|| अमृतांशू नेरुरकर

ओपन सोर्सच्या पटावरील विविध लायसन्सिंग पद्धतींच्या व्याख्यांमध्ये तसेच प्रत्येक लायसन्सिंग पद्धतीत काहीसा फरक असला तरीही मुख्यत: या लायसन्सिंग पद्धतींची दोन पंथांमध्ये विभागणी करता येईल. एक म्हणजे बीएसडी लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ आणि दुसरा जीपीएल लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा..

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

कोणत्याही (ओपन सोर्स अथवा प्रोप्रायटरी) सॉफ्टवेअरच्या जीवनचक्रात त्याची लायसन्सिंग पद्धत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सॉफ्टवेअरचा वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावरील वापर, त्याचे वितरण, विक्री तसेच त्यात बदल किंवा सुधारणा करण्यासाठीचे सर्व नियम सॉफ्टवेअरच्या लायसन्समध्ये समाविष्ट असतात. किंबहुना सॉफ्टवेअर लायसन्स हा एक कायदेशीर दस्तावेजच असतो ज्यात सॉफ्टवेअर वापरण्यासंदर्भातल्या वरील सर्व अटी व शर्ती तपशीलवारपणे नमूद केलेल्या असतात.

ओपन सोर्स प्रकल्पात सॉफ्टवेअरच्या लायसन्सचे महत्त्व एवढय़ापुरतेच सीमित नसते. कोणत्याही प्रकारच्या संस्थात्मक संरचनेच्या (निदान औपचारिक स्तरावरील) अभावामुळे ओपन सोर्स प्रकल्प आणि त्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या समुदायासाठी सॉफ्टवेअरचे लायसन्स प्रकल्पातल्या देवाणघेवाणीची तसेच गुंतागुंतीच्या व्यवस्थापनाची एक सामाजिक स्तरावरील व्यवस्था निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य बजावते. प्रकल्पात सहयोग देणाऱ्या तंत्रज्ञांच्या वर्तणुकीचे नियम विशद करतानाच या तंत्रज्ञांना प्रकल्पात एकत्र धरून ठेवण्याचेही काम ओपन सोर्स लायसन्स करत असते.

ओपन सोर्स विश्वात आज विविध संस्था अथवा व्यावसायिक कंपन्यांकडून निर्मिलेले कमीतकमी दोन डझन लायसन्स अधिकृतपणे उपलब्ध आहेत, जे विविध ओपन सोर्स प्रकल्पांत वापरले जातात. सर्वसाधारणपणे कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी लागू होईल अशा लायसन्सपासून (उदा. जनरल पब्लिक लायसन्स किंवा जीपीएल) काही संस्था अथवा कंपन्यांनी आपल्या विशिष्ट उद्देशांसाठी निर्मिलेल्या लायसन्सपर्यंत (उदा. नेटस्केपचा नेटस्केप पब्लिक लायसन्स किंवा नासा आपल्या सॉफ्टवेअरसाठी वापरात असलेला ओपन सोर्स लायसन्स) विविध प्रकारचे लायसन्स अस्तित्वात आहेत.

कोणत्याही ओपन सोर्स लायसन्समध्ये सॉफ्टवेअरसंदर्भातल्या मुख्यत्वेकरून तीन तत्त्वांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली असते, ज्यांचे विश्लेषण खालील परिच्छेदांत केले आहे.

१) स्वातंत्र्य (फ्रीडम) – सॉफ्टवेअर स्वत:च्या गरजेनुसार वापरण्याचे, त्यात आवश्यकतेनुसार बदल वा सुधारणा करण्याचे आणि सुधारित आवृत्तीचे पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य इथे अभिप्रेत आहे. विविध ओपन सोर्स लायसन्सिंग पद्धतीत हे स्वातंत्र्य कमी अधिक प्रमाणात वापरकर्त्यांला बहाल केलेले असते.

