अमेरिकेत आणि एकूणच जगभर १९२९ मध्ये आलेल्या महामंदीनंतर ऑलिम्पिक भरवण्याची धमक अमेरिकेनेच दाखवली. रोम येथे १९२३ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनात लॉस एंजलिस या एकाच शहराची बोली दाखल झाली होती. इतर कोणत्याही शहराने – युरोपातील वा अमेरिकेतील – ऑलिम्पिक भरवण्याची इच्छा प्रदर्शित केली नव्हती. मंदीच्या ऐन मध्यावर अनेक देशांची स्पर्धेसाठी पथके पाठवण्याचीही ऐपत नव्हती. ॲमस्टरडॅम (१९२८) ऑलिम्पिकसाठी ४६ देशांनी पथके पाठवली. लॉस एंजलिसमध्ये हा आकडा ३७ वर येऊन घसरला. त्यामुळे सहभागी खेळाडूंची संख्या सेंट लुईस १९०४ ऑलिम्पिकनंतर प्रथमच इतकी कमी नोंदवली गेली. तरी ती फार निराशाजनक नव्हती असे अनेक अमेरिकी विश्लेषक आजही सांगतात. कारण लॉस एंजलिस हे अमेरिकेच्या पार पश्चिम टोकावरील कॅलिफोर्निया राज्यात वसलेले शहर. त्या काळात विशाल अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात वाहतूक साधनेही नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रतिसाद यापेक्षाही कमी अपेक्षित होता.

लॉस एंजलिस १९३२

अमेरिकेत भरवले गेलेले हे दुसरे ऑलिम्पिक. पण अमेरिकेतील पहिल्या, सेंट लुईस ऑलिम्पिकपेक्षा ते कितीतरी अधिक सकारात्मक आणि उत्साहवर्धक ठरले. सेंट लुईसप्रमाणे एक्स्पोझिशनच्या निमित्ताने ऑलिम्पिकचा साईड-शो असा प्रकार नव्हता. वंशद्वेष, वर्णद्वेषाचे जाहीर प्रदर्शन मांडल्यामुळे सेंट लुईस ऑलिम्पिक डागाळले गेले. लॉस एंजलिस १९३२ त्यापेक्षा कितीतरी वेगळे आणि चांगले ठरले.

सर्वांत उल्लेखनीय बदल ठरला वेळापत्रकाचा. आधीची बहुतेक सर्व ऑलिम्पिक एक, दोन किंवा तीन महिन्यांपर्यंत चालली. लॉस एंजलिसने हा शिरस्ता मोडून काढला. ती स्पर्धा केवळ १६ दिवस चालली. तेथूनच अध्र्या महिन्यात किंवा त्यापेक्षाही कमी दिवसांत ऑलिम्पिक संपवण्याचा स्वागतार्ह पायंडा पडला. ऑलिम्पिक व्हिलेजची संकल्पना आधीच्या ॲमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरली गेली होती. त्यावेळी लाकडी केबिन उभारून तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली होती. लॉस एंजलिसमध्ये आयोजकांनी त्याच्या एक पाऊल पुढे जात पक्क्या बांधकामाचे पूर्ण संकुलच उभारले. तोही पायंडा महत्त्वाचा ठरला.

भविष्यात ऑलिम्पिक भरवताना अशा प्रकारे यजमान देशाची आणि शहराची ऑलिम्पिक व्हिलेज उभारण्याची क्षमताही जमेस धरली जाऊ लागली. ज्यांना ऑलिम्पिकच्या निमित्ताने व्हिलेज उभारायचेय, त्यांना त्या संकुलाचा पुढे वापर कसा करायचा याविषयी नियोजन करणे आवश्यक ठरू लागले. पदकविजेत्यांसाठी पोडियमची उभारणी आणि शर्यतींसाठी स्टॉपवॉच आणि फोटो-फिनिश तंत्रज्ञान हे आणखी दोन महत्त्वाचे बदल याच स्पर्धेत प्रथम दिसून आले.

