कविता, क्रिकेट, चित्रं यापैकी कशाकशाला आपण आपापल्या संदर्भात महत्त्वाचं मानायचं, हा प्रश्न प्रत्येकाचा, आपापल्यापुरता असतो. सत्य कुठेतरी दुसरीकडेच असणार असतं, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे संदर्भ आपण आपापले शोधायचे असतात. पण संदर्भ लक्षातच घेतले नाहीत, तर कशालाही आपण ‘हे नाही कळत’ असं म्हणू शकतो..

प्रभाकर बरवे यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक वाचून मग त्यांची चित्रं पाहाणं, हा एक उपयुक्त मार्ग असल्याचं सार्वत्रिक मत आहेच. ‘कलाभान’बद्दल गेल्या आठवडाभरात ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यातूनही हे मत सार्वत्रिक असल्याचाच प्रत्यय खासगीपणे आला. बरवे यांनी मध्यमवर्गीय आर्थिक अनुभव गाठीशी असूनही ‘जगण्याचं वस्तूकरण’ सारखी पाश्चिमात्य संस्कृतीतली दु:खं उगाळत न बसता आहे त्या जगण्यातला अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, एवढंच म्हणणं गेल्या आठवडय़ातल्या ‘कलाभान’मध्ये होतं. त्याच्याशी सहमत आहोत की नाही, हे सांगण्याआधी (किंवा ऐवजीसुद्धा) अनेक ‘वाचकां’नी बरवे यांच्या ‘कोरा कॅनव्हास’चं कौतुक केलं. दोघेच निराळे होते, त्यांच्या प्रतिक्रियांमुळे आजच्या विषयापर्यंत आपण आलो आहोत. ‘चित्र आणि शब्द यांमध्ये अधिक सोपं असं काही असतं का?’ हा आजचा विषय. ‘बरवेंचं पुस्तक वाचण्यापेक्षा त्यांची चित्रं बघणं बरं.. त्यांचं ते पुस्तक वाचलं की मला तर न्यूनगंडच येतो’ असं सांगणारा एक चित्रकार, आणि ‘पुस्तक वाचलंय मी, पण खास नाही वाटलं’ असं सांगणारी एकजण. या दोघांच्या प्रतिक्रिया इतरांपेक्षा निराळय़ा आहेत, हे अगदी नक्की. इतर (पुस्तक आवडलं आणि पुस्तकामुळे बरवेंची चित्रं पाहू लागलो, चित्रं समजू लागली) प्रतिक्रियांच्या मागे ‘आपल्याला वाचलेलं समजतं. चित्रंबित्रं नाही कळत’ हे गृहीतक ठामपणे असावं. ते तितकं ठाम नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत बरवेंची चित्रं- बरवेंचं पुस्तक या जोडीनं सिद्ध केलंय. काही थोडय़ा, अल्पसंख्यच लोकांना चित्रं शब्दापेक्षा अधिक कळतात.
त्या अल्पसंख्य लोकांचा कैवार आपण इथं घेण्याचं काहीच कारण नाही.. साहित्य- नाटय़- चित्रपट- संगीतादी कलांबाबत ‘रसिक’ असलेले आपण मराठीभाषक लोक चित्रांपासून मात्र लांब का, या प्रश्नातूनच ‘कलाभान’या लेखमालेचा जन्म झाला आहे. या प्रश्नावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्यामुळे इथे त्या (उपरोल्लेखित) अल्पसंख्याचं लांगूलचालन होणार नाही.
तेव्हा आपण चित्रांची चर्चा बाजूला ठेवून शब्दांबद्दलच्या चर्चेतले काही मुद्दे पाहू.
‘शब्दाला अर्थ असतो, वाक्याला तर अर्थ असायलाच हवा,’ या व्यावहारिक व्याख्या आहेत. याउलट, चित्र म्हणजे चित्रच, त्याचा अर्थ काय विचारताय, असं चित्रकारच अनेकदा म्हणतात! मग सोपं काय?
शब्दच.. कदाचित.. परंतु शब्द हे व्यवहाराचं साधन आहेत आणि चित्रं व्यवहारात नाहीत, असं इथं आपण गृहीत धरलंय, म्हणून. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये गेलात तर तिथल्या चित्रलिपीचा अर्थ समजून देण्यासाठी गाइड असल्यास तो अनेक खुणांकडे पॉइंटर नेऊन त्या म्हणजे जणू मुळाक्षरंच आहेत, अशा रीतीनं सांगत असतो. इजिप्तमधलीच ‘अश्रू’ ही खूण अरुण कोलटकरांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहावर आहे. कोलटकरांच्या त्या कविता अनेकांना ‘समजल्या’ असतील. पण समजा कविता जरा कठीण वाटल्या असतील, तरीही आवडली असेल, लक्षात राहिली असेल ती ‘अश्रू’च्या खुणेचा वापर करण्याची कोलटकरांची योजकता.
