मुंबईच्या रणजी संघाला ४४ वर्षांत ४० विजय मिळाले, हे निर्भेळ यशच. पण गेल्या दोन दशकांत क्रिकेटची निकोप वाढ देशभरच्या छोटय़ा शहरांतही होऊ लागली.. विषमता अभावितपणेच का होईना, सांधली गेली..
मुंबई ही मायानगरी, देशाची आर्थिक राजधानी. एकेकाळची, क्रिकेटचीही राजधानीच. मग देशात अन्यत्र त्याचं अनुकरण केलं जातं. क्रिकेट हे मुंबईकरांचं पहिलं प्रेम. वर्षांनुवष्रे क्रिकेटशी ऋणानुबंध टिकवून ठेवणाऱ्या मुंबई बेटाला हा वारसा दिला ब्रिटिशांनीच. हा इंग्रजांची घमेंडच जोपासणारा, क्लबांच्या हिरव्यागार मैदानांवर खेळला जाणारा खेळ हळूहळू मुंबईभर शिरला, पसरला.. इथलाच झाला. दोन इमारतींमध्ये उपलब्ध झालेल्या चिंचोळ्या सिमेंटच्या पृष्ठभागाला मग काँक्रीट पिचची शान येऊ लागली. खास राखीव मैदानं ते दाटीवाटीने खेटून असलेल्या झोपडय़ा.. स्थळ कोणतंही असो, क्रिकेटचा डाव या नगरीत सहजगत्या रंगतो. काळ सरला, वष्रे सरली तसतशी क्रिकेटची ही जादू आता देशातील छोटय़ा अनेक शहरांत, गावांमध्ये पसरली आहे. आता क्रिकेटवर मोठय़ा शहरांची मक्तेदारी राहिलेली नाही. पण याही परिस्थितीत मुंबईने रणजी करंडकावर गेली ४४ र्वष वर्चस्व राखणं, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर, कप्तान अजित आगरकर आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्यासह मुंबईच्या शिलेदारांनी संघाला ४०व्या ऐतिहासिक विजेतेपदाची भेट दिली. आता भारतीय संघात यापैकी किती जण स्थान मिळवतील, हे औत्सुक्याचं ठरेल. एक काळ होता, जेव्हा भारतीय संघातील सहा-सात खेळाडू मुंबईचे असायचे. अजित वाडेकर, बापू नाडकर्णी, सुनील गावस्कर, वासू परांजपे, दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, विजय मांजरेकर, विजय र्मचट, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री असे क्रिकेटमधील अनेक हिरे मुंबईनं भारतीय संघाला दिले. पण कालांतराने क्रिकेटमधील ही सत्ताकेंद्रे आता दिल्ली, तामिळनाडूकडे स्थलांतरित झाली. त्यामुळे सचिनवगळता एखाद-दुसरा खेळाडू जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपला तरी मुंबईसाठी ती आता पर्वणी ठरते. कारण जशी मुंबईच्या रणजी संघासाठी स्पर्धा वाढली आहे, तशीच स्पर्धा भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून वाढते आहे. १९८३मध्ये भारतीय क्रिकेट संघानं चमत्कार घडविला. इंग्लंडच्या लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजची दादागिरी संपवून भारतानं विश्वचषकाला गवसणी घातली. कपिलदेव, सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ, कृष्णम्माचारी श्रीकांत ही मंडळी सर्वसामान्यांची दैवतं झाली. परंतु तोवरच्या संघांतील सारेच खेळाडू हे चांगल्या शहरातील आणि श्रीमंत क्रिकेट मंडळांचे प्रतिनिधी होते. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची पुनरावृत्ती एकदा नव्हे, दोनदा करून दाखवली ती महेंद्रसिंग धोनी या कर्णधारानं. धोनी स्वत:सुद्धा छोटय़ा शहरातला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकलेल्या दोन विश्वचषकांचे संघ जरी पाहिले तरी क्रिकेट आता ‘छोटे, छोटे शहरों में..’ पसरत असल्याची साक्ष पटते. हरभजन सिंग जालंदरचा, झहीर खान महाराष्ट्राच्या श्रीरामपूरचा, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि मुनाफ पटेल भरुचचे, सुरेश रैना गाझियाबादचा, प्रवीण कुमार मेरठचा, तर पीयूष चावला अलिगढचा. माहिती-तंत्रज्ञान क्रांतीमुळे आता छोटी शहरे मोठय़ा शहरांच्या नजीक आली आहेत. भारतातर्फे खेळण्याचं स्वप्न साध्य होणं तेव्हासुद्धा आव्हानात्मक होतं, आताही आहे. परंतु स्थानिक क्रिकेट आता देशात खोलवर पसरलं आहे. विदर्भातील खाण कामगाराचा मुलगा उमेश यादवनं देशाकडून खेळण्याचं स्वप्न सत्यात आणलं. सौरभ तिवारी, कमरान खान, दीपक चहार, अशोक मनेरिया, विजय झोल यांच्यासारखे अनेक युवा आणि गुणवान क्रिकेटपटू आता पुढे येत आहेत. आयपीएल फ्रेंचायझीसुद्धा आपल्या विभागातील गुणवत्ता हेरून तिला व्यासपीठ मिळवून देत आहेत.
