योगेन्द्र यादव yyopinion@gmail.com

आधीच्या अथवा उपलब्ध राजकीय सिद्धान्तांची फेरसमीक्षा करणे, हेही राजकारणाचे महत्त्वाचे अंग मानले जाते. त्यातून नवे राजकारण उभे राहात असते. अशा प्रकारे मार्क्‍सवादाकडे पाहिले, तर आज काय दिसते..

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

एकविसाव्या शतकात मार्क्‍सवाद गैरलागूच ठरतो, अशा मताचे बहुतेकजण असतील. मीदेखील कधीही ‘मार्क्‍सवादी’ नव्हतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकत होतो आणि राजकारणाशी सक्रिय परिचय नुकता होत होता, तेव्हाही ‘पार्टी’निष्ठ डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विरोधातच मी लढत होतो. आजही, भारतातील कम्युनिस्ट पक्षांच्या एकारलेपणाचा मी खंदा टीकाकारच आहे. पण एकोणिसाव्या शतकातला ‘मार्क्‍सवाद’ हे अखेर एक विचारधन आहे आणि कोणत्याही विचारधनाकडे पूर्णत: पाठ फिरवणे हितावह नसते. उलट, त्या वैचारिक मांडणीतले जन्मजात दोष ओळखावेत, स्थळकाळानुरूप गैरलागू ठरणारे सारे फेकून द्यावे आणि संकल्पनांचा विचार करावा, असे केल्यास मार्क्‍सवाद हाही भविष्य घडवण्यासाठी काहीएक सामग्री देणारा ठरतो.

तसे करण्यासाठी आपल्याला भारतीयसंदर्भात मार्क्‍सवादी तत्त्वांचा विचार करावा लागेल. आज ‘भारतीयसंदर्भात मार्क्‍सवाद’ असे नुसते म्हटले की आठवतात ते पोथीनिष्ठ पक्ष, त्यांची रटाळ भाषणे, किंवा मग नक्षलवादीच. आपण विचार करायचा आहे तो मार्क्‍सवादी तत्त्वांचा. गटांचा नाही. मार्क्‍सवादी ‘राज्यव्यवस्थे’चा तर नाहीच नाही. त्या व्यवस्था हुकूमशाही प्रवृत्तीच्या, विरोधकांना ‘संपवणाऱ्या’, सारे नियंत्रण राज्यव्यवस्थेच्या हाती देणाऱ्या होत्या, हे आता साऱ्यांनाच माहीत आहे. इतकेच काय, पण डावे राज्यकर्ते व नेते यांनाही आपल्या विचारापासून दूरच ठेवणे बरे.

आपण विचार करायचा तो एकोणिसाव्या शतकातल्या, युरोपच्या बाहेर न पडलेल्या आणि एकोणिसाव्या शतकातल्याप्रमाणेच जगणाऱ्या त्या कुणा कार्ल मार्क्‍सने विचारातून जी नवी दिशा दिली, तिचा. ही दिशा समाजाचा ‘शास्त्रीय’ विचार करण्याची होती, म्हणून ती महत्त्वाची.

मार्क्‍सवादाचे गुणदोष पाहण्यासाठी या सैद्धान्तिक वादाचे तीन भाग पाडता येतील : पहिला म्हणजे या वादाने पाहिलेले (साम्यवादी) समाजाचे स्वप्न, दुसरा म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानाचे या वादाने केलेले आकलन आणि तिसरा भाग म्हणजे वर्तमानाकडून त्या स्वप्नवत् समाजाकडे जाण्यासाठीचे मार्ग.

ध्येय काय?

