रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काही राजकीय अपरिहार्य कारणांमुळे मुदतवाढ मिळाली नाही. मुदतवाढ मिळाली असती तर नोटाबंदीचा प्रकार घडला नसता. केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेकडे वाढीव आर्थिक वाटा कलमांचा वापर करून मागितला नसता, कारण देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) काय आहे हे राजन यांना चांगले ठाऊक होते आणि अडचण नको म्हणून केंद्र सरकारने राजन यांना मुदतवाढ दिली नाही. हे देशाचे अपयश म्हणावे लागेल.

राजन हे शिकागो विद्यापीठात प्राध्यपैकी करतात. संधी मिळणार असल्यास मायदेशी परतण्यास उत्सुक आहोत, असे त्यांनी अलीकडेच मुलाखतीत सांगितले. विरोधी पक्षांनी त्यांना अर्थमंत्री करण्याची तयारी दाखवली. मात्र राजन यांची कारकीर्द पाहता सत्तेवर कोणताही पक्ष येवो; पण देशहितासाठी रघुराम राजन याना अर्थमंत्री केल्यास ते देशाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावू शकतात. डॉ. मनमोहन सिंग यांची अवहेलना लायकी नसलेल्या राजकीय मंडळींनी केली; तशी राजन यांच्याबाबतीत कोणी करणार नाही.

– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर (नवी मुंबई)

‘विज्ञान संपते तिथे..’ अस्मिता सुरू !

यशवंत पाठक यांच्या वैयक्तिक पत्रातील काही भाग ‘लोकमानस’ या सदरासाठी पाठविला जाणे आणि लोकसत्ताने त्यास ‘यशवंत पाठक यांचे विज्ञानविषयक विचार’ अशा शीर्षकाने (लोकमानस, २६ मार्च) प्रसिद्धी देणे, हे वैज्ञानिक दृष्टिकोन विषयक गैरसमज वाढवण्यास हातभार लावणारेच ठरते. यशवंत पाठक यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म सुरू होते’ किंवा ‘विज्ञानाची परिणती शेवटी अध्यात्मातच होते’ , हे एक गैरसमज पसरवणारे आणि धार्मिक अस्मिता फुलवणारे वाक्य आहे. त्यासाठी असे म्हणण्याचा प्रघातच पडला आहे. काही वैज्ञानिकही याला अपवाद नाहीत. विज्ञानापेक्षा अध्यात्मच कसे श्रेष्ठ हे ठसविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. विज्ञानाला मर्यादा आहेत हे वैज्ञानिकही मान्य करतात. ते त्याची शास्त्रीय कारणमीमांसाही देऊ शकतात. पण अध्यात्माचे श्रेष्ठत्व ठसवणारी मंडळी तशी ती देऊ शकत नाहीत, हा महत्त्वाचा फरक आहे.विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते असे म्हणणाऱ्यांना, विज्ञान नेमके कोठे संपते हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण त्याचे निश्चित गमक उपलब्ध नाही. ते उपलब्ध होण्याची शक्यताही नाही. कारण विज्ञान ही एक सतत घडणारी निरंतर प्रक्रिया आहे. तसेच, विज्ञानाची परिणती अध्यात्मात होते म्हणजे नेमके काय होते, हे कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही.

विज्ञान हे तटस्थ आणि भावनाशून्य असते. कारण ते निसर्गातील भौतिक नियमांशी बद्ध आहे. परंतु त्याचा वापर करणारा मानवी मेंदू भावनाशील असल्यामुळे जर भावना बुद्धिपेक्षा प्रबळ असतील तर तो विज्ञानाचा दुरुपयोग करतो आणि जर भावनांवर बुद्धीचा अंकुश असेल तर तो विज्ञानाचा विधायक म्हणजेच सदुपयोग करतो.

अध्यात्माचा आणि ते मांडणाऱ्या संतवाङ्मयाचा अभिमान जरूर असावा; पण विज्ञानाला कमी लेखले जाऊ नये. मात्र अध्यात्माचेच श्रेष्ठत्व मानणारी माणसे ‘जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते’, अशी टाळ्याखाऊ अस्मिता गोंजारणारी आणि भावनेच्या पुरात वाहून जाणारी वाक्ये फेकून स्वतच्या बुद्धीलाही कमी लेखतात, हे त्यांच्या गावीही नसते. हे आपल्या केव्हा लक्षात येईल?

