खरे तर सेना-भाजप युतीबाबत त्याच पक्षांच्या नेत्यांतच गोंधळ आहे. सध्या तर परिस्थिती अशी की हे पक्ष परस्परांचे समर्थक आहेत की विरोधक हा प्रश्न पडावा. तेव्हा विरोधी पक्षीयांच्या आघाडीत कोण आले वा कोण गेले यास काहीच अर्थ नाही….
महाराष्ट्रातील विरोधी पक्षीय म्हणवून घेणाऱ्यांची कार्यक्रम पत्रिका पाहिल्यास कोणालाही मराठी माणसाची कीव आल्याशिवाय राहणार नाही. राज्य दुष्काळाच्या खाईत आहे, आर्थिक विपन्नावस्था तीव्र आहे, औद्योगिक विकास खुरटलेला आहे आणि अशा वेळी समर्थ पर्याय म्हणून उभे राहण्याऐवजी हे विरोधी पक्षीय तीन मुद्दय़ांतच अडकले आहेत. शिवसेना, भाजप आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्या या तीन पायांच्या तिरपागडय़ा शर्यतीत मनसेचा चवथा टेकू घ्यावा की न घ्यावा, मुंबईतील अश्वशर्यतीच्या मैदानांवर घोडय़ांनीच धावावे की अन्य कोणी आणि वस्त्रप्रावरणांच्या दुकानांसमोर महिलांच्या प्लॅस्टिकच्या पूर्ण वा अर्धाकृती बाहुल्या पाहून चाळवणारी पुरुषांची मने थाऱ्यावर कशी ठेवावीत, हे ते तीन प्रश्न. या तीन प्रश्नांखेरीज विरोधी पक्षीयांसमोर काहीही कार्यक्रम नाही. सध्या राज्यात विरोधी पक्ष ही तीन पायांची शर्यत आहे आणि अशा तीन पायांच्या शर्यतींचा अनुभव असा की एकतर ती कधीच वेळेत पूर्ण होत नाही. जेव्हा केव्हा पूर्ण होते तोपर्यंत स्पर्धकांचे गुडघे फुटलेले असतात. म्हणजे वेळही गेलेला असतो आणि वर गुडघेही फुटतात. सेना-भाजप-रिपाइं यांचे हे असे सुरू आहे. पुन्हा त्यातही दखल घ्यावी असे काही उपमुद्दे आहेत. एक म्हणजे हे तीन पक्षीय एका पायाने पंगू आहेत आणि तिघांनीही स्पर्धेसाठी नेमका हाच पाय पुढे केला आहे. भाजपच्या पायाला नितीन गडकरी की गोपीनाथ मुंडे हा प्रश्न पडलाय आणि तो सुटल्यावर या पायाची बोटे किती असतील हेही त्याला कळेनासे झाले आहे. या बोटांच्या स्पर्धेत विनोद तावडे यांनी आपले अंगभूत चातुर्य वापरून अंगठय़ाच्या जागेसाठी आधीच आपली मोर्चेबांधणी केली असून अन्य रिकाम्या जागांसाठी आशीष शेलार की किरीट सोमय्या की अतुल शहा की आणखी कोणी अशी लढाई सुरू आहे. तेव्हा त्या पायाचे काही खरे नाही आणि त्यामुळे तो स्थिरच उभा राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दुसरा भिडू असलेल्या शिवसेनेच्या पायाला अलीकडे चार पावले टाकली की धाप लागते. खेरीज पेव्हर ब्लॉकमुळे असमान झालेल्या रस्त्यांवरून आपल्याला सरळ चालता येईल की नाही याचा आत्मविश्वासही या पायाने गमावलेला आहे. याउप्पर या पायाची दुसरी समस्या ही की तो सतत दादरच्या कृष्णकुंजातून कोणते पाऊल टाकले जाणार आहे याचाच विचार करीत बसतो. त्यामुळे त्याला स्वत:ची गती नाही. या दोघांव्यतिरिक्त असलेला तिसरा पाय म्हणजे रामदास आठवले यांच्या रिपाइंचा. या पायाची आतापर्यंतची पावले बरीच वाकडीतिकडी पडलेली असल्याने नक्की कोणत्या दिशेने जावयाचे आहे हेच या पायास ठाऊक नाही. त्याच वेळी सत्तास्पर्धेत शिवसेना-भाजपची साथ द्यावयाची की काँग्रेस-राष्ट्रवादीची याही बाबत या पायाचा संभ्रम मिटलेला नाही. त्यामुळे तीन पायांच्या स्पर्धेत हा पाय जरी उतरला असला तरी आपण धावावे की नाही याचाच अंदाज त्या पायास नाही.
