scorecardresearch

पहिली बाजू : भ्रमनिर्मितीचे ठेकेदार!

समाजातील बहुसंख्य घटक अविचारानेच (केंद्र) सरकारला पाठिंबा देत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे..

केशव उपाध्येभाजप (महाराष्ट्र प्रदेश)चे मुख्य प्रवक्ते

समाजातील बहुसंख्य घटक अविचारानेच (केंद्र) सरकारला पाठिंबा देत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे..

‘लेखक हा चिंतनशील मानव आहे,’ ही बाब उदगीरच्या ९५व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी मान्य केल्याने या संमेलनाच्या मंचावरून त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या चिंतनाची दखल प्रत्येक अन्य क्षेत्राने घ्यावयास हवी. ‘काळ तर मोठा कठीण आला आहे, असे म्हणण्याची एक प्रथा काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकांनी नोंदवून ठेवली आहे,’ असे ते म्हणतात. साहजिकच, लेखकाच्या चिंतनशील मनास समाधान वाटेल किंवा प्रतिभेस प्रोत्साहन मिळेल, असा काळ कोणत्याच टप्प्यावर याआधी कधी आला होता किंवा नाही याविषयीच सासणे यांनी या एका वाक्यातून शंका व्यक्त केली. सामान्य माणसाच्या नजरेतून या वाक्याकडे पाहिले, तर काळाचा आजवरचा कोणताही टप्पा अशा चिंतनशील लेखकास समाधानाचा किंवा प्रतिभेस प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल नव्हता, असेच दिसते. सासणे यांच्या म्हणण्यानुसार, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असे लिहून ठेवण्याची चिंतनशील म्हणविणाऱ्या प्रत्येक लेखकाची प्रथाच असेल, तर तेच वाक्य संमेलनाच्या मंचावरून अध्यक्षपदावरून बोलताना उद्धृत करून सासणे यांनी ती प्रथा पुढे नेण्याचे काम केले, एवढेच म्हणता येईल. थोडक्यात, आपण त्या प्रथेशी प्रामाणिक राहिलो, प्रथेशी प्रतारणा न करता काळाच्या प्रत्येक टप्प्यानुसार त्याचे ज्या शब्दांत वर्णन करावयाचे असते, ते करून प्रथा पाळली, एवढा चिंतनशील लेखकास आवश्यक असलेला प्रामाणिकपणा सासणे यांनी दाखविला. काळ आपल्याला वेगवेगळय़ा कालखंडातून फिरवत असतो, त्यानुसार सध्या तो आपल्याला भ्रमयुगात फिरवून आणत आहे, असे सासणे यांना वाटते. ते साहजिकच आहे. साहित्य संमेलनाच्या मंचावरून पार पाडावयाच्या प्रथांशी ते सुसंगतही आहे. साहित्य संमेलनात चिंतनशीलतेच्या नावाखाली काही वादग्रस्त किंवा सामान्य जनतेच्या मानसिकतेला धक्का देणारे विधान केल्याखेरीज त्याची तात्पुरतीदेखील चर्चा होत नाही. सासणे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याएवढी पात्रता असलेले साहित्यिक आहेत, हेही अनेकांना त्यांच्या निवडीनंतर समजले, अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरू होती. त्यांच्या भाषणानंतर त्यांच्या पात्रतेची पातळी साहित्य आणि सर्वसामान्य समाजविश्वाला आता नक्कीच उमगली असेल.