-जगदीश काबरे, सीबीडी-बेलापूर (नवी मुंबई)

टीका अज्ञानातून!

‘विज्ञानाला मर्यादा; पण अध्यात्म उजवे कसे?’ हे पत्र (लोकमानस, २७ मार्च) वाचले. विज्ञानाच्या मर्यादा आहेत पण अध्यात्माने मानवी जीवन सुखकर केल्याचे कुठे दिसत नाही असे पत्रलेखक म्हणतात.  हे बरोबर आहे, पण याचे मूळ कारण खूप कमी लोक आध्यत्मिक जीवन जगतात हे आहे.

अध्यात्म म्हणजे माणसाने अंतर्मुख होऊन जीवन जगणे, स्वततील चतन्यशक्तीला जाणणे. हीच चतन्यशक्ती सर्वापाशी आहे, पण ते त्याबाबत अज्ञानी असतात. असे अज्ञानी लोक स्वतचे दोष न पाहता इतरांचे दोष, अगदी पंतप्रधानांचे कसे चुकते, हे दररोज लोकांना सांगतात. आपल्यातील चतन्य शक्ती ही सर्वाच्या ठिकाणी आहे म्हणजे आपण सर्व जण एक आहोत. ही एकत्वाची  भावना मनात ठेवली तर आपले सर्व व्यवहार प्रेमळ आणि सार्वजनिक हिताचे होतील. खरे आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सध्या देशात असणारे जातीचे, प्रांतांचे, आरक्षणाचे, विविध पंथांचे सर्व प्रश्न मिटतील व खरे आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

– पुरुषोत्तम कऱ्हाडे ,जोगेश्वरी पूर्व.

‘चळवळ’ नव्हे, धूळफेक!

भाजप प्रवक्ते अनिल बलुनी यांच्या ‘‘मं भी चौकीदार’ चळवळ’ या लेखात बेमालूमपणे महात्मा गांधी यांचे आंदोलन आणि आदरणीय विनोबा भावे यांची १९५२ सालची ‘भूदान चळवळ’ यांच्याशी तुलना करून प्रधानसेवक मोदी यांना त्या पात्रतेला नेण्याचा प्रयत्न करतात. पण गांधी आणि भावे यांच्याशी तुलना करायला भाजपत अजून कुणी जन्मलेले नाही, पुढे जन्मायची शक्यताही दिसत नाही. मुळात ‘मं भी चौकीदार’ ही ‘चळवळ’ म्हणायच्या पात्रतेची तरी वळवळ आहे काय? मुदलात २०१४ला चायवाला, गुजरात मॉडेल, अच्छे दिन, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया हे सारे कुठे कधी हरविले आणि ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा लोकांनी कशी उचलली, हे भाजपच्या चाणक्यांनाही कळले नाही.

देश, राष्ट्रवाद, भारतमाता की जय, वंदे मातरम या सर्व बाबी मतपेटीतून विजयाचा मार्ग शोधण्यासाठीच्या युक्त्या होत्या, हे जनतेला अखेर समजू लागले आहे. अनिल बलुनी यांच्या मते मोदींच्या ‘मं भी चौकीदार’या ट्वीटने ‘क्रांती’ केली आणि ‘सामाजिक चळवळ’ उभारली गेली. ज्या पक्षाचे कोटीच्या कोटी सदस्य ‘मिस कॉल’ने तयार होतात, ज्यांच्याकडे समाजमाध्यमांच्या निरनिराळ्या विभागांसाठी खर्च करायला पैसे आणि टीम आहे त्यांना हे सर्व सहज शक्य आहे. पण याआधीच्या असल्याच घोषणांकडे व कथित ‘चळवळीं’कडे पाहिल्यास काय दिसते?

‘सब का साथ, सब का विकास’ ही घोषणा तर हल्ली विनोदांसाठी वापरली जाणारी घोषणा आहे. भ्रष्टाचार आणि भाजप हे समानार्थी शब्द आहेत, परंतु काही ‘पेड माध्यमां’मुळे लोक विस्मृतीत गेले होते, ते आता जागे झाले आहेत.