म्हणजे आपल्याला फक्त ‘लिहिणाऱ्यानं हे सांगितलंय’ एवढंच कळतं, असं नाही.
आपल्याला ‘हे इथं झालंय’ किंवा ‘हे मला वाटलंय’ हेही कळतंच.
आपल्याला आधी काहीतरी समजलेलं असेल, तर त्यापुढे नक्की त्यापेक्षा जास्त समजतं. हे सर्वसाधारण मानवी वैशिष्टय़ आहे. पण कुणाला कशानंतर काय कळेल, याचे ठोकताळे चुकूही शकतात. उदाहरणार्थ, कोलटकरांची कविता वाचणारे कविताप्रेमी- ज्यांनी बा. सी. मर्ढेकर, नारायण सुर्वे, दि. पु. चित्रे, झालंच तर विवेक मोहन राजापुरे, मन्या ओक, भालचंद्र नेमाडे या कवींच्या नंतर कोलटकरांच्या निधनाआधीच्या आजारपणात एकदम निघालेले चार संग्रह वाचले- त्यांना कोलटकर या सर्वाच्या संदर्भात कळले आणि संस्कृतीचं कोलटकरांनी मांडलेलं आकलन हे या सर्वाच्या पुढलं आहे, असं वाटू लागलं. पण हे ‘नवे कवी’ न वाचलेल्या आणि तुकाराम ते बहिणाबाई चौधरी असे – शहाणिवेच्या कवितेचे संस्कार मात्र सहजपणे होत गेलेल्या एखाद्यानं/ एखादीनं कोलटकरांच्या कविता वाचल्या तर? तर कदाचित, ‘हे साधेपणानंसुद्धा सांगता येईल की’ असा एखादा शेरा उगाचच कोलटकरांवर बसेल. ‘नाही कुणी का कुणाचा । बाप लेक मामा भाचा। मग अर्थ काय बेंबीचा। विश्वचक्री॥’ या मर्ढेकरांच्या ओळी साधेपणानं आशय सांगणाऱ्या आहेत आणि त्या अभंगासारख्या छंदात बांधलेल्या आहेत. पण ‘मला माहीत असलेल्या अभंगांसारखा हा नाही, मग याला अभंग का म्हणायचं?’ असा प्रश्न त्या एखाद्याला / एखादीला मर्ढेकर वाचताना पडू शकेल.
यासारखे अनुभव दूरान्वयानं का होईना, आपल्याला चित्राबाबत आलेले आहेत. आपल्याला अमुक माहीत असतं आणि आपली एकंदर क्षमता म्हणाल तर अमुक+असंख्य गोष्टी माहीत करून घेण्याची नक्कीच असते. पण एकावेळी अमुक+काय माहीत करून घ्यायचं अमुक+किती माहीत करून घ्यायचं, हे आपल्यापैकी प्रत्येक जण निरनिराळं ठरवत असतात. ‘स्थिरचित्र (वस्तुचित्र)’ हा प्रकार शाळेत आपण शाळेतल्या चित्रकलावर्गात हाताळलेला असतो. त्या वर्गात वस्तूंचे आकार काढणं, प्रकाशयोजना हुबेहूब दाखवणं, मग विविध वस्तूंचे पोत निरनिराळे असतात त्यांचा आभास रंगांमधून दाखवणं, अशा पायऱ्यांनी आपण आपली माहिती वाढवत जातो. पण वस्तूकडे पाहून पेन्सिलीनं तिचं अचूक माप घेणारे आपण पुढे, वस्तूचा पोत दिसतोय त्यापेक्षा निराळाच असता तर काय झालं असतं, (कपबशी समजा फरची असती, तर?) असे विचार सहसा करत नाही. वस्तुचित्रण म्हणजे शिक्षकांना / परीक्षकांना / व्यवस्थेला जे अपेक्षित आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या व्यवहारात आपण आपल्यापरीनं चोख असतो!
नेहमीचा व्यवहार आणि कलाव्यवहार यांना असंख्य फाटे फुटत जातात.. आपण वाढत जातो, पण कलेपासून लांबही जातो. क्रिकेट पाहणं एवढीच एकमेव रसिकतेची खूण उरलेले काही जण आपल्यात असतील.. ते जेव्हा अमक्या फलंदाजाची फटकेबाजी ‘नजाकतदार’ आहे, ‘कलात्मक’ आहे, असं म्हणतात.. तेव्हा त्यांना काय म्हणजे ‘कलात्मक’ असं वाटत असावं?