साहित्य संमेलने आणि वाद हीदेखील अशीच एक परंपरा आहे. विशेषत: केंद्रात किंवा राज्यात हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर असताना साहित्य संमेलनांच्या मंचावरून वादांची फोडणी घालण्याची अहमहमिका सुरू होते. हे नवे नाही. जावेद अख्तर या अमराठी गीतकारास संमेलनाच्या मंचावर निमंत्रित करून त्यांच्या मुखाने मोदी सरकारवर दुगाण्या झाडण्याचा प्रयत्न याआधी झालेला मराठी माणसाने पाहिला आहे. मोदी सरकारचा काळ कठीण वाटणाऱ्या सासणे यांच्यासारख्या चिंतनशील लेखकास महाराष्ट्रातील काळाचे मात्र जरादेखील भान नाही, की ते स्वत: ज्या समाजाच्या नावाने खडे फोडतात, त्यासारखेच संभ्रमावस्थेत सापडले आहेत, हे न कळण्याएवढा मराठी माणूस दूधखुळाही नाही. साधारणपणे चिंतनशील व पुरोगामी विचाराची माणसे ज्यांचे अस्तित्व मानत नाहीत, त्या पुराणकथांचे खरेखोटे संदर्भ देत सासणे यांनी काळरात्र नावाच्या एका कालखंडाचे वर्णन केले आहे. त्याची पार्श्वभूमीदेखील संमेलनाच्या त्या परंपरेशी निष्ठा राखण्याच्या लाचार भूमिकेशीच मिळतीजुळती आहे.

अलीकडे संमेलने सरकारी अनुदानाच्या तुकडय़ांवर भरविली जातात आणि मिळणारे सरकारी अनुदान कसे तुटपुंजे आहे, हे दाखविण्याच्या स्पर्धेतून सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन कसे केले जाते, ते याआधीही जनतेच्या नजरेस आलेले आहे. साहित्य संमेलने स्वत:च्या आर्थिक पायावर न भरविता सरकारच्या पाठबळावर भरविण्याच्या प्रथेला गालबोट लागू नये, याकरिता संमेलनाच्या मंचावरून आधार देणाऱ्या सत्तेच्या भूमिकेशी विसंगत मते न मांडता किंवा त्यांच्या नेत्यांना न दुखविता त्यांना मौज वाटेल, समाधान होईल अशी भूमिका घेऊन त्यास चिंतनशीलतेचा, वैचारिकतेचा वगैरे मुलामा चढवून ते आपले क्रांतिकारी विचार वगैरे आहेत, असे भासविण्याचीदेखील एक मोठी स्पर्धा साहित्यक्षेत्रात सतत सुरू असते. अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीस त्या स्पर्धेत सहभागी व्हावेच लागत असल्याने, स्पर्धेत यश किती मिळते याचे मोजमाप करण्याऐवजी, आपण त्या स्पर्धेसाठी अगदीच नालायक ठरणार नाही, याची काळजी तरी घ्यावीच लागते. संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्यिकांचे कान टोचले. साहित्य संमेलनाच्या मंचावरून विशिष्ट राजकीय पक्षाच्या प्रचाराची भूमिका घेतली जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साहजिकच, या अपेक्षेस सुरुंग लागू नये आणि त्यांचीच री पुढे ओढून त्या मताशी निष्ठा व्यक्त करायवयाची असेल तर एक पाऊल पुढे टाकून पवार यांना अभिप्रेत असलेल्या त्या विशिष्ट विचारसरणीवर दुगाण्या झाडल्याच पाहिजेत, असे सासणे यांना वाटले असावे.

सरकारी पैशाच्या पाठबळावर होणारी ही संमेलने असल्याने सरकारच्या भावना जपल्याच पाहिजेत, असा समज दुर्दैवाने बळावला असावा. अन्यथा, साहित्यिक विश्वावर प्रेम करणाऱ्या समाजाच्या भावनांचाही विचार या मंचांवरून केला जायला हवा होता. पण हाती वाडगा घेऊन सरकारदरबारी उभे राहाणाऱ्या साहित्यिकास सामान्यांच्या भावनांचे काही सोयरसुतक राहिलेले नसावे. त्यामुळेच, लांगूलचालनी प्रथेशी प्रामाणिक राहाण्याच्या परंपरेस धक्का लावू पाहाणारा साहित्यिक सूर तेथे वज्र्य ठरविला जातो. ठाण्याच्या साहित्य संमेलनाने हेदेखील दाखवून दिले होते. त्यासाठी अशा प्रामाणिक सुराचा विरोध करणारी एक मोठी फळी आधीपासून बांधली जात असते. राजकीय तिरस्कार आणि मत्सराने पुरेपूर भारावलेले काही वैफल्यग्रस्त राजकारणी साहित्यक्षेत्राची ही कमकुवत बाजू नेमकी ओळखतात आणि आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या सुराची री ओढण्यास अशा फळीला भाग पाडतात, हेही याआधी स्पष्ट झालेले आहे. याच वैफल्यातून याआधी जावेद अख्तर, नयनतारा सेहगल आदी अमराठी लोकांना मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मराठी साहित्यप्रेमींच्या माथी मारण्याचे प्रयत्नही झालेच होते. त्यातूनच, साहित्यिक संस्कृतीलाही राजकीय विचारवादाचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरू असतो. भारतीय संस्कृती, परंपरा, समाजजीवन यांच्यावर सातत्याने दुगाण्या झाडून, त्या परंपरा-संस्कृतीस बुरसटलेपणाचा ठपका ठेवून हद्दपार करण्याकरिता या मंचाचा वापर सातत्याने होतो. सामान्यत: परंपरा, संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्यांकरिता दुर्दैवी वास्तवाची बाजू या मंचावरून उघड होते. सरकारी पुरस्कार, सरकारी अनुदानातून साहित्याची छपाई, आदींचा तपशील तपासला, तर असे विचार मांडणाऱ्यांपैकी किती चिंतनशील अशा व्यवहारांतून स्वत:स लेखक म्हणून घडविण्याचा आटापिटा करत असतात, याचे रंजक मासले उघड होतील.

