१९६. मनी.. लोचनी

सद्गुरूबोधात गुंफलेलं आयुष्य जगण्याचं महत्त्वं समर्थानी मनोबोधाच्या ४६व्या श्लोकापर्यंत सांगितलं.

सद्गुरूबोधात गुंफलेलं आयुष्य जगण्याचं महत्त्वं समर्थानी मनोबोधाच्या ४६व्या श्लोकापर्यंत सांगितलं. आता या सद्गुरूंची बाह्य़लक्षणं ४७व्या श्लोकापासून सांगायला ते सुरुवात करीत आहेत. मनोबोधातील हे दहाश्लोकी गुरूचरित्रच आहे! या सद्गुरूचं दोन शब्दांतलं वर्णन समर्थ करतात ते म्हणजे ‘‘दास सर्वोत्तमाचा!’’ हा सद्गुरू जो आहे तो सर्वोत्तम परम अशा तत्त्वाचा दास आहे! एक लक्षात ठेवा, मनोबोधाचे पुढील दहा श्लोक म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं परिपूर्ण वर्णन नव्हे. कारण वेदांनीही ज्या स्वरूपाचं वर्णन ‘नेति नेति’ असं केलं, त्या सद्गुरूंचं खरं स्वरूप, त्यांचं खरं व्यापक विराट कार्य, त्यांचा खरा विराट संचार, यांचं आकलन कोणाला होणार? तेव्हा श्रीसद्गुरूंना नमन करून मनोबोधाच्या या दहा श्लोकांचा मागोवा आता घेऊ. ४७वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे:

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहें।

जनीं जाणता भक्त होऊनि राहें।

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। ४७।।

प्रचलित अर्थ: त्याच्या मनात व लोचनात म्हणजे आत व बाहेर सर्वत्र त्याला श्रीरामच दिसत असतो. अंतर्बाह्य़ रामरूप भरून गेल्यामुळे त्याला ज्ञानीही म्हणावे व भक्तही म्हणावे किंवा जाणता भक्त म्हणावे, अशी त्याची बैठक असते. तो पूर्ण ज्ञानी असून सगुणाचे प्रेम आणि साधनाचा क्रम दोन्ही राखून असतो. तो सर्वोत्तम भक्त धन्य होय.

आता मननार्थाकडे वळू. मुळात सर्व प्रचलित अर्थ हे रामाचा धन्य भक्त कसा असावा, हेच सांगणारे आहेत. आपल्या गूढार्थानुसार हे सद्गुरूंचंच वर्णन आहे! या श्लोकाच्या पहिल्या चरणाचे पहिले दोन शब्दच किती विराट आहेत! मनी आणि लोचनी!! सद्गुरूंचं मन कोणी ओळखावं? त्यांच्या विराट अंतरंगाचा थांग कुणाला लागावा? पण एक निश्चित की त्यांच्या अंतरंगात आणि ‘लोचनी’ म्हणजे त्यांच्या समस्त भौतिक जगात परमतत्त्वच भरून असतं! सर्वत्र ते श्रीरामाला अर्थात परमतत्त्वालाच पाहात असतात, अनुभवत असतात. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘‘मी माझ्या शिष्यालाही रामरूपातच पाहातो!’’ एकदा गुरुजी स्नान आटोपून हातात छोटा आरसा घेऊन कपाळी त्रिपुंड्र रेखीत होते. आम्ही वीस-पंचवीसजण भोवती कोंडाळं करून त्यांना न्याहाळण्याचं सुख अनुभवत होतो. अगदी नि:शब्द शांतता होती. गुरुजींनी हसून विचारलं, ‘‘तुम्ही एवढेजण माझ्याकडे रोखून पाहात आहात, मला कसं वाटत असेल?’’ त्या प्रश्नानं आम्हा सर्वानाही प्रसन्न हसू आलं. तोच गुरुजी गंभीरपणे म्हणाले, ‘‘मला तुम्ही सर्व कसे दिसता माहीत आहे? मला तुम्ही सर्व रामरूपच दिसता!’’ सर्वत्र केवळ तोच तो भरून आहे.. काहीच वेगळेपणा नाही.. द्वैताचा लेशमात्र स्पर्श नाही.. मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे! आणि केवळ तेच सर्वत्र रामरूप पाहू शकतात बरं का.. सर्वत्र ब्रह्म व्याप्त आहे, असं आपण तोंडानं म्हणू, पण दुसऱ्याच्या अपशब्दानं क्रोधितही होऊ, अशी गत आहे! केवळ तेच सर्वत्र एकालाच पाहातात.. ‘अभंगधारा’ सदरात ‘रूप पाहाता लोचनी’ या अभंगाचं विवरण आठवतं का? त्यात सद्गुरूंच्या पाहाण्याचा मागोवा आहे. आरशात आपण आपला चेहरा न्याहाळतो आणि चेहऱ्यावर काही डाग लागला असेल तर काढून टाकतो. आपण आरशात पाहातो पण आरशाला पाहात नाही! अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूही शिष्यातही त्याच परमतत्त्वाचा अंश पाहातात आणि त्यात काही दोष चिकटला असेल तर काढून टाकतात! ते शिष्याला पाहात नाहीत, शिष्याच्या देहाला पाहात नाहीत, त्या आवरणाला पाहात नाहीत, त्या आवरणाआतील परमतत्त्वालाच पाहातात!

– चैतन्य प्रेम

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या