scorecardresearch

अग्रलेख : शेन वॉर्नचे नसणे..

भविष्यात क्रिकेटला वेगळय़ा आणि भविष्यवेधी वळणावर नेण्यासाठी तो हवा होता..

त्याची बुद्धी, त्याचा सच्चेपणा, त्याचा स्पष्टवक्तेपणा याची क्रिकेटला आजही गरज होती. भविष्यात क्रिकेटला वेगळय़ा आणि भविष्यवेधी वळणावर नेण्यासाठी तो हवा होता..

शेन कीथ वॉर्नवर मृत्युलेख लिहायचा, तर पहिले आव्हान ठरते त्याचे नसणे स्वीकारण्याचे. तो स्वीकार अत्यंत कष्टप्रद असाच. कारण गेली जवळपास ३० वर्षे तो क्रिकेटच्या अवकाशाला व्यापून राहिला होता. त्याचे आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे द्वंद्व – ज्यात सचिन नेहमीच अग्रेसर राहिला आणि वॉर्नने ते कधीही अमान्य  केले नाही – ही या व्याप्तीची केवळ एक झलक होती. द्वंद्व आणि वॉर्न नेहमीच हातात हात घालून चालत राहिले. ते द्वंद्व होते बोजड शरीर असूनही ऑस्ट्रेलियासारख्या ‘तंदुरुस्तीपसंद’ देशात क्रिकेटच्या मैदानावर उतरून हुन्नर दाखवण्याच्या ईर्षेशी. ते द्वंद्व होते सिगारेट, मद्य आणि मदनिका या खल ठरवल्या गेलेल्या आसक्तींशी. द्वंद्व होते तेज गोलंदाजांची पंढरी असलेल्या ऑस्ट्रेलियात फिरकीपटू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या प्रतिकूलतेशी. तसेच ते होते मैदानावरील उत्कटता आणि मैदानाबाहेरील स्वच्छंदीपणा यांत समतोल साधण्याच्या आव्हानाशी. या सर्वच द्वंद्वांमध्ये तो यशस्वी ठरला असे काही नव्हे. पण क्रिकेटला आस्वादत राहणे त्याने कधीही त्यागले नाही. आणि एखादी चांगली गज़्‍ाल, एखादा उत्कृष्ट सिनेमा, एखादे उंची मद्य यावत् त्याची कारकीर्द चवीचवीने आस्वादणे क्रिकेटप्रेमींनी कधीही सोडले नाही. त्याच्या खेळाला सोप ऑपेराची उपमा दिली जायची. ते खरे नव्हे. सोप ऑपेरामध्ये कथानक ठरीव असते आणि त्यातली नाटय़मयता कृत्रिम असते. वॉर्नची कारकीर्द आणि त्याचा अकाली शेवट हे नाटय़मय असेल, परंतु त्यात कृत्रिम आणि ठरलेले असे काही नव्हते. उत्तरोत्तर रंगत जाणारी ती एक मैफल होती. वॉर्न खेळत असताना तिची रंगत वाढत गेलीच, पण त्याच्या निवृत्तीनंतरही तिला अनोखी खुमारी चढली. निवृत्तीपश्चात कारकीर्द आता कुठे सुरू झाल्यासारखी वाटत होती, पण साधे, सरळ, शाश्वत असे काही वॉर्नप्रमाणेच नियतीलाही मंजूर नव्हते. 

आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात शाळेतील असा एखादा मुलगा नक्की आला असेल जो कमालीचा वांड असूनही अभ्यासात हुशार असायचा. त्यामुळे पालक आपापल्या मुलांना बजावायचे, ‘याच्या नादाला लागू नका. पण तो अभ्यास कसा करतो ते पाहून ठेवा’. वॉर्न हा या श्रेणीतला क्रिकेटमधील हुशार उनाड मुलगा. पुढे त्या विद्यार्थ्यांचा लेगस्पिन गोलंदाजीमधील विद्यावाचस्पती बनला, तरी खेळावरील आणि फिरकीवरील प्रेम टिकून राहिले. दिखाऊपणा आणि दांभिकतेला शिष्टसंमती मिळालेल्या आजच्या युगात विस्कटलेल्या केसांसह आणि मळकटलेल्या कपडय़ांसह वॉर्न मैदानात दिमाखात वावरायचा. क्रिकेटचे मैदान हे त्याचे विद्यापीठ आणि २२ यार्डाची खेळपट्टी प्रयोगशाळा होती. पट्टीच्या प्रोफेसराचा जीव पीएच.डी. करून आणि निवृत्त होऊनही विद्यापीठात आणि त्यातही प्रयोगशाळेत अडकून राहावा तसे वॉर्नचे होते. त्याच्या रंगलीलांची टॅब्लॉइडी चर्चा नित्यनेमाने प्रसृत होत असे. वॉर्नचे व्यक्तिमत्त्वच जोखड झुगारून देणारे होते, त्याला तो काही करू शकत नव्हता. तरीही सचिन तेंडुलकरपासून स्टीव्ह वॉपर्यंत, ब्रायन लारापासून ज्याक कॅलिसपर्यंत; सुनील गावस्करपासून ते इयन चॅपेल यांच्यापर्यंत, सर गॅरी सोबर्स यांच्यापासून ते रिची बेनॉपर्यंत प्रत्येक पिढीतील प्रतिभावंताने या कलंदराला त्याच्या क्रिकेटकौशल्यावरूनच पारखले आणि गौरवले. सचिनसारखा शिस्तप्रिय, नियमप्रिय, नीतिप्रिय महान क्रिकेटपटू त्याचा जानी दोस्त होता आणि दोघांतील द्वंद्व त्यांच्या मैत्रीच्या आड कधीही आले नाही. याचे कारण सचिनने वॉर्नमध्ये निव्वळ असामान्यत्व पाहिले आणि त्याच्यातील कथित सामान्य तमोगुणांकडे दुर्लक्ष केले. वॉर्नची जगाकडून हीच अपेक्षा होती. त्याच्या स्खलनशील व्यक्तिमत्त्वाला उदात्तीकरणाचा सोस नव्हता. कारकीर्दीत सातत्याने केलेल्या ढीगभर चुकांबद्दल त्याला कधीच फारसा विषाद वाटला नाही. प्रत्येक वेळी नवीन भानगड बाहेर आल्यावर स्वारी शिक्षा, बंदी वगैरे भोगून मैदानावर हजर व्हायची आणि आधीपेक्षा अधिक जोमाने खेळायची. या असीम, अक्षय प्रज्ञेमागील रहस्य काय होते? मैदानाबाहेर मानवी चुका करत राहणारा हा खेळाडू मैदानात अमानवी कर्तृत्व इतक्या सातत्याने कसे काय गाजवत राहतो, हा प्रश्न आपल्यापैकी कुणाला कधीच पडत नव्हता का?

