ठाण्यात सदनिका बँकेकडे तारण असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तींना विकून एचडीएफसी बँकेची फसवणूक; तर डोंबिवलीत एकाच फ्लॅटसाठी तब्बल ११ बँकांकडून कर्ज घेऊन या सर्व बँकांची फसववणूक, अशा बातम्या अलीकडेच वाचल्या. विशेष म्हणजे यामध्ये एक डॉक्टरदेखील सामील आहे. असे घोटाळे सहज टाळता येण्यासारखे आहेत..
 देशात जेव्हा वाहन खरेदी केले जाते तेव्हा खरेदीदाराला वाहन उत्पादकाकडून त्या वाहनाची ‘प्रादेशिक परिवहन विभागा’त नोंदणी करून नोंदणी पुस्तक दिले जाते ज्याला आर.सी. बुक असे म्हटले जाते. हल्ली एटीएम कार्डाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या या नोंदणी पुस्तकात वाहनचालकाचे नाव, पत्ता, वाहनाचा संपूर्ण तपशील, जसे की वाहनाचा प्रकार, उत्पादनाची/नोंदणीची तारीख, इंधन, वजन, भार क्षमता, उत्पादकाचे नाव, वाहनाचा रंग ही माहिती एका सिम कार्डसदृश इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये साठवलेली असते. केवळ ४० हजार ते ५० हजार रुपये किमती असलेल्या वाहनांसाठी ही पद्धत सध्या वापरात येते आहे, तर मग लाखो रुपये किंमत असलेल्या सदनिकांसाठीदेखील ही पद्धत का वापरली जात नाही? वाहनांच्या ‘आर.सी. बुक’प्रमाणेच जर प्रत्येक सदनिकेच्या नोंदणीपश्चात तिचे अशाच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील नोंदणी कार्ड बनवले गेले, तर शासनाकडे राज्यातील सर्व सदनिकांची एकत्रित माहिती संबंधित विभागाच्या संगणकावर उपलब्ध होऊ शकते. राज्यात सर्व विभागांना पिनकोड क्रमांक तसेच भूखंडांना विशिष्ट क्रमांक दिले गेलेले आहेतच (ज्याला सिटी सव्र्हे अथवा कॅडेस्ट्रल सव्र्हे नंबर म्हटले जाते). हे इलेक्ट्रॉनिक कार्ड बनवताना शहराचे संक्षिप्त नाव, विभागाचा पिन कोड क्रमांक, सिटी सव्र्हे अथवा कॅडेस्ट्रल सव्र्हे नंबर, महानगरपालिकेचा विभाग आणि मग सदनिकेचा अनुक्रमांक अशा प्रकारे बनवले जाऊ शकते. या कार्डामध्ये या सदनिकेचा संपूर्ण तपशील- म्हणजेच सदनिकेचा पत्ता, चटई क्षेत्र, निर्मिती वर्ष, सदनिकाधारकाचा आधार कार्ड क्रमांक/ पॅन क्रमांक, आतापर्यंत झालेले हस्तांतरण, सदनिका जर बँकेकडे गहाण असेल तर तशी नोंद व सदनिकेसंबंधातील सर्व कागदपत्रांचे स्कॅिनग करून साठवणूक केल्यास आणि प्रत्येक खरेदी-विक्री/ गहाणवटदरम्यान या इलेक्ट्रॉनिक कार्डाशिवाय व्यवहार करण्यास मनाई केल्यास ग्राहकांची अथवा बँकांची फसवणूक होण्यावर नक्कीच र्निबध येतील.
शासनाकडे सर्व सदनिकांची आधार कार्डाप्रमाणेच केंद्रीभूत पद्धतीने माहिती जमा असल्याने या माहितीचा उपयोग अनेक कारणांसाठी होऊ शकेल.
– अशोक कुंडलिक शिंदे,  प्रतीक्षानगर, शीव

