‘इंडिया’तला भारतीय समाज

देशी इंग्रजी कविता असो किंवा इतर साहित्य असो, त्यातील मुख्य झगडा हा देशी अनुभव परक्या भाषेत मांडण्याच्या तिढय़ाशी राहिलेला आहे.

देशी इंग्रजी कविता असो किंवा इतर साहित्य असो, त्यातील मुख्य झगडा हा देशी अनुभव परक्या भाषेत मांडण्याच्या तिढय़ाशी राहिलेला आहे. या साहित्यावर झालेल्या टीकेतही त्यातल्या ऐवजाआधी भाषेच्या कृत्रिमपणावर झोड उठवली गेली आहे. अखेर भाषेबरोबर तिची संस्कृती, समजुती, जीवनमूल्ये असे सगळेच येते. ती प्रत्येकाला जन्माबरोबर आयतीच मिळाल्याने तिने आपल्याला दिलेली सुरक्षिततेची आणि मुळांशी जोडलेले असल्याची जाणीव गृहीतच धरली जाते. या पाश्र्वभूमीवर काही ना काही कारणाने  इंग्रजी हीच प्रथमभाषा बनलेल्या, एके काळी इथे अल्पसंख्य असलेल्या, पण आता विस्तारत चाललेल्या वर्गाची विचित्र कोंडी होताना दिसते. इंग्रजी नाटकांच्या बाबतीत ही कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये महेश दत्तानी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पंचवीस वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत नाटककार, दिग्दर्शक, नाटय़ प्रशिक्षक, चित्रपट दिग्दर्शक अशा अनेक भूमिका निभावणारे, साहित्य अकादमी विजेते दत्तानी यांनी आपल्या ‘मी अॅण्ड माय प्लेज’ या नव्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत याच धडपडीचा प्रवास मांडला आहे. यात त्यांच्या ‘व्हेअर डिड आय लीव्ह माय पर्दा’ आणि ‘बिग फॅट सिटी’ या दोन नाटय़संहिता संग्रहित आहेत.
स्वातंत्र्य चळवळीच्या आसपासच्या काळात अस्तित्वात असलेल्या नाटक कंपन्यांमधून काम करणाऱ्या धाडसी अभिनेत्री हा ‘व्हेअर डिड आय लीव्ह माय पर्दा’ या नाटकाच्या प्रेरणास्रोत आहेत. नाटकातील प्रमुख पात्र नाझिया साहिबा हीसुद्धा रंगमंच गाजवलेली, निष्णात नृत्यांगना, अभिनेत्री आहे. एके काळी स्वत:ची नाटक कंपनी चालवणाऱ्या नाझियाकडे आज ऐंशीच्या घरात पोहोचल्यावर चित्रपटांतून आजीच्या निर्थक भूमिका करण्याची वेळ आली आहे; पण ती चित्रपटाचे जग आपल्यासाठी खूप थोटके असल्याचे जाहीर करते आणि एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटातून बाहेर पडते. नव्या नाटकाची जुळवाजुळव सुरू करते. हे नाटक  तिच्याच कंपनीने सादर केलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतल’चे आधुनिक इंटरप्रीटेशन असते; पण या जुळवा- जुळवीदरम्यान आजवर पेटाऱ्यात बंद असलेले तिच्या भूतकाळाचे समंध बाहेर पडून तिला सतावू लागतात. नाझियाची भाची रुबी या नाटकासाठी प्रायोजक आणण्याचे आश्वासन देते. मात्र त्यासाठी मूळ नाटकात शाकुंतलची भूमिका नाझियाने नव्हे तर आपली आई झरीन हिने केली होती, नाझियाच्या मॉडर्न इंडियन थिएटर या कंपनीच्या स्थापनेतही तिचा महत्त्वाचा वाटा होता हे नाझियाने जाहीरपणे सांगावे, अशी तिची अट आहे. त्या काळातल्या जुन्या कपडेपटाचे प्रदर्शन भरविण्याचीही रुबीची इच्छा आहे, पण भूतकाळाला मूठमाती द्यायला सरसावलेली नाझिया मात्र कपडय़ांबरोबर सगळ्याच आठवणींची होळी करायला निघाली आहे. अखेर एका प्रसंगात रुबीच्या मुलीच्या रूपाने नाझियाने मनात दडवून ठेवलेले एक सत्य समोर येते आणि फाळणीच्या काळातील एक जखम भळभळ वाहू लागते. झरीन नेमकी कधी गेली, तिने शकुंतलेची भूमिका केली होती की नाही, रुबीकडे असलेल्या जुन्या पोस्टरमधली शकुंतला झरीन होती की नाझियाच, आपलीच मुलगी असलेल्या रुबीला स्वीकारण्यास नाझिया तयार का नाही, या प्रश्नांची उत्तरे अखेरीस धक्कादायक रहस्यभेदानंतर मिळतात. (पण फाळणीच्या पाश्र्वभूमीवरील गोष्टींमध्ये धक्कादायक शेवटांचाही एक साचा बनून गेला आहे आणि नाटकातला धक्का त्याहून वेगळा नाही.)
