अविजित पाठक

विविध परीक्षांचे निकाल जाहीर होण्याचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशोगाथा कानी पडण्याचा हा काळ. मात्र दरवर्षी या सुमारास मला काही प्रश्न अस्वस्थ करतात.

– सर्वोत्तम गुण मिळविण्याच्या, यशस्वी ‘परीक्षायोद्धे’ (एग्झाम वॉरियर्स) होण्याच्या चढाओढीत आपली नवी पिढी त्यापेक्षाही मोलाचे काही गमावून बसते आहे का? असे काही, जे अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचे आहे.

– आजचे अतिमहत्त्वाकांक्षी पालक आपल्या पाल्यांकडे ‘गुंतवणूक’ एवढ्याच सीमित दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत का? कोचिंग क्लासचालक या ‘अव्वलां’ना ‘ब्रँड’ म्हणून विकू पाहत आहेत का?

– बाजाराच्या कलानुसार झुकणाऱ्या या काळात ज्याला ‘मोजता येण्यासारखे यश’ म्हणून संबोधले जाते, त्यापलीकडेही आयुष्यात बरेच काही आहे की! हे ‘बरेच काही’ मुलांच्या लक्षातच येऊ नये, अशी सोय आपण करून ठेवली आहे का?

– एखाद्या परीक्षेत अव्वल स्थानी पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांना थेट गुरुस्थानी बसवून त्यांनी त्यांच्याच वयाच्या विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि यशाविषयी सल्ले द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या वृत्तनिवेदकांना कोणी रोखू शकेल का?

विद्यार्थीवृत्तीचा खोलात जाऊन विचार केला असता, असे वाटते की, या यशोगाथा आख्यायिकांच्या स्वरूपात सादर करणे थांबविले पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर देदीप्यमान उदाहरणे असायलाच हवीतच, त्याबद्दल वाद नाही. पण या उदाहरणांमुळे त्यांच्या विचारांची क्षितीजे विस्तारणे, त्यांच्या कुतूहलाला चालना मिळणे आणि त्यातून विज्ञान, काव्य, इतिहास, भूगोल, संगीत, सुतारकाम अशा हव्या त्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना नवे प्रश्न पडले पाहिजेत. हे प्रश्न सद्यस्थितीला धक्का देण्याएवढे नवे असले, तरीही बेहत्तर!

मात्र प्रत्यक्षात ‘सब घोडे बारा टके’ स्वरूपाच्या प्रचलित शिक्षणपद्धतीत शाळांना उपयुक्ततावादी ‘कोचिंग सेंटर्स’चे स्वरूप आले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील कुतूहल आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती अगदी सुरुवातीलाच उखडून टाकली जाते. सारे काही आधीच ठरलेले आहे, हे अगदी बालवाडीपासूनच जर मुलांच्या मनावर बिंबवले गेले तर त्यांच्यात काही देदीप्यमान घडवण्याची इच्छा, कुतूहल, प्रश्न विचारण्याची वृत्ती कशी विकसित होणार? ‘ए फॉर अमेरिका’, ‘आय फॉर आयआयटी’ आणि ‘एम फॉर एमबीए’ हे आधीच ठरलेले असताना, मुले स्वतंत्र विचार कसा करू शकतील? अशा वातावरणात त्यांना संस्कृती, मूल्ये किंवा उपजीविकेची साधने याविषयी नवे प्रश्न विचारण्यास वाव किंवा प्रोत्साहन मिळणे शक्य आहे का? जगणे म्हणजे अतिस्पर्धात्मक असणे, जगणे म्हणजे इतरांना मागे टाकत पुढे जात राहणे आणि जगणे म्हणजे पैशाची पूजा करणे अशा एकांगी गृहितकावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले जात असताना विद्यार्थ्यांना वेगळा विचार कसा करता येईल?

शिक्षणाचे जे प्रारूप आपण स्वीकारले आहे, त्यात ही कोवळी मुले उमलणे, बहरणे शक्यच नाही. या प्रारूपात केवळ यशस्वी होण्याचे डावपेच आणि सूत्रांनाच स्थान आहे. दृश्य यशाचे उपासक असलेल्या आपल्या समाजात या अव्वलांची विनम्रता लयाला न गेली तरच नवल. ही मुले अनेकदा हे विसरूनच जातात की प्रत्येकाकडे, अगदी अपयशी ठरलेल्यांकडेही जगाला सांगण्यासाठी स्वत:ची अशी एक गोष्ट असतेच.

