scorecardresearch

अग्रलेख : संतूरचे घराणे

धारदार नाक, चेहऱ्यावर आत्ममग्नतेची शांतता, उंचपुऱ्या, देखण्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारा शुभ्र केसांचा संभार, अतिशय अभिजात रंगसंगतीचा उमरावी पेहराव, गळय़ात त्या पेहरावावर लोंबणारी सोनेरी साखळी आणि हातात लांबून दिसणारी एक लाकडाची पेटी.

प्रज्ञा आणि मेहनत यांच्या बळावर साथसंगतीच्या वाद्यातून संगीत निर्माण करण्याची, संतूरच्या स्वरांचा तुटकपणा नाहीसा करण्याची किमया शिवकुमारांनी केली..

हे वाद्य अनेकपरींच्या संगीतशैलींत सामावणारे ठरूनही, त्यांनी त्यातील भारतीयत्व कायम जपले..

धारदार नाक, चेहऱ्यावर आत्ममग्नतेची शांतता, उंचपुऱ्या, देखण्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारा शुभ्र केसांचा संभार, अतिशय अभिजात रंगसंगतीचा उमरावी पेहराव, गळय़ात त्या पेहरावावर लोंबणारी सोनेरी साखळी आणि हातात लांबून दिसणारी एक लाकडाची पेटी. त्यावर सुरेख हस्तिदंती कोरीव काम.. शिवकुमार शर्मा यांचे मैफलीत येणे हे असे राजस असे. संतूर या वाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात उंचस्थानी नेऊन बसवणाऱ्या या कलावंताने स्वत:बरोबरच भारतातील आणि जगातील कोटय़वधी संगीतरसिकांचे आयुष्य स्वरमय करून परिपूर्ण करून टाकले. सात दशकांच्या या सांगीतिक कारकीर्दीत शिवजींनी जे प्रचंड कष्ट घेतले, त्याला त्यांच्या सर्जनाची जोड होती. त्यामुळे सगळय़ांनाच नव्या असणाऱ्या या वाद्याला प्रतिष्ठा मिळाली. संतूर हे मुळात काश्मीरच्या खोऱ्यातील समूह संगीतात साथसंगत करणारे एक लोकवाद्य. संगतीऐवजी संगीत निर्माण करण्यासाठी त्या वाद्याच्या क्षमता रुंद असाव्या लागतात. ते कलावंताशी बोलायला लागले, की त्यातून संगीतनिर्मितीच्या अनेक शक्यतांचा उगम होतो. स्वतंत्रपणे रागसंगीत वाजवण्याची क्षमता त्या वाद्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी आपली सारी बुद्धिमत्ता पणाला लावली आणि त्यात अनेक सुधारणा केल्या. वाद्यनिर्मितीमागे विज्ञान असते. एका अर्थाने ते विज्ञानाचे सौंदर्याला मिळालेले कोंदणच. वाद्य हे साधन. त्यासाठी वादकाची बुद्धी आणि प्रतिभा महत्त्वाची. शिवकुमारांकडे ती होती. त्यामुळेच या वाद्यातून संगीतनिर्मितीच्या असंख्य शक्यतांचा विचार त्यांना करता आला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘जन्माला’ आलेल्या या वाद्याच्या साथीने शिवकुमार शर्मा यांनी गेल्या सात दशकांत भारतातच नव्हे, तर जगात अस्सल भारतीयत्वाची एक खूणगाठ तयार केली.

