पराभवाच्या दोषाचे वळ स्वत:च्याच पाठीवर उमटवून घेऊन गांधी घराण्याची शान अबाधित राखण्यात काँग्रेसच्या दिल्ली- बैठकीतील सहभागी मंडळी मश्गूल असताना, महाराष्ट्रात नैतिकतेचा महापूर आला आहे.. राजीनामे देऊन मंत्रिमंडळाबाहेर पडलेले नीतिमान आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे तर महानीतिमान! तेव्हा चव्हाणांनी मागणे मान्य करावे आणि श्रेष्ठींना स्मितहास्यात आणखी रंगू द्यावे..

आपले काहीच चुकत नाही अशा भ्रमात राहणाऱ्यास अचानक आपले सगळेच चुकले असे ध्यानात आल्यावर जसे वाटेल तशी सध्या काँग्रेसजनांची भावना झालेली असेल. परंतु प्रश्न चुकणे वा बरोबर असण्याचा नाही. कोणाही मर्त्य आणि स्खलनशील मानवास आयुष्यात कधी ना कधी आपल्या चुकांची कबुली द्यायची वेळ येतच असते. राजकीय पक्ष हा मानवांचा असतो आणि ते सर्व मर्त्य आणि स्खलनशील असतात. तेव्हा काँग्रेसजनांच्या मनी या क्षणी चुकांचे कढ दाटून येत असतील तर ते तसे नैसर्गिकच म्हणावयास हवे. या निवडणुकांत काँग्रेसला दारुणतम पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश या एकाच राज्यात भारतीय जनता पक्षाला जेवढय़ा जागा मिळाल्या त्यांची संख्या काँग्रेसच्या देशभरातील एकूण विजयी उमेदवारांच्या दीडपट आहे. जेव्हा इतका मोठा पराभव होतो तेव्हा त्यात दोन्ही घटकांचा वाटा असतो. प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारे आणि युद्धाचे डावपेच आखणारे. तेव्हा त्या अर्थाने या निवडणुकांत काँग्रेसचे युद्धनेतृत्व ज्यांच्याकडे होते ते गांधी मायलेक आणि त्या नेतृत्वाच्या तालावर प्रत्यक्ष मतसंगरात भाग घेणारे दोषी म्हणावयास पात्र ठरतात. परंतु काँग्रेसजनांना हे मान्य नाही. त्यांच्या मते काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्यातीलच कोणाकडे असावे असाच त्या पक्षाचा नियतीशी करार झालेला आहे आणि एकदा का असा करार झाल्याचे मान्य केले की त्यात चूकभूल शोधता येत नाही. म्हणजे एखादा जन्माला येतानाच उंच वा बुटका, काळा वा गोरा अशी रचना घेऊन जन्माला येतो आणि त्याबद्दल जसे कोणासही बोल लावता येत नाही, तसेच काँग्रेसजनांनाही गांधी घराण्याबद्दल आक्षेप घेता येत नाही. इतकेच काय, त्याचे अस्तित्वही नाकारता येत नाही. तेव्हा देशपातळीवर या घराण्यातील मायलेकांना निवडणुकांतील पराभवाबद्दल दोष देता येणार नाही ही काँग्रेसजनांची भूमिका योग्यच. भाविक जन जसे पदरात काही चांगले पडले तर त्याचे श्रेय परमेश्वराला देतात आणि वाईट घडले तर स्वत:च्याच कर्माला जबाबदार धरतात तशी ही काँग्रेसजनांची आध्यात्मिक वृत्ती आहे. आनंद मानावा असे काही घडले तर ते केवळ गांधी घराण्याच्या कृपाशीर्वादाने असे म्हणायचे असते आणि अघटिताचा सामना करावयाची वेळ आल्यास स्वत:स बोल लावायचे असतात, हे ज्ञान काँग्रेसजनांना उपजतच असते. किंबहुना हे ज्ञान असणे ही उत्तम काँग्रेसजन होण्याची पहिली पायरी असते. ती चुकली की काय होते आणि स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून काही मागितले की काय घडते याचा धडा देणारे अनेक जण सापडतील. जवळचाच दाखला द्यावयाचा झाल्यास नारायण राणे हे उत्तम उदाहरण. काही वर्षांपूर्वी स्वत:च्या ताकदीची जाणीव होऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींना आव्हान देण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्या वेळी पक्षाने दिलेल्या हिसक्यातून ते अद्याप बाहेर येऊ शकलेले नाहीत. तेव्हा अशी चूक मुरलेले काँग्रेसजन करीत नाहीत. कोणत्याही पराभवासाठी ते स्वत:स दूषणे देतात आणि गांधी कुटुंबीयांना दोष देऊ पाहणाऱ्यांची तोंडे बंद करतात. आताही नेमके तेच होत असून पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्र बैठक बोलावली असली तरी कडकलक्ष्मी ज्याप्रमाणे स्वत:च्याच पाठीवर आसूड ओढते तसे त्या बैठकीत सहभागी होणारे काँग्रेसजन स्वत:च्या पाठीवर दोषांचे वळ उठवतील यात शंका नाही. सोनिया गांधी वा चि. राहुलबाबा गांधी यांनी राजीनाम्यातील रा जरी उच्चारला तरी समस्त काँग्रेसजन धाय मोकलून रडतील आणि राजीनामा या शब्दाचे चार शब्ददेखील गांधी कुटुंबीयांसंदर्भात उच्चारले जाणार नाहीत, याची दक्षता घेतील.
