राजकीय मतभिन्नता शत्रू अथवा मित्र या अंगानेच पाहिली जाण्याची सामुदायिक गल्लत मोदी-पवार भेटीच्या निमित्ताने पुन्हा होताना दिसते. वस्तुत: समाजातील अनेक घटकांशी सातत्याने संवाद साधण्याची प्रगल्भता राजकीय व्यक्तीकडे असणे जितके गरजेचे आहे तितकेच अशा संवाद-भेटी घडत असताना आपल्या राजकीय प्राधान्यक्रमांबाबत गफलत होऊ न देणे हेदेखील गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष बारामतीत जाऊन शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावल्यामुळे अनेकांत सोवळे मोडल्याची भावना आहे. ही भेट व्हायच्या आधी आणि नंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातील बहुसंख्य या मोदी यांनी काही अब्रह्मण्यम् कृत्य केले असे वाटावे अशा होत्या. बारामती येथील कृषी संस्थेचे कार्य पाहण्यासाठी पवार यांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. या आधी पवार यांनी गुजरातेतील आणंद येथील दुग्धव्यवसायातील प्रयोगांची पाहणी करण्यासाठी गुजरातला भेटी दिल्या होत्या. त्याची परतफेड करण्याची संधी मोदी यांना निमंत्रण देऊन पवार यांनी साधली. महाराष्ट्रात अत्यंत कडवेपणाने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांची ही बारामती भेट होत असल्यामुळे तीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटली. या निवडणुकांत भाजपचे प्रमुख लक्ष्य शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस होती. महाराष्ट्र सरकारात त्या पक्षाचे नेतृत्व करणारे अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांनी केलेला कथित भ्रष्टाचार हा या निवडणुकीचा केंद्रिबदू होता. आपण सत्तेवर आल्यास हा भ्रष्टाचार खणून काढू हे भाजपचे वचन होते आणि त्या वचनाच्या आधारेच त्यांना सत्तासोपान चढता आला. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरणनिर्मिती करणारे अग्रणी नरेंद्र मोदी हेच राष्ट्रवादीच्या मठीत पाहुणचार झोडणार असतील तर त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडणे साहजिकच. या अशा प्रतिक्रिया म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा अर्थ लावण्यात होत असलेली सामुदायिक गल्लत. राजकारणातील स्पर्धकास प्रत्यक्ष जीवनात शत्रू मानण्याचा प्रघात अलीकडे मोठय़ा प्रमाणात रुजताना दिसतो. पवार-मोदी भेटीच्या निमित्ताने व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया या प्रथेच्या निदर्शक आहेत.
राजकारण हे मुद्दय़ांभोवती फिरावयास हवे, व्यक्तींभोवती नव्हे. आपल्याकडे हल्ली असे होत नाही. व्यक्ती हाच मुद्दा असतो. मग ते काँग्रेसचे राहुल गांधी असोत वा भाजपचे नरेंद्र मोदी वा ममता वा जयललिता. यातील विरोधाभास हा की राजकारण राहणार व्यक्तिकेंद्रित पण राजकारण पद्धती मात्र कागदोपत्री का असेना पक्षकेंद्रित. प्रत्यक्षात परस्परांच्या विरोधात लढतात ते पक्ष. परंतु राजकारणाचे केंद्रस्थान हे व्यक्ती असल्यामुळे चित्र तयार होते ते दोन, तीन वा अधिक व्यक्तींमधील संघर्षांचे. परिणामी राजकीय पक्षांना विरोध म्हणजे व्यक्तींना विरोध असे सर्वसामान्यांना वाटू लागते. बरे, याच्या जोडीस या सर्वास भावनेची किनार. त्यामुळे वातावरणनिर्मिती होते ती नायक आणि खलनायक या धर्तीवर. मुळातच राजकारण आणि लोकशाही प्रक्रिया आपल्या समाजात पूर्णपणे रुजलेली नसल्यामुळे भावनेच्या भरात राजकीय प्रतिस्पर्धी हा शत्रू मानला जातो. त्यात निवडणुकांत महत्त्व येते ते भावनिक मुद्दय़ांनाच. अर्थ, ऊर्जा आदी गंभीर विषयदेखील प्रक्षोभक अंगानेच समोर मांडले जातात. त्याचा परिणाम असा की ही राजकीय मतभिन्नता शत्रू अथवा मित्र या अंगानेच पाहिली जाते. पवार यांच्या भेटीस मोदी गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया याचेच दर्शन घडवतात. कालौघात समाज प्रगल्भ होण्याऐवजी अधिकाधिक शालेय होत चालल्याचा हा परिणाम असून हा बदल खचितच कौतुकास्पद नाही. याचे कारण येथील राजकारण स्पध्रेस एक प्रगल्भ आणि प्रौढ किनार आहे.