मार्क्‍सवादाने नैतिक भाषेऐवजी शास्त्रीय भाषा वापरली, पण तो आकळून घेणे हे नैतिकदृष्टय़ा मनोज्ञच ठरू शकते. असे दिसते की, गतकाळाबद्दलची निरीक्षणे मार्क्‍सने ‘समाजाचा शास्त्रीय अभ्यास’ म्हणून मांडली आणि त्यापुढे हा समाज कुठे जाऊ शकतो, हे सांगण्याची जबाबदारीही शास्त्रज्ञांप्रमाणे, वैज्ञानिकांप्रमाणे शिरावर घेतली. मात्र समाज कुठे जाऊ शकतो, हे सांगताना मार्क्‍सने काही मोघम आणि स्वप्नाळू विधाने केली. ज्याआधारे पुढे, मार्क्‍सवादी व्यवस्थांची रचना झाली आणि ‘पार्टी’च्या एकाधिकारशाहीला मोकळे रान मिळाले. मार्क्‍सने ज्या सूचना केल्या त्यांची इतकी ‘कठोर अंमलबजावणी’ रशियन क्रांतीने केली हे मार्क्‍सचे दुर्दैवच, पण त्याहून मोठे दुर्दैव म्हणजे या रशियन व्यवस्थेचीच रूपे अन्यत्र कठोरपणे लादली जाऊ लागली. यात स्वप्नातल्या समाजाची उभारणी राहिली बाजूलाच. त्याऐवजी, लोकशाहीशी फारकतच घेणारी राजकीय व्यवस्था आणि न टिकणारी अर्थव्यवस्था बोकाळली. कालांतराने या अर्थव्यवस्थेचा पाडाव झालाच, पण तिचा आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे ही रशियाप्रणीत व्यवस्था आणि  मोठी कारखानदारी- जास्तीत जास्त उत्पादन यांवर भर देणारी भांडवली व्यवस्था यांत केवळ वरवरचा, प्रचारभाषेचा फरक होता. असल्या व्यवस्थांचा सर्वात मोठा दोष म्हणजे येथे ‘आत्मोन्नती’ला तर नाहीच पण ‘आत्मजाणिवे’लाही थारा उरला नाही. ‘स्व’च्या तात्त्विक- आध्यात्मिक वा नैतिक गरजा पूर्णत: दुर्लक्षित ठरल्या. हा मुद्दा ‘आता काय त्याचे? त्या व्यवस्था तर गेल्या’ असे म्हणून झिडकारता नाही येणार. आजही अनेक कम्युनिस्टांनी नैतिक गरजांकडे असेच दुर्लक्ष चालवलेले दिसते.

तरीही, जगातील विषमता वाढते आहे, शोषण होते आहे तोवर मार्क्‍सवादाची उपयुक्तता संपणार नाही. या विषमतेचे आणि शोषणाचे, अन्यायाचे मूळ भांडवली व्यवस्थेत आहे हे मार्क्‍सवादाने दाखवून दिले. त्या शोषणाची नवनवी रूपे ओळखणारेही मार्क्‍सवादी आहेत, ते स्वत:ला कम्युनिस्ट म्हणवत नसतील पण वसाहतवाद, वंशवाद, पुरुषसत्ताकता आणि अगदी जातिभेदाशीही लढण्याची ऊर्मी त्यांनी दाखवली आहे, ती मार्क्‍सवादाच्या प्रभावामुळे. गरिबांच्या, दलितांच्या, सर्वहारांच्या आणि शोषितांच्या बाजूने उभे राहणे आजही ‘मार्क्‍सवादी’ मानले जाते. हे मूल्य कायम ठेवून आजची वैचारिक मांडणीही करता येऊ शकते.

आपण आज कुठे आहोत?

