|| पीयूष गोयल : वाणिज्य तसेच उद्योगमंत्री, वस्त्रोद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना महासाथीच्या आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून देश आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. दुबईमधील ‘एक्स्पो २०२०’ मधून आपण जगाला या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो आहोत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना २ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना सर्वसमावेशक विकास, स्वच्छता आणि स्वराज्य ही त्यांनी पाहिलेली देशाबद्दलची स्वप्ने प्रत्यक्षात येताना स्पष्ट दिसत आहेत. आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान या नात्याने सर्वोच्च पदावरून २० वर्षे नि:स्वार्थी तसेच अथक लोकसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारच्या, सगळ्यांना विशेषत: गरीब आणि गरजू लोकांना खरेखुरे स्वराज्य मिळावे या मिशनचे प्रमुख आधार राहिले आहेत. करोनाच्या महासाथीने तर या निश्चयाला अधिकच बळकटी दिली आहे.

एखादा देश अडचणींना कसा सामोरा जातो यातून त्या देशाची आव्हानात्मक परिस्थितीत मोठी पावले उचलणे, क्षमता वाढवणे आणि महत्त्वाकांक्षी ध्येये साध्य करण्यासाठी नियोजन करणे या सगळ्याबाबतची वागणूक नेमकी कशी आहे हे समजते. कोविड १९ च्या महासाथीशी भारताने दिलेला लढा हे आपत्तींचे इष्टापत्तींमध्ये रूपांतर करण्याचे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. या महासाथीच्या काळात सगळे जग बचावात्मक पवित्र्यामध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारत मात्र सुधारणांना आणि शाश्वत विकासाच्या प्रक्रियेला सामोरा जातो आहे. 

गेल्या सात वर्षांमध्ये आपण ज्या सुधारणा करायला घेतल्या आहेत, त्यातही विशेषत: करोनाच्या महासाथीच्या काळात ज्या सुधारणांना सुरुवात झाली आहे, त्यांच्यामुळे देशातील उत्पादन तसेच आपली निर्यात क्षमता वाढायला आणि भारत एक जागतिक आर्थिक केंद्र बनायला चालना मिळाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपली क्षमता अधिकच वाढणार आहे. भारत हा माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती तसेच अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आधीपासूनच आघाडीवर आहे. या क्षेत्रांमधील देशातील संशोधन तसेच नवनिर्मितीच्या क्षमतांचा जसजसा आणखी विकास होईल तसा कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स या नव्या जमान्यातील तंत्रज्ञानाचा देशालाच फायदा होईल. 

या महासाथीमधून आपण जे धडे शिकलो, त्यातूनदेखील आपला आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता आपण कोणत्याही आव्हानावर आपल्या वैज्ञानिक, उद्योगशील तसेच संशोधन आणि विकसन करण्याच्या क्षमतांच्या मदतीने मात करू शकतो. औषधनिर्मिती वा हेल्थकेअर उत्पादने विकसित करणे असो किंवा भारतातच उत्पादित झालेल्या दोन लशींवर आधारित जगातला सगळ्यात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम राबवणे असो, भारताने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

भारताला जो वेगवान आर्थिक विकास अपेक्षित आहे त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून तो साध्य करण्यासाठी इथून पुढच्या काळात दर्जा आणि उत्पादकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कोविड-१९ च्या महासाथीमुळे झालेला परिणाम ओलांडून आता भारताची अर्थव्यवस्था येत्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या त्रैमासिक सत्रात २०.१ टक्क्यांनी वाढली आहे. त्याउलट गेल्या वित्तीय वर्षात त्या वर्षाच्या पहिल्या त्रैमासिक सत्रात हाच दर उणे २४.४ टक्के होता.  आपण परिस्थितीवर मात करून वर येतो आहोत, याचे हे फक्त भक्कम लक्षण नाही तर आर्थिक पातळीवर उसळून वर येण्याची आपली क्षमता त्यातून दिसते. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. ती आपली फार मोठी जमेची बाजू आहे. आपल्या देशातील नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यातून आपली उत्पादकता वाढून त्याचा आपल्या विकासाच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये पुढच्या २५ वर्षांमध्ये भारत कसा असेल (अमृत काल) याबद्दलचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या उद्दिष्टासह असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन मांडला जाईल. १५ ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे उद्दिष्ट नव्याने मांडले. ते म्हणाले, ‘‘देशाने आणि देशामधील नागरिकांनी अधिकाधिक प्रगती करावी हेच ‘अमृत काल’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या १०० वर्षांचे उद्दिष्ट आहे. सोयीसुविधा आणि त्यांचा दर्जा यांच्या बाबतीत शहर आणि गाव असा भेद नसेल असा भारत निर्माण करणे हे ‘अमृत काल’चे उद्दिष्ट आहे. जिथे सरकार नागरिकांच्या जीवनात उगीचच ढवळाढवळ करणार नाही, असा भारत निर्माण करणे हे ‘अमृत काल’चे उद्दिष्ट आहे. जगामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व पायाभूत सुविधा जिथे असतील असा भारत उभा करण्याचे ‘अमृत काल’चे उद्दिष्ट आहे.’’  

