scorecardresearch

Premium

किरीट जोशी

शिक्षणाला आध्यात्मिक पाया देण्याच्या गप्पा मारणारे आणि त्यांच्याकडे संशयाने पाहणारे असे दोन वर्ग आज उरले असताना, किरीट जोशी यांच्यासारख्या अभ्यासू शिक्षणतज्ज्ञाची उणीव अधिकच भासणार आहे.

किरीट जोशी

शिक्षणाला आध्यात्मिक पाया देण्याच्या गप्पा मारणारे आणि त्यांच्याकडे संशयाने पाहणारे असे दोन वर्ग आज उरले असताना, किरीट जोशी यांच्यासारख्या अभ्यासू शिक्षणतज्ज्ञाची उणीव अधिकच भासणार आहे. योगी अरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, अरविंद आश्रमाचे पदाधिकारी आणि वेदांपासून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानापर्यंतचा मूलभूत अभ्यास करणारे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक हीदेखील त्यांची ओळख होतीच; परंतु शिक्षणात मूल्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नरत राहणे, हे त्यांचे जीवनध्येय होते. कर्करोगाने वयाच्या ८३व्या वर्षी, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
वडील मगनलाल जोशी हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या विचारांचा पूर्णत: स्वीकार आणि मूर्तिपूजेचा धिक्कार करणारे असल्याने मूल्यसंघर्ष म्हणजे काय, हे लहानपणीच किरीट जोशी यांनी पाहिले. वडील सरदार पटेलांचे सहकारी होते, काठेवाड संस्थानाच्या मुक्तीसाठी त्यांनी लढा उभारला होता आणि पुढे ते सौराष्ट्र विधानसभेचे सभापतीही झाले. परंतु या काळात किरीट यांच्यावर सखोल संस्कार झाला तो महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि स्वामी विवेकानंदांच्या चिंतनाचा. महाविद्यालयात तत्त्वज्ञान शिकताना त्यांना अनेक प्रश्न पडत गेले, त्यातून मूळ ग्रंथांचे वाचन वाढत गेले आणि त्यातून मिळालेल्या शैक्षणिक यशाचीच जणू पुढली पायरी म्हणून वयाच्या २४व्या वर्षी, १९५५ साली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय प्रशासकीय सेवेतही रुजू झाले होते.. या नोकरीत जीव न रमल्याने वर्षभरातच राजीनामा देऊन त्यांनी योगी अरविंद यांच्या विचारांचा अभ्यास सुरू केला. अरविंद आश्रमातच राहून केलेल्या या अभ्यासान्ती त्यांना शिक्षण हे ध्येय गवसले आणि गांधीजींचा संस्कार मुळातलाच असल्याने, शिक्षणपद्धती आमूलाग्र बदलता येईल, अशा ईष्र्येने त्यांनी काम करण्याचे ठरवले. आश्रमातच झालेल्या या प्रयोगांचे यश बाह्य़ जगात झिरपले नसले, तरी किरीट जोशी यांचे शिक्षणविषयक चिंतन त्यामुळे दृढ झाले. त्यांच्या या कामाची दखल सुमारे १५ वर्षांनी, १९७२ साली अभ्यासकांनी घेतली. अरविंद आश्रमात तत्त्वज्ञान शाखेतील ‘प्रोफेसर’ असलेले जोशी केवळ पदव्युत्तर वर्गात नव्हे, तर बालवाडीतही शिकवत. शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया त्यातून अभ्यासता येई. यातूनच, ते पढिकपंडित नसल्याची कीर्ती दिगंत झाली आणि १९७६मध्ये इंदिरा गांधी यांनी त्यांना केंद्र सरकारचे शैक्षणिक सल्लागार या पदावर नेमले. भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीपीआर) सदस्यसचिव (१९८१ ते ९०) आणि पुढे (२००० ते २००६) याच संस्थेचे अध्यक्ष, हॅम्बर्ग शहरात युनेस्को शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष (१९८७- ८९), ऑरोविल फाउंडेशनचे अध्यक्ष (१९९९- २००४) आदी अनेक पदांवरून त्यांनी काम केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National senior academics kirit joshi

First published on: 16-09-2014 at 01:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×