समस्या स्थलांतरितांच्या

अमेरिका हा स्थलांतरितांचा खंड आहे. युरोपातील जुलमी राज्यसत्ता वा धर्मसत्तेपासून पळ काढणाऱ्यांनी मूळ रहिवाशांच्या विरोधात लढाया करून त्यांना नामशेष करत हा खंड वसवला आहे.

अमेरिका हा स्थलांतरितांचा खंड आहे. युरोपातील जुलमी राज्यसत्ता वा धर्मसत्तेपासून पळ काढणाऱ्यांनी मूळ रहिवाशांच्या विरोधात लढाया करून त्यांना  नामशेष करत हा खंड वसवला आहे. हे सगळे युरोपीय वंशाचे गोऱ्या वर्णाचे होते. त्यापैकी संयुक्त संघराज्याने ब्रिटिश राज्यसत्तेशी लढून अठराव्या शतकात स्वतंत्र राज्य स्थापन केले. तेव्हा प्रथमच या देशाने स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वांचा उद्घोष केला. त्याचा अमेरिकन माणसाला अभिमान आहे. परंतु तत्त्व व वागणूक यातील विसंगतीही अमेरिकेने  वारंवार दाखवून दिली आहे.
गरिबी, राजकीय वा धार्मिक छळणुकीला कंटाळून आलेल्या युरोपातील गोऱ्या व ज्यू स्थलांतरितांना जेवढय़ा मोकळेपणाने सामावून घेण्यात आले, तसे फिलिपिनो, चिनी वा भारतीयांना आले नाही. आफ्रिकेतील काळ्या वर्णाच्या लोकांना तर जनावरांप्रमाणे पकडून आणून अतिशय अमानुषपणे वागवले गेले. हा इतिहास जेब बुश व क्लिंट बोलीक यांच्या ‘इमिग्रेशन वॉर्स’ या पुस्तकात आहे. यात वैशिष्टय़ हे आहे की इथल्या विसंगतीवर, इथल्या त्रुटींवर वा राजकीय व्यवस्थेवर अमेरिकन विचारवंत टीका करतात. आणि त्यावर विचार करून हा समाज आपल्यात बदल घडवून आणतोही. उदा. वर्णभेद नष्ट करण्यासाठी यादवी युद्धही झाले. ५० वर्षांपूर्वी मार्टिन ल्यूथर किंग यांनी चळवळ उभी केली. या दोन्ही प्रसंगी गोरे व काळे सहकार्याने लढले. त्याच परंपरेला अनुसरून जेब  व क्लिंट  यांचे हे पुस्तक आहे. यापैकी जेब हे जॉर्ज बुश दुसरे यांचे चिरंजीव. वडिलांची राजकीय परंपरा चालवतानाही, त्यांचे स्वत:चे या प्रश्नावर ठाम विचार आहेत. पक्षाच्या मर्यादा ओलांडण्याची त्यांची तयारी आहे. तर क्लिंट पोलीश असावेत असे वाटते.
बुश व बोलीक यांच्या मते अमेरिकेला जगातील सर्वात जास्त सामथ्र्यवान राष्ट्र बनवण्यामागे स्थलांतरितांचे कष्ट व त्यांची धडपड कारणीभूत आहे. आजही अमेरिकेचे जगातील पहिले स्थान टिकवायचे असेल तर स्थलांतरितांबाबतची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. सुस्पष्ट धोरण व त्याची कठोर अंमलबजावणी हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. ते म्हणतात, ‘स्थलांतरितांचा प्रश्नच नसणारा दिवस उगवेल या विचाराने खरे तर आपला थरकाप उडावा. कारण याचा अर्थ कुणालाच अमेरिकेला यायचे नाही.’
९/११ झाल्यानंतर स्थलांतरितांचा प्रश्न, अंतर्गत सुरक्षा समितीकडे सोपवला गेला. लेखकांच्या मते हा प्रश्न या घटनेनंतर ताबडतोब त्यांच्याकडे सोपवले जाणे साहजिक असले तरी, आजही हा विभाग त्यांनीच सांभाळणे चुकीचे आहे. दहशतवाद्यांना शोधण्याचे त्यांचे काम सोडून त्यांना या प्रश्नात लक्ष घालावे लागत आहे. बराक ओबामांच्या पहिल्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी इमिग्रेशन कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्ष बहुसंख्येने असूनही या सुधारणा