शेन वॉर्नला क्रिकेटमधील दिएगो मॅराडोनाची उपमा दिली गेली. तसे पाहायला गेल्यास तो मॅराडोना, एल्विस, मोहम्मद अली यांचे मिश्रणच होता. माझे कौशल्य तुमच्यासमोर सादर करतो, त्यापलीकडे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करण्याच्या फंदात पडू नका, ही मोहम्मद अलीसम गुर्मी त्याच्यात होती. मॅराडोनाच्या पायांतील चापल्य वॉर्नच्या उजव्या हाताच्या बोटांमध्ये दिसून यायचे. एल्विसप्रमाणे तो रॉकस्टार मानला जायचा, पण एल्विसच्या मखमली वाणीसारखीच जादूई त्याची फिरकी होती. मोहम्मद अली वगळता इतर दोघे बेछूट जगले, आणि अकाली संपले. वॉर्नही त्यांच्या वाटेने गेला. पहिल्याच कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या भारताशी गाठ पडली हे आपले सुदैव, कारण त्यातूनच आपल्यातील अपूर्णतेची सणसणीत प्रचीती आली आणि सुधारण्याची गरज कळाली असे वॉर्न सांगायचा. १९९३ मध्ये इंग्लिश भूमीतील त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिला चेंडू अविस्मरणीय ठरला. तो आजही ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हणून ओळखला जातो. वॉर्न नावाच्या मिथकाचा तो जन्म होता. त्यानंतर प्रत्येक सामन्यात वॉर्नकडून तश्शाच चेंडूची अपेक्षा बाळगली जायची आणि अनेकदा वॉर्नने त्या मिथकाला साजेशी कामगिरी करूनही दाखवली. परंतु खेळपट्टीची चौकट वगळल्यास इतर चौकटी त्याला मान्य नव्हत्या. संघभावना वृद्धीसाठी त्याचा एक कर्णधार स्टीव्ह वॉ ऑस्ट्रेलियन संघगीत, कधी राष्ट्रगीत वगैरे सामन्यापूर्वीच्या संघबैठकीत सर्वाना गायला लावायचा. वॉर्नला त्याचा तिटकारा होता. मैदानावर उतरल्यानंतर याची खरोखरीच गरज भासते का, हा त्याचा रोकडा सवाल! सुपरस्टार, रॉकस्टार वगैरे जमातींसारखे जनतेपासून विलगीकरण त्याने स्वीकारले नाही. सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी तो सिगारेट, पिझ्झा आणि बीयर ही त्रिसूत्री पाळणारा त्यांच्यापैकीच एक होता. वॉर्नच्या मेलबर्नमधील पुतळय़ाजवळ फुले-मेणबत्त्यांच्या बरोबरीने ही सामग्रीही अनेकांनी श्रद्धेने आणून वाहिली, कारण वॉर्नच्या सामान्यपणात एक सच्चेपण होते. त्याची क्रिकेटविषयक जाण थक्क करणारी होती. तो स्वत: उत्कृष्ट कर्णधार आणि व्यूहरचनाकार होता. क्रिकेट समालोचन करताना अगदी कालपरवापर्यंत ज्या बारकाव्यांनी तो मैदानातील परिस्थितीचे आणि पुढे काय होणार याचे वर्णन करायचा ते अद्भुत होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जीव ओतला, तरीही तितक्याच उत्कटतेने एकदिवसीय, टी-२० आणि फ्रँचायझी क्रिकेटही स्वीकारले आणि त्यावरही स्वत:ची छाप सोडली. भारतातील क्रिकेटविषयी, क्रिकेटपटूंविषयी त्याला आदर होता. पण भारतीय जेवण त्याला कधीही आवडले नाही आणि याविषयी शिष्टाचाराची पत्रास न बाळगता तो मतप्रदर्शन करे. हल्लीचे बरेच परदेशी क्रिकेटपटू कोणत्याही विषयावर मतप्रदर्शन करताना, भारतातील क्रिकेट व्यवस्था ही आपली मायबाप असल्याची जाणीव ठेवून मोजूनमापून बोलतात, वॉर्नचे तसे नव्हते. त्याची बुद्धी, त्याचा सच्चेपणा, त्याचा स्पष्टवक्तेपणा याची क्रिकेटला आजही गरज होती. भविष्यात क्रिकेटला वेगळय़ा आणि भविष्यवेधी वळणावर नेण्यासाठी त्याचे योगदान हवे होते. ते आता शक्य नाही. गत शतकातील महानतम क्रिकेटपटूंमध्ये ‘विस्डेन’ मासिकाने जॅक हॉब्ज, डॉन ब्रॅडमन, गारफील्ड सोबर्स आणि व्हिव्हियन रिचर्डस यांच्या बरोबरीने वॉर्नची निवड केली. बाकीच्या चौघांच्या नावासमोर सर ही उपाधी लागली आणि ते सगळे प्राधान्याने फलंदाज होते. वॉर्न हा एकटा गोलंदाज. त्याला उपाधीची गरज नव्हतीच. तो त्यांच्यात सगळय़ात लहानही. त्याचे नसणे त्यामुळेच स्वीकारायला विलक्षण जड जाते!

मराठीतील सर्व संपादकीय ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial paying tribute to cricket legend shane warne zws