आज मार्क्‍सवादाकडे पाहायचे तर, मघाशी म्हटल्याप्रमाणे, नेत्यांकडे नकाच पाहू. डाव्या पक्षांकडेही नाही. अनेकानेक डावे कार्यकर्ते दिसतील, त्यांच्या निष्ठेकडे मात्र डोळसपणे पाहा. त्याहूनही, मार्क्‍सवादाकडे एक ‘सामाजिक शास्त्र’ म्हणून पाहाणे महत्त्वाचे आहे आणि त्यादृष्टीने एक बाब लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, तुम्ही जो समाज बदलू पाहाताहात त्या समाजाचा अभ्यास करा- तो समाज आधी समजून घ्या- हा मार्क्‍सवादाचा सांगावा आहे. अभ्यासान्तीच समाज बदलता येईल, हा विश्वास क्रांतिकारकांना बळ देणारा ठरलाच पण समाजविज्ञानालाही पुढे नेणारा ठरला आहे. मार्क्‍सवादाचा असा समाजशास्त्रीय विचार आज केला तर असेही दिसून येईल की, त्याची पुढली वा भविष्य दाखवणारी गणिते चुकलेली आहेत. मार्क्‍सवाद इतका युरोपीय आहे की, भारतीय समाजाच्या संदर्भात तो यांत्रिकपणे अथवा ‘पोथीनिष्ठ’ राबवताच येणार नाही. हा मार्क्‍सवादाचा जन्मजात दोषच आहे. (‘पोथीनिष्ठ’ हा शब्द म्हणजे ‘दास कॅपिटॉल’ते लेनिनकृत ‘व्हॉट इज टुबी डन’ या ग्रंथांना खास भारतीय अहेर! अशा ‘पोथीनिष्ठ डाव्यां’चे भारतात काय झाले आपण पाहातोच आहोत).

अशा वेळी, भारतीय स्थळकाळसंदर्भातून मार्क्‍सवादाचे चार विशेष कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुदीप्त कविराज यांनी चर्चिले आहेत. त्यांचा पहिला मुद्दा असा की ‘जडवाद’ म्हणजे नीतीमूल्यांपासून फारकत नव्हे. गरिबांचा, शोषितांचा किंवा ढासळत्या पर्यावरणाचा विचार नैतिकतेच्या शब्दांत केला तरीही जडवादी चौकटीत बसणारच. दुसरा मुद्दा ‘ऐतिहासिकता’ या संकल्पनेबद्दलचा आहे. आज जे जे दिसते त्यामागे इतिहासातील कारणे आहेत, असे मान्य करून त्या कारणांचा शोध आपण घेणार असू तर आपल्या समाजाचा विचार आपण आपल्याच इतिहासानुसार करू शकतो. याला पूर ठरणारा तिसरा मुद्दा प्रा. कविराज मांडतात तो असा की, ‘वर्ग’ ऐवजी वर्णाश्रमधर्म आणि जातिव्यवस्था, जातिअंत यांचा विचार करावा लागेल. त्यांचा चौथा मुद्दा ‘अंतर्विरोध’ या संकल्पनेबद्दल आहे. भांडवलशाहीतले अंतर्विरोध मार्क्‍सने सांगितले, पण आपल्याला आज आधुनिक व्यवस्थांमधले अंतर्विरोधही ओळखावे लागतील.

पुढे काय?

मार्क्‍सवादी न होता, झापडे न लावता मार्क्‍सवादाचा अभ्यास करणे, ही पुढली दिशा आहे. ती दिशा आपल्याला हेही सांगते की, मार्क्‍सवादी ‘क्रांती घडवण्या’च्या मार्गात नैतिकतेचा विचार केलेला नसल्याने तो मार्ग अपुरा आहे आणि म्हणून झापडबंद मार्क्‍सवादी आजही हिंसेचा आधार घेताहेत.

आपल्याला हवा असलेला मार्क्‍सवाद या हिंसक प्रकारापेक्षा नक्कीच निराळा आहे. तो समाजाच्या अभ्यासाचे बळ देणारा आहे. आज मार्क्‍सवादाला टोमणे मारणे सोपे असतेच, पण मार्क्‍सवादाच्या टीकाकारांन- माझ्यासारख्या अनेकांना- अभ्यासाच्या अनेक दिशा मार्क्‍सवादामुळे मिळाल्या आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही.

लेखक जय किसान आंदोलनआणि स्वराज इंडियाचे संस्थापक आहेत.