केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी अरविंद सुब्रमणियन यांची ठरलेली नियुक्ती होणार कधी एवढाच प्रश्न होता. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने तर, केवळ उच्चपदस्थांच्या होकारास उशीर होतो आहे म्हणून नियुक्ती- आणि भारताच्या आर्थिक सुधारणाही- रखडत असल्याची बातमी २ ऑक्टोबर रोजीच दिली होती, त्यानंतर पंधरवडय़ाने ही नियुक्ती झाली. त्यापूर्वी २००८ पासून भारतीय अर्थखात्याने ‘जी-२०’विषयक सल्ला देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ गटात ते होते. परंतु हे अपवाद वगळता त्यांची कारकीर्द देशाबाहेरच अधिक बहरली. अमेरिकेच्या राजधानीतील ‘पीटरसन इन्स्टिटय़ूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’चे फेलो, ही त्यांची स्थायी ओळख. असेच अभ्यासपद त्यांना सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट (सीजीडी) या संस्थेने दिले आहे. ऑक्सफर्डहून उच्चशिक्षण (एम.फिल. आणि डी.फिल.) पूर्ण केल्यानंतर, १९८८ पासून अशा जागतिक आव्हानांतच ते अधिक रमले. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) ज्या वाटाघाटींनंतर स्थापन झाली, त्या ‘गॅट’ (जागतिक व्यापार व करविषयक करार) आस्थापनेमधील अर्थतज्ज्ञ म्हणून १९८८ ते ९२ पर्यंत सुब्रमणियन कार्यरत होते. भारतासह सर्वच देशांकडे त्या वेळी त्यांना तटस्थपणे पाहता आले. तेथून १९९२ ते १९९९ पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत, मग वर्षभर हार्वर्डच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटमध्ये अध्यापन, त्यानंतर अमेरिकेच्या विद्यापीठीय वर्तुळातच राहून अन्य देशांसाठी सल्लागाराची भूमिका, असा त्यांचा प्रवास आहे. पीटरसन संस्था तसेच सीजीडी, हार्वर्ड आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठे, ब्रूकिंग्ज संस्था अशा- अमेरिकेत राहून जागतिक अर्थधोरणांचा अभ्यास करणाऱ्या वर्तुळात सुब्रमणियन नामांकित आहेत.
 संशोधन पत्रिकांमध्ये विपुल लेखन करणाऱ्या सुब्रमणियन यांची गणना, सर्वाधिक संदर्भमूल्य असलेल्या अर्थतज्ज्ञांमध्ये होते. ‘इंडियाज टर्न : अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक ट्रान्स्फॉर्मेशन’ (२००८), ‘एक्लिप्स : लिव्हिंग इन द श्ॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स’ (२०११) ही त्यांनी लिहिलेली दोन, तसेच सहलेखकांच्या साथीने आणखी तीन पुस्तके, जागतिक अर्थपुरवठय़ाचा आदर्श समतोल आणि विपरीत सद्य:स्थिती याविषयीच्या त्यांच्या अभ्यासाची साक्ष देतात.चिनी अर्थव्यवहाराचे खंदे टीकाकार, अमेरिकेप्रमाणेच भारताचीही बाजू लक्षात घेणारे आणि जागतिक आर्थिक धोरणांमध्ये भारताचे महत्त्व जाणणारे अर्थतज्ज्ञ, या त्यांच्या प्रतिमेस नवी जबाबदारी साजेशी आहे. दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजातून पदवी घेतल्यावर ते अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीए झाले होते, या अर्थाने दिल्ली व गुजरातशीही त्यांचा संबंध असल्याचे गमतीने म्हणता येईल!