मेहदी हसन खान हे विश्वविख्यात पाकिस्तानी गझल गायक व सिनेपार्श्वगायक होते. गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये शहेनशाह ए गझल म्हणजेच ‘गझलेचा सम्राट अशी त्यांची ओळख आहे.१८ जुलै १९२७ रोजी जयपूर संस्थानातील लुना या गावी त्यांचा जन्म झाला. तर पाकिस्तानातील कराची येथे १३ जून २०१२ रोजी ते कालवश झाले. मेहदी हसन यांचे पठाण घराणे पिढीजात गायकीचे घराणे होते. जयपूर घराण्याची गायकी गाणारी त्यांची सोळावी पिढी होती. मेहदी हसन यांचे आजोबा इम्रानबक्ष हे त्या काळचे नामवंत गायक म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या गायकीच्या माध्यमातून नेपाळच्या क्षयग्रस्त महाराणीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले होते. तर मेहदी हसन यांचे काका उस्ताद इस्माईल खान न्यूमोनिया झालेल्या लहान मुलांसह स्वर -आलाप आळवून त्यांना रोगमुक्त करत असत असे सांगितले जाते. एका अर्थाने त्याकाळी ते म्युझिक थेरपीही करीत होते असे म्हणावे लागेल. मेहदी हसन यांचे वडील अझीमखानही गायक म्हणून सुप्रसिद्ध होते.

मेहदी हसन वयाच्या सहाव्या वर्षापासून काका व वडिलांकडे गाणे शिकू लागले. आपला मोठा भाऊ पंडित गुलाम कादिर यांच्यासह वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १९३५ साली त्यांनी पहिली गाण्याची मैफल केली. तर वयाच्या १८व्या वर्षाच त्यांनी ध्रुपद, दादरा, ठुमरी, ख्याल गायकीमध्ये अतिशय उत्तम प्राविण्य मिळवलेले होते. शास्त्रीय संगीत त्यांच्या रक्तातच भिनलेले होते. लहानपणापासून गायनासाठी लागणारी शिस्त, सातत्यपूर्ण दीर्घकाळ रियाज, योग्य आहार आणि उत्तम प्रशिक्षण हे बाळकडू त्यांना कुटुंबीयांकडून मिळाले. ज्याला चांगले गायक व्हायचे आहे त्याने व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती कमावली पाहिजे ही शिकवण त्यांच्या वडिलांनी, काकांनी त्यांना दिली. मेहदी हसन यांनी त्याचे पालन करून रियाजाबरोबरच शारीरिक मेहनतही भरपूर केली. त्यामुळे ते धाप न लागता सलग ५०-५२ तास गाऊ शकत असत.

भारताच्या फाळणीमध्ये २० वर्षाचे मेहदी हसन आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानला गेले. तेथे त्यांनी उदरनिर्वाहासाठी काही काळ सायकलच्या दुकानात काम केले. त्यानंतर काही काळ फर्ग्युसन कंपनीत ट्रॅक्टरचे मेकॅनिक म्हणून नोकरीही केली. मात्र नंतर त्यांनी पूर्णवेळ गायकीसाठीच वाहून घेतले. १९५२ पासून त्यांनी पाकिस्तान रेडिओवर गायला सुरुवात केली. तसेच गझल गायकीसह गाण्याचे इतर कार्यक्रम करायलाही सुरुवात केली. याच दरम्यान १९५६ पासून त्यांना चित्रपट क्षेत्रात पार्श्वगायनाची संधीही मिळाली. त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून भूमिका बजावली. त्यातील असंख्य गाणी लोकप्रिय झाली.