‘काय म्हणजे कलात्मक हा प्रश्न फारच मोठा आहे..’ हे उत्तर देऊन क्रिकेटरसिक हा प्रश्न सीमापार टोलवू शकतातच; पण आजवर न पाहिलेलं- आजवरच्या शैलींपेक्षा निराळं, असं काहीतरी पाहायला मिळतंय म्हणून आत्ता इथं त्याला ‘कलात्मक’ म्हणायचं, हे त्या मोठय़ा प्रश्नाचं एक- जरा सोपं उत्तर आहे. बाकीच्या क्षेत्रांमधल्या ‘कलात्मकते’शी त्या उत्तराचा ताळाही करून बघता येतो. १९३६ साली मेरेट ओपेनहाइम हिनं फरची कपबशी करून आर्ट गॅलरीत मांडली, तेव्हाही शैलीतला फरक हा कलात्मकतेकडे नेणारा एक मार्ग आहे, याची जाणीव अनेक प्रेक्षकांना झाली असणार!
 विषय ओपेनहाइमच्या कपबशीचा नाही.. ‘काहीतरी निराळं झालं’ किंवा ‘आतापर्यंत पाहिलेल्याच्या पुढलं आहे हे’ एवढंच पुरेसं असतं का, हा त्या कपबशीतून निघणारा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे. त्याच्या विरुद्ध बाजूचा प्रश्न म्हणजे – ‘जे झालंय त्याच्या पुढलंच कशाला पाहिजे? नवंच सांगायला कशाला पाहिजे? आधीचेच ‘फॉर्म’ वापरले आणि नवं काही सांगितलं नाही तरीही प्रेक्षकाची (वाचकाची / श्रोत्याची) क्षमता वाढवणारं काही असेलच की? तेही कलाच, की नाही?’ अशी सरबत्ती!
या सरबत्तीच्या पुष्टय़र्थ आहे, रेने मॅग्रिट याचं गाजलेलं चित्र. ‘गाजलेलं’ म्हणजे फक्त आर्ट गॅलऱ्यांमध्ये नाही, चित्रकलेच्या चर्चेत नाही, तर तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र या क्षेत्रांमध्येही मॅग्रिटच्या या चित्राचा दाखला दिला जातो.
या चित्रात नवं काहीच नाही.. आपले हिंदुहृदयसम्राट ओढायचे तशापैकी एका पायपाचं हे चित्र, ‘वस्तुचित्र’ या पेपरात ए ग्रेड मिळवील असं आहे. त्याच्या खाली काहीतरी लिहिलंय. फ्रेंचमध्ये लिहिलंय, त्याचा अर्थ ‘हा पाइप नव्हे’ असा होतो. म्हटल्यास, ही अशी धादांत धक्कातंत्रवजा ओळ चित्राखाली लिहिणं ‘नवं’ आहे. वरवर ते नेहमीसारखंच (किंवा जुन्यासारखंच) दिसत असूनही क्षमतावाढ करणारं आहे. या चित्राचं शीर्षक आणखी निराळं आहे- ‘प्रतिमेचा द्रोह’ (द ट्रीझन ऑफ इमेजेस) असं. हा पाइप नाही, ‘पायपाची हुबेहूब प्रतिमा’ असेल- पण पाइप नाही. दिसतंय ते चित्रच. असं मॅग्रिट सांगतो, म्हणून हे चित्रकलेबाहेरही ‘असतेपणा’च्या चर्चेतलं महत्त्वाचं चित्र ठरतं. ‘मी सत्याचा आभास नाही- मी स्वयंभू सत्यच आहे’ असा याचा अर्थ तत्त्वज्ञानात होऊ शकतो. या अर्थानं कलाकृतीकडे पाहिलं की मग, तिच्यासमोर आपण आहोत हे महत्त्वाचं ठरतं.
‘साब देखो ये न्यू येर भी क्या है’ अशी कोलटकरांची एक कविता आहे. तीही अशीच- मराठी काव्यसंग्रहातली संपूर्ण हिंदी कविता. एका टॅक्सीवाल्यानं त्याच्या बुद्धीनुसार सांगितलेली एका जोडप्याबाबतची दु:खद घटना.
आकार / रंग / पोत समजतो, पण चित्र कळत नाही. फरची कपबशी आवडते, पण आधुनिक चित्रकलेचा इतिहास आवडतो म्हणून नाही.. फर छान दिसते म्हणून!
हे होत राहणारच. प्रश्न आपल्या निवडीचा आहे. आपण आपल्या जगण्याचे संदर्भ किती व्यापकपणे कलेच्या इतिहासाशी वगैरे जोडायचे, याचा प्रश्न. उत्तर प्रत्येकाचं निराळं.
‘प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस’ वगैरे शब्द अजिबात कठीण नसूनसुद्धा कुठे कळतात बहुसंख्यांना?

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?