‘तुम्हाला आई हवी आहे, आईची भेट हवी आहे, हे मला समजते.. पण तुम्हाला आई जितकी हवी, तितकेच साऱ्यांना स्वातंत्र्य हवे आहे. न्याय हवा आहे’ असे पत्र आपल्या दोघा मुलांना लिहून त्यांची समजूत घालणारी नसरीन सोतूदेह् यापुढेही तुरुंगातच राहील.. तिच्याच मायदेशाच्या, इराणच्या दमनशाहीविरुद्ध तिने आरंभलेले उपोषण तिने गुरुवारी ४९व्या दिवशी संपवले, याबद्दल तिची एकमेव मागणी इराण सरकारने पूर्ण  केली आहे. पण ती मागणी नसरीनने स्वतच्या मुलीसाठी केली होती.. १२ वर्षांच्या या मुलीला इराणबाहेर जाण्याची परवानगी द्या, अशी! ही मुलगी कदाचित इराणबाहेरच राहील, नसरीनची कीर्ती माहीत असलेला एखादा देश या मुलीला आश्रय देईल आणि नसरीन मात्र इराणमध्येच राहील. तिला २००९ मध्येच ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.. पण स्वत मानवी हक्क वकील असलेल्या आणि इराणमधील हजारो आंदोलकांवरील अत्याचारांविरुद्ध दाद मागणाऱ्या, त्यापैकी काहीजणांचे रीतसर वकीलपत्र घेऊन खटले लढवलेल्या नसरीन यांना  हा तुरुंगवास जणू पसंत आहे. त्याच म्हणतात, ‘मला कैदेत ठेवले हेच बरे झाले. माझे कित्येक अशील कैदेतच असताना मीच तेवढी बाहेर, हे भयावह वाटते मला..’ नसरीनना किंवा इराणमधील प्रागतिक विचारांच्या अनेकांना कशाचे भय वाटते, हे निराळे सांगायला नको. सरकारविरुद्ध बोलणे, त्यांच्या मनमानीविरुद्ध अवाक्षर काढणे इराणात अशक्य आहे. तरीही नसरीन या अन्यायाला वाचा फोडत असते. तुरुंगातून पत्रे लिहिते. ही पत्रे अशा भाषेत असतात की, कागदोपत्री इराण सरकारला त्यावर आक्षेपही घेता येत नाही. मग गेल्याच महिन्यात केला, तसा तिच्या नवऱ्याचा- रेझा यांचा – छळ केला जातो. नसरीनचे कौतुक अगदी नोबेल-विजेत्या शिरीन इबादींनाही आहे आणि नसरीनला २०१० मध्येच ‘साखारॉव्ह शांतता पुरस्कार’ हा युरोपीय बहुमानही मिळाला आहे. कुटुंब आणि देश यांत भेद न करणारी, मुलांना आई हवी तितकेच देशाला स्वातंत्र्य आणि न्याय हवा म्हणणारी नसरीन वकील आहे, त्यासाठी आठ वर्षे उमेदवारी करून २००३ मध्ये तिने सनद मिळवली आहे आणि त्याआधी तिने तत्त्वज्ञानात पदवी मिळवली आहे.. पण तिची मोठीच ओळख ही की, ती मध्यमवर्गीय घरात वाढलेली आणि आजची महिला आहे.