भुरळ पाडणाऱ्या आवाजाचे गझलगायक म्हणून त्यांचा लौकिक होता. तज्ञांच्या मते मेहदी हसन यांचा त्यांच्या मेहनतीबरोबरच बॅरिटोन पद्धतीचा आवाजही त्यांना रसिकप्रिय करून गेला. बॅरीटोन हा आवाजाचा एक प्रकार आहे. अतिशय हलके आणि अतिशय उंच स्वरही सहजपणे लावण्याची लवचिकता या आवाजात असते. त्या आवाजात एक प्रकारची चपळता आणि वजन असते. शास्त्रीय संगीतासह जगभरच्या विविध प्रकारच्या गायन शैलीत अशा प्रकारचा आवाज आढळतो. मेहदी हसन यांना ती जन्मजात देणगी होती आणि त्यांनी त्यावर प्रयत्नपूर्वक हुकूमत प्राप्त केली होती. सहज साध्य काहीही नसते. असाध्य परिश्रमच मोठे यश मिळवून देत असतात हे त्यांनी दाखवून दिले.

मेहदी हसन यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम केले. प्रामुख्याने फैज अहमद फैज, मीर तकी मीर, अझमत अशगत सलीम, गालिब, दाग देहलवी, मौलाना हसरत मोहानी, सलीम गीलानी सफी तब्सुम, बहादुर शहा जफर, मोमीन, शेवन रिझवी, तसलीम फाजली, अहमद फराज, जॉन एलिया, कतील शिफाई आदींच्या गझला कार्यक्रमात गायल्या आणि त्या कमालीच्या लोकप्रिय केल्या. त्यांच्या गझल गायकीने जगजीत सिंग यांच्यापासून विविध शैलीतील गायकांच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जगभरच्या गझल रसिकांचे कानही तयार व तृप्त केले.

गझल गायकी ही शब्द प्रधान गायकी आहे. शेरातील शब्द त्याच्या अर्थासहित रसिकांपर्यंत पोहोचवणे हे मोठ्या कौशल्याचे काम असते. मेहदी हसन यांनी आपल्या गझलगायकीत आलाप, तान, खर्ज यांचा सर्वोत्तम मिलाफ करत गझल रसिकांपर्यंत पोहोचवली.

रंजिश ही सही दिल को दुखाने के लिए आ, आ फिर से मुझे छोड कर जाने के लिए आ, आणि अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें ( अहमद फराज), ज़िन्दगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा ( कतील शिफाई), देख तो दिल के जा से उठा है, ये धुवासा कहा से उठता है (मिर तकी मीर ), दिल ए नादान तुझे हुआ क्या है, आख़िर इस दर्द की दावा क्या है ( मिर्झा गालिब), आज तक याद है वो प्यार का मंज़र मुझको, भूल सकता नहीं वो पहली मुलाक़ात कभी (शेवन रिझवी), बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी, जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो न थी (बहादूरशाह जफर), बेकरारी सी बेकरारी है, वस्ल है और फिराक तारी है, जो गुजारी न जा सकी हम से, हम ने वो जिंदगी गुजारी है ( जॉन एलिया), ग़ज़ब किया, तेरे वादे पे ऐतबार किया, तमाम रात क़यामत का इन्तज़ार किया ( दाग देहलवी) अशा अनेक गझला आपल्या आवाजातून मेहदी हसन साहेबांनी करोडो लोकांपर्यंत पोहोचवल्या. उस्ताद मेहदी हसन यांना पाकिस्तान, भारत आणि नेपाळच्या सरकारांसह अनेक संस्थांनी अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारत पाकिस्तान यांच्यात सांस्कृतिक करार झालेला नव्हता. त्यामुळे मेहदी हसन यांचे गायनाचे कार्यक्रम भारतात होऊ शकले नव्हते. ते कार्यक्रम कसे सुरु झाले याबाबत ज्येष्ठ कवी गंगाधर महांबरे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी कायद्याच्या कलम ३१ अन्वये व्यापार उद्योगासाठी पाकिस्तानी नागरिक इस्रायल खेरीज कोणत्याही देशाला (भारतासह) भेट देऊ शकतो. याचा फायदा घेऊन मेहदी हसन १९७८ मध्ये भारतात आले. त्या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे व जयपूर येथे गझल गायनाचे कार्यक्रम केले. आपल्या कार्यक्रमात मेहदी हसन रंजीश ही सही (यमन ), बात करनी मुझे मुश्किल (पहाडी), दिल मे अब यु (बागेश्री ), जो चाहते है ( नटक भैरव ), आये कुछ अब्र ( बिलावल), नावक अंदाज जिधर (झिंझोटी ), आगे बढे न किस्सा ( खमाज), कैसे छुपाऊ राज ( मिश्र मालकंस – पिलु ) पत्ता पत्ता बुटा बुटा ( शिवरंजनी )तसेच ठुमरीच्या अंगाने गायलेली ‘अबके हम बिछडे’ या गझला प्रधान्याने म्हणत असत. भारतातील अनेकांवर या गझलचा प्रभाव पडल्याने गुलाम अलीपूर्व अशा गायक – गायिकांच्या गझल गायनात या रचनांचा समावेश हमखास झालेला दिसून येतो.’

