देशाच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानाची हत्या करून त्याचे शिर पळवणारे पाकिस्तानी सैनिक आणि झारखंडमध्ये स्फोटात उडवलेल्या मृत जवानाच्या शरीरात बॉम्ब ठेवणारे नक्षलवादी यांच्यात काहीच फरक नाही, साम्य भरपूर आहे. यापैकी एक बाहेरचा तर दुसरा अंतर्गत शत्रू आहे. एक दिवसाच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटना क्रौर्याच्या परिसीमा सांगणाऱ्या आहेत आणि पाकिस्तान व नक्षलवाद्यांचे संबंध स्पष्ट करणाऱ्या आहेत. शहीद जवानाच्या पोटात दडवून ठेवलेला बॉम्ब पाकिस्तानी बनावटीचा होता हेसुद्धा आता स्पष्ट झाले आहे. तीस वर्षांपासून मध्य भारतात हिंसाचार करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या हिंसेतील क्रूरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चार वर्षांपूर्