भाजप नेते नरेंद्र मोदी उत्तर भारतात वावरताना पठाणी वेश परिधान करणार या वृत्ताने अनेकांच्या भुवया निश्चितच उंचावल्या असतील. अनेकांना तो तद्दन राजकीय ढोंगीपणा वाटला असेल. अनेकांच्या दृष्टीने तो मुस्लीम अनुनयाच्या राजकारणाचा विकृत आविष्कार ठरत असेल. आजवर अशा प्रकारच्या तथाकथित अनुनयाची मक्तेदारी तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांकडे होती आणि उजवी हिंदुत्ववादी मंडळी त्यांच्यावर हीच टीका करीत असत. आता स्वत:स हिंदू राष्ट्रवादी म्हणवणारे नरेंद्र मोदी यांना याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. हा काव्यगत न्याय म्हणायचा की बदलत्या राजकीय वास्तवाचे प्रतीक, हे ज्याने त्याने आपण कोणत्या वैचारिक कळपात आहोत, त्यावरून ठरवायचे आहे. मोदी यांनी देवालयाआधी शौचालये बांधावीत, असे विधान केले होते. त्यावर तोगडियापंथीय हिंदुत्ववाद्यांनी बरेच तोंडसुख घेतले. आता या कथित मुस्लीम अनुनयवादी कृतीमुळे ही मंडळी पुन्हा मोदी यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. परंतु त्यांनी आदळआपट करण्याचे काहीच कारण नाही. कारण मोदी हे तर आपल्या थोर आणि पूज्य भारतीय संस्कृतीचे पाईक आहेत आणि या संस्कृतीला जागूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रतीकांना किती महत्त्व असते हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मोदी यांनी प्रतीकपूजनाच्या त्याच परंपरेवर पाऊल ठेवले आहे. हे कोणीही सांगेल, की पठाणी कुर्ता घातला म्हणजे मोदी लगेच मुल्ला मोदी होणार नाहीत. किंवा आपल्यासारखीच वेशभूषा केली म्हणून मुस्लीम जनता त्यांच्या प्रेमात पडणार नाही. तरीही मोदी यांना पठाणी कुर्ता शिवण्यास सांगावेसे वाटले, याचे कारण आता ते पूर्वीचे मोदी राहिलेले नाहीत. गुजरातमधील सद्भावना यात्रेदरम्यान मुस्लीम पद्धतीची टोपी घालण्यास उद्धट नकार देण्याचा प्रकार करणारे मोदी हे आता केवळ गुजरातचे नेते राहू इच्छित नाहीत. ते आता पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्या मार्गावर या अशा गोष्टी करणे त्यांना आवश्यक वाटत आहे. भारतीय समाजास प्रतीके भावतात, हे काँग्रेसच्या नेत्यांनी केव्हाच जाणले होते. डोक्यावर मोरपीस लावून आदिवासींमध्ये नृत्य करणे यांसारख्या गोष्टी काँग्रेस नेत्यांसाठी काही हौसेचा मामला नव्हता. ते त्यांच्या राजकीय शहाणिवेचे आणि परंपरेच्या जाणिवेचे द्योतक होते. मुस्लीम पद्धतीची फर कॅप घालून इफ्तार पाटर्य़ामध्ये डावे आणि मधले नेते सहभागी होत असत ते यातूनच. मात्र याला मुस्लिमांचा अनुनय म्हणून उजवी मंडळी आपली उंच नाके मुरडत असत. या गोष्टींना नाक मुरडणेच नव्हे, तर त्यांवर सडकून टीका करणे गरजेचे आहे. कारण अशा गोष्टींना केवळ सत्ताकारणाचा विषारी वास असतो. त्याहून भयंकर म्हणजे मुळातच तो अनुनयाचा मामला नसतो. अनुनयातून काहीतरी व्यवहार अपेक्षित असतो. येथे तर निव्वळ समाजमनाची फसवणूक असते. प्रतीकांचा वापर राजकीय नेत्यांकडून आपल्या प्रतिमासंवर्धनासाठी नेहमीच होत असतो. एवढेच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक नेते आपल्या फायद्यासाठी समाजाला प्रतीकबद्धही करीत असतात. आपल्या चेहऱ्यावर धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवणे ही मोदी यांची आजची गरज आहे. त्यासाठी त्यांना आज पठाणी कुर्ता आवश्यक वाटत असेल, तर ते काँग्रेसचाच कित्ता गिरवीत आहेत. तेव्हा जमल्यास काँग्रेसवाले, डावे आदींनी त्यांचे अभिनंदनच करावे आणि बाकीच्या उजव्यांनी वगैरे स्वत:च्या कपाळावर दोन्ही हात मारून घ्यावेत.