मंदीच्या वातावरणातही या ऑलिम्पिकला अमेरिकनांनी भरभरून प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळ्यास तत्कालीन अध्यक्ष हर्बर्ट हूवर उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष चार्ल्स कर्टिस यांच्या हस्ते स्पर्धांना प्रारंभ झाला. तरी उत्साह उदंड होता. लॉस एंजलिसमधल्या अजस्र कोलिसियम संकुलाच्या प्रेक्षागारात तब्बल एक लाख प्रेक्षक आले होते.

बर्लिन १९३६ – नाझी स्पोर्ट्सवॉश!

मध्यंतरी कतारमधील फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने अरब स्पोर्ट्सवॉश हा शब्दप्रयोग, विशेषत: पाश्चिमात्य माध्यमांमध्ये वापरला गेला. अरब देशांमध्ये मूलभूत मानवी हक्कांची मुस्कटदाबी झाकोळण्याचा प्रयत्न भव्य क्रीडास्पर्धांच्या आयोजनानिमित्ताने कशा प्रकारे होत असतो, यावर भरपूर लिहून येत होते. तो धागा पकडायचा, तर बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धा आधुनिक क्रीडा इतिहासातील पहिली ठसठशीत स्पोर्ट्सवॉश (२स्र्ः१३२ ी८ी६ं२ँ) किंवा क्रीडा दिशाभूल ठरते. जर्मनीला युद्धखोरीबद्दल १९२० आणि १९२४ मधील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ दिले गेले नव्हते. पण १९३१ मध्ये ऑलिम्पिक समितीची बैठक झाली आणि तीत १९३६ साठीच्या यजमान देशांची चर्चा झाली, त्यावेळी जर्मनीचे नाव पुढे आले होते. अर्थात त्या दिवसांमध्ये जर्मनीत वायमार रिपब्लिकची राजवट होती. पण जर्मन कायदेमंडळ किंवा राइशस्टागमध्ये नाझी सदस्यांची संख्या लक्षणीय होती.

जर्मनीमध्ये राजकीय परिवर्तन होऊ लागल्याची चाहूल त्यावेळी युरोप आणि युरोपबाहेर लागली होती. व्हर्साय करारातून सावरू लागलेल्या जर्मनीला आर्थिक उभारी आणि आंतरराष्ट्रीय स्वीकारार्हता मिळावी हा उद्देश यजमानपद बहाल करताना असल्याचे त्यावेळी सदस्यांनी सांगितले होते. पण १९३३ मध्ये नाझी नेता अडॉल्फ हिटलर जर्मनीचा चान्सेलर बनला. त्यानंतर वर्षभरातच त्याने जर्मनीची सूत्रे हाती घेतली नि स्वत:ला ‘फ्युरर’ अर्थात (सर्वोच्च) नेता म्हणून घोषित केले. जर्मनीमध्ये निर्दय सांस्कृतिक राष्ट्रवादाला मोकळी वाट मिळाली. या बदलांची नोंद घेतली जात नव्हती असे नव्हे. पण हिटलरची लोकप्रियता जर्मनीत प्रचंड होती आणि तो किमान सुरुवातीस तरी लोकशाही मार्गाने निवडून आला, या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येत नव्हते.

पण अमानवी ज्यूद्वेष; समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीची गळचेपी; अश्वेत, समलिंगींची हेटाळणी हे अवगुण युरोप-अमेरिकेतील लोकशाहीप्रेमी मंडळींना खुपू लागले होते. नाझींना ज्या पाश्चिमात्य मंडळींची सहानुभूती मिळायची, त्यांना साम्यवादाविरोधात नाझीवाद वरचढ ठरतो आहे यातच समाधान वाटत होते. यात आघाडीवर होते अमेरिकी ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ॲव्हरी ब्रुंडाग. हिटरच्या धोरणांमुळे १९३३ च्या आसपास जर्मनीतील ऑलिम्पिक इतरत्र हलवण्याबाबत विचार होऊ शकत होता. पण ब्रुंडाग हे हिटलरच्या पाहुणचाराने आणि खेळांतील पायाभूत सुविधा उभारणीत जर्मनीने केलेल्या प्रगतीने भलतेच मोहीत झाले.

