अमृतांशू नेरुरकर

खुले व्यवहार करण्याचे व्यासपीठ या आंतरजालाच्या हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचे स्नोडेनच्या लक्षात आले.

salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी
article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट! 

नागरिकांच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवण्यासाठी निरंकुश सत्ताधाऱ्यांकडून आंतरजालाचा (इंटरनेट) ‘मास सव्‍‌र्हेलन्स’चं माध्यम असा वापर होऊ द्यायचा नसेल तर विकिलीक्ससारख्या बेकायदेशीर कृत्यांचा गौप्यस्फोट करणाऱ्या ‘व्हिसलब्लोइंग’ व्यासपीठांची नितांत गरज आहे असं ज्युलियन असांज ठासून प्रतिपादन करत असे. केवळ अशा व्यासपीठांच्या उपलब्धतेमुळे सर्व प्रश्न सुटणार नसले तरी शासकीय तसेच खासगी आस्थापनांच्या बेलगाम वर्तणुकीला काही प्रमाणात वेसण घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या गोपनीयता हक्काच्या उघड पायमल्ली संदर्भात जनजागृती करण्यासाठी विकिलीक्ससारख्या व्यासपीठांचं योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. असांजशी बऱ्याच अंशी मिळत्याजुळत्या अंत:प्रेरणा असलेल्या पण गोपनीयता आणि पारदर्शकता या विषयांत त्याच्यापेक्षाही अधिक प्रभाव पाडलेल्या एडवर्ड स्नोडेनच्या कार्याचा परामर्श घेतल्याशिवाय ही लेखमाला पुरी होऊ शकणार नाही.

आज एडवर्ड स्नोडेन आणि ‘व्हिसलब्लोअर’ हे शब्द समानार्थी वाटावेत इतका प्रभाव त्याने केलेल्या गौप्यस्फोटांमुळे गेल्या आठ वर्षांत पडलेला आहे. खरं सांगायचं तर स्नोडेनच्या आधीही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि पारदर्शकता या मूल्यांचा हिरिरीने पुरस्कार करणारी व त्यासाठी सर्वशक्तिमान सत्ताकेंद्रांशी दोन हात करायला तयार असणारी ‘हॅकर’ संप्रदायातील अनेक मंडळी व त्यांचे विविध गट कार्यरत होतेच. विकिलीक्सच्या बरोबरीने अ‍ॅनॉनिमस, ‘टूर प्रोजेक्ट’, ‘पायरेट पार्टीज’ किंवा अगदी ओपन सोर्स सॉफ्टवेअर चळवळीत सक्रिय योगदान देणारी मंडळी, असे अनेक जण आपापल्या परीने या कार्यात योगदान देतच होते. पण तरीही स्नोडेनच्या गौप्यस्फोटांचा परिणाम पुष्कळ व्यापक होता.

त्याने अमेरिकेसारख्या बलाढय़ सरकारला खडबडून जागं तर केलंच, पण आपल्या विदासंकलन आणि विदासुरक्षेच्या धोरणांत महत्त्वाचे बदल करण्यास भाग पाडलं. शासकीय तसंच कॉर्पोरेट जग स्नोडेनच्या गौप्यस्फोटांनी ढवळून निघालंच, पण अकादमिक तसेच संशोधन क्षेत्र व प्रसारमाध्यमं यांच्यावरही स्नोडेनचा बराच काळासाठी प्रभाव पडला. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य? एका सर्वेक्षणानुसार स्नोडेनने अमेरिकी सरकारकडून नागरिकांच्या सामाजिक आणि डिजिटल व्यवहारांवर (नागरिकांच्या अनभिज्ञतेत) पाळत ठेवण्याचे उद्योग चव्हाटय़ावर आणल्यानंतर जगभरातील तब्बल ७० कोटी लोकांनी आपली इंटरनेट तसेच समाजमाध्यमांवरची वर्तणूक कायमस्वरूपी बदलली. करोनाची समस्या आणि त्यामुळे आमूलाग्र बदललेली माणसाची सामाजिक वागणूक सोडली तर दुसरी एकही समस्या नजीकच्या इतिहासात आठवत नाही ज्याने इतक्या मोठय़ा प्रमाणात जनमानसावर परिणाम झाला असेल.

