहतो, हे  ‘धर्माचा अर्थ’ (४ जाने.) या संपादकीयात स्पष्ट केले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे अर्थाशिवाय धर्म खरोखरच निर्थक आहे आणि धर्मक्रांती तर दारिद्रय़ाकडे नेते.

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

‘तो’ मौर्य नव्हे, चंद्रगुप्त विक्रमादित्य!

‘जे आले ते रमले..’ या सदरातील ‘परकीयांचा भारतप्रवेश’ हा भाग (४ जाने.) वाचला. लेखक म्हणतात ‘इ.स.पू. ३२७ मध्ये ग्रीक राजा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. त्याचा सेनाधिकारी सेल्युकस याचा संबंध मौर्य राजा चंद्रगुप्त याच्याशी आला. सेल्युकसने त्याच्या मुलीचा विवाह चंद्रगुप्ताशी करून एका भारतीयाशी नातेसंबंध जोडला..’ विष्णुपुराणानुसार चंद्रगुप्त मौर्याचा काळ इ.स.पू. १३३४ ते १३०८ असा येतो. बौद्ध वाङ्मयातील माहितीशीदेखील हा काळ बहुतांशी जुळतो. मात्र अलेक्झांडर इ.स.पू. ३२७ मध्ये भारतात आला. मग त्याचा सेनाधिकारी सेल्युकस याचा संबंध चंद्रगुप्त मौर्याशी कसा काय येऊ शकतो?

समुद्रगुप्त (राज्यकाल- इ.स.पू. ३४१ ते ३०६) व चंद्रगुप्त विक्रमादित्य (राज्यकाल- इ.स.पू. ३०२ ते २६७) या गुप्त राजांच्या काळातच आशियात ग्रीकांची राज्ये होती. इ.स.पू. ३०२ मध्ये सेल्युकसचा पराभव करून त्याची कन्या हेलनशी विवाह करणारा तो चंद्रगुप्त विक्रमादित्य हाच होय. त्याचा चंद्रगुप्त मौर्याशी काहीही संबंध नाही. दोन नावांतल्या साधम्र्यामुळे हा गोंधळ उडाला आहे.

   -ओंकार शिरसकर, कुर्ला (मुंबई)