सासणे यांना आपल्या भाषणातून साहित्य व्यवहारांचा परामर्श घेतानाही केंद्रातील हिंदूत्ववादी सरकारविरोधाचा कडवट व मत्सरी सूर लपविता आलेला नाही. लेखकाने सत्य सांगितले पाहिजे, असे सासणे म्हणतात. त्यामध्ये कोणाचेच दुमत असता नये. या संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यविश्वाकडून असलेल्या अपेक्षांचा उच्चार केला. सामान्य माणसालाही साहित्य क्षेत्राकडून त्याच अपेक्षा आहेत. साहित्य क्षेत्राने स्वत:स राजकारणात गुरफटवून घेऊ नये. वास्तवाचे भान ठेवावे आणि संभ्रम माजविण्याच्या राजकीय चालबाजीत स्वत:स झोकून देऊ नये. केंद्रातील भाजप सरकारच्या काळावर ठपका ठेवण्याच्या प्रयत्नात, त्या सरकारवर दृढ विश्वास ठेवणाऱ्या आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यामध्येच देशहित आहे, याची खात्री बाळगणाऱ्या समाजास अल्पमती ठरविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपण कोठे आहोत, कोणत्या काळात ढकलले जात आहोत, याचे परिणाम काय होतील, हे समजावण्याच्या प्रयत्नांत समाजातील बहुसंख्य घटक अविचारानेच सरकारला पाठिंबा देत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. संभ्रमावस्थेचा फैलाव करण्याचा एक क्षीण प्रयत्न या भाषणात दिसतो. असा प्रयत्न म्हणजे, लेखकाने सत्य सांगितले पाहिजे या स्वमुखाने व्यक्त होणाऱ्या भूमिकेशी धादांत प्रतारणा आहे. कारण भारतीय समाज सुजाण आहे. कोणताही सत्ताधीश समाजहितास तिलांजली देऊन स्वहितासाठी सत्ता राबवू पाहातो, तेव्हा त्याला उखडून फेकून देण्याची हिंमत या समाजाने दाखविलेली आहे. सासणे यांनी महाराष्ट्रापलीकडचे पाहून संभ्रम माजविण्याचा प्रयत्न केला. त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राच्या वास्तवाकडे पाहून सत्य चित्र रंगविण्याचे धाडस दाखविले असते, तर काळ तर मोठा कठीण आला आहे, हे त्यांना अधिक विश्वासाने आणि छातीठोकपणे सांगता आले असते.

पण त्याला ते तरी काय करणार? कारण, ज्या आधारवडाच्या छायेखाली उभे राहून बोलावयाचे असते, त्याच्याशी प्रतारणा न करण्याची प्रथा पाळावी लागतेच ना?

मराठीतील सर्व पहिली बाजू ( Pahili-baaju ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp keshav upadhye article bharat sasane speech at 95 akhil bharatiya sahitya sammelan zws

ताज्या बातम्या