अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा यांची नुकतीच निवड करण्यात आली. देवयानी खोब्रागडे प्रकरणानंतर नॅन्सी पॉवेल यांनी अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदाचा दिलेला राजीनामा, भारतातील सत्तांतर, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारताशी केलेला आण्विक सहकार्य करार आणि भारत-चीन या दोन राष्ट्रांमधील मत्री करार अशा सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ही नियुक्ती झाली आहे. वर्मा हे स्वत: वकील असून, राष्ट्रीय सुरक्षा आणि अण्वस्त्रप्रसारबंदी या विषयात त्यांचा हातखंडा आहे. वर्मा यांचे आई-वडील भारतीय. अगदी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांचा सहभाग होता. १९६०च्या दशकात वर्मा दाम्पत्य अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. तेथील पीटस्बर्ग विद्यापीठात डॉ. कमल वर्मा हे इंग्रजी साहित्य शिकवू लागले. या दाम्पत्याला झालेल्या पाच मुलांपकी रिचर्ड हे शेंडेफळ.
रिचर्ड यांची नाळ आई-वडिलांमुळे अशी भारताशी जोडली गेली. मात्र त्यांचे सगळे शिक्षण अमेरिकेतीलच. येथे त्यांनी आपले कायद्यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलात त्यांनी अधिवक्ता म्हणून नोकरीही धरली. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास लक्षात घेत अमेरिकेचे सिनेट सदस्य हॅरी रीड यांचे सल्लागार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विद्यमान परराष्ट्रमंत्री केरी यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानला अमेरिकेतर्फे देण्यात येणारी आíथक मदत तिप्पट करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच अमेरिकेतर्फे लादले जाणारे निर्यात नियंत्रण आणि आíथक र्निबधविषयक मसुदालिखाणाचे कामही वर्मा करीत असत. तत्पूर्वी त्यांनी नेपाळच्या संसदेसह संविधाननिर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला, रिड यांच्या सल्लागारपदी असताना नेवाडा येथील बांगलादेशी जनतेशी त्यांनी सुसंवाद प्रस्थापित केला आणि गेली ११ वष्रे ते अफगाणिस्तानातील परिस्थितीचे अत्यंत जवळून म्हणजेच परराष्ट्र व्यवहार उपमंत्री म्हणून अवलोकन करीत आहेत.
विविध कायदेशीर बाबींच्या संदर्भात त्यांचा भारताशीही वेळोवेळी संबंध येत गेला. २००८मध्ये दहशतवाद आणि संहारक शस्त्रास्त्रांचा प्रसार याविरोधात स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे सदस्यत्व त्यांनी भूषविले होते. एकीकडे भारतीय वंशाची भावनिक पाश्र्वभूमी आणि दुसरीकडे अमेरिकी संरक्षण यंत्रणा व परराष्ट्र व्यवहार यांच्याशी जुळलेले वैधानिक नाते अशी शिदोरी घेऊन रिचर्ड वर्मा भारतात दाखल होत आहेत. अफगाणिस्तानातून नाटो सन्याची प्रस्तावित माघार, पाकिस्तानातील अशांतता, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारतोल सुधारणे, सामरिक-आíथक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहकार्य अशा विविध आघाडय़ांवर राजदूत वर्मा कोणत्या भूमिका घेतात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.