‘बुलडोझर योग!’ हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे अत्यंत समर्पक विश्लेषण करणारे संपादकीय (११ मार्च) वाचले. कोणत्याही घराण्याचे वैभव चौथ्या पिढीपर्यंत टिकते, हा समज काँग्रेसने खरा ठरवला आहे असे दिसते.

आज इतर पक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात कितीही ताकदीचे असले तरी ते प्रादेशिकच आहेत. त्यामुळे केंद्रात दोनच सशक्त पक्ष असावेत हे प्रगत लोकशाहीचे प्रारूप अपरिहार्य असल्याचे स्पष्ट दिसत आहे, परंतु त्यासाठी आपापला स्वार्थ सोडून प्रादेशिक पक्षांचे नेते आपापले पक्ष एका पक्षात विलीन करून एकत्र येणे शक्य नाही. असा प्रयोग जनता पक्षाने केला पण तो अत्यंत वाईट रीतीने फसला.  आताचे राजकारण पाहता आता तो प्रयोग स्वप्नातही शक्य दिसत नाही. त्यामुळे  केंद्रात व अनेक राज्यांत एकच पक्ष सत्तेत राहील असे रशियाप्रणीत लोकशाहीचे प्रारूप दीर्घ काळ टिकून राहील व एक व्यक्ती आधारित सत्ताकेंद्र स्थापण्यासाठी कदाचित संविधान पूर्णत: बदलले जाईल अशी दाट शक्यता दिसून येत आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप

विवेक शिरवळकर, ठाणे

अखिलेश यांना आत्मचिंतनाची गरज

‘बुलडोझर योग’ हा अग्रलेख वाचला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाजपकडून मोदींचा चेहरा असला तरी त्यासाठी त्यांच्या सोबतीला नितीन गडकरी, राजनाथसिंग यांच्यासह इतरही नेते प्रचारासाठी उतरविण्यात आले होते. पण याउलट सपकडून लढण्यासाठी अखिलेश यादव यांना तेवढी दमदार साथ नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे मायावतींचे निष्क्रिय राहणे. त्यासाठी त्यांच्यावर दबाव होता की काय नकळे. कारण ही निवडणूक भाजपसाठी २०२४ साठी महत्त्वपूर्ण होती. तिसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाज हा भाजपवर नाराज असला तर तो एक वेळ मतदानालाच जाणार नाही, पण तो इतर कोणाला मतदान करणार नाही. भाजपसारख्या मातब्बर पक्षाला हरवायचे असेल तर अखिलेश यादव यांना आत्मचिंतन करावे लागेल. अन्यथा उत्तर प्रदेशात बुलडोझर चालत राहील.

प्रा. राजेशकुमार झाडे, चंद्रपूर

आता विरोधक आणखी महत्त्वाचे!

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालांकडे दोन वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. यातून देशात सध्या तरी भाजपला राष्ट्रीय पातळीवर कोणी सक्षम विरोधक नाही हे अधोरेखित झाले आहे. समोर विरोधक नसेल तर अमर्याद स्वातंत्र्यामुळे एकाधिकारशाही वाढण्याची शक्यता असते. आज ही भीती आहे. त्यामुळे भविष्यात भाजपशी दोन हात करताना एकास एक लढत देण्यासाठी समान विचारी पक्षांची एकत्रित मोट बांधणे, मोदींच्या तोडीचा नेता उभा करणे, भावनिक राजकारणाला पर्याय देत समान कार्यक्रम सादर करताना स्वत:शी प्रामाणिक राहून सर्व मतभेदांना तिलांजली देत भाजपसमोर उभे राहणे ही आव्हाने आहेत. प्रादेशिक अस्मितेचा लढा देणाऱ्या पक्षांनी याची निश्चित दखल घ्यायला हवी. यासाठी सर्व लहानमोठय़ा राजकीय प्रवाहांना सोबत घेऊन युद्ध लढावे लागणार असल्याने हे निकाल तिसऱ्या आघाडीसाठी दिशादर्शक आहेत.