 वाद्य तयार झाले, तरी त्याच्या वादनाची एक पद्धत आणि शैली विकसित व्हावी लागते. भारतीय वाद्यसंगीतात आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या सारंगी, वीणा, सतार, सरोद या तंतुवाद्यांनी स्वत:ची शैली तयार केली होती. अगदी व्हायोलीननेही आपले स्थान निर्माण केले होते. या सर्वानंतर संतूर आले. आलापी, गत, जोड, झाला या वाद्यवादन परंपरेच्या बरोबर राहूनही त्यात वेगळेपणा आणण्याचा शिवकुमारांचा प्रयत्न खास म्हणावा असा होता. त्यामुळेच या वाद्याला अभिजात संगीतानेही आपलेसे केले. संस्कृत वाङ्मयात शततंत्री वीणा (शंभर तारांची वीणा) असा उल्लेख आढळतो. मात्र काळाच्या ओघात ही वीणा लोकसंगीतातच रमली. तिचे पुनरुज्जीवन करून तिला भारतीयत्वाची ओळख प्राप्त करून द्यावी, असे शिवकुमारांना का वाटले असेल? त्यांचे वडील पंडित उमा दत्त हे गायक आणि तबलावादक होते. जम्मू आणि श्रीनगर आकाशवाणी केंद्रात संगीत विभागप्रमुख म्हणून कामही करत होते. त्यामुळे अगदीच लहान वयात गाणे शिकत असतानाच शिवकुमारांच्या हाती तबला आला. ते वाद्य त्यांनी इतके आत्मसात केले की, आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेक गायन-वादनाच्या कार्यक्रमांत त्यांनी तबल्यावर साथसंगतही केली. वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांनी संतूर हे वाद्य हाती दिले आणि ‘हेच वाद्य तुला नवी ओळख मिळवून देईल’, असा विश्वासही दिला. शिवजींनी ते वाद्य इतके आपलेसे केले की दोन-तीन वर्षांतच त्यांनी आकाशवाणीच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात वादन केले. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईतील हरदास संगीत संमेलनातील त्यांचा पहिला कार्यक्रम रसिकांच्या मनांत संमिश्र भावना निर्माण करणारा होता. सगळेचजण हे वाद्य प्रथमच ऐकत आणि पाहातही होते. काहींना ते खूपच भावले, परंतु अनेकांनी अभिजात संगीतासाठी हे वाद्य अपुरे असल्याची प्रतिक्रियाही दिली. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील गीतासाठी त्यांना वादन करण्याचे निमंत्रण दिले. हिंदी चित्रपट संगीतात पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव सुरू होत असतानाच संतूर या वाद्याने केलेला प्रवेश सगळय़ाच संगीतकारांसाठी सुखकारक होता. तरल आणि भावपूर्ण संगीताच्या अभिव्यक्तीसाठी संतूरचे आगमन होईपर्यंत कोणतेच वाद्य उपलब्ध नव्हते. नंतरचा इतिहास महत्त्वाचा आणि शिवजींची वेगळी ओळख सांगणारा असा. शांतारामांनी त्यांना चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी देऊ केली. शिवकुमारांनी मात्र परत जम्मूला जाण्याचाच निर्णय घेतला. नंतरच्या काळात अनेक चित्रपटगीतांमध्ये संतूरवादन केल्यानंतर त्यांनी हरिप्रसादजींबरोबर शिव-हरी या नावाने संगीतबद्ध केलेली चित्रपट गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘चांदनी’, ‘लम्हें’ या चित्रपटांतील गीते ही त्या रसिकप्रियतेची साक्ष देणारी ठरली आहेत. 

