|| अमृतांशू नेरुरकर

वापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

नव्वदच्या दशकाच्या मध्यावर लिनक्सला शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राबरोबरच व्यावसायिक परिघातदेखील गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली होती. लिनक्सची तांत्रिक कामगिरी व कार्यक्षमता अत्यंत उच्च दर्जाची असल्याकारणाने अनेक व्यावसायिक आस्थापना लिनक्सला त्यांच्या मध्यवर्ती प्रणालींसाठी वापरण्यास उत्सुक होत्या. सोर्स कोड जरी हाताशी असला तरी शेवटी लिनक्स ही हॅकर संप्रदायाने हॅकर संप्रदायासाठी बनवलेली प्रणाली असल्याने वापरकर्त्यांची तांत्रिक कुवत गृहीत धरली गेली होती. त्यामुळेच वापर सुलभतेच्या दृष्टीने लिनक्स संगणकावर चढवून वापरण्यासाठी काहीशी किचकट होती.

अशा वेळेला व्यावसायिक स्तरावर लिनक्सच्या वापरासाठी कंपन्यांना अशा भागीदाराची गरज होती जो लिनक्सच्या विविध भागांच्या (जसं कर्नल, शेल, एडिटर वगैरे) नवीनतम आवृत्त्या एकत्रित करेल, त्यांची विशिष्ट हार्डवेअर संचांवरची योग्यता तपासेल व अखेरीस कंपन्यांना त्यांच्या सव्‍‌र्हरवर विनासायास चढू शकेल असं लिनक्स सॉफ्टवेअर एकात्मिक (इंटिग्रेटेड) स्वरूपात उपलब्ध करून देईल. या संधीचा सर्वात प्रथम फायदा उठवला इगड्रासिल कॉम्पुटिंग या कंपनीने! तिने प्रथमच लिनक्सला केवळ ९९ अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात वापरकर्त्यांला अत्यंत सुलभपणे आपल्या संगणकावर चढवता येईल अशा स्वरूपात, त्याकाळात प्रसिद्ध पावत असलेल्या कॉम्पॅक्ट डिस्कवर (उऊ फडट) उपलब्ध करून दिलं. पुढील काळात उदयास आलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती सेवा प्रदान करण्याच्या विविध बिझनेस मॉडेल्सची ही नांदी होती. ९०च्या दशकाच्या अखेरीस उदयास आलेल्या रेड हॅट, व्हीए लिनक्स, बिटकीपर, माय एसक्यूएलसारख्या कंपन्यांनी तर एकविसाव्या शतकातल्या कॅनोनिकल, झिम्ब्रा, पेन्टाहोसारख्या कंपन्यांनी ओपन सोर्स चळवळीला व्यावसायिक स्तरावर यशस्वी करून दाखवलं.

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या वापरकर्त्यांला आपलं सॉफ्टवेअर वापरण्याचं लायसन्स विकून मुख्यत्वेकरून महसूल कमावत असतात. सोर्स कोड खुला नसल्याने वापरकर्ता ते सॉफ्टवेअर केवळ वापरू शकतो. त्यात सुधारणा किंवा त्याचे पुनर्वितरण करू शकत नाही. आपण आपल्या वैयक्तिक संगणकावर जी विन्डोज ऑपरेटिंग प्रणाली अथवा एमएस ऑफिससारखी सॉफ्टवेअर वापरतो, ती वापरण्याची लायसन्स (जर ती पायरेटेड नसतील तर) आपण काही हजार रुपये खर्च करून घेतलेली असतात. या लायसन्सची किंमत प्रति यूजर पद्धतीने आकारली जाते व बऱ्याचदा तर या लायसन्सची कालमर्यादासुद्धा ठरलेली (जसे एक, तीन किंवा पाच वर्षे) असते. अशा ठरवलेल्या कालावधीनंतर जर वापरकर्त्यांला ते सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर त्याला पुन्हा त्याचा लायसन्स विकत घेणं भाग असतं. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएमसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या दिग्गज कंपन्यांचे आपल्या सॉफ्टवेअरचं लायसन्स अशा आवर्ती पद्धतीने विकण्याचं बिजनेस मॉडेल अत्यंत यशस्वी ठरलं झालं आहे.

