गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईकरांना एक स्वप्न सतत पडत होते. मोनो रेल्वे हे त्या स्वप्नाचे नाव. ऑगस्टमध्ये मोनो धावणार अशी बातमी गेल्या वर्षी कधी तरी फुटली आणि या स्वप्नाला बहर आला, पण ऑगस्ट तसाच गेला. डोळ्यासमोर मोनोची तयारी मात्र दिसत होती. मग हे स्वप्न डिसेंबपर्यंत लांबणार असं वाटू लागलं. तरीही डोळ्यासमोर तरळणारं ते स्वप्न मुंबईकरांनी पुसून टाकलं नाही. ते तसंच जपून ठेवलं. कारण मोनोचं स्वप्न साकारणार आहे, हे प्रत्येकालाच माहीत होतं. बघताबघता वर्ष सरलं. दरम्यान, चार राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. पराभवाची कारणं स्पष्ट होती. ती कानाआड करण्यासाठी जनतेला नवं स्वप्न दाखवणं किंवा जपलेलं स्वप्न साकार करणं हाच पर्याय असल्यानं मुंबईकराला मोनोच्या स्वप्नपूर्तीची खात्री झाली. लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी करावयाच्या कामांचे प्राधान्यक्रम बदलले आणि रेंगाळलेली मोनो सरळ पहिल्या क्रमांकावर येऊन दाखल झाली. तातडीने कार्यान्वित करता येईल असा तोच एकमेव प्रकल्प होता. मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची वेळ नव्या वर्षांच्या चाहुलीसोबत जवळ जवळ येत होती आणि अखेर तो दिवस उजाडला. शनिवारी मोनो धावली आणि रविवारी मुंबईच्या वर्तमानात एक नवे पान उघडले. मोनो रेल्वेचे स्वप्न साकार झाले.. इतके दिवस उराशी जपलेले हे स्वप्न साकारून प्रत्यक्षात आलेले असताना, त्याची थेट अनुभूती घेण्याचा अनावर उत्साह ओसंडून वाहिला नसता, तर मुंबईच्या स्वाभाविक उत्साहाशी ते विसंगतच ठरले असते. मोनोच्या पहिल्या फेरीचे साक्षीदारच नव्हे, तर पहिल्या फेरीचा अनुभव आपल्या जगण्याशी जोडण्याकरिता धाव घेऊन अमाप उत्साहभरल्या वातावरणात मुंबईकरांनी आपल्या या स्वप्नाचे मूर्तरूप अनुभवले. आता मोनो रोजच धावणार आहे, पण पहिल्या फेरीचे आणि ते जमले नाही, तर किमान पहिल्या दिवशीच्या सफरीचा अनुभव आपल्या गाठीशी बांधण्याच्या उत्साहात तमाम लहानथोर मुंबईकर मूल होऊन धावले.. मोनोचा अनुभव आणि सफर अविस्मरणीय करण्यासाठी असंख्य फेसबुकवीरांच्या रविवारच्या पोस्टवर मोनो झळकत होती. कुणी तिला प्रेमानं मोनोराणी म्हटलं, तर कुणी मोना डाìलग म्हणत आपल्या रसिकतेची झालर तिच्यावर चढविली. आजवर केवळ बस, रिक्षा-टॅक्सी, खासगी वाहने आणि ओसंडून वाहणाऱ्या गर्दीला वाहून नेण्याची कसरत करीत धावणारी उपनगरी रेल्वेगाडी या अनुभवांच्या गाठोडय़ातच गुरफटून राहिलेल्या मुंबईकराला आता मोनो सफरीच्या अनुभवाची आणखी एक जोड मिळाली आहे. मुंबईकराच्या स्वप्नातील मोनोला मेट्रोचीही साथ आहे. आता मेट्रोच्या स्वप्नपूर्तीची प्रतीक्षा मुंबईकराला लागली आहे. पण सध्या निवडणुकीच्या निमित्ताने हाती पडलेला मोनोचा नजराणा काही थोडका नाही. या आनंदामुळेच, हजारो मुंबईकरांच्या आयुष्यातील कालचा रविवार आगळावेगळा ठरला. हा आनंद आता उराशी जपून ठेवत, गर्दीच्या सवयीशी पुन्हा एकरूप होत धकाधकीची धावपळ झेलताना, हाती लागलेले हे आनंदाचे किंचित क्षण पुन्हा धावपळीच्या जगण्याला सामोरे जाण्याची उमेद देत राहणार आहेत. एका गुलाबी स्वप्नावर स्वार होऊन मुंबईचे विहंगम दृश्य न्याहाळण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतल्याचा आनंद उराशी जपत आणि या आनंदाच्या अनुभवांची देवाणघेवाण करीत असंख्य मुंबईकरांनी साजरा केलेल्या रविवारच्या सुट्टीलाही आजवरच्या इतिहासापेक्षा नवे वेगळेपण मिळाले आहे, कारण मोनोच्या प्रवासाच्या पहिल्यावहिल्या अनुभवाने रविवारच्या सुट्टीच्या आनंदाला नवी झालर लावली.. पहिल्या सफरीतच मोनोच्या डब्यांमध्ये दाटलेल्या गर्दीला लाभलेली ही नवी देणगी मुंबईकरांचे भविष्य थोडेसे तरी सुकर ठरवेल, अशी अपेक्षा उंचावरून धावणाऱ्या या मोनोराणीला धन्यतेने न्याहाळणाऱ्या मुंबापुरीने मनोमन व्यक्त केली असेल..