ऑलिम्पिक समितीने ज्यूविरोधी धोरणांसदर्भात तत्कालीन जर्मन सरकार आणि जर्मन ऑलिम्पिक समितीकडून काही हमी घेतल्या. यात जर्मन ऑलिम्पिक संघटनेमध्ये ज्यू किंवा अर्ध-ज्यूंच्या नियुक्त्या कायम राहातील, ज्यूंना ऑलिम्पिकमध्ये खेळू दिले जाईल या प्रमुख अटी होत्या. कालांतराने जर्मनीत स्थिरावलेल्या नाझी राजवटीने यांतली पहिली अट पाळली. दुसरी अट पाळण्याची फारशी वेळच त्यांच्यावर आली नाही, कारण ऑलिम्पिक सुरू होईपर्यंत जर्मनीच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रहावाहातून ज्यूंची हकालपट्टी जवळपास पूर्ण झाली होती. अनेक ज्यूंनी भेदाभेदाच्या धोरणांना कंटाळून स्वत:च माघार घेतली होती.

ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा ज्यूविरोधी फलक उतरवणे वगैरे वरवरचे उपचार हिटलरने केले. अतिभव्य ऑलिम्पिक स्टेडियम उभारले, पण त्यावर नाझी बोधचिन्हे आणि राष्ट्रचिन्हेच अधिक प्रखरतेने दिसली. बर्लिन १९३६ हे इतिहासातले पहिले चलचित्रित आणि प्रक्षेपित ऑलिम्पिक. यातून अनेक वर्षे जगासमोर हिटलरच झळकला. भव्य तरी उद्दाम नाझी संचलने आणि ऑलिम्पिक यांतील फरकच अनेकदा कळायचा नाही. त्या स्पर्धेत जेसी ओवेन्स या अश्वेत धावपटूने चार सुवर्णपदके जिंकली. ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने हॉकीत जादू दाखवत सुवर्णपदक जिंकले. पण त्यामुळे हिटलरचे अश्वेतांविषयी मतपरिवर्तन झाल्याचे दाखले सापडत नाहीत. उलट अधिक अविचारी चेवाने तो गोर्‍या आर्यांचा वर्चस्ववाद दामटत राहिला आणि एक दिवस स्वत:च भस्मसात झाला!

भारतीय हॉकीची द्वाही!

लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने सर्वाधिक ४१ सुवर्णपदके जिंकली. त्या स्पर्धेआधीपासूनच अमेरिकेच्या पथकाचा ऑलिम्पिकमध्ये दबदबा दिसू लागला होता. आजही तो कायम आहे. परंतु पहिल्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये एक भन्नाट प्रकार घडला. भारताकडून ॲथलेटिक्स, जलतरण या प्रकारांसाठी काही मोजके खेळाडू धाडले गेले. त्यांच्याबरोबर हॉकी संघही गेला, कारण पदकाची आशा त्यांच्याकडूनच होती. मंदीचा फटका बसल्यामुळे अनेक देशांनी हॉकी संघ धाडलेच नाहीत. खुद्द भारतीय संघालाही निधीची मोठी चणचण होती. पैसा उभा करण्यासाठी स्पर्धेपूर्वी अनेक प्रदर्शनीय सामने खेळावे लागले.

इतके होऊनही प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये केवळ तीनच संघ उतरले – अमेरिका, जपान आणि भारत. त्यामुळे तिन्ही संघांची पदकनिश्चिती पहिल्या सामन्यापूर्वीच झाली! भारताचे वर्चस्व वादातीत होते. त्यांनी प्रथम जपानला ११-१ असे तुडवले. मग यजमान अमेरिकेला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर २४-१ असे लोळवले. ध्यानचंद यांनी ८ गोल केले. त्यांचे धाकटे बंधू रूपसिंह यांनी १० गोल केले. ऑलिम्पिकमध्ये त्यापूर्वी किंवा नंतर २४-१ इतक्या विनोदी फरकाने कोणत्याही संघाला विजय मिळवता आलेला नाही.

siddharth.khandekar@expressindia.com