हा उत्सव अजूनही दलितांचाच का?
राजीव आरके यांचा ‘जयंतीच्या वळणावर’ हा लेख (११ एप्रिल) वाचून मन सुन्न झाले. सगळ्याच सण-उत्सवांना ओंगळवाणे रूप येत आहे. पण ज्या बाबासाहेबांनी देव नाकारला विभूतीपूजा नाकारली त्यांच्या जयंतीच्या नावाने हे चालले असेल तर निश्चितच खेदजनक. बाजारीकरणातून आलेला उथळपणा,चकचकीतपणा यांच्या अपरिमित अशा प्रभावातून हे घडते आहे.
हा बाजारीकरणातून निर्माण झालेला कोलाहल सुंदर अशा समाजबांधणीच्या विचारांनाच गिळतो आहे. जाणत्या आंबेडकरी जनतेला या वाढत चाललेल्या विरोधाभासाची जाणीव आहेच, हेही लक्षात घ्यायला हवे .
पण दुसरीकडे अजूनही भीमजयंती हा आंबेडकरी जनतेचाच उत्सव का आहे? ज्या बाबासाहेबांनी तमाम भारतीयांच्या विकासाचाच कायम विचार केला, जात-धर्म-िलग-पंथ-प्रांत असा कोणताही भेदभाव न करता समतेचा सतत आग्रह धरला; ते बाबासाहेब अजूनही दलितांचेच का? त्यांच्या विचारांची जपणुकीची जबाबदारी केवळ दलितांचीच का? याचाही विचार होणे (आरके यांचा लेख डोळ्यात अंजन घालणाराच आहे, याची जाणीव असूनही) गरजेचे वाटते.
डॉ . राजेंद्र गोणारकर, नांदेड

राजीनामा की भरपाई?
अलीकडेच अजित पवारांनी काढलेल्या उद्गारांमुळे सगळीकडे चच्रेचा महापूर आला होता. अजित पवारांनी माफीही मागितली; पण विरोधकांचा त्यावर विश्वास नाही असे दिसते. त्यांना अजित पवारांचा राजीनामाच पाहिजे आहे.
थोडा विचार केला तर हा सारा खटाटोप निर्थक वाटतो. अजित पवार राजीनामा देणे कठीण दिसते. बहुसंख्य मतदारांना नि समर्थकांना त्यांचे बोलणे न खटकण्याचीच शक्यता आहे, त्यामुळे त्यांचे ठरलेले (कमिटेड) मतदार विरोधकांकडे वळण्याची शक्यता नाही हे अजित पवारांना चांगलेच ठाऊक असल्यामुळे त्यांच्यात बदल होईल, असे वाटत नाही.
त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्या उजनी धरणाच्या पाण्यासाठी उपोषण आणि वरील नाटय़ घडले त्यासाठी ६५ दिवसांच्या उपोषणानंतर कोर्टाची ऑर्डर मिळाली. मधल्या काळात पाणी न मिळालेल्या लाभधारकांना नुकसानभरपाई देण्यात यावी. त्यासाठी लागणारा पसा संबंधित जबाबदारांकडून वसूल करण्यात यावा.
शरद कोर्डे, ठाणे</strong>