अनिल बलुनी यांच्या लेखात मोदी यांनी ‘लालकिल्ल्याच्या सदरेवरून’ भाषण केले असा उल्लेख आला आहे. सदर लालकिल्लाही भाडय़ाने देऊन नको तिकडे व्यापारचातुर्य दाखवायचा मूर्खपणा मोदी सरकारने केलेला आहे. एकाच मित्राला पाच विमानतळ भाडय़ाने दिले तेव्हा अनुभव पाहिला गेला नाही.

सन २०१४ मधील ‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेचे ‘मेरा झूठ सबसे मजबूत’ या घोषणेत लोकांनी कधी रूपांतर केले ते भाजपच्या धुरीणांना कळलेही नाही.

रोजगाराचे आकडे जाहीर करायला ५६ इंच छाती घाबरते हे जनता बघत आहे. १२,००० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोज शहीद होणारे जवान, पाकिस्तानात जाऊन केक खाणे, पुलवामाच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले त्याला महिना होत नाही तर त्यांच्या पंतप्रधानाला चोरून एसएमएस पाठविणे, या गोष्टींची नोंद जनता घेत नाही असे वाटते काय?

वर्षांला दोन कोटी नवीन रोजगार राहिले बाजूला, काँग्रेस काळात लागलेल्या एक कोटीच्या वर नोकऱ्या गेल्या. शेतमजूर घरी बसले. मजुरी द्यायला पैसे नाहीत. ‘एमटीएनएल’च्या कामगारांना, जेटच्या कामगारांना, छत्तीसगडच्या चौकीदारांना चार ते सहा महिने पगार मिळत नाही. सरदार पटेल यांचा पुतळा बनविण्यासाठी प्रचंड खर्च केला; त्या कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत. ७० वर्षांत अशी भीषण हलाखी आली नव्हती.

जनतेचा एक रुपयाही संसदेच्या मंजुरीशिवाय खर्च करता येणार नाही, हे लोकशाहीचे तत्त्व आहे. या तत्त्वालाही केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. संसदेच्या मंजुरीविना ९९,६१० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. ‘कॅग’ने यावर ताशेरे मारले आहेत. अर्थ मंत्रालयाचे या बाबींकडे दुर्लक्ष आहे. हे जाणीवपूर्वक आहे. जिकडे चौकीदारी करायला हवी, तिथे सर्व कथित ‘चौकीदार’ डोळ्यावर झापडे लावून बसलेले आहेत.

न्यायाधीश पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकारांचे खून होत आहेत. न्यायाधीश संशयास्पदरीत्या मृत्युमुखी पडले आहेत, केस घ्यायला तयार नाहीत, खऱ्या बातम्या दिल्या तर ती वाहिनीच केबलवरून गायब करण्यात येत आहे. संपादकांना घरी बसविले जात आहे. असा भारत कुणी अपेक्षिलेला नाही. नोटाबंदीतही हेच केले. ४ नोव्हेंबर २०१६पर्यंत १७.९७ लाख कोटी रुपये रोख चलनात होते. डिजिटल इंडियाची खोटी जाहिरातबाजी करून लोकांना पुन्हा फसविले. या चलनात आता १९.४४ टक्के वाढ  झालेली असून २१.४१ लाख कोटी रुपये रोख चलन बाजारात उपलब्ध आहे. हजारो नोकऱ्या गेल्या, कारखाने बंद पडले, रांगेत उभे राहून १००च्या वर भारतीय जिवास मुकले, पण ‘चौकीदारा’ला त्याचे सोयरसुतक नव्हते.

राफेल खरेदी घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून नोंद केला जाईल अशी चिन्हे आहेत. जर ‘चौकीदार’ प्रामाणिक आहे; तर संयुक्त संसद समिती का नेमली जात नाही?

माजी सीबीआय निर्देशक आलोक वर्मा राफेलची फाइल उघडतील या भीतीने रातोरात त्यांची बदली करणे, न्यायालयाला शपथेवर खोटे सांगणे, देशाच्या महत्त्वाच्या संस्थांना बटीक बनवून टाकणे हे काही लपवून ठेवण्यासारखे नाही. दुसरीकडे, ‘टूजी घोटाळ्या’चे खोटेपण लोकांना आता समजले आहे. तत्कालीन ए. राजा समवेत १७ आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडलेले आहे.

