अनुराग ठाकूर (क्रीडा, युवा विकास तसेच  माहिती – प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळाच्या व खेळाडूंच्या स्थितीकडे लक्ष देणारे नेतृत्व, हे देशाच्या ऑलिम्पिक-भरारीचे महत्त्वाचे कारण आहे..

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू या खेळाडूंना चुरमा, आइस्क्रीम हे खाद्यपदार्थ देताहेत, बजरंग पुनियाबरोबर हास्यविनोद करताहेत, रवी दहियाला ‘आणखी थोडं हसत जा’ म्हणून सांगताहेत आणि मीराबाई चानूचे अनुभव ऐकताहेत ही दृश्ये पाहून प्रत्येक भारतीयाला आनंद झाला असेलच. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूबरोबर पंतप्रधानांनी थोडा वेळ घालवला हे त्या खेळाडूंसाठी अतिशय उत्साहवर्धक होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते पॅराऑलिम्पिकच्या पथकाला भेटले आणि त्यांनी दिव्यांग खेळाडूंचा प्रेरणादायक प्रवास समजून घेतला.

या वागण्यातून खेळांची आवड आणि भारतीय खेळाडूंसाठी अधिक काहीतरी करण्याची इच्छा हे नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचे वेगळे पैलू आपल्यासमोर येतात. टोक्यो ऑलिम्पिक सुरू होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी आपली तयारी कुठपर्यंत आली आहे, कशी झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी एक सविस्तर बैठक घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यांनी ज्यांनी जवळून बघितले आहे, ते पंतप्रधान क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी किती प्रयत्नशील असतात याचा हवाला देऊ शकतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘खेल महाकुंभ’ हा कार्यक्रम सुरू केला होता. त्याअंतर्गत अगदी तळच्या स्तरापासून खेळातल्या सहभागाला प्रोत्साहन दिले गेले. हेसुद्धा कुठे तर खेळातील गुणवत्तेचा फारसा इतिहास नसलेल्या गुजरातसारख्या राज्यात. आणखीही एका मार्गाने त्यांनी खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे ते ‘भारतामधल्या खेळाडूंचे’ असे पहिले आणि अग्रगण्य पंतप्रधान आहेत असं मला वाटतं.

काही दिवसांपूर्वी २०१३ चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात असे दिसत होते की मोदी पुण्यामधल्या काही महाविद्यालयीन तरुणांसमोर भाषण करत होते. ‘भारतामध्ये भरपूर गुणी खेळाडू आहेत, पण ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या वाढवण्यासाठी मात्र आपल्याला झगडावं लागतं’ अशी खंत त्यांनी त्या भाषणामधून व्यक्त केली होती. ‘ऑलिम्पिकमधल्या यशापासून आपल्यासारख्या देशानं वंचित राहण्याचं काहीच कारण नाही’, असेही त्यांनी त्या भाषणात सांगितले. त्यांच्या मते ऑलिम्पिकमधल्या पदकांच्या तक्त्यामध्ये आपल्या देशाचा क्रमांक तळाशी असतो, याला  खेळाडू कारणीभूत नाहीत, तर आपण त्यांच्यासाठी योग्य ते क्रीडामय वातावरण तयार करून देऊ शकत नाही हे त्यामागचं कारण आहे. महिला तसेच पुरुषांच्या हॉकी संघाने तर जाहीरपणे सांगितले आहे की एखाद्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर आलेल्या पंतप्रधानांच्या फोनमुळे त्यांचे मनोबल वाढण्यास खूप मदत झाली. २०१९ मध्ये नीरज चोप्राला दुखापत झाली होती, तेव्हा पंतप्रधानांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या या कृतीला तेव्हा सगळ्या पातळ्यांवरून चांगली दाद मिळाली होती.

लोकांना खेळांमध्ये खूप रस असतो, पण त्यात काही करण्याची, सहभागी होण्याची वेळ येते तेव्हा फारसे कुणी पुढे येत नाही. क्रीडा क्षेत्रासंदर्भातल्या समस्यांचे हे मूळ आपल्या पंतप्रधानांना नेमके समजले आहे असे म्हणता येईल. ऑलिम्पिकमधल्या पदकवीरांना भेटल्यानंतर पंतप्रधानांनी केलेल्या टिपण्णीमध्ये वास्तव आणि आशावाद या दोन्हीचे मिश्रण होते. ते म्हणाले, ‘खेळांमधले आत्ताचे हे यश बघितले तर मला खात्री आहे की खेळांकडे बघण्याचा मुलांच्या पालकांचा दृष्टिकोन यापुढच्या काळात नक्कीच बदलेल.’ आपल्या देशाची पदकसंख्या वाढते आहे असे पालक बघतील तेव्हा आपल्या मुलानेही एखादा खेळ खेळावा याकडे त्यांचा कल वाढेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सरकारची सगळी यंत्रणा तसेच कार्पोरेट क्षेत्र आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे असे ते पाहतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की क्रीडा हे आपल्या पाल्यासाठी एक आकर्षक तसेच प्रतिष्ठा मिळवून देणारे क्षेत्र आहे.

क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाला यशस्वी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न करू शकतो. त्यातला एक मार्ग म्हणजे ‘एक राज्य, एक खेळप्रकार’ असे धोरण राबवण्यासाठी आपल्या राज्यांना प्रोत्साहन देणे. ते एकाच खेळाला प्राधान्य देऊ शकतात किंवा उपलब्ध गुणवत्ता, नैसर्गिक आवड, हवामानाची परिस्थिती आणि उपलब्ध सुविधा यांच्यावर आधारित काही खेळांना (अर्थातच इतर खेळांकडे दुर्लक्ष न करता) प्रोत्साहन देऊ शकतात. यातून एकाच खेळावर लक्ष केंद्रित करता येईलच, पण त्याबरोबर त्या त्या राज्यामध्ये असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल.