 – पांडुरंग भाबल, भांडुप, मुंबई

मतदारांनी विरोधकांना मतपेटीतूनच उत्तर दिले

नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालांच्या संदर्भातला ‘बुलडोझर योग!’ हा अग्रलेख वाचला. चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय नेत्रदीपक आहे. ११ मार्चच्याच अंकातला पहिल्या पानावरचा ‘भाजपचीच लाट, बाकी सगळे भुईसपाट’ हा मथळा अगदी चपखल आहे. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या पराभवाची भाकिते केली होती. अनेक विरोधी नेत्यांनी ‘देशात दहशतीचे वातावरण असून एकाधिकारशाहीला मतदार कंटाळले आहेत, मतदारांना परिवर्तन हवे आहे’ वगैरे वक्तव्ये वारंवार केली जात होती. या सर्वाना मतदारांनी मतपेटीमधून चोख उत्तर दिले आहे.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

आपला जमते ते इतरांना का नाही जमत?

पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय नेत्रदीपक म्हणावा लागेल. स्थापनेपासून दहा वर्षांत या पक्षाने दोन राज्यांत सत्ता मिळविली आहे. समाजमाध्यमातून या पक्षाच्या  धोरणावर टीका होते, खिल्ली उडवली जाते; पण त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पंजाबच्या मतदारांना काँग्रेस, अकाली दल, भाजप, बसप या पक्षांचा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. पण या पक्षांना इतके घवघवीत यश कधीच  मिळाले नाही. अनेक राज्ये (दिल्लीसुद्धा) आर्थिक संकटात असल्याची चर्चा असते, पण दिल्लीत  महिलांना सरकारी बसमध्ये प्रवास, सर्वाना अपघातानंतर सरकारी इस्पितळात आरोग्य सेवा, शालेय शिक्षण तसेच ३०० युनिटपर्यंत वीज हे सर्व तिथे मोफत आहे. आता पंजाबात लोकांना ३०० युनिट वीज व इतरही काही सेवा मोफत मिळतील. हे सर्व या पक्षाच्या सरकारला कसे शक्य होते, यावर इतर पक्षांनी चिंतन करावे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात  मोबाइल, लॅपटॉप, मोपेड  व सायकल मोफत देण्याच्या घोषणांचा लोकांवर परिणाम होत नाही याची  राजकीय पक्षांनी  दखल घ्यावी.

अमोल म. पाठक, नागपूर

मनसे, शिवसेनेने यातून काही तरी शिकावे

‘बुलडोझर योग’ हा अग्रलेख वाचला. उत्तर प्रदेश सरकार ‘डबल इंजिन’वाली सरकार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या विजयोत्सवपर भाषणात सांगितले. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे. इंजिन एक असो वा अनेक, ते जनतेच्या हितासाठी सुसाट धावले पाहिजे. अन्यथा काही इंजिने (मनसे) १६ वर्षे झाली तरी यार्डातच थंड पडून राहतात आणि नेहमीप्रमाणे मोठाल्या वल्गना करून पुन्हा यार्डात जातात. ‘आप’ने नवीन राज्यात जोरदार प्रवेश करणे हे ‘मनसे’ला शिकण्यासाठी तर गोमंतकीयांनी धूळ चारणे हे शिवसेनेला मंथन करण्यासाठी भाग पाडणारे ठरावे.

जयेश राणे, भांडुप (मुंबई)

केजरीवाल देवालयांच्या भेटी टाळतील का?