सतत नवीन घोषणा देणे, कुणी सरकारला प्रश्न विचारले तर राष्ट्रवादी घोषणा देणे, त्याला देशद्रोही म्हणणे हेच गेली साडेचार वर्षे लोक बघत आलेले आहेत. हे आता जास्त दिवस चालणार नाही. मतदारांमध्येही एक गावरान शहाणपणा असतो, तेथे वारंवार चाणक्यनीती चालत नाही. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ हे लोकांना माहीत आहे.

मोदीजी अखलाकच्या मृत्यूवर, नजीबच्या गायब होण्यावर, दलितांना झाडाला टांगून मरेस्तोवर मारण्यावर, झुंडशाहीने विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हत्या होण्यावर काहीच ट्वीट करत नाहीत. त्यावर ट्वीट करून काही चळवळ उभारल्याचे आम्ही कुठेही पाहिले नाही. कितीही प्रयत्न केला तरी, ‘चौकीदार चोर आहे’ ही घोषणा विस्मृतीत जाणार नाही आणि त्यापासून भाजपला पळताही येणार नाही.

 – धनंजय जुन्नरकर (सचिव, प्रवक्ता- मुंबई प्रदेश काँग्रेस)

अडवाणींनी घरी राहिलेलेच बरे..

महाभारतात द्रौपदीची जेंव्हा विटंबना होत होती त्या वेळी सर्वच ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्ती- द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म.. डोळ्यावर कातडे ओढून गप्प बसले होते. मनात आणले तर भीष्म हे सर्व रोखू शकत होते. त्याप्रमाणे गेल्या पाच वर्षांत लोकशाहीची जी विटंबना, पक्ष तोडणे, निरनिराळ्या संघटना मोडणे, लोकशाही संस्थांची जी व्यवस्था मोडून काढण्याचे काम चालले आहे त्यावर लालकृष्ण अडवाणी आणि तसेच इतर ज्येष्ठ नेते यांनी तोंडातून ब्रही काढला नाही. कुठल्याही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नावर- मग तो काश्मीर असो, नोटाबंदी, बेकारी, गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्या असोत किंवा शेतकऱ्यांच्या  आत्महत्या असोत, आपले मतप्रदर्शन केले नाही. पक्षातील वा देशातील लोकशाही वाचवण्याचे काहीही प्रयत्न केले नाहीत. देशाची जी अराजकाकडे वाटचाल चालू आहे ती रोखण्याचा काहीही प्रयत्न केला नाही.

अशा अघोषित आणीबाणीच्या वेळी जर हे शस्त्र म्यान करून बसले तर मग ती शस्त्रे काय कामाची? मग सामान्य नागरिकांनी कोणाकडे आशेने पाहायचे? यांच्या उपस्थितीने जर लोकसभेत काहीही फरक पडणार नसेल तर यांची उपस्थिती लोकसभेत असून उपयोग काय? गेल्या लोकसभेत अडवाणीजींनी यूपीए सरकारला उद्देशून एक असभ्य शब्द वापरला होता, ताबडतोब त्या शब्दाला सोनिया गांधी यांनी हरकत घेतली होती, त्याला प्रत्त्युतर म्हणून अडवाणी यांनी लगेचच क्षमा मागितली होती. हे केवळ दोन मिनिटांत घडले; पण आज ही सभ्यता भाजपमध्ये शिल्लक राहिली आहे काय? राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहू द्या पण पंतप्रधानांनी राजकारणात वैयक्तिक निंदानालस्ती करताना जी असभ्यपणाची भाषा वापरली, त्यालासुद्धा आवर घालण्याचा प्रयत्न भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला नाही. पक्षाचाच विचार करायचा झाला तरी ज्या पक्षाशी प्रतिमा म्हणून अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे चेहरे लोकांच्या नजरेसमोर यायचे त्या जागी  अमित शहा आणि स्मृती इराणी यांचे चेहरे नजरेसमोर येऊ लागले ही सुद्धा या पक्षाची अधोगतीच नव्हे काय? मग अशा पक्षाला आणि जनतेला निरुपयोगी ठरलेल्या अडवाणी यांनी लोकसभेत येण्यापेक्षा घरी राहिलेलेच बरे.

  – अशोक वासुदेव बक्षी, सातारा

जे डीएड/बीएडचे झाले, तेच इंजिनीअरिंगचे..