पुढे जाऊन देशामधल्या कार्पोरेट जगतालाही ‘एक खेळ, एक कार्पोरेट’ या धोरणात सहभागी करून घेता येईल. आज जगभरात सगळीकडेच होतकरू तरुणांमधल्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, लीग उभ्या करणे, खेळांची लोकप्रियता वाढवणे, मार्केटिंग करणे तसेच खेळाडूंसाठीचा निधी वाढवण्यासाठी ते वापरत असलेल्या वस्तूंच्या जाहिराती करणे यासाठी कार्पोरेट कंपन्या पुढाकार घेताना दिसत आहेत. या कंपन्या आणि क्रिकेटसारखा खेळ यांच्या हातमिळवणीचे परिणाम आपण गेली कित्येक वर्षे बघतो आहोत. त्यात भर म्हणजे आता नव्या फिनटेक (फायनान्स आणि टेक्नॉलॉजी) किंवा युनिकॉर्न कंपन्याही प्रायोजकत्व देतात, हे प्रमाण वाढीस लागले आहे. त्याआधी ग्राहकोपयोगी वस्तूंचे बॅ्रण्ड्स प्रायोजक असत. ही परिस्थिती खेळासाठी, खेळाडूंसाठी आणि कंपन्यांसाठी अशा सगळ्यांसाठीच फायद्याची आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजामधल्या अगदी तळच्या स्तरापासून क्रीडा संस्कृतीचा विकास करत जाणे. त्यासाठी वेगवेगळ्या खेळांचे वेळापत्रक स्थानिक, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर तातडीने विकसित करणे, वाढवणे आवश्यक आहे. आपल्या देशात प्रत्येक खेळासाठी राष्ट्रीय पातळीवरची लीग असणे गरजेचे आहे. त्यातून तरुण खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या पातळ्यांवर आपापले कौशल्य अधिक विकसित करण्याची संधी मिळेल. त्याबरोबर देशामध्ये क्रीडाविषयक सुविधा वाढतील आणि क्रीडाविषयक एक परिसंस्था उभी राहील. ऑलिम्पिक खेळाडू घडवण्यासाठी आपल्याकडच्या विद्यापीठांच्या व्यवस्थेचा देखील चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल असे मला वाटते. या सगळ्या गोष्टींमुळे खेळांमधला रस आणि सहभाग वाढायला निश्चितच मदत होईल.

दर्जा तसेच जागतिक मानकांवर भर दिल्याचाही आपल्या देशाच्या क्रीडा क्षेत्राला फायदा झाला आहे. आधीची पद्धत किचकट नियमांनी बद्ध, नोकरशाहीवर आधारित असलेली तसेच वैतागवाणी होती. मोदी खेळाडूंकडून थेट माहिती मिळवण्यास प्राधान्य देत असल्यामुळे त्यांच्या सरकारच्या काळात ही पद्धत बदलली. टोक्यो २०२० च्या भारतीय खेळाडूंच्या पथकाला भेटल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना, ‘देशात क्रीडाविषयक सुविधा वाढवण्यासाठी, त्या अधिक चांगल्या करण्यासाठी काय करता येऊ शकतं या संदर्भातली तुमची मतं वेळोवेळी माझ्यापर्यंत पोहोचवा’, असे सांगितले. मीराबाई असो की मेरी कोम असो, त्यांना झालेल्या दुखापतींवर त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यात पंतप्रधानांनी जातीने लक्ष घातले आहे.

आपल्या क्रीडा क्षेत्रावर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे (खरे तर हा विरोधाभास आहे.) आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘एग्झ्ॉम वॉरियर्स’ या पुस्तकात आणि ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात या मुद्दय़ाचा उल्लेख केला आहे. प्ले स्टेशन इतकेच मैदानावर जाऊन खेळायलाही महत्त्व द्या, असे त्यांचे म्हणणे आहे. ते आधुनिक तंत्रज्ञान नाकारत नाहीत, पण त्यांना मुलांनी एकत्र येणे आणि खेळणे यांतील निरोगी समतोल अपेक्षित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातही क्रीडा शिक्षण हा एक आकर्षक पर्याय असेल अशी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. येत्या काही वर्षांमध्ये मणिपूरला देशातील पहिलेवहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. खेळाडूंसाठी ते वरदानच ठरेल आणि त्यांतून इशान्येकडच्या राज्यांमध्ये समृद्ध क्रीडा संस्कृती विकसित होईल.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तरी अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या. अ‍ॅथलेटिक्समधले पहिले सुवर्णपदक आपण या ऑलिम्पिकमध्ये जिंकले. आपल्या हॉकीच्या टीमने अनेक वर्षांनी कमाल करून दाखवली. थाळीफेक, गोल्फ, तलवारबाजी अशा खेळांमध्येदेखील आपण यश मिळवले. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’, ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ या मोहिमांनी पाया रचला आहे. त्यातून उभ्या राहणाऱ्या या नव्या भारतामध्ये यश मिळवण्यासाठीची आस आहे. त्यासाठी आपल्या खेळाडूंना सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आपले पंतप्रधान खेळामधल्या सर्वोत्तमाच्या शोधात आहेत.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp minister anurag thakur article praising narendra modi for encouraging olympic medal winners zws
First published on: 24-08-2021 at 01:06 IST