 हा बदल फक्त क्रिकेटमध्येच नव्हे तर भारतामधील संपूर्ण क्रीडाविश्वात पाहायला मिळतो. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणींच्या शहरांतूनही क्रीडापटू घडू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर छोटय़ा शहरातील तारेही तेजाने तळपत आहेत. सहा महिन्यांपूर्वी लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही नेमकं हेच स्पष्ट झालं. रौप्यपदक विजेता विजय कुमार हा हिमाचल प्रदेशचा, कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त सोनीपतचा तर बॉक्सिंगध्ये कांस्यपदक जिंकणारी एम.सी. मेरी कोम ही मणिपूरची. क्रीडा क्षेत्रातील हा बदल आता प्रामुख्याने अधोरेखित होत चालला आहे. त्यामुळेच क्रिकेटमधील वाढत्या स्पर्धात्मक युगातही मुंबईनं जिंकलेला रणजीचा किताब अधिक मोलाचा वाटतो. मुंबईने साखळी ते अंतिम फेरीपर्यंतच्या ११ सामन्यांमध्ये जवळपास   ३५ ते ४० खेळाडू आजमावले. यापैकी नऊ वेगवान गोलंदाज होते. मुंबईच्या संघात निर्माण होणारी स्पर्धा निश्चितच लक्ष वेधते. त्यामुळे संधीच्या शोधात असलेले मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आसाम, हिमाचल प्रदेश, झारखंड यांच्यासारख्या नव्यानं उदयास आलेल्या संघांची वाट धरतात. पण तरीही मुंबईत क्रिकेटसाठी बारमाही सुगीचं वातावरण असतं. छोटी शहरं आणि ग्रामीण भागातूनही खेळाला पोषक वातावरण आता निर्माण होऊ लागलं आहे. अर्थात, व्याप्ती अशी वाढत असताना काही ढोबळ दोषही वाढताहेत. एके काळी दिग्गज क्रिकेटपटूही सरावासाठी स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करायचे. पण आता भारतीय क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर झालेले क्रिकेटपटू क्वचितच रणजी वगैरेसारख्या स्पर्धामध्ये खेळतात. मग खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून अर्धचंद्र मिळाल्यावर त्यांना आपल्या संघाचा पुळका येतो. महेंद्रसिंग धोनी तर गेली अनेक वष्रे रणजी खेळू शकला नाही, आता चार दिवसांवर आलेल्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यातही तो खेळणार नाही. परंतु हाच धोनी गुरुवारी दुबईत ‘सेव्हन बाय एम. एस. धोनी’ या परफ्युमच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून हजेरी लावताना दिसतो. याचप्रमाणे दुखापत, विश्रांती आदी कारणास्तव स्थानिक क्रिकेट टाळणारी ही सारी मंडळी आता एप्रिलपर्यंत बरी होतील, कारण आयपीएलच्या सहाव्या चक्रीची ते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. आयपीएलने क्रिकेटमध्ये बेसुमार पैसा आणला. मनोरंजन आणि छोटेखानी स्वरूप यामुळे आयपीएल खेळण्याचे मर्यादित स्वप्न जोपासणारीही पिढी आता क्रिकेटमध्ये वावरू लागली आहे. दु:ख याचंच अधिक आहे की, केवळ पैशामुळेच क्रिकेटसारखा खेळ मोठा होतो आणि हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळासह अन्य खेळांकडे दुर्लक्ष होतं.. पण क्रिकेट आणि त्याचा प्रसार हे  जर भारतातल्या प्रादेशिक विषमता मोजण्याचं एक परिमाण मानलं, तर त्या मोजपट्टीवर जम्मूपासून तिरुनेलवेलीपर्यंतचा आणि गुवाहाटीपासून भरुचपर्यंतचा हा देश किती गुणी आहे, हे समजतं.
अशा गुणी देशात मुंबईनं इतिहास मोठा आणि खेळाडूही मोठे म्हणून संघातही आम्हालाच अधिक प्रतिनिधित्व हवं, हा आग्रह विसरूनही मोठं यश मिळवलं आहेच.. अशी खिलाडू वृत्ती असल्यावर बाकीच्यांना संधी मिळते, तशी ती छोटय़ा शहरांना मिळते आहे.