‘जगण्याचे ‘जुगाड’’ हा अशोक तुपे यांचा लेख (२७ मार्च) वाचला. लेख इंजिनीअरिंगबद्दल आहे, पण पूर्वी काळात डीएड् आणि बीएड् अभ्यासक्रम करून शिक्षक होण्याची एक लाट निर्माण झाली होती ती लाट आजच्या घडीला पूर्णपणे नष्ट होत आहे. डीएड् आणि बीएड्धारक लाखो विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन नाही. गुजराण करण्यासाठी पुण्या-मुंबईत हे विद्यार्थी वाट्टेल ते काम करण्यास तयार आहेत, आणि त्याचमुळे स्पर्धा परीक्षांकडे या विद्यार्थ्यांचा ओढा वाहताना दिसत आहे. सरकारची नोकर भरती दिवसेंदिवस कमीच होत असल्यामुळे इकडेदेखील नोकरीची हमी नाही.

डीएड् आणि बीएड्नंतर आली, ती इंजिनीअिरगची लाट मागील काळात निरीक्षण केल्यास प्रत्येक घरातील एक जण तरी तंत्रनिकेतन पदविका किंवा पदवीसाठी असेल हे चित्र निर्माण झाले होते. कारण त्या वेळी इंजिनीअरांची संख्या कमी प्रमाणात असल्याने इंजिनीअरची मागणीदेखील अधिक होती. पण आजच्या घडीला परिस्थितीत अवघड होऊन बसलीय एकटय़ा पुणे परिसरातच शे-दीडशे  इंजिनीअिरग महाविद्यालये सापडतील. नुकतेच एक सर्वेक्षणात आढळले की, अशा इंजिनीअरिंगच्या पदव्या उदंड झाल्या तरी, भारतातील पात्रता असणारे’ इंजिनीअर केवळ चार ते पाच टक्के एवढेच आहेत.

शिक्षणात ज्या प्रकारे दर्जा पाहिजे तो नसल्याने पुढील भावी पिढीला या जुगाडाची सवय लाववीच लागेल. शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दिवसेंदिवस अपात्र उमेदवारांची संख्या वाढत आहे. तेव्हा निदान जुगाड जुळवण्यासाठी तरी शासनाने मदत करावी ही विनंती!

– शशांक कुलकर्णी, जालना</strong>

‘फिट’ होण्याचे कसब

‘जगण्याचे ‘जुगाड’’ हा लेख (युवा स्पंदने, २७ मार्च) वाचल्यावर असे वाटले की आजकाल भले इंजिनीअरिंग केल्यावर इंजिनीअरचे काम नसेल मिळत; पण कुठे ना कुठे ‘फिट’ होण्याचे कौशल्य मात्र मिळते. आणि तेही, कुठून इंजिनीअरिंग केले त्याच्या निरपेक्ष! इंटरव्ह्यू घेताना प्रत्यक्षात असे दिसते की इंजिनीअरिंग- ज्ञानात अलीकडे अनेक इंजिनीअर अल्पज्ञानी असतात. लेख वाचून असे वाटते की ‘जागतिक भान’ नावाचा एक नवा विषय सध्या इंजिनीयरिंगमध्ये शिकवत असावेत! दर वर्षी किती इंजिनीअर्स बाहेर पडतात, नोकऱ्या किती, तज्ज्ञ/कुशल लेक्चर्स किती प्रमाणात आहेत, इंजिनीअरिंग विषय कितपत ‘अनडायल्युटेड’ स्वरूपात शिकवले जातात, या मुद्दय़ांचा परामर्श हवा होता.

      – अर्जुन बा. मोरे, ठाणे</strong>

हे तर राजकीय शक्तिप्रदर्शन

नुकतेच भारताने अवकाशात फिरणारा उपग्रह नष्ट करण्याची शक्ती सगळ्यांना दाखवून दिली असली तरी आताच निवडणूक काळात ही चाचणी का घेतली गेली, याचा विचार कोण करते का? अशी क्षमता असणारा आपण जगात चौथा देश बनलो हा अभिमान आहे आणि तो कायमच राहणार आहे. मात्र ही मिशन शक्तीची किमया राजकीय ताकद वाढविण्यासाठी होत आहे हे नक्की! तळे राखील तो पाणी चाखील हेच स्पष्ट होत आहे.