‘बिग फॅट सिटी’ या नाटकाचा विषय पूर्णपणे शहरी आधुनिक जगण्याशी संबंधित आहे. मुंबईत राहणाऱ्या उच्चभ्रू मध्यमवर्गाच्या ‘कपाटातले सांगाडे’ उघडय़ावर टांगण्याचे काम हे नाटक करते. भारतीय इंग्रजी नाटकांतील पहिली ब्लॅक कॉमेडी असे त्याचे वर्णन नाटकाच्या जाहिरातीत केलेले दिसते. मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीमधील एका इमारतीमधील वन बीएचके फ्लॅटमध्ये मुरली आणि निहारिका हे जोडपे राहतेय; पण रिसेशनमुळे मुरलीची मल्टिनॅशनल कंपनीमधली नोकरी सुटल्याने त्यांच्या घराचे हप्ते थकले आहेत. एका बँकेत सहसंचालक असलेल्या आपल्या कॉलेजमधल्या जुन्या मित्राची, शैलेशची फेसबुकवरून ओळख काढून त्याला सहज भेटीला बोलावल्यासारखे त्यांनी बोलावले आहे. प्रत्यक्षात त्याच्या बँकेत कर्ज ट्रान्स्फर करण्याचा त्यांचा इरादा आहे. हा मित्रही अडचणीत असून त्यालाही मुरलीकडून आपले काम काढायचे आहे. शैलेशला इम्प्रेस करण्यासाठी वरच्या मजल्यावर राहणारी सास-बहू मालिकांतील एके काळची स्टार लॉली आणि तिचा दारुडा नवरा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आपल्या मुलाच्या पार्टीची तजवीज करण्यासाठी लॉली निघून गेल्यानंतर, दारूच्या नशेत असलेल्या तिच्या नवऱ्याला मुरली व निहारिका बेडरूममध्ये झोपवतात, पण त्याच वेळी त्या घरात छुपी पेइंग गेस्ट म्हणून राहणारी होतकरू टीव्ही स्टार अनु आणि तिचा बॉयफ्रेंज पुनीत तिथे येतात. लॉलीच्या नवऱ्यावरून अनुवर संशय घेत पुनीत रागाच्या भरात त्याचा खून करतो. त्यातच लॉलीच्या मुलाच्या पार्टीवर पोलिसांची रेड पडून या गोंधळात अधिकच भर पडते. मग सुरू होते या खुनामधून आपापला स्वार्थ साधण्याची स्पर्धा. त्यातून प्रत्येक पात्राचं नतिक अध:पतन, स्वार्थ, लोभ, अगतिकता यांचे बटबटीत प्रदर्शन मांडले जाते. शेवटी मुरली शहरातून आपला गाशा गुंडाळून मूळ गावी जायला निघतो आणि शैलेशच्या रूपात लॉली ऊर्फ ललिताला नवा जीवनसाथी मिळतो. फार्सच्या धाटणीचा हा गडबड-गुंता असूनही तो प्रचंड हास्यकारक नाही की त्यातला ब्लॅक ह्य़ूमरही टोकाचा नाही. त्यातच अनुच्या भावाकडून या प्रेमी युगुलाची हत्या घडवून आणून ऑनर कििलगचा प्रश्नही जाता जाता मांडला गेलाय. हा सामाजिक संदर्भ नाटकाच्या विनोदी पठडीशी फटकून असल्यासारखा वाटतो.
‘व्हेअर डिड आय..’च्या निर्मात्या, दिग्दर्शक आणि नाझियाचे मध्यवर्ती पात्र साकारणाऱ्या लिलेट दुबे व ‘बिग फॅट सिटी’मध्ये लॉलीची भूमिका करणाऱ्या अचिंत कौर यांनी या नाटकांबद्दल छोटी मनोगते लिहिली आहेत. स्वत: दत्तानी यांनी प्रस्तावनेत आपल्या नाटय़ क्षेत्रातल्या प्रवासाचा धावता आढावा घेतला आहे, बेंगळुरू म्हणजे तेव्हाच्या बंगलोरमधील अल्पसंख्य गुजराती समाजात गेलेले लहानपण, क्वचित पाहिलेल्या आणि वडिलांकडून सतत कानावर पडलेल्या भांगवाडी रंगमंचाच्या आठवणी नॉस्टॅल्जिक सुरात ते मांडतात. रंगमंचाचे जबरदस्त आकर्षण असूनही कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत या क्षेत्राला दत्तानी यांनी दुरूनच बुजरेपणाने न्याहाळले. अखेर अभिव्यक्तीसाठी नाटक हेच आपले माध्यम असणार हे नक्की केल्यानंतर मात्र त्यासाठी आपल्याकडे पुरेशी भाषाच नसावी हे कुणी तरी वाचाच हिरावून घेतल्यासारखे वास्तव आपल्या लक्षात आल्याचे ते सांगतात. त्याच अगतिकतेवर उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात इथल्या समाजात वाढलेली, बहरलेली इंग्रजी वापरण्याचा आणि त्यातून याच समाजातले विषय मांडण्याचा पर्याय दत्तानी यांनी शोधला. त्यातून त्यांची नाटके प्रेक्षकाशी अधिक चांगला संवाद साधू शकली.
 इंग्रजी माध्यमातून शिक्षण होत असताना, मातृभाषा, त्यातले साहित्य, संवाद या सगळ्याशी संबंध सरळसरळ तोडून टाकल्याने ज्यांची प्रथम भाषा इंग्रजीच बनून गेली आहे असा वर्ग आपल्याकडे आता वाढत आहे. या वर्गाला दत्तानी यांचे म्हणणे अधिक चांगले समजेल. ज्येष्ठ रंगकर्मी अलेक पदमसी यांच्या म्हणण्यानुसार इथल्या इंग्रजी भाषिक भारतीय वर्गाला स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम दत्तानी यांच्या नाटकांनी केले आहे. त्याची थोडी झलक ‘मी अॅण्ड माय प्लेज’ वाचून मिळू शकेल.
मी अॅण्ड माय प्लेज : महेश दत्तानी,
पेंग्विन बुक्स, नवी दिल्ली,  
पाने : २४६, किंमत : २९९ रुपये.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Me and my plays bhartiya society in india