केजरीवाल यांची राजकारण करण्याची पद्धत इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी पण स्मार्ट आहे आणि त्याची झलक त्यांनी पंजाबमध्येही दाखविली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, ‘तेथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फक्त डॉ. आंबेडकर व शहीद भगतसिंग यांच्याच तसबिरी असतील.’ मंत्रिमंडळाचा शपथविधी भगतसिंग यांच्या गावी होईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. या गोष्टींचे स्वागत आहे. परंतु या प्रतीकात्मक गोष्टी झाल्या. डॉ. आंबेडकर व भगतसिंग यांच्या मूलभूत विचारांचे काय? आंबेडकर व भगतसिंग हे निरीश्वरवादी असून त्यांच्या जीवनात व विचारधनात विवेकाला प्रधान्य होते. बाबासाहेबांचे धर्म व अंधश्रद्धेविषयीचे विचार अनेकांना माहीत आहेत. परंतु भगतसिंग यांच्या विचारांचा तेवढा प्रचार व प्रसार झाला आहे, असे वाटत नाही. ‘मी नास्तिक का आहे’ या पुस्तिकेत भगतसिंग यांनी  म्हटले आहे, ‘माणसाने विवेकनिष्ठ जीवन जगणे काही सोपे नाही. अंधविश्वासापासून समाधान किंवा आधार मिळवणे सोपे आहे. परंतु निरंतर विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.’ या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये विवेकनिष्ठ दृष्टिकोन भिनवण्याच्या दृष्टीने केजरीवाल  यांनी आता ‘हनुमान चालिसा’सारखे कार्यक्रम जाहीरपणे करणे टाळायला हवे, जेणेकरून जनतेमध्ये ते निश्चित असा संदेश देऊ शकतात. या बाबतीत तरी नेहरूंचे अनुकरण करायला हरकत नाही.

संजय चिटणीस, मुंबई

बुडत्या नावेत बसायला कोणीही तयार नसतो..

‘बुलडोझर योग’ हा अग्रलेख वाचला. बुडत्या नावेत कोणीही बसण्यास तयार नसतो हे वास्तव काँग्रेस पक्षासाठी तंतोतंत लागू पडते. सर्वच लोक मग ते नेते असोत की मतदार पायाखालची वाळू सरकली की जमिनीकडे धाव घेतात हेच प्रकर्षांने जाणवते. काँग्रेस पक्षाने चन्नी यांच्यावर विश्वास ठेवला, पण मुळात त्यांचा कार्यकाल कमी होता हे मान्य न करता ‘म्हणजे काय लायकीच्या नेत्याकडे राहुल- प्रियांका यांनी काँग्रेसचे सुकाणू दिले होते’ असे म्हणणे एकतर्फी अणि बेजबाबदारपणाचे ठरेल असेच वाटते. चन्नी मुख्यमंत्री झाल्यावर अमिरदर सिंह असो की सिद्धू असो, आम्हाला दलित नेतृत्व मान्य नाहीच हेच सांगतात, यातच काय ते आले.   

विशाल भिंगारे, परभणी

तरीही काँग्रेस विचारच या देशाला तारणारा..

‘बुलडोझर योग!’ अग्रलेख वाचला. काँग्रेस वा समाजवादी यांना सत्ताधीशांची वैगुण्ये मतदारांसमोर आक्रमकपणे उघडी पाडता आली नाहीत हे वास्तव आहे. जो जीता वही सिकंदर, हे जरी खरे असले तरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भाजप वा आपचा विजय हा संकुचित राजनीतीचाच विजय मानावा लागेल! भाजपच्या गुणांचा(?) हा विजय नव्हे! खरेतर काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक विचार आहे! विविध जाती, धर्म, पंथांच्या आपल्या या देशात धर्मनिरपेक्ष विचारांचीच गरज आहे. आज काँग्रेस अपयशाच्या गर्तेत असली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घ्यायचा तिला इतिहासही आहे! म्हणूनच काँग्रेस विचारच या देशाला तारणारा आहे हे सध्याच्या जल्लोषात अतिशयोक्तीचे व हास्यास्पद वाटत असले तरी तितकेच ते खरेही आहे.

श्रीकांत मा. जाधव, अतीत, सातारा