-संतोष ह. राऊत, लोणंद (जि. सातारा )

शास्त्रज्ञांचे श्रेय पंतप्रधानांनी लाटणे हास्यास्पद

उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची बातमी इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञाकडून देशाला कळली असती तर ते जास्त सयुक्तिक ठरले असते. कारण ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान किंवा सत्ताधारी पक्ष यांनी कोणतेही परिश्रम घेतलेले नसतात. वर्षांनुवर्षे चाललेल्या अथक परिश्रमांचे व संशोधनाचे ते फलित असते. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण करीत ही बातमी देणे हास्यास्पद ठरले, तसेच ते इस्रोतील शास्त्रज्ञांचा अवमान करणारेही ठरले.

काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतरच्या हवाई सर्जकिल स्ट्राइकचे लष्कराचे श्रेय यांनी लाटलेच, आता शास्त्रज्ञांचे लाटले. निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही काहीही करायला व करवून घ्यायला तयार आहोत, हा दर्प पंतप्रधानांच्या बाष्कळ कृतीतून दिसून आला. राहुल गांधी यांनी त्यांना ‘जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा’ देऊन त्यांची नाटकीय कृती देशाच्या रंगमंचावर मांडली हे बरे केले!

आता निवडणुका होईपर्यंत कोणकोणत्या नाटकांचे प्रयोग आपल्यासमोर सादर होणार आहेत याची झलक या निमित्ताने जनतेला मिळाली आहे.

-राजश्री बिराजदार, दौंड (जि. पुणे)

‘इच्छाशक्ती नाही’, म्हणजे काँग्रेसला सार्वभौमत्वाविषयी गांभीर्य होते की नव्हते?

भारतीय शास्त्रज्ञांनी बुधवारी ‘मिशन शक्ती’ म्हणजेच ‘ए सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. देशाच्या पंतप्रधानांनी याची देशवासीयांना माहिती दिली. आपल्या परंपरेप्रमाणे त्यावर वाद-विवाद सुरू झाले आहेत. ते आधी सर्जकिल स्ट्राइक, एअर स्ट्राइकच्या वेळीदेखील झाले आहेत. या तिन्ही बाबतीत एक समान सूत्र आहे. ते हे की, सर्जकिल स्ट्राइकच्या वेळी सन्याने, एअर स्ट्राइकच्या वेळी हवाई दलाने आणि आता ‘ए सॅट’च्या वेळी शास्त्रज्ञांनी ‘आपली सज्जता होती, पण त्या वेळच्या राजकीय नेतृत्वाने इच्छाशक्ती दाखवली नाही,’ हे सांगून टाकले आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यापूर्वी काँग्रेसने त्याची कारणे देशासमोर सांगायला हवीत. अन्यथा देशाच्या सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर काँग्रेस गंभीर नव्हती हेच सिद्ध होईल.

– उमेश मुंडले, वसई

श्रेयाचे राजकारण प्रचारात गाजणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना ‘मिशन शक्ती’अंतर्गत उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती देशवासीयांना दिली. भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु पंतप्रधानांनी या अभियानाच्या माहितीची घोषणा करण्याच्या दोन-तीन तास अगोदर केलेल्या पूर्वसूचनेमुळे तर्कवितर्काना आलेले उधाण टाळता आले असते. तसेच आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे पंतप्रधानांच्या या घोषणेला राजकीय लाभाचे लेबल लागणे स्वाभाविक आहे. सत्ताधारी-विरोधक यांनी चालवलेले श्रेयाचे राजकारण प्रचारात गाजणार यात शंका नाही. हे सर्व खरे असले तरी शास्त्रज्ञांची उल्लेखनीय कामगिरी दुर्लक्षिली जाऊ नये.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी

‘शक्ती’पेक्षा युक्ती श्रेष्ठ?

‘मिशन शक्ती’ हे शास्त्रज्ञांनी केलेल्या अविरत मेहनतीचे २००९ पासूनच्या संशोधनाचे फलित आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या मिशनवर राजकीय शेरेबाजी किंवा प्रसिद्धी करून नाही सत्ताधारींना आवरता येत नाही विरोधकांना. एकंदरीत पंतप्रधानांनी ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

– दत्तप्रसाद शिरोडकर,  मुलुंड