ओपन सोर्स व्यवस्थेत सॉफ्टवेअर अशा पारंपरिक पद्धतीने विकण्याच्या मानसिकतेला सोडचिठ्ठी द्यावी लागते. ओपन सोर्स व्यवस्थेत सोर्स कोड खुला असल्याने, ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनी सॉफ्टवेअरच्या प्रती विकून महसूल कमावू शकत नाही, तसेच प्रोप्रायटरी कंपन्यांसारखे ‘व्हेंडर लॉक-इन’ पद्धतीनेसुद्धा वापरकर्त्यांला आपल्याकडे अनंतकाळ टिकवून ठेवणं शक्य नसतं. सोर्स कोड हाताशी असल्याने एकाच कंपनीवर असलेलं अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी होतं.

अशी वापरकर्त्यांभोवती केंद्रित झालेली व निर्मात्याऐवजी वापरकर्त्यांचं हित जपणारी व्यवस्था असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती बिजनेस मॉडेल्स तयार करणं आव्हानात्मक काम आहे. मूळ सॉफ्टवेअरच एक ‘कमॉडिटी’ झाल्याने ओपन सोर्स कंपन्यांना निरंतर पद्धतीने आर्थिक परतावा मिळवण्याचे नवे मार्ग शोधणं भाग आहे.

रेड हॅटच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या रॉबर्ट यंगने, नेटस्केप आणि मोझिला ब्राउझरच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेल्या फ्रँक हेकरसमवेत ओपन सोर्स बिजनेस मॉडेल्सबद्दल व्यापक स्वरूपाचं विचारमंथन केलं आहे. आज अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्व ओपन सोर्स सॉफ्टवेअर पुरवठादार कंपन्यांच्या बिजनेस मॉडेल्समध्ये या दोघांनी विशद केलेल्या पद्धतींचंच मिश्रण पाहावयास मिळतं.

सर्वात पहिलं आणि सर्वाधिक वापरलं जाणारं बिजनेस मॉडेल म्हणजे ‘सपोर्ट सेलर’, थोडक्यात ओपन सोर्स सॉफ्टवेअरसंदर्भातील विविध सेवा पुरवणं. सॉफ्टवेअर हा एक अत्यंत गुंतागुंतीचा दस्तऐवज असल्याने केवळ सोर्सकोड हाताशी आहे म्हणून एखादं सॉफ्टवेअर लगेच वापरण्यायोग्य बनत नाही. त्यासाठी अनेक पूर्वप्रक्रिया त्या सॉफ्टवेअरसंदर्भातल्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीला कराव्या लागतात, तसंच ग्राहक ते सॉफ्टवेअर वापरात असताना अनेक प्रकारच्या सेवा निरंतर पद्धतीने पुरवाव्या लागतात.

उदाहरणार्थ सॉफ्टवेअरच्या विविध भागांच्या उपलब्ध असलेल्या आवृत्त्या एकत्र करून, यथायोग्य तपासून, त्यातील चुका किंवा उणिवा शक्य तितक्या दूर करून सॉफ्टवेअरची एक स्थिर आवृत्ती प्रसिद्ध करणं, ज्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर वापरलं जाणार आहे तिथल्या तांत्रिक संरचनेचं विश्लेषण करून सॉफ्टवेअरला त्यानुसार सुसंगत बनवणं, ठरावीक कालावधीनंतर अधिक कार्यक्षम अशा सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या प्रसिद्ध करत राहणं, ग्राहकाला सॉफ्टवेअरसंदर्भातला संपूर्ण तांत्रिक सपोर्ट देणं मग त्यात त्याच्या शंकांचं निरसन, सॉफ्टवेअर हे सव्‍‌र्हर वा संगणकावर चढवण्यासाठीची संपूर्ण मदत व मार्गदर्शन, सुधारित सॉफ्टवेअरची आवृत्ती ग्राहकाला देऊन त्याच्याकडचं सॉफ्टवेअर अद्ययावत करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश अशी सपोर्ट सेलर कंपनी आपल्या बिजनेस मॉडेलमध्ये करत असते. रेड हॅटसारख्या कंपनीने (जरी काही दिवसांपूर्वीच आयबीएमने रेड हॅट विकत घेण्याचा आपला मनसुबा जाहीर केला असला) तर हेच बिजनेस मॉडेल अंगीकारून पुढील काळात आपल्या सेवेचा एक ‘ब्रॅण्ड’ तयार केला.