कोणत्याही भक्कम आधाराशिवाय केवळ एकटय़ाच्या बळावर अमेरिकी सरकारशी युद्ध करण्यामागे स्नोडेनची भूमिका काय होती? या कृत्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल याची पूर्ण कल्पना असतानाही हे धाडसी कृत्य करण्यामागची त्याची मानसिकता काय असेल? कोणत्या मूल्यांच्या रक्षणासाठी तो एवढा मोठा धोका पत्करायला तयार झाला असेल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला स्नोडेनच्या २०१९ साली प्रकाशित झालेल्या ‘पर्मनंट रेकॉर्ड’ या आत्मचरित्राची मदत घ्यावी लागेल.

असांजप्रमाणेच स्नोडेनची सुरुवातही (अधिकृतपणे संगणक व नेटवर्क सुरक्षा तंत्रज्ञ म्हणून असली तरीही) एक हौशी हॅकर म्हणूनच झाली होती. बाह्य़ जगात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समानता, पारदर्शकता ही मूल्य अस्तंगत होत असताना, ही मूल्ये टिकवण्यासाठी इंटरनेटच्या व्यासपीठाचा वापर करता येईल असं त्याचं ठाम मत बनत चाललं होतं. स्नोडेनचा इंटरनेटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भौगोलिक, जात, वर्ण, सांपत्तिक स्थिती, शिक्षण या सर्व भेदांपलीकडे जाऊन खुले व्यवहार करण्याची एक सुरक्षित जागा, असा होता. पण आजूबाजूला दिसत असलेल्या घटनांकडे पाहून आंतरजालाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातोय की काय अशी रास्त भीती त्याला जाणवू लागली होती.

त्याच्या या भीतीचे खात्रीत रूपांतर होण्यात २०१३ सालची एक घटना कारणीभूत ठरली. त्या वर्षीच्या सुरुवातीस स्नोडेनला अमेरिकी सुरक्षा आयोगात (नॅशनल सेक्युरिटी एजन्सी किंवा एनएसए) संगणक सुरक्षा सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथे काम करत असताना अमेरिकी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या गोंडस नावाखाली जागतिक स्तरावर चालवलेले नागरिकांच्या आंतरजाल तसेच समाजमाध्यमांवरील उपलब्ध असलेल्या सर्व विदेचं (डेटा) संकलन, संचय आणि विश्लेषण करण्याचे तसेच त्याद्वारे त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन कृतीवर पाळत ठेवण्याच्या उद्योगांची त्याला जाणीव व्हायला सुरुवात झाली.

लोकांच्या खासगी माहितीच्या या अफाट संकलनाची व्याप्ती केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नव्हती तर जगातील प्रत्येक माणसाच्या (निदान जो स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा वापर करतो) प्रत्येक कृतीची विस्तृत आणि कायमस्वरूपी नोंद ‘बाउंडलेस इन्फॉरमन्ट’ या प्रकल्पाच्या अंतर्गत अमेरिकी सरकार आपल्याकडे ठेवत होतं. या महाप्रकल्पात सरकारला डिजिटल तसंच समाजमाध्यमी क्षेत्रातल्या विशाल अमेरिकी कंपन्या तसंच सेल्युलर सेवापुरवठादारही सढळ हस्ते मदत करत होते. एवढंच नव्हे तर ‘फाइव्ह आइज’सारख्या कराराला अनुसरून (ज्यात गुप्त आणि संवेदनशील माहितीची त्या करारात सामील असलेले देश एकमेकांशी देवाणघेवाण करतात) इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे देशही या प्रकारची माहिती अमेरिकेस खुलेआम पुरवत होते. 

एनएसएमध्ये काम सुरू केल्याच्या चार महिन्यांच्या आतच स्नोडेनला वरील उद्योगांचा पत्ता लागला होता आणि मोठय़ा अपेक्षेने आलेल्या स्नोडेनचा एनएसएबाबतीत भ्रमनिरास व्हायलाही सुरुवात झाली होती. आपण अनेक वर्ष उराशी जपलेली मूल्यं अशी पायदळी तुडवली जात असताना आपल्याला नेमून दिलेलं काम करत गप्प बसून राहणं किंवा समस्येपासून पळ काढण्यासाठी एनएसएला सोडचिठ्ठी देणं यापैकी एका पर्यायाचा स्वीकार करणं स्नोडेनच्या स्वभावात बसत नव्हतं.