२) समानता (नॉन-डिस्क्रिमिनेशन) – कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्थेविरुद्ध भेदभावाचे वर्तन न करणे. उदाहरणार्थ एखादे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्याचा जेवढा हक्क एखाद्या अमेरिकन व्यक्तीला आहे तेवढाच तो आफ्रिकन माणसाला किंवा संस्थेलादेखील आहे. अशा प्रकारच्या समानतेची तजवीज ओपन सोर्स लायसन्सच्या अटींमध्ये कटाक्षाने केलेली असते.

३) व्यवहारवाद (प्रॅगमॅटिज्म) – वापरकर्त्यांला ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्याची गरज जाणवू शकते. ओपन सोर्स सॉफ्टवेअर लायसन्स वापरकर्त्यांला अशी मुभा देतो का यावर त्या लायसन्सिंग पद्धतीची व्यावहारिकता अवलंबून असते.

ओपन सोर्सच्या पटावर अस्तित्वात असलेल्या विविध लायसन्सिंग पद्धतींच्या व्याख्यांमध्ये तसेच वरील तीन तत्त्वांचे अनुसरण करण्यामध्ये प्रत्येक लायसन्सिंग पद्धतीत काही प्रमाणात फरक असला तरीही मुख्यत: या लायसन्सिंग पद्धतींची दोन पंथांमध्ये विभागणी करता येईल. एक म्हणजे बीएसडी लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ तर दुसरा म्हणजे जीपीएल लायसन्सिंग पद्धतीची शैली अनुसरणारा पंथ!

बीएसडी लायसन्सिंग पद्धती सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सर्व प्रकारची स्वातंत्र्ये व मुभा तर देतेच पण त्याचबरोबर त्याच्यावर कसल्याही प्रकारचे र्निबध किंवा जबाबदारी टाकत नाही. खरे सांगायचे तर बीएसडी लायसन्स हा केवळ एक पानी दस्तऐवज आहे ज्याच्यात तीन प्राथमिक स्वरूपाच्या तरतुदी केल्या आहेत. एक म्हणजे त्यात वापरकर्त्यांला सॉफ्टवेअरच्या (आहे त्या किंवा सुधारित स्वरूपात) अमर्याद वापराचा व वितरणाचा अधिकार बहाल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून त्याचे वितरण करताना सॉफ्टवेअरला ओपन सोर्स ठेवण्याचे कसलेच बंधन वापरकर्त्यांवर घातलेले नाही. अशा अमर्याद अधिकाराच्या बदल्यात वापरकर्त्यांकडून निव्वळ एक माफक अपेक्षा ठेवली आहे ती म्हणजे त्याने सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये समाविष्ट असलेली मूळ कॉपीराइट सूचना न बदलण्याची! आणि शेवटचे म्हणजे सॉफ्टवेअरच्या निर्मितीत सहयोग दिलेल्या प्रोग्रामर्सना व त्याच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या संस्थेला (जसे बीएसडीच्या बाबतीत कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठ!) सर्व प्रकारच्या कायदेशीर भानगडींतून वाचवण्यासाठी, सॉफ्टवेअरबाबतीत कसलीही हमी न घेणारे ‘नो वॉरंटी’ कलम अंतर्भूत केले आहे.