भारतीय वाद्यसंगीताचा अवकाश गायनापेक्षा व्यापक झाला, याचे कारण वाद्यांची संगीत निर्माण करण्याची अफाट क्षमता. संगीत मनात, मेंदूत तयार होऊन ते व्यक्त करण्यासाठी गळाही अपुरा पडू लागल्यानेच कलावंतांना वाद्यांचा शोध घ्यावा लागला असावा. त्यासाठी विज्ञानाने केलेले साह्य जेवढे मोलाचे, तेवढेच कलावंतांचे योगदानही. वाद्याला बोलते करणे, ही कला कष्टसाध्य असते. शिवजी त्यात कुठेही कमी पडले नाहीत. या वाद्याची ओळख होणे हेच त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. स्वतंत्र वादनाची निमंत्रणे मिळण्यासाठी ते अतिशयच महत्त्वाचे होते. कलावंताच्या कलात्मक घालमेलीच्या या काळात त्यांना त्यांची आत्ममग्नता उपयोगी पडली. स्वस्थचित्त राहून आपल्या प्रतिभेला साद घालत राहताना, सतत नवसर्जनाचा विचार करण्याची कुवत त्यांच्या अंगी होती, म्हणूनच संतूर या वाद्याला नंतरच्या काळात रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. गेल्या तीनचार दशकांत भारतातील एकही संगीताचा कार्यक्रम संतूरवादनाशिवाय पार पडू शकला नाही, एवढी लोकप्रियता शिवकुमारांच्या वादनाने मिळवली. तरीही त्याने ते कधी हरखून गेले नाहीत. आपल्यातील सर्जकशक्यता सातत्याने तपासून पाहताना, प्रत्येक कार्यक्रम ही आपल्या अस्तित्वाचीच परीक्षा आहे, याचे भान ठेवून त्यांनी वादन केले.

रागसंगीतातील उत्स्फूर्तता रसिकांच्या साक्षीनेच उलगडत जाते. कलावंत म्हणून जो शाश्वत आनंद साध्य होतो, तो रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. समोर बसलेल्या रसिकांना तो कसा मिळेल, एवढाच त्यांचा ध्यास होता. त्यात ते यशस्वी झाले, हे तर खरेच, परंतु लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असतानाही, आधीच्या कष्टाच्या पायऱ्या विसरता कामा नयेत, हे त्यांचे जीवनसूत्र होते.

जगातील अनेकविध संगीतशैलींत सामावून जाऊ शकेल असे वाद्य हाती असतानाही, शिवकुमारांनी त्यातील भारतीयत्व कायम जपले. १९६७ मध्ये प्रकाशित झालेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा त्यांचा अल्बम एवढा प्रचंड गाजला, की त्यामुळे त्यांची आणि त्याबरोबरच त्यामध्ये सहभागी झालेले बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया व गिटारवादक पं. ब्रिजभूषण काब्रा यांची नवी स्वरखूण रेखाटली गेली. संतूर या वाद्यात प्रत्येक स्वर स्वतंत्रपणे वाजतो. एकाच वेळी अधिक स्वरांच्या पुंजातूनही प्रत्येक स्वराची स्वतंत्रता सहज लक्षात येणारी असते. अन्य सगळय़ाच वाद्यांमध्ये एका स्वरावरून अलगदपणे दुसऱ्या स्वरापर्यंत पोहोचणारी मींड सहजपणे काढता येते. शिवजींनी त्यावरही एक अप्रतिम उपाय शोधला आणि या ‘कटनोट्स’च्या वाद्याला परिपूर्ण केले. संगीतातील हा अद्भुत चमत्कार त्यांच्या सर्जनाने साध्य झाला आणि स्वाभाविकच त्याचे अनुकरण होऊ लागले.

भारतीय संगीतात घराणे या संकल्पनेचे महत्त्व अधिक. ते त्याच्या नावात नसून सांगीतिक आविष्काराच्या सुस्पष्टपणे वेगळेपणा जपणाऱ्या सादरीकरणाच्या शैलीत सामावलेले असते. सतार किंवा सरोद या वाद्यांच्या क्षेत्रात सेनिया, इटावा, इमदादखानी यांसारखी तालेवार घराणी आपापली प्रतिष्ठा जपत असताना, संतूरवादनात स्वत:चेच घराणे निर्माण करणारे शिवकुमार शर्मा हे कालजयी ठरतात. त्यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

मराठीतील सर्व संपादकीय ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orange family instrument music musical style shivkumar sharma court music artist music lovers life vocal ysh

ताज्या बातम्या