भारतरत्न लता मंगेशकर आणि मेहदी हसन यांना एकमेकांबद्दल कमालीचा आदर होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘मेहदी हसन यांना ऐकताना परमेश्वरच त्यांच्या मुखातून जातो आहे असं मला वाटायचं.’ मेहदी हसन यांचीही लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्याची तीव्र इच्छा होती. अखेर २०१० साली त्यांनी पाकिस्तानमध्ये स्वतः चाल लावलेल्या गझलेचा आपल्या आवाजाचा भाग रेकॉर्डिंग करून लतादीदींना पाठवला. लतादीदींनी त्या ट्रॅकवर आपलं रेकॉर्डिंग केलं. २०११ साली साली ती गझल ‘सरहदे’ या अल्बममधून प्रकाशित झाली. हे रेकॉर्डिंग केलं त्यावेळी मेहदी हसन साहेब ८२ वर्षाचे आणि लता मंगेशकर ८० वर्षाच्या होत्या. ‘तेरा मिलना बहुत अच्छा लगे है, मुझे तू मेरे दुख जैसा लगे है ! ये तेरा अल्मस है के जिंदगी है, तुझे छू लु तो दिल जिंदा लगे है !!’ अशी ही गझल फरहत शहजाद यांची होती. हे उदाहरण म्हणजे एकमेकांच्या आवाजाबद्दलचा कमालीचा आदर एकत्रित व्यक्त करणे होते यात शंका नाही.

मेहदी हसन यांच्या मुलांनी पोलीस, महसूल आदी खात्यात मोठ्या हुद्द्यांवर काम केले. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायन, तबलावादन, गझल गायकी, पॉप संगीत अशा क्षेत्रातही नावलौकिक मिळवला. आणि आपल्या घराण्याची गायकी १७ व्या पिढीतही जोपासली. १९९० नंतर मेहदी हसन फुफुसाच्या आणि किडनीच्या आजाराने त्रस्त झाले. त्यांनी पाकिस्तानसह अनेक ठिकाणी उपचार घेतले. या आजारावरील आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी २००५ मध्ये ते भारतात आले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, दिलीप कुमार अशा अनेक मान्यवरांनी त्यांचे अतिशय आदराने स्वागत केले. उपचार घेतल्यानंतर ते पाकिस्तानला परत गेले. कालांतराने त्यांना पक्षघाताचा मोठा झटका आला. जुना आजारही पुन्हा बळावला. अखेर कराची मधील आगाखान युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये मेहदी हसन कालवश झाले.

हा गझल गायकीचा शहेनशहा आपला बॅरिटोन आवाज असंख्य रचनांमधून जगभरातील रसिकांसाठी, आपल्यासाठी ठेवून गेला. त्यांच्या जन्मशताब्दी प्रारंभदिनी त्यांना विनम्र अभिवादन…!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते असून प्रबोधिनीच्या वतीने गेली ३७ वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
prasad.kulkarni65@gmail.com