    तेव्हा या पाश्र्वभूमीवर या तीन पायांच्या शर्यतीसाठी मनसेचा चौथा टेकू घ्यावा की न घ्यावा या मुद्दय़ावर हे तिघे पक्ष मधेच लंगडी लंगडी खेळतात. त्याचाच भाग म्हणून भाजपचे नवे तडफदार राज्यप्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. एरवी तसेही सेना वा भाजपतील नाराज बऱ्याचदा राज ठाकरे यांच्या खांद्यावर डोके ठेवून आसु गाळून येत असतात. मग त्या पूनम महाजन राव असोत वा सेनेचे एकनाथ शिंदे वा अन्य कोणी. परंतु फडणवीस हे काही अशा नाराजांतील नाहीत. त्यामुळे नव्या दमाच्या अध्यक्षीय फडणवीसांनी भेट घेतल्याने राज ठाकरे यांचा खांदा ओला झाला असण्याची शक्यता नाही. परंतु या भेटीमुळे पुन्हा एकदा युतीमध्ये मनसेस समाविष्ट करावे की नाही याबाबत ऊहापोह सुरू झाला आहे. या संदर्भातील ताजी चर्चा खरे तर रामदास आठवले यांनी छेडली. राज ठाकरे यांना युतीत घेण्यास त्यांचा विरोध होता. परंतु ती टोपी फिरवून त्यांनी युतीत राज ठाकरे यांनी यावे असा प्रस्ताव दिला. त्यावर भलत्याच तडाख्याचा सामना करावा लागल्याने त्यांनी लगेचच ही भूमिकादेखील बदलली आणि राज ठाकरे यांची गरज नाही, असे विधान केले. या कोलांटउडय़ांमुळे रामदास आठवले यांचा प्रवास राज्याच्या राजकारणात विदूषक म्हणवून घेण्याकडे सुरू आहे की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. या युतीत मुळात रामदास आठवले यांचे स्थान शून्याच्या जवळ जाणारे आहे. उद्धव ठाकरेसुद्धा त्यांना भीक घालत नाहीत, हे वास्तव आहे. आपणास लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या किमान ३५ जागा हव्यात या त्यांच्या मागणीकडे सेना-भाजपच्या नेत्यांनी ढुंकूनसुद्धा पाहिलेले नाही. तेव्हा आठवले यांनी खरे तर मनसेस निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. आपणास बसावयास जागा असली तर ती इतरांस देण्याचा विचार करता येतो. परंतु स्वत:लाच जागा नाही आणि इतरांना या-या म्हणण्यात काय हशील? आठवले यांना हे कळले नाही. त्यामुळे त्यांच्यावर खजिल होण्याची वेळ आली. खरे तर सेना-भाजप युतीबाबत त्याच पक्षांच्या नेत्यांतच गोंधळ आहे. सध्या तर परिस्थिती अशी की हे पक्ष परस्परांचे समर्थक आहेत की विरोधक हा प्रश्न पडावा. गोपीनाथ मुंडे यांना नितीन गडकरी नकोत. या दोघांना उद्धव ठाकरे नकोत. उद्धव ठाकरे यांना सत्ता मिळणार असेल तर तोपर्यंत सगळेच हवेत आणि नंतर सगळेच नकोत. खेरीज या तिघांना मिळून देवेंद्र फडणवीस नकोत. तेव्हा या विरोधी पक्षांची अवस्था चितळे यांच्या मिठाईच्या दुकानाप्रमाणे झाली आहे. काय आहे यापेक्षा काय नाही याचीच यादी मोठी. त्यात शिवसेनेस मधे मधे महालक्ष्मी येथे अश्वशर्यतीत धावणाऱ्या घोडय़ांची दया येते. राज्यसभा वा तत्सम निवडणुकांतील घोडेबाजाराचा अंतर्गत अनुभव गाठीशी असल्याने सेनेचे हे अश्वप्रेम उफाळून आले असावे. त्यामुळे त्यांनी अश्वशर्यतीच्या मैदानाच्या जागी उद्यान करावे अशी मागणी केली. मुंबईवर शिवसेनेची वीसहून अधिक वर्षे सत्ता आहे. या काळात मुंबापुरीतील होती ती उद्याने बहरली असे झालेले नाही की अनेक नवी उद्याने तयार झाली असेही घडलेले नाही. तेव्हा सेनेने या ताज्या उद्यानप्रेमामुळे सगळय़ांनाच अचंबित केले. कदाचित अश्वशर्यतींशी संबंधित धनाढय़ांच्या मातोश्रीवारीनंतर हे प्रेम कमी होईलदेखील. तीच बाब कपडय़ांच्या दुकानांसमोरील प्लॅस्टिकच्या स्त्री-प्रतिमांचीही. पुरुषांचे चारित्र्य कचकडय़ाचे असल्याने ते कशानेही भंग होऊ शकते या भीतीमुळे बहुधा सेनेने या बाहुल्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. खरे तर अशी मागणी करून आपण अजूनही बालबुद्धीच कसे आहोत, याचा पुरावा सेनेने दिला.
    या अशा मंडळींकडून प्रगल्भ आणि प्रौढ राजकारणाची अपेक्षा करणे तूर्त व्यर्थ आहे. तेव्हा विरोधी पक्षीयांच्या आघाडीत कोण आले वा कोण गेले यास काहीच अर्थ नाही. सध्याचे यांचे वागणे पाहता अशा प्रयत्नांचे वर्णन उघडय़ाकडे नागडे गेले आणि दोघेही कुडकुडून मेले असेच करावे लागेल.