ॲड. रोहित एरंडे
काही बळी गेल्याशिवाय आपल्याकडे यंत्रणांना जाग येत नाही असे म्हणतात. मागील आठवड्यात मुंबईतील साकीनाका परिसरात पावसामुळे उघड्या राहिलेल्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी २९ ऑगस्ट २०१७ रोजी डॉ. दीपक अमरापूरकर यांच्यासारख्या प्रसिद्ध डॉक्टरांना याच प्रकारामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर २०१७ साली रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात गाडी अडकल्यामुळे गाडीची दारे न उघडल्याने ॲड. प्रियम मिठीया या तरुण वकिलाला गाडीतच काळाने गाठले होते.
आपल्या राज्य घटनेतील कलम २१ नुसार नागरिकांना काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. हे कलम घटनेचा पाया आहे, ज्याला धक्का लावता येत नाही किंवा कोणालाही घटनादुरुस्ती करून बदलता येत नाही. या अधिकारामध्ये शुद्ध हवा, पिण्यायोग्य पाणी, ध्वनी आणि प्रदूषणमुक्त वातावरण, चालण्यायोग्य रस्ते, ‘राइट टू प्रायव्हसी’ आणि नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पदपथावरून चालणे हा देखील मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले आहे, मात्र कायदे उदंड आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही याचा प्रत्यय वारंवार येतो.
सध्या कुठल्याही शहरात जा, सन्मानीय अपवाद वगळता, गल्ली असो वा महामार्ग, रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे, कारण कुठलेही असो, त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. अशा वेळी नगरपालिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या रतलाम म्युनिसिपालिटी विरुद्ध वर्दीचंद, (AIR १९८० एम सी १६२२) या एका दुर्लक्षित पण महत्वपूर्ण निकालाची आठवण होते.
उघडी गटारे, रस्त्यावर शौचाला बसणारे लोक, दारुच्या कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित होणारे जलस्त्रोत, तसेच चांगल्या ड्रेनेज सिस्टीमचा अभाव यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे आणि त्यामुळे ही परिस्थती हा एक प्रकारचा सामाजिक त्रास (public nuisance) आहे आणि तो संपविण्याची जबादारी रतलाम महानगरपालिकेचीच आहे, म्हणून काही नागरिकांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १३३ अन्वये मॅजिस्ट्रेट कोर्टात दाद मागितली आणि मॅजिस्ट्रेट साहेबांनीही महानगरपालिकेला हा सर्व त्रास थांबविण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजण्यास सांगितले. मात्र, महानगरपालिकेने असे करण्यास आर्थिक कारणांमुळे असमर्थता तर दाखविलीच शिवाय असे आदेश देण्याचा मॅजिस्ट्रेट कोर्टाला अधिकारच नाही असा पवित्रा घेतला. अर्थातच खालच्या कोर्टाने तसेच उच्च न्यायालयानेही पालिकेला चांगलेच फटकारले आणि घटनात्मक कर्तव्यांचे पालन करण्यास सांगितले. मात्र हे आदेश मान्य नसल्याने रतलाम पालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
जनतेच्या सुदैवाने, सामान्य जनतेचे तारणहार अशी ख्याती असलेले न्यायाधीश कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सदरील प्रकरण चालले आणि त्यांनी दिलेला निकाल आजही नागरिकांसाठी एक मोठा आधार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ पाणी, हवा हे नागरिकांना मिळालेच पाहिजे पण त्याचबरोबर हे आर्थिक अडचण हे या व्यवस्था न पुरवण्यामागे कारण असूच शकत नाही. अश्या शब्दात पालिकेला न्यायालयाने फटकारले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मॅजिस्ट्रेटसारख्या न्यायदानाच्या पिरॅमिडमधील कनिष्ठ पायरीवरील न्यायालयाने कोणाचीही भीड न बाळगता घेतलेल्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयानेही मोकळेपणाने कौतुक केले. सर्वोच्च नायालयाने पालिकेला ठरावीक मुदतीत सर्व समस्या संपविण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले, अन्यथा संबंधित अधिकऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकेल अशी तंबीही दिली. चार दशकांपूर्वीचा हा निकाल आजही लागू आहे आणि लोकांच्या समस्याही त्याच आहेत !!
सरकार कोणाचे होते आणि कोणाचे आहे हा मुद्दा येथे गौण ठरतो. लोकांना त्यांचे रोजचे जीवन नीटपणे जगता यावे एवढीच मापक अपेक्षा असते. मुंबई- पुण्यासारख्या ठिकाणी तर लोकांना ‘जगण्याचे स्पिरीट’ दाखविण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो.
पण बोध घेणार कधी ?
वर म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाने एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटायचे असेल तर आपल्याकडे एखादा बळी जावाच लागतो, त्यानंतरच सरकारी यंत्रणा जागी होते की काय असा प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षांमध्ये असे बघायला मिळते की मुसळधार पाऊस झाला की काही ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप येते, रस्ते उखडले जातात त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा नीट न होऊ शकण्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे. तसेच हल्ली रिडेव्हलपमेंटमुळे देखील सोसायट्यांमध्ये पाणी जिरण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि याचा परिणाम शेवटी पाणी तुंबण्यात होतो. यावर काही दिवस समाज माध्यमांवर चर्चा घडते, मग आहेच पहिले पाढे… अर्थात सर्व जबाबदारी एकट्या सरकारचीच आहे असे मानणे चुकीचे ठरेल. नागरिकांनीही त्यांच्या घटनात्मक अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाण ठेवणे गरजेचे आहे.
तर वरील सर्वोच्च निकाल आजही लागू असल्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यातून बोध घ्यावा आणि आर्थिक अडचण ही सबब नगरविकासाच्या आड कधीही येऊ शकत नाही हे लक्षात ठेवावे.
rohiterande@hotmail.com