काँग्रेसमध्ये राजीनामा वगैरे द्यायचा तो अन्य मर्त्य नेत्यांनी. यात मग आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई जसे येतात तसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होतो. काँग्रेसच्या दिल्ली दिग्विजयी पराभवात महाराष्ट्रातील महापराभवाचा वाटा मोठा आहे. तेव्हा या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी पदत्याग करावा असे राज्यातील अनेक काँग्रेसजनांना वाटू लागले आहे. राज्यातील ही उच्च नैतिक मूल्ये पाळणाऱ्यांच्या परंपरेत विदर्भसिंह नितीन राऊत आणि कोकणसिंह नारायण राणे किंवा पुणेरी बिबटे मा. रा. रा. दीपक मानकर मोडतात. मतदारांनी निवडणुकीत वास्तविक यातील पहिल्या दोन्ही सिंहांच्या आयाळीदेखील भादरून त्यांची फारच केविलवाणी अवस्था करून टाकली. पुणेरी बिबटे रा. रा. मानकर तर या दोघांहूनही थोर. साक्षात तुरुंगवासाचा त्यांना दांडगा अनुभव. खेरीज राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी यांच्यासारखा नीतिमान शिरोमणी हा त्यांचा गुरू. म्हणजे त्यांच्या अंगी नैतिकता किती ठासून भरलेली असावी हे आपल्यासारख्या जनसामान्यांना काय कळणार? तेव्हा नैतिकतेला जागत या दोन्ही सिंहांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि पुणेरी बिबटय़ाने मुख्यमंत्री चव्हाण यांचाच राजीनामा हवा अशी मागणी केली. मुदलात जे सिंह वा बिबटे असतात त्यांना मंत्रिपदाचे एवढे ते काय? मतदारांनी भादरलेली आयाळ जशी पुन्हा उगवू शकते तसेच मंत्रिपदही पुन्हा मिळू शकते तसेच तुरुंगवासाचा अनुभवही पुन्हा घेता येऊ शकतो. तेव्हा नैतिकता महत्त्वाची. त्याच नैतिकतेला आळवत या दोघांनी पृथ्वीराजाच्या दरबारातून काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला. या दोन नरसिंहांप्रमाणे पृथ्वीराजानेही राजीनामा द्यायला हवा असे काही काँग्रेसजनांचे म्हणणे असेल तर त्यात जरूर तथ्य आहे, यात शंका नाही. परंतु या दोघांच्या वा रा. रा. मानकर यांच्यासारख्या अन्य काँग्रेसजनांच्या ठायी असलेल्या नैतिकतेचा अंशही पृथ्वीराजबाबांकडे नाही. केले आहे काय या पृथ्वीराजाने मुख्यमंत्री होऊन? ना एखादे अभियांत्रिकी महाविद्यालय काढले ना सहकारी बँक, ना रस घेतला खाणकामांत. सगळा नुसता नन्नाचा पाढा. ही कामे करावयाची तर सिंहाचीच छाती लागते. नारायणरावांसारखी. पृथ्वीराजबाबांकडे ती नाही. त्यामुळे त्यांना ते जमले नाही. ते नाही तर नाही निदान पोराबाळांकडून स्वदेशी, संघर्ष, स्वाभिमान वगैरे तडफदार संघटना तरी स्थापून घ्यावयाची. तेही करणे त्यांना शक्य झालेले नाही. गेलाबाजार रा. रा. मानकर यांचा तरी ‘आदर्श’ डोळ्यांपुढे ठेवून एखाद्या तुरुंगवासाची व्यवस्था करावयाची. तेही या पृथ्वीराजाने केलेले नाही. तेव्हा इतका हा मचूळ गृहस्थ राणे, राऊत वा रा. रा. मानकर यांच्यासारख्या तडफदारांचे नेतृत्व कसे काय करणार? त्यामुळे राऊत वा राणे या दोघांच्या नैतिक पावलांवर पाऊल टाकून पृथ्वीराजबाबांनीही राजीनामा देणे गरजेचे आहे, असे आमचेही मत आहे. याही उप्पर मा. रा. रा. दीपक मानकर यांच्यासारखा नैतिकतेचा शिरोमणीच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागीत असेल तर आता आणखी काय शोभा व्हायची राहिली? तेव्हा पृथ्वीराजबाबांनी राजीनामा द्यावा आणि काँग्रेस श्रेष्ठींनी राज्य काँग्रेसची सूत्रे राणे अथवा राऊत यांच्या नैतिक मार्गदर्शनाखाली मानकर यांच्या हाती सुपूर्द करावीत, हे उत्तम.
तसे झाल्यासच राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरचे ते आध्यात्मिक स्मित समस्त भारतवर्षांस अनुभवता येईल. आता काही काँग्रेसजनांना पक्षाच्या पराभवापेक्षा तो स्वीकारत असताना राहुल गांधी यांच्या स्मिताने अधिक घायाळ केले आहे, असे म्हणतात. मतदारांकडून एवढा मोठा दणका बसूनही राहुल गांधी स्मितहास्यात रंगून जाऊ शकत असतील तर पराभवाचे दु:ख करणारे आपण कोण हे काँग्रेसजनांना कळून चुकले आहे. देशभरातील काँग्रेस कार्यालयांतून अलीकडे लाजून हासणे     अन् हासून ते पहाणे.. हे सुरेल गीत ऐकू येते ते त्यामुळेच.