जग कोविड-१९ च्या महासाथीतून सावरत असणे आणि त्याच काळात भारतात विकासाचा प्रवास सुरू होणे या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतानाच दुबईमध्ये १ ऑक्टोबर रोजी ‘वल्र्ड एक्स्पो’ २०२० सुरू झाले असून ते ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात इथे वेगवेगळ्या देशांमधले लोक मोठ्या प्रमाणात येतील. 

दुबई ‘एक्स्पो २०२०’ मधील भारताच्या दालनामध्ये देशातील कौशल्य, चैतन्य, तसेच समृद्ध सांस्कृतिक वारशाबरोबरच उभरत्या भारतामधील नव्या संधींचे जगाला दर्शन घडवले जाईल. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध मंत्रालये, वेगवेगळे विभाग, देशातील वेगवेगळी राज्ये तसेच उद्योग यांच्या दालनांमध्ये देशातील स्थैर्य आणि संधी यांचे प्रदर्शन असेल. ‘एक्स्पो २०२०’ मधील भारताच्या सहभागाने भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या संबंधांतदेखील अधिक दृढता येईल.

‘जीएसटी’ वा ‘रेरा’सारखे अनेक भविष्यलक्ष्यी कायदे, अनेक कायद्यांमध्ये सुधारणा, परदेशी गुंतवणुकीची उद्योगस्नेही धोरणे  उत्पादकतेशी जोडलेल्या गुंतवणूक योजना तसेच अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे वाहने तसेच ड्रोन उद्योग या सगळ्यामुळे भारत जागतिक आर्थिक केंद्र  म्हणून खूप वेगाने उदयाला येतो आहे. सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांमुळे गरीब, गरजू तसेच उपेक्षित विभागातील लोकांचे जीवनमान सुधारते आहे. या योजनांमुळे केवळ लोकांचेच सक्षमीकरण होते आहे असे नाही तर त्यांच्यामुळे सरकारलाही देशातल्या अगदी कानाकोपऱ्यातील लोकांनाही विकासाच्या आपल्या प्रक्रियेत सामावून घेता येते आहे. 

उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री गरीब अन्न योजना यांसारख्या योजना गरीब तसेच उपेक्षित विभागांमधील लोकांसाठी आहेत. समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत या प्रकल्पांचे फायदे पोहोचावेत यासाठी सरकार प्रयत्न करते आहे. महासाथीच्या काळात एकाही कुटुंबाला उपाशीपोटी झोपावे लागू नये, यासाठी सरकारने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

 देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर क्षमतेपर्यंतच नाही तर त्याहीपलीकडे नेण्यासाठी आवश्यक असलेले सकल राष्ट्रीय उत्पादन साध्य करण्याच्या वाटेवर आपण सध्या आहोत. येत्या २५ वर्षांत आपल्याला देशाच्या विकासाचा हा सोनेरी टप्पा पाहायला मिळेल. दुबईतील ‘एक्स्पो २०२०’ च्या व्यासपीठावरून आपण नव्या भारताच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सगळ्या जगाला आमंत्रित करू या.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Call for a new india to the world piyush goyal minister of commerce and industry akp
First published on: 05-10-2021 at 00:02 IST