मोदी कशामुळे भोंदू?
‘ह. भ. प. राहुलबाबा’ या अग्रलेखानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत यांनी (लोकमानस,१२ एप्रिल) आपल्या नेत्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण नरेंद्र मोदी यांना कॅगचा हवाला देऊन ते भोंदू म्हणत आहेत. मग कॅगच्या अहवालातून यूपीए सरकारवर अनेकदा टीका झाली; त्याबद्दल भोंदू  कुणाला म्हणायचे?
गुजरातची सुधारणा सर्वाच्या नजरेत भरत असताना मोदी भोंदू कुणाला दिसतील? कावीळ झालेल्या माणसाला जग सर्व पिवळे दिसत असते असे म्हणतात! एरवी एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली एखादी निवडणूक हरली की  त्याला लगेच दुर्लक्षित केले जाते ही काँग्रेस ची परंपरा. पण बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात सारख्या ठिकाणी दणकून मार खाऊन सुद्धा राहुल बाबांना उपाध्यक्ष पद बहाल करणे याला काय म्हणावे? आज पाठिंबा काढला तर दुसऱ्या दिवशी सीबीआयचा ससेमिरा लावणारया काँग्रेसला मोदींविरोधात काही करता येत नाही कारण ते पूर्णत स्वछ आहेत. भोंदू कोण, हे न कळण्याइतकी जनता वेडी नाही.      
सुनील कुलकर्णी, पुणे

कर्नाटकी दंडेली घटनाविरोधी
‘बेळगावात पोलिसी दंडेली’ ही बातमी केवळ धक्कादायकच नव्हे, तर निषेध करण्यासारखी आहे (लोकसत्ता, १२ एप्रिल). आपल्याच देशात जर नागरिकांना त्यांचा सण साजरा करता येणार नसेल, तर मग ‘भारत माझा देश’ असे कसे म्हणायचे?  मी अमेरिकेत असताना गुढी पाडवा व दिवाळी हे दोन सण तेथील  भारतीय आनंदाने साजरा करताना पाहिले. परदेशात आमचे सण आम्हाला साजरे करता येतात तर बेळगावात का नाही? हा भारतीय घटनेचा स्पष्ट अनादर आहे. आता याबाबत काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे आहे.
मार्कुस डाबरे, पापडी, वसई

ते पहिलेच नव्हेत
अजित पवार यांच्या व्यक्तव्यावर किती दिवस गोंधळ घालायचा व विधानसभेचे कामकाज किती दिवस रोखायचे याचे भान विरोधकांनी राखणे गरजेचे आहे. १९८२ साली काही कार्यकत्रे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना पाणीटंचाई संदर्भात भेटायला गेले असताना त्यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते; परंतु त्या वेळी मीडिया व विरोधक आजच्यासारखे आक्रमक शैलीचे नव्हते. निवडणुका जिंकायच्या असतील तर २०१४ च्या निवडणुकांपर्यंत याच वादाचे ‘सिंचन’चालू ठेवणे हा विरोधकांच्या अपरिहार्यतेचाच भाग आहे? जाहीर सभेत शिवराळ भाषा वापरण्याची एका घराण्याची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न करणे ही मात्र अजित पवारांची मोठी चूकच म्हणता येईल.
सुरेश डुंबरे , ओतुर (पुणे)

नकारामागे अंतस्थ हेतू?
अजित पवार यांचा मतदारसंघ आहे पुणे जिल्ह्यातला. त्यांचे काका शरद पवार यांचा मतदारसंघ आहे माढा, जो आहे सोलापूर  जिल्ह्यात. मग सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवणाऱ्या उजनी धरणाचे पाणी न सोडण्यामागे अजित पवारांचा काही अंतस्थ हेतू होता काय?
स्पंदन पवार

सुशिक्षितांनी अलिप्त राहू नये
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्याचे होत असलेले विकृतीकरण हा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. बाबासाहेब सांगत की, थोर पुरुषांचे विचार अमलात आणले नाहीत तर ते नष्ट होतील. मनोरंजन व दिखाऊ जाहिरातबाजीच्या खर्चाला कात्री लावून शैक्षणिक व परिवर्तनवादी कार्यक्रम हाती घेतले तरच बाबासाहेबांना त्याचा जयंती दिनाची खरी मानवंदना ठरेल. यासाठी अलिप्त ना राहता सुशिक्षित व वरिष्ठ मंडळींनी पुढाकर घेऊन या जयंती कार्यक्रमात सुधारणा करण्याची गरज आहे.
– चंद्रकांत कांबळे, नवी मुंबई.