२७१. शिवत्व

प्रपंचदु:खाचं हलाहल मुळात निर्माण होण्याचीच प्रक्रिया त्या परम व्यापक नामाच्या आधारावर मंदावू लागेल.

 

समर्थ रामदास सांगतात की, हे मना, कोणताही जीव किंवा कोणताही मानव प्रपंचदु:खाच्या विषबाधेपासून तुला वाचवू शकत नाही. सर्वचजण किंकर्तव्यमूढ आहेत! आधार केवळ एका रामनामाचाच आहे. प्रपंचदु:खाचं हलाहल मुळात निर्माण होण्याचीच प्रक्रिया त्या परम व्यापक नामाच्या आधारावर मंदावू लागेल. मग जे काही प्रपंचदु:ख उरेल तेही सोसता येईल, यात काय शंका! पण हे नाम अंगी मुरत मात्र गेलं पाहिजे.. मन त्याच्याशी एकजीव, एकरूप झालं पाहिजे. कसं ते ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ८३व्या श्लोकात सांगितलं आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे :

जेणें जाळिला काम तो राम ध्यातो।

उमेसीं अतीआदरें गूण गातो।

बहू ज्ञान वैराग्य सामथ्र्य जेथें।

परी अंतरीं नामविश्वास तेथें।। ८३।।

प्रचलित अर्थ : शंकरांनी आपल्या दृढ वैराग्याने काम अर्थात मदनाला जाळून टाकले. तरी तेही रामध्यानात निमग्न असतात आणि माता पार्वतीपाशी रामगुण गातात. ज्ञान, वैराग्य आणि सामथ्र्य यांनी परम संपन्न असूनही शंकरांच्या अंत:करणात नामासाठी दृढ विश्वास आहे.

आता मननार्थाकडे वळू. मुळात कामाला जाळून टाकलं तरी आणि ज्ञान, वैराग्य आणि सामथ्र्य असूनही शंकर रामनामात दंग आहेत, हा अर्थ पुरेसा वाटत नाही. उलट याच्या उलट अर्थ घेतला तर साधकासाठीची अर्थसंगती लागते. त्याआधी शिवपार्वती या अद्वय द्वयीचं रहस्य थोडं जाणलं पाहिजे! माउलींनी ‘अमृतानुभवा’च्या प्रारंभी ते मांडलं आहेच आणि पावसचे स्वामी स्वरूपानंद यांनी त्याचा जो अभंगभावानुवाद केला आहे त्यात ते अधिकच प्रकाशमानही झालं आहे. शिव आणि पार्वती अर्थात पुरुष आणि प्रकृती यांनीच हे चराचर व्याप्त आहे. शिव हा आत्मस्वरूप आहे तर पार्वती ही त्याची शक्तीस्वरूप अर्थात आत्मशक्ती आहे. हे दोन्ही लौकिकार्थाने भिन्न दिसत असले तरी अंतर्यामी अभिन्नच आहेत. माउली म्हणतात ‘गोडी आणि गुळु। कापुरु आणि परिमळु’ यांना वेगळं करता येत नाही ना? गूळ-गोडी, कापूर-परिमळ जसे एकजीव आहेत तसेच शिवपार्वती ‘समरूपिणो:’ आहेत.. एकरूप आहेत. माउली म्हणतात, ‘दो ओठीं येक गोठी। दो डोळां येकी दिठी। तेवीं दोघीं जिहीं सृष्टी। येकीच जेवीं।।’ ओठ दोन असतात, पण ते एकच गोष्ट सांगतात! डोळे दोन असतात, पण ते एकच गोष्ट पाहतात.. आत्मा आणि त्याची सूक्ष्म आत्मशक्ती जागृत झाली की त्यांचा जेव्हा परमतत्त्वाशीच संयोग होतो, तेव्हाच त्यांच्या अस्तित्वाचं आणि ऐक्याचं खरं सार्थक होतं. त्यासाठी साधकातलं शिवत्व जागं झालं पाहिजे. हे ‘शिव’त्व म्हणजे काय? ‘शिव’ म्हणजे ‘स: ईव!’ अर्थात ‘हा तोच!’ साधक जेव्हा व्यापक होईल तेव्हा त्याच्यातलं आणि परमतत्त्वातलं अंतर संपूनच जाईल ना? आणि जोवर मनात संकुचित, ‘मी’पणाला चिकटलेल्या कामना शिल्लक आहेत, तोवर ‘शिव’त्व जागं होणं शक्य नाही.. तोवर त्या परमतत्त्वस्वरूप रामाचं ध्यान शक्य नाही. समर्थ म्हणतात, ‘जेणें जाळिला काम तो राम ध्यातो।’ ज्यानं अंत:करणातील समस्त कामना जाळून टाकल्या आहेत तोच परमध्यान साधू शकतो! आणि कामना संपल्यावर जेव्हा आत्मशक्ती जागी होते तेव्हा तिला परमात्मशक्तीकडेच वळविण्याचं सहजकार्य सुरू होतं! ‘उमेसीं अतीआदरें गूण गातो!! ’असा साधक देहभावावर पुन्हा येत नाही. आपल्या सर्व शक्तीचा स्रोत, उगम ती परमात्मशक्तीच आहे, हे तो पक्केपणानं जाणत असतो. त्या परम स्वरूपाशी अभिन्नत्वानं जोडलं गेलेलं जे नाम आहे त्याचाच त्याला आधार वाटतो. त्या नामावरचा त्याचा विश्वास अढळ राहतो. पण त्यासाठी थोडं नव्हे, ‘बहू’  ज्ञान, वैराग्य आणि सामथ्र्य आवश्यक असतं!

चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या