बीएसडीला विद्यापीठीय संशोधनाची पार्श्वभूमी असल्याने या लायसन्सच्या अटी बऱ्याच अंशी बंधनरहित आहेत. याचा सॉफ्टवेअरच्या प्रसारासाठी जसा मोठय़ा प्रमाणात हातभार लागू शकतो तसेच काही वेगळ्या गुंतागुंतीसुद्धा निर्माण होऊ  शकतात. जेव्हा बिल जॉयने कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील आपल्या पदाचा राजीनामा दिला व बीएसडीचा सोर्स कोड घेऊन सन मायक्रोसिस्टीमच्या निर्मितीमध्ये गुंतला तेव्हा तो कोणतेही बेकायदेशीर काम करत नव्हता. पुढे सन मायक्रोसिस्टीमने डीईसीच्या वॅक्स लघुसंगणकांवर चालवण्यासाठी बीएसडीच्या एका नव्या आवृत्तीची निर्मिती केली जी ओपन सोर्स नव्हती. विशेष म्हणजे ही आवृत्ती मूळ ओपन सोर्स असलेल्या बीएसडीच्या सोर्स कोडचा आधार घेऊन बनवली होती. इथे सन मायक्रोसिस्टीम बीएसडी लायसन्समध्ये असलेल्या तरतुदींचाच (किंवा मर्यादांचा) पुरेपूर वापर करत होती. सन मायक्रोसिस्टीमच्या पुढील काळात झालेल्या भरभराटीनंतर बीएसडी प्रकल्पात सहभागी असलेल्या इतर तंत्रज्ञांचा बिल जॉयने बीएसडीचा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यावर सुरुवातीला सौम्य प्रमाणात असलेला विरोध पुष्कळ पटीने वाढला तरीही कायदेशीररीत्या ते सनविरोधात कसलीही कारवाई करू शकले नाहीत.

बीएसडीच्या तुलनेत वापरकर्त्यांवर बऱ्याच जास्त प्रमाणात र्निबध घालणारा असला तरीही जनरल पब्लिक लायसन्स (किंवा जीपीएल) हा एखादे सॉफ्टवेअर आणि त्याच्या सर्व सुधारित आवृत्त्या या कायमस्वरूपी ओपन सोर्स राहण्याची संपूर्ण खात्री देतो. बीएसडीप्रमाणेच जीपीएल आपल्या वापरकर्त्यांना सॉफ्टवेअरचा वापर, सुधारणा व वितरण करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देत असला तरीही आपल्या ‘वायरल क्लॉज’द्वारे सॉफ्टवेअरला सदैव ओपन सोर्स ठेवण्याचे बंधन घालतो. जीपीएलचा रचनाकार रिचर्ड स्टॉलमनच्या म्हणण्यानुसार जे सॉफ्टवेअर तिचे निर्माते ओपन सोर्स म्हणून उपलब्ध करून देत असतील, अशा सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वापरून तिला प्रोप्रायटरी बनवणे हे अनैतिक आहे आणि सॉफ्टवेअरच्या लायसन्सने अशा वर्तणुकीला पायबंद घालणे जरुरी आहे.

तात्त्विक अंगाने स्टॉलमनचा तर्क बिनतोड वाटत असला आणि यामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या अर्निबध वापरावर वचक बसत असला तरीही काही व्यावहारिक अडचणी निर्माण होतात. सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरणे अशक्य होऊन बसते, कारण जे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर एखाद्या जीपीएल स्वरूपाची लायसन्सिंग पद्धती वापरत असलेल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करत असेल तर जीपीएल अशा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा सोर्स कोड खुला करण्याचे बंधन घालतो. या काहीशा अव्यावहारिक मागणीमुळे जीपीएलच्या आहे त्या स्वरूपातल्या वापरावर मर्यादा पडतात.

जीपीएल आणि बीएसडी या दोन विरुद्ध टोकाच्या लायसन्सिंग पद्धतींमधल्या शक्तिस्थळांचा वापर करून ओपन सोर्स तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारी व तसेच व्यावहारिक निकषांवर पात्र ठरणारी लायसन्सिंग पद्धती डेबियन प्रकल्पात वापरली गेली. डेबियन सोशल कॉन्ट्रॅक्ट लिहिणाऱ्या ब्रूस पेरेन्ससाठी सॉफ्टवेअर वापरकर्त्यांचे स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे होते तेवढेच ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा प्रसार होणे गरजेचे होते ज्यासाठी त्याने असा मध्यममार्ग स्वीकारला. डेबियन लायसन्सिंगची पद्धत एवढी लोकप्रिय झाली की, पुढे स्टॉलमनलादेखील जीपीएलमध्ये व्यावहारिकतेला अनुसरून काही बदल करणे भाग पडले. आज बहुतेक ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये डेबियनशी मिळतीजुळती लायसन्सिंग पद्धती वापरण्यात येते.

amrutaunshu@gmail.com

(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)