मुंबईत २३ जूनच्या मुसळधार पावसाच्या रात्री आपले दिवसभराचे काम आटोपून अंधेरीहून विरारला जायला निघालेल्या २२ वर्षांच्या मयंक लोहारचा मृत्यू ही त्याला सुरा भोसकून मारणार्या त्या एका माणसाच्या संतापाची परिणती मानावी एवढे आता महानगरांमधले जगणे खरोखरच मानवी उरलेले आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे. अर्थात असे म्हणण्याचा अर्थ मयंक लोहार या तरुणाच्या खुनाचे समर्थन असा अजिबात होऊ शकत नाही.
पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या, सतत धावत्या, अनेकांना मोहमयी वाटणार्या शहराचे एखाद्या कधीही स्फोट होऊ शकणार्या बॉम्बमध्ये रूपांतर झाले आहे का, याचा मात्र खरोखरच विचार व्हायला हवा. ‘मुंबईची जीवनवाहिनी’ म्हटल्या जाणार्या लोकल ट्रेनमधली भांडणे हा काही मुंबईकरांसाठी नवीन विषय नाही. दररोज ७० ते ८० लाख लोकसंख्या या लोकलगाड्यांतून लटकत, घामाघूम होत प्रवास करते. या प्रवासात कधीतरी ‘अरे-कारे’च नव्हे तर हातघाईवर येणे हेही साहजिक आहे.
ही भांडणे बसण्याच्या जागेवरूनच नव्हे तर दाराजवळ वा खिडकीजवळ उभे कोणी राहावे, कोणी कोणासाठी बाजूला सरकावे, यावरून किंवा आपल्या इच्छित स्थानकावर उतरायला मिळणे, धक्का लागणे, शिवीगाळ करणे अशा अगदी कोणत्याही मुद्द्यावरून होऊ शकतात. आवाज चढले, माणसे एकमेकांना भिडली की आसपासच्या लोकांची मध्यस्थी होऊन ती थांबतात किंवा आपापले स्टेशन येईपर्यंत धुम्मस राहाते. पण किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर एखाद्याने सरळ चाकूसुरा काढून दुसर्याचा खून करावा?
अवघ्या सहा महिन्यांत घडलेली ही दुसरी घटना. यापूर्वी २४ जानेवारी रोजी आलोक कुमार सिंह या ३३ वर्षीय प्राध्यापकाची अशीच किरकोळ कारणावरून लोकलगाडीत हत्या झाली होती. साध्या साध्या गोष्टींवरून दुसर्याला भोसकावे इतकी माणसे असंवेदनशील का होऊ लागली आहेत? त्यांच्या सहनशक्तीचा असा अंत का होऊ लागला आहे? सहसा लोकल ट्रेनमधून कामानिमित्त फिरतात ती सर्वसामान्य माणसे. ती खिशात चाकूसुरा घेऊन फिरत असतील आणि सहजपणे कोणालाही भोसकतील हे मुंबईकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.
पण तसे होऊ लागले आहे, हे खरे. त्यांचे रोजचे जगणे धकाधकीचे होतेच. पण लोकल ट्रेनमधली कधीही न संपणारी, आक्रमक होत चाललेली गर्दी, घरापासून स्टेशनपर्यंत माणसांची, फेरीवाल्यांची गर्दी, सततची वाहतूक कोंडी, अपुरे, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, वाढती महागाई, मुलाबाळांच्या शिक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न, अन्नधान्यापासून सर्व गोष्टींची घटत चाललेली गुणवत्ता, आपण ज्यांना निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींना आपल्या प्रश्नांची कदरच नसणे या सगळ्या गोष्टींनी मुंबईकर दिवसेंदिवस अधिकच कातावत चालला आहे. हे सगळे प्रश्न मुंबईबाहेरच्या जगण्यातही असतात. पण रोजचा लोकलगाडीचा प्रवास मुंबईकरांचे जगणे इतरांपेक्षा अवघड करून टाकतो.
त्यात हे असेच चालणार, ते कधीच संपणार नाही ही भावना त्याला अधिक कुरतडत ठेवते. बॉलीवूडच्या सिनेमांमधून मुंबई, तिथली लोकल ट्रेन, मुंबईच्या जगण्यामधली ऊर्जा, मुंबईकरांचे स्पीरिट या गोष्टी काहीशा रोमँटिक करून दाखवल्या जात असल्या तरी आजकालची मुंबई रोजच्या रोज मुंबईकरांच्या अंगावर येते. लोकलच्या तालावर सतत जीव खाऊन धावताना एखाद्या दिवशी काहीतरी भयानक घडले, तरी दुसर्या दिवशी तीच लोकल पकडणे हे मुंबईकराचे ‘स्पीरिट’ नसते तर ती त्याच्या जगण्यामधली अपरिहार्यता असते. त्याचे मानसिक परिणाम साठत जाऊन त्याचा कधीतरी कोणत्या तरी मार्गाने स्फोट होतो.
मुंबईतली सामान्य माणसे जास्तीत जास्त वेळ लोकलगाडीत असल्यामुळे तिथल्या भांडणांमध्ये तो होतो. प्रत्येक माणसाची आपल्या आतल्या उद्रेकाला वाट देण्याची पद्धत वेगळी. पण अशा प्रसंगांमधून दिसते ते हेच की इथल्या प्रत्येकाची सहनशक्ती संपत चालली आहे. तरीही जे घडले ते भयंकरच. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणार्या लोकल ट्रेनमध्येच जगणे फारसे न बघितलेल्या एका तरुणाला त्याच्या आसपासचे जग किती भयंकर आहे, याचा अनुभव घेताघेताच मृत्यूला सामोरे जावे लागणे, अतिशय वेदनादायी आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी केवळ लोकलगाड्यांच्या कानाकोपर्यांत कॅमेरे बसवण्यासारखे उपाय निष्फळच ठरतील… हत्या झाल्यावर जिवंत माणसेसुद्धा आपापल्या मोबाइलचे कॅमेरे सरसावत होतीच! त्यापेक्षा, सामान्य माणसाचे जगणे सुसह्य करणे हाच उपाय ठरू शकतो. पण हे भान आपल्या यंत्रणा दाखवतील?
