तू प्यार का सागर है, पूछो ना कैसे मैंने रैन बितायी ते मस्ती भरा है समा..अशा असंख्य आणि भिन्न प्रकारच्या गाण्यांचं मन्नादांनी सोनं केलं. मात्र अनेकदा गायकांनी नाकारलेली गाणी आपल्याकडे येतात, याची त्यांना खंत होती. अशांना मग अधिक संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते आणि ते अधिक तेजस्वी होतात..

चित्रपट संगीत हे त्या त्या काळचे लोकसंगीत असते असे सप्रमाण प्रतिपादन ज्येष्ठ संगीताभ्यासक पंडित अशोक दा. रानडे यांनी केले होते. मन्ना डे, महंमद रफी, किशोरकुमार, तलत मेहमूद, लता, आशा, गीता दत्त आदींची त्या काळची गाणी ऐकताना ते पटते. यातल्या प्रत्येकाच्या आवाजाला चेहरा होता. स्वभाव होता. त्यानुसार त्या काळास पेलणारी चेष्टामस्करी व्यक्त  करण्यासाठी किशोरकुमारचे एक लडकी भीगी भागीसी.. पुरेसे होते आणि सभ्य, नाकासमोरून चालणाऱ्या, गृहपाठ कधीही न चुकवणाऱ्या आणि पुढे कार्यालयात वेळेवर येणाऱ्या प्रतिष्ठितेच्छूंचे मन हरिदर्शनासाठी महंमद रफीच्या आवाजात तडपत होते. एखादा आयुष्यातून विस्कटलेला तलत मेहमूदची शाम ए गम की कसम घेऊन बसायचा तर दुसरा कोणी वह सुबह कभी तो आएगी असे दोन नाकपुडय़ांतून येणाऱ्या मुकेशी स्वरात कोणाला तरी समजावयाचा. मोठा शांत, निवांत आणि पापभीरू काळ होता तो. अशा काळात आवाजाला असा कोणताही साचेबद्ध आकार नसलेले प्रबोध चंद्र डे आपला नितळ स्वर घेऊन चित्रपटसृष्टीत एका विलक्षण योगायोगाने आले. मूळचा स्वभाव वांड म्हणता येईल असा. दांडगट वागणे. कुस्ती, बॉक्सिंग हे आवडते खेळ. ते स्वभावातले मोकळेपण आवाजातही आलेले. या प्रबोध चंद्राचे काका कृष्ण चंद्र.. म्हणजे के सी डे हे मोठे गायक. अंध असलेल्या केसींचे चित्रपटसृष्टीत चांगले नाव होते. त्यांच्याबरोबर प्रबोध चंद्र मुंबईत आले. त्या वेळी चित्रपट निर्माते विजय भट्ट यांना आपल्या चित्रपटात संत वाल्मीकीसाठी के सी डे यांचे गाणे हवे होते. परंतु या केसींची अट असायची. त्यांना ज्या चित्रपटात काम करायची संधी मिळायची त्याच चित्रपटात ते गायचे. या चित्रपटात ते काम करणार नव्हते. म्हणून त्यांनी गाण्यासही नकार दिला. परंतु भट यांना त्यांनी आपला पुतण्या प्रबोध आपल्यासारखाच गातो, असे सुचवले. सुरुवातीस भट या तरुणाविषयी साशंक होते. परंतु केसींच्या आग्रहाखातर त्यांनी त्यास गाणे दिले आणि वर १५० रुपये मानधन. मन्ना डे हा चित्रपट गायक जन्माला आला तो या टप्प्यावर. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर वृद्धांसाठी गाणारा असा छाप होता. त्याचे कारण हे संत वाल्मीकी. त्यानंतर काकांच्याच सिनेमासाठी मन्नादा सुरैया यांच्यासमवेत गायले. त्यामुळे त्यांना मिळणारी गाणी अशीच होती. किशोर, रफी यांनी नाकारलेली गाणीच बऱ्याचदा माझ्या वाटय़ाला यायची अशी त्या काळची वेदना मन्ना डे यांची होती. दिलीपकुमारला तलत मेहमूद वा महंमद रफी लागायचा, राज कपूरला मुकेश आणि पुढे राजेश खन्ना वगैरेंचा आग्रह असायचा तो किशोरकुमारसाठी. माझ्यासाठी म्हणून कोणी यायचे नाही, ही मन्नादांची व्यथा होती. परंतु यामुळे एक झाले. मन्नादा प्रत्येक गाणे जीव ओतून गायचे. हाती आलेली प्रत्येक संधी ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, याची त्यांना शेवटपर्यंत जाण होती. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे रियाजाच्या मुशीतून तावूनसुलाखून निघाले. काका के सी डे यांच्या जोडीला अमान अली आणि अब्दुल रेहमान खाँ यांचे ते शागीर्द होते. चित्रपटात नाव व्हायला लागले म्हणून त्यांची तालीम कधी चुकली असे झाले नाही. त्यांच्या गाण्यातले हे शास्त्र त्याचमुळे कायम अभिमानाने चार बोटे वरच राहिले.
शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असल्यामुळे या क्षेत्रातील बुजुर्गाविषयी त्यांना आदर होता. त्याचमुळे ‘बसंत बहार’मध्ये केतकी गुलाब जुही चंपक बन फूले ही जुगलबंदी साक्षात भीमसेन जोशींबरोबर गाताना मन्नादा नतमस्तक होते. त्या चित्रपटात मन्नादा नायक भारतभूषण यांच्यासाठी पाश्र्वगायन करीत होते. नायकालाच आवाज द्यावयाचा असल्यामुळे जुगलबंदीत भीमसेनांना पराभव पत्करावा लागतो. तेव्हा एवढय़ा मोठय़ा शास्त्रीय गायकाचा पराभव आपल्याकडून होणे मन्नादांना मंजूर नव्हते. इतका सरळ मनाचा हा गायक. माणसाच्या आवाजात त्याचे व्यक्तिमत्त्व दिसत असावे. त्याचमुळे असेल परंतु मन्ना डे यांची गाजलेली, प्रात:स्मरणीय म्हणता येतील अशी गाणी ही बलराज सहानी वा अशोककुमार यांच्यावर चित्रित झालेली आहेत. ऐ मेरे प्यारे वतन.. गाणारा बलराज सहानी यांचा ‘काबुलीवाला’ अजरामर होण्यास मन्ना डे यांच्या आवाजाचा पोतही कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. वास्तविक मन्ना डे यांच्या आवाजाची जातकुळी असे बसके गाणे गाण्यास योग्य नाही. तरीही दिग्दर्शक हेमेन गुप्ता यांनी हे गाणे मन्नादांना दिले. हे गुप्ता एके काळी सुभाषचंद्र बोस यांचे सचिव होते. या बोंगाली दृष्टिकोनातून त्यांना मन्नादा यांच्या आवाजाचा परिचय होता. त्या आधी दशकभर बलराज सहानी यांच्याच ‘दो बिघा जमीन’मधील मौसम बिता जाय या विलक्षण सुंदर गाण्यातील आवाज मन्नादा यांचाच. १९५५ सालातल्या ‘सीमा’मध्येही बलराज सहानी यांना स्वर दिला होता तो मन्नादा यांनीच. त्यातील तू प्यार का सागर है..चे अथांग खोल स्वर आणि भेदरलेली नूतन ही प्रतिमा संगीतरसिकांच्या स्मृतिपटलाला आयुष्यभरासाठी बिलगलेली आहेत. नंतर एकदम वेगळ्या धाटणीची ‘वक्त’मधील ऐ मेरी जोहरा जबीं ही कव्वाली पडद्यावर गाणाऱ्या बलराज सहानी यांना आवाज दिला तो मन्नादांनीच. त्याआधी काळाकुळकुळीत केविलवाणा ‘मेरी सूरत तेरी आँखे’मधील अशोककुमार मन्नादांच्याच आवाजातून आपली वेदना व्यक्त करता झाला. या चित्रपटातील गाण्यांनी मन्नादा घराघरांत पोहोचले. त्यातील पूछो ना कैसे मैंने रैन बितायी..मधील व्याकूळता ही त्या अवस्थेतून जाणाऱ्या प्रत्येक माणसाची भावना व्यक्त करून गेली.
गाणे हे जगण्याशी जोडले गेले की जोपर्यंत कोणी ना कोणी जगणारे आहेत तोपर्यंत ते टिकते. त्या काळची गाणी ही अशी जगताना बरोबर चालणारी होती. त्यामुळे सत्तरभर वर्षे झाली तरी अजूनही तेव्हढय़ाच चवीने ऐकली जातात. त्याचमुळे टीव्हीवरील कोणत्या तरी स्पर्धेतील गायकाला आपला कस दाखवण्यासाठी मन्नादांच्या गाण्याची निवड आजही करावीशी वाटते. म्हणजे अन्य गाणी प्राथमिक फेऱ्या जिंकण्यासाठी पुरतात. परंतु अंतिम विजय साध्य करायचा असेल तर तिथे मन्नादांच्या स्वरमहालात शिरावे लागते. इतरांच्या तुलनेत मन्नादांची गाणी संख्येने कमी आहेत. पण जी आहेत ती सर्वच्या सर्व कसदार आहेत. पाणीदार मोत्यांच्या हारातील प्रत्येक मोती तितकाच तेजाळ असावा तसे. त्याचमुळे ‘आनंद’मधील जिंदगी कैसी है पहेली.. हे लक्षात असतेच पण इस्स करणाऱ्या राज कपूरच्या ‘तिसरी कसम’मधील पिंजरेवाली मुनिया  हीदेखील गानप्रेमींना जवळची वाटते. नव्या दमाच्या आर डी बर्मन यांनी त्यांच्याकडून आओ ट्विस्ट करे.. गाऊन घेतले. पण त्यासाठी त्यांना फारच ट्विस्ट करावे लागले. एरवी ते लक्षात राहतात ते भरगच्च लगावाच्या स्वरामुळे. मस्ती भरा है समा..मध्ये थोर अशा अ‍ॅकॉर्डियनइतकाच सुखावतो तो मन्नादा यांचा स्वर. समा मस्ती भरा असला तरी ती किती करावी याची जाणीव न हरवणारा.
हे मन्नादा यांचे वैशिष्टय़. काही वैशिष्टय़पूर्ण नसतानाही वैशिष्टय़ राखणारे. त्यांनी बंगालीतही अनेक गीते गायिली. परंतु सुरुवातीला हिंदीप्रमाणेच तेथेही ते दुर्लक्षिले गेले. उत्तमकुमार आदी अभिनेते विशिष्ट गायकाचा आग्रह धरीत. ते नाही मिळाले तर गाणे मन्नादांकडे येत असे. याची त्यांना खंत होती. असे जे असतात त्यांना अधिक संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते आणि ते अधिक तेजस्वी होतात आणि मग.. गदिमांच्या शब्दांत सांगायचे तर.. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक.. असा क्षण येतो. मन्ना डे हा असा राजहंस होता. काल तो आपल्यातून उडाला. त्यांच्या राजहंसी स्वरास अभिवादन.