‘सेल इट -फ्री इट’ (सुरुवातीला विका आणि नंतर मोफत उपलब्ध करून द्या) पद्धतीचं बिजनेस मॉडेल काही ओपन सोर्स कंपन्या वापरतात. नेटस्केप, मायएसक्यूएल ही यातील काही ठळक उदाहरणं! यात कंपनी आपलं सॉफ्टवेअर पहिली काही र्वष प्रोप्रायटरी पद्धतीने विकते आणि नंतर त्याचा सोर्स कोड खुला करून सॉफ्टवेअरला ओपन सोर्स बनवते. वेळ जर अचूकपणे साधता आली तर या बिजनेस मॉडेलमुळे कंपनीला दुहेरी फायदा होऊ  शकतो. एक तर सुरुवातीला प्रोप्रायटरी पद्धतीने सॉफ्टवेअर विकल्याने एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालेला असतो जो पुढे ओपन सोर्स झाल्यावरही कायम राहण्याची पुष्कळ शक्यता असते. त्याचबरोबर ओपन सोर्स केल्यानंतर जगभरातल्या तांत्रिक समुदायाचा भरघोस सहभाग मिळू शकतो ज्यामुळे सॉफ्टवेअरच्या वाढीला चांगलंच पाठबळ मिळते.

यंग आणि हेकरच्या मताप्रमाणे तिसरं ओपन सोर्स बिजनेस मॉडेल हे ‘सव्‍‌र्हिस एनेब्लर’ आहे. यात कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरला ओपन सोर्स करण्यामागचा मूळ उद्देश हा तिच्या एखाद्य चांगल्यापैकी महसूल मिळवून देणाऱ्या सेवा अथवा वस्तूची मागणी वाढवण्याचा असतो. एचपीने (ह्य़ुलेट-पॅकार्ड) २००० सालात जेव्हा आपलं ई-स्पीक हे ई-कॉमर्ससंदर्भातल्या सेवा पुरवणारं सॉफ्टवेअर ओपन सोर्स केलं तेव्हा एचपीला हे सॉफ्टवेअर ज्या एचपी सव्‍‌र्हरवर सर्वाधिक कार्यक्षम पद्धतीने चाललं असतं त्याची मागणी तर वाढवायची होतीच पण त्याचबरोबर उभरत्या डिजिटल क्षेत्रात आपला जम अधिक मजबूतपणे बसवायचा होता, ज्याला हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स केल्याने हातभारच लागला असता.

अखेरचं बिजनेस मॉडेल हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलच्या अत्यावश्यक नसलेल्या पण उपयुक्त वस्तू विकण्याचं आहे, ज्याला यंग आणि हेकरने ‘अ‍ॅक्सेसरायजिंग’ असं संबोधलं आहे. ओरायली पब्लिकेशन हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. विविध लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी तांत्रिक प्रशिक्षण देणारी अनेक पुस्तकं आणि मॅन्युअल्सचं प्रकाशन ते करतात. एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा लोकाश्रय ज्या प्रमाणात वाढतो तशी ओरायलीची त्या सॉफ्टवेअरसंदर्भातील पुस्तकंसुद्धा चांगल्या प्रमाणात विकली जातात.

ओपन सोर्स सॉफ्टवेअरभोवती गुंफल्या गेलेल्या विविध बिजनेस मॉडेल्सचा परामर्श घेतल्यानंतर वैयक्तिक स्तरावरील काही लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.