राजकारणासारख्या ‘रोखठोक’ व्यवहारवादी क्षेत्रात चमत्कार, योगायोग अशा कल्पनांना वाव नसतो. तरीही राजकारणातच सर्वाधिक चमत्कार आणि योगायोग जुळून येतात, हे महाराष्ट्रात आणि देशातही अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात तर विधानसभेच्या अनेक निवडणुका चमत्कार करून दाखविण्याच्या मुद्दय़ावरच लढल्या गेल्या. एखाद्या घडामोडीचे संकेत मिळावेत आणि पुढच्या काही घटनांमधून त्याला पुष्टी मिळावी अशा प्रकारचे राजकीय योगायोग मात्र महाराष्ट्रात अभावानेच आढळतात. पश्चिम महाराष्ट्राचा भक्कम राजकीय पाया असलेल्या सांगली परिसरावर एके काळी जबरदस्त पकड असलेल्या वसंतदादा पाटील यांना मानणारा मतदार कालौघात कमी होऊन नवा मतदारवर्ग निर्माण होऊ लागल्यानंतर सांगली- मिरज- कुपवाड परिसरांवर जयंत पाटील, आर. आर. पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांची पकड बसली. दूध, द्राक्षे आणि साखर अशा तिहेरी नगदी धंद्याच्या साऱ्या नाडय़ा ज्याच्या हातात असतात, त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व असते, हा इतिहास आणि वर्तमान आहे. याच्याच आधाराने सांगलीतील नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात वजनही प्राप्त झाले. याच अनुकूल परिस्थितीमुळे जम बसविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आता काँग्रेसला याच मुळांवर घाव घालणे गरजेचे वाटू लागले असावे. अशा परिस्थितीत प्रस्थापित नेतृत्वालाच आपल्या कह्य़ात घेणे किंवा त्याच्यासमोर आपले असे तितकेच कडवे आव्हान उभे करणे हे दोनच मार्ग राजकारणात उपलब्ध असतात. काँग्रेसकडे यापैकी दुसरा मार्ग सध्या तरी तितकासा प्रबळ नाही. साहजिकच, पहिल्या मार्गाची चाचपणी होणेही साहजिकच होते. अलीकडेच सांगली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने ती सुरू केली. समंजस राजकारण आणि जिल्ह्य़ाशी असलेले परंपरागत नाते यामुळे जयंत पाटील हे जिल्ह्य़ाचे प्रस्थापित नेते असले तरी अलीकडे आर. आर. पाटील, अजित पवार यांच्या राजकारणात त्यांची घुसमट होत असल्याची चर्चा सुरू झाली. सांगली- मिरज- कुपवाड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत काँग्रेस-राष्ट्रवादीची धुमश्चक्री ऐन शिगेला पोहोचलेली असतानाच, जयंत पाटील काँग्रेसवासी होणार असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसच्याच प्रदेशाध्यक्षांनी केला. असे काही करायला वेड लागलेले नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी त्याचा इन्कार केला, पण त्यानंतर लगेचच महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला मात्र पुरता भुईसपाट झाला. काँग्रेसचा झेंडा सांगली महापालिकेवर फडकला. स्थानिक राजकारणावरील जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी वर्चस्वाला या निकालामुळे धक्का बसला आहे हे वास्तव असले तरी अशा एखाद्या निकालामुळे कोणताही राजकीय नेता निवृत्ती घेत नसतो. उलट बदललेल्या गणितांचा मागोवा घेत तो पुढे वाटचाल करत राहतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्याविषयी केलेले सूचक भाष्य, त्यानंतर जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि त्यानंतरचे निवडणूक निकाल या साऱ्या गोष्टी वरवर वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यामागे काही योगायोगाचे धागे आहेत का, हा संभ्रम एव्हाना राजकारणात पुरता भिनला असेल.  सांगलीचे निकाल आणि जयंत पाटील यांच्याविषयीचे भाष्य हे चमत्कार आणि निव्वळ योगायोग असतील, तरी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात पाठविण्याचा पक्षाध्यक्षांचा इरादा आणि हे निकाल यांतदेखील या योगायोगाचे धागे शोधण्यास आता सुरुवात झाली असेलच!