या विषयाचा अजून अभ्यास केल्यानंतर त्याला हे समजलं की अमेरिकी सरकारने या महाविदासंचयास कायदेशीर मान्यता मिळवली आहे. अमेरिकी संसदेत पारित झालेला आणि न्यायालयीन कसोटी पार केलेला फॉरेन इंटेलिजन्स सव्‍‌र्हेलन्स (फिसा) कायदा किंवा पेट्रियट कायदा अशांच्या आधारे सरकारच्या या कृतीला न्यायालयीन आव्हान देणं कठीण आहे. त्याच वर्षी काही एनजीओ आणि मानवाधिकार संघटनांनी फिसा कायद्याच्या आधारे अमेरिकी सरकारने चालवलेल्या ‘मास सव्‍‌र्हेलन्स’च्या विरोधात खटला लढला होता. अपेक्षेप्रमाणे न्यायालयात संघटनांनी केलेला युक्तिवाद टिकला नाही आणि एवढय़ा व्यापक स्तरावर असा विदासंचय होत असेल यावर न्यायालयाचा पुराव्याअभावी विश्वास बसला नाही.

पुष्कळ विचारांती स्नोडेन या निष्कर्षांप्रति आला की कायदेशीर लढाई लढत बसण्यापेक्षा एनएसएची धोरणं आणि कार्यपद्धती विशद करणारे दस्तावेज जगासमोर जसेच्या तसे मांडणं हाच एनएसएचे काळे उद्योग पुराव्यासकट चव्हाटय़ावर आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याची ही योजना अमलात आणण्यासाठी त्याने लगेचच पावलं टाकायला सुरुवात केली. मे २०१३ मध्ये स्नोडेनने एनएसएमधल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि हॉंगकॉंगकडे प्रयाण केलं. स्वत:जवळ असलेल्या दस्तावेजांचं योग्य रीतीने वर्गीकरण करून झाल्यानंतर जून २०१३ च्या पहिल्याच आठवडय़ात त्याने ही ‘टॉप सिक्रेट’ माहिती टप्प्याटप्प्याने ‘द गार्डियन’ आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या जगद्विख्यात दैनिकांच्या पत्रकारांकडे सुपूर्द करण्यास सुरुवात केली. या माहितीच्या आधारे लॉरा पॉईत्रस या प्रसिद्ध अमेरिकी दिग्दर्शिकेने स्नोडेनवर माहितीपट बनवण्यासही सुरुवात केली.

अखेरीस ९ जून २०१३ रोजी ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ आणि अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन’ पोस्टमध्ये स्नोडेनने केलेल्या गौप्यस्फोटाची कहाणी समांतरपणे प्रसिद्ध झाली, जिने केवळ या दोन देशांतच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ उडवून दिली. स्नोडेननं केलेल्या या गौप्यस्फोटाचं विस्तृत वृत्तांकन (जे ‘स्नोडेन फाइल्स’ म्हणून सुप्रसिद्ध आहे) या दैनिकांत पुढे अनेक दिवस सुरू राहिलं, ज्यामुळे विदासुरक्षा, तिची गोपनीयता आणि खासगीपणावरचा आपला अधिकार हे विषय प्रथमच मुख्य प्रवाहात आले.

या धाडसी कृत्यामुळे स्नोडेनला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागलं? अमेरिकी शासन तसंच न्यायव्यवस्थेने या गौप्यस्फोटांवर कसा काय प्रतिसाद दिला? या सर्व प्रकरणात प्रसारमाध्यमांचा वाटा किती महत्त्वाचा होता आणि एकंदरीतच सत्ताकेंद्रांवर वचक राहण्यासाठी प्रसारमाध्यमांचं कोणाच्याही दबावाखाली काम न करणं किती महत्त्वाचं आहे? आणि गोपनीयतेचा उघड भंग करूनही या विषयाची सर्वसामान्यांत व्यापक जाणीव करून देण्यामागे स्नोडेनचे योगदान किती, या सर्व मुद्दय़ांचा ऊहापोह पुढील लेखात करू या.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com