झाल्या नाहीत असे लेखक म्हणतात. अर्थात या विषयावर अमेरिकन जनतेत विभिन्न मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, भिन्न संस्कृतीतून आलेल्या लोकांमुळे गुन्हेगारी फैलावते. त्याच वेळी इटालियन माफियांनी केलेल्या कारवाया अथवा दारूबंदीच्या काळात जॉर्ज केनेडी (सिनीअर) यांनी कमावलेल्या पैशांचा त्यांना विसर पडतो. तर काहींची तक्रार असते की अमेरिकनांपेक्षा कमी पैशात काम करून हे स्थानिक लोकांना बेकारीच्या खाईत ढकलतात. लेखक म्हणतात की हे खरे नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की अमेरिकन लोकांना नको असणारी कष्टाची कामे हे अप्रशिक्षित कामगार करतात. उदा. सध्याच्या बेकारीच्या काळातही अमेरिकेच्या शेती उद्योगाला कामगारांची गरज आहे, परंतु जास्त पगार व सवलती देऊनही, देशी अमेरिकन शेतावर मजुरी करायाला तयार होत नाहीत. त्यातील काही स्थलांतरितांच्या बाजूने असतात. कारण त्यांना स्वस्तात व कमी दराने मजूर मिळतात.
लेखकांच्या मते इमिग्रेशनला उत्तेजन देण्याचे आणखी एक सबळ कारण म्हणजे अमेरिकन समाजात झपाटय़ाने कमी होणारी मुलांची संख्या. स्त्रियांचे शिक्षण व त्यांचे काम करण्याचे प्रमाणे वाढत असल्याने, मुलांचे प्रमाण कमी-कमीच होत जाणार आहे. याचाच अर्थ आज अमेरिकन समाजात निवृत्त व वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे व काम करण्यायोग्य वयाच्या तरुणाईची संख्या कमी होत आहे. काम करणाऱ्यांच्या कमाईतूनच सोशल सिक्युरिटी, मेडिकेअर इत्यादींसाठी फंड जमा होतो. या फंडावर जगणाऱ्यांची संख्या वाढत असताना, त्यात जमा होणारे पैसे कमी होत आहेत. हे वाढणे जर आवश्यक असेल तर काम करण्यायोग्य वयाच्या स्थलांतरितांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे असे लेखकांना वाटते. ते पुढे म्हणतात की संयुक्त संघातील नोबल पारितोषक विजेत्यांपैकी एकतृतीयांश लोकांचा जन्म परदेशात झाला आहे व हे प्रमाण १९९० ते २००१ मध्ये निम्म्यावर आले आहे. सिलीकॉन व्हॅलीतील अध्र्या कंपन्या स्थलांतरितांनी सुरू केल्या आहेत. उदा. गुगल, इंटेल, ई-बे इत्यादी. २००० साली पीएच.डी. झालेल्या इंजिनीअर्सपैकी निम्मे परदेशात जन्मलेले होते. बुश व बोलीक यावर एक उपाय सुचवतात. तो म्हणजे एका निश्चित भूमिकेतून स्थलांतरितांचे प्रमाण वाढवणे. आज अमेरिकन सरकारची भूमिका ही कुटुंबाला एकत्र आणण्याची आहे. म्हणचे अमेरिकन नागरिक आपली पत्नी, अविवाहित मुले, आई-वडील व इतर नातेवाईकांना अमेरिकेत कायमचे राह्यला बोलावून घेऊ शकतो. त्यांना इमिग्रेशनमध्ये प्राधान्य आहे. या भूमिकेवर लेखकांचा आक्षेप आहे. त्यांच्या मते या भूमिकेमागील हेतू कितीही स्तुत्य असला, तरी व्यवहारात अनेकदा अनुत्पादक लोकांची संख्या जास्त वाढवून देशाचे नुकसानच होते.
हे पुस्तक अमेरिकेचा स्वार्थ लक्षात ठेवून लिहिलेले आहे. कारण अमेरिकेचे आर्थिक प्रश्न सोडवून त्यांना त्यांची लाइफ-स्टाइल तशीच कायम ठेवायची आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुक – वर्म बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Migration problem

ताज्या बातम्या