या अव्वल मुलांना जर संवेदनशील पालक किंवा चौकटीबाहेरचा विचार करणारे धाडसी शिक्षक मिळाले नाहीत, तर यशस्वी होण्याच्या नादात ते आधीच अपयशी ठरतात. मी टीव्हीवर नुकतीच बंगालमधील अशाच एका यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत पाहिली. तो शाळेव्यतिरिक्त सात खासगी शिकवण्यांना जातो, रोज १० ते १२ तास अभ्यास करतो आणि त्याला फारच कमी मित्र आहेत, कारण त्याला त्यात वेळ ‘वाया’ घालवायचा नाही. हे ऐकून मी अक्षरश: हतबुद्ध झालो. या शिक्षणव्यवस्थेने त्याच्या बालपणाचा बळी घेतला आहे, किशोरवयातील अनोखे अनुभव त्याच्यापासून हिरावून घेतले आहेत आणि कुतूहलातला आनंद तर त्याने कधी अनुभवलेलाच नाही. त्याच्या कानात कुजबुजणारे एकही झाड नाही, गोष्टी सांगणारी नदी नाही, तिथे ना कधी सूर्योदय झाला आहे ना सूर्यास्त… अपले हे ‘अव्वल’ केवळ सांगितल्याप्रमाणे चोख कामगिरी बजावणारे रोबॉट झाले आहेत का? अशा व्यक्ती ज्या, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणार्धाकडे उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहतात. त्या क्षणार्धात आपण भौतिकशास्त्रातला एखादा प्रश्न सोडवला का किंवा ‘ओएमआर शीट’वर योग्य उत्तर निवडण्याचा वेग वाढवला का, याचाच हिशेब लावत बसतात.

या साऱ्यांचे आयुष्य साचातून काढल्याप्रमाणे अगदी एकसारखे भासले, तर त्यात काहीच आश्चर्य नाही. मी खूप वाट पाहिली, की कधीतरी एखादा ‘अव्वल’ म्हणेल, ‘मी अदूर गोपालकृष्णन् आणि सत्यजीत रे यांच्या चित्रपटांनी प्रभावित झालो आहे. मला सुद्धा चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात काम करायचे आहे’ किंवा ‘मला मेधा पाटकर आणि सुंदरलाल बहुगुणा ही प्रेरक व्यक्तिमत्त्वे वाटतात, मलाही शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी काम करायचे आहे’ किंवा कोणीतरी म्हणेल, ‘सी. व्ही. रमण आणि सत्येंद्रनाथ बोस माझे आदर्श आहेत आणि मला वैज्ञानिक व्हायचे आहे,’ मात्र नाही, अद्याप तरी असे काही ऐकायला मिळालेले नाही. उलट जवळपास प्रत्येक ‘अव्वल’ पाठांतर केलेल्या पोपटाप्रमाणे म्हणतो/ म्हणते ‘मला डॉक्टर, अभियंता किंवा आयएएस अधिकारी व्हायचे आहे.’ हा साचेबद्धपणा भयावह आहे. तरुणांमध्ये क्रांतिकारी वृत्ती किंवा कल्पकतेचा लवलेशही नाही. सामान्यपणाच्या पलिकडे जाण्याचे वेड नाही आणि ही स्थिती अतिशय दु:खद आहे.

आपण कोणत्या प्रकारचा समाज घडवत आहोत? आपल्यालेखी धर्म म्हणजे कर्कश कर्मकांडांपलीकडे काहीही नाही. देशभक्ती म्हणजे आपल्याच कल्पनेतून जन्म घेतलेल्या ‘देशाच्या शत्रूं’विषयी असलेल्या हिंसक भावना. मुख्य प्रवाहातील राजकारणाचा मूल्यांशी सुतराम संबध राहिलेला नाही. राजकारणात प्रचंड विषमता रुळली आहे. त्यामुळेच सर्जनशील व्यक्तींना तुरुंगवास भोगावा लागतो. प्रत्येक गोष्ट विरोधी चष्म्यातूनच पाहिली जाते. दुर्गुणांना गुण म्हणून नावाजले जाते, कुरूपतेला सुंदर ठरवले जाते आणि आत्ममग्नतेला विनम्रता म्हटले जाते. अशा या समाजात शिक्षणव्यवस्थेतील सकारात्मकतेचा बळी जात आहे. त्यामुळे आज टागोरांचे शांतिनिकेतन इतर कोणत्याही सर्वसामान्य कर्कश आणि प्रक्षुब्ध विद्यापीठासारखेच झाले आहे आणि त्यात काहीच आश्चर्य नाही. आज जिद्दू कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक आदर्शांचा प्रसार करणे आणि त्यांना एका विशिष्ट बुद्धिजीवी वर्गाच्या पलीकडे घेऊन जाणे कठीण आहे. गांधीजींना केवळ स्मारके आणि संग्रहालयांपुरतेच सीमित करण्यात आले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील ‘टॉलस्टॉय फार्म’मध्ये केलेल्या शिक्षणविषयक प्रयोगांचा अभ्यास करण्यात, कोणालाही स्वारस्य नाही.

या साऱ्याचा दृश्यपरिणाम म्हणजे राजस्थानातील कोटा हे शहर… आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कुरूप चेहरा तिथे स्पष्ट दिसतो. हे शहर विद्यार्थ्यांसाठी एक ‘मुक्तिस्थळ’ झाले आहे. तेथील ‘एड-टेक कंपन्या’ आपल्या यशाच्या कहाण्या सांगणाऱ्या पत्रकांच्या जादुई छडीने मध्यमवर्गाला भुलवण्यासाठी सज्ज असतात. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेतील जीवघेण्या स्पर्धेच्या पोकळ वाश्यांचेच प्रतीक ठरते- या पत्रकांवर विराजमान झालेली ‘अव्वलांची मांदियाळी’!

लेखकाने ‘ एज्युकेशन ॲण्ड मॉरल क्वेस्ट’, ‘सोशल इम्प्लिकेशन्स ऑफ स्कूलिंग’ आदी पुस्तके लिहिली असून ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापन करतात.