ती अगदी महाभारत कालातदेखील सापडते. कौरव आणि पांडव यांच्यात कमालीचा तणाव, शत्रुत्व होते तरीही युधिष्ठिराने वयम् पंचाधिकम् शतम, असे उद्गार काढले हा, या भूमीचा जय नावाचा इतिहास आहे. रणभूमीवर आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी उभे ठाकलो असलो तरी प्रत्यक्षात आम्ही पाच अधिक शंभर असेच आहोत, असा त्याचा उदात्त अर्थ. या महाराष्ट्रातील राजकारण्यांना ज्याच्या नावाने राज्य करावयास आवडते ते छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील त्यांच्या राजकीय औदार्यासाठी ओळखले जातात. स्वराज्याच्या मुळावर आलेला असला तरी औरंगजेबाविषयी शिवाजी महाराजांना नितांत आदर होता. किंबहुना औरंगजेब अलीकडे अनेकांना वाटतो तितका खुजा असता तर शिवाजी महाराजांची उंची कळती ना. आपल्या राष्ट्रीय राजकारणातील या राजकीय औदार्याचे अनेक मासले सांगता येतील. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे मतभेद तीव्र होते. परंतु तरीही आपल्यातील राजकीय विरोधाचे रूपांतर एकमेकांविषयीच्या अनादरात होणार नाही, याची काळजी उभयतांना होती. पंडित नेहरू आणि राम मनोहर लोहिया यांनी संसदेत एकमेकांचे काढलेले वाभाडे सर्वश्रुत आहेत. पण म्हणून या उभयतांत खासगीत संवाद नव्हता असे नाही. सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू किंवा महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषबाबू बोस यांच्यातील राजकीय मतभिन्नता परस्परांमधील संवाद संहारक नव्हती. अगदी अलीकडचे उदाहरण द्यावयाचे तर भाजपचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान लाभलेले अटलबिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षीयांशी उत्तम संबंध राखण्यासाठी ओळखले जात. नसíगक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रमुखपदी वाजपेयी यांनीच शरद पवार यांची नेमणूक केली होती आणि अणुऊर्जेच्या मुद्दय़ावर अमेरिकेस हाताळण्यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हरकिशनसिंग सुरजित यांची मदत घेण्यात त्यांना कमीपणा वाटला नव्हता. अर्थात, मोदी आणि पवार यांच्या भेटीत तितके उदात्त काही नसले तरी त्या दोघांची भेट झाली म्हणून इतका गहजब करण्याचे काही कारण नाही. तेव्हा राजकीय प्रतिस्पर्धक म्हणजे कडवा शत्रू असे मानण्याचा प्रघात हा अलीकडचा. गेल्या दशकातला. ही भारतीय राजकारणास तामिळनाडूने दिलेली देणगी. त्या राज्यात द्रमुक सत्तेवर आला की अण्णा द्रमुकच्या जिवावर उठतो आणि अण्णा द्रमुक सत्तेवर आला की द्रमुकचा गळा आवळतो. तेव्हा या द्राविडी प्राणायामाचे अनुकरण अन्यत्र करण्याचे कारण नाही.
मोदी आणि पवार भेटीच्या निमित्ताने अजित पवार यांनीदेखील हा धडा घेण्यास हरकत नाही. ही भेट बारामती येथे झाली. त्या वेळी अर्थातच अजित पवार हजर होते. अन्य प्रांतीयांकडून काही शिकण्यासाठी ते कोठे जात नाहीत. तेव्हा बारामतीतील हा घरचा धडा त्यांना आपसूकच मिळाला असेल असे मानण्यास हरकत नाही. राजकारणातील मतभिन्नता म्हणजे वैर ही प्रथा महाराष्ट्रात पडण्याचा काळ आणि अजित पवार आदी मंडळींचे राजकारण सुरू होण्याचा काळ हा एकच आहे. हा योगायोग नाही. राजकारण करू पाहणाऱ्यांचा समाजातील विविध घटकांशी संवाद असावयास हवा, उद्योगपती ते कलाकार अशा अनेकांकडून त्याने काही घेत राहावे आणि स्वत:स कंत्राटदारांच्या परिघापुरते मर्यादित ठेवू नये ही महाराष्ट्राची परंपरा. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील ते शरद पवार व्हाया विलासराव देशमुख, सुशीलकुमार िशदे अशा अनेकांनी पाळली. पुढील काळात दुर्दैवाने तिचा लोप होताना दिसतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचे स्वप्न पाहणारे अजितदादा यांना यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तसेच ते आहे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील. आपल्या पक्षाचा पंतप्रधान आपल्या प्रमुख विरोधी पक्षप्रमुखाचा पाहुणचार घेत असला तरी त्या पक्षाच्या नेत्यांविरोधात हाती घेतलेली चौकशी पातळ करण्याचे आपल्याला काही एक कारण नाही, हे फडणवीस यांना उमगले असेलच. पवार यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करणे हे मोदी यांचे राजकारण झाले आणि त्यांनी ते स्वीकारले तरीही आपले चौकशीचे काम न सोडणे हे फडणवीस यांचे राजकारण झाले. ते उभयतांनी प्राधान्यांनी करावे आणि तरीही एकमेकांना शत्रू मानू नये.
हे वरकरणी विरोधाभासी वाटले तरी असा विरोधाभास पेलता येणे हेच प्रौढ राजकारणाचे लक्षण आहे. या महाराष्ट्रास बेरजेच्या राजकारणाची प्रगल्भ परंपरा आहे. राजकीय मतभेदांमुळे या बेरजेच्या राजकारणाची वजाबाकी होणार नाही, याची दखल राजकारण्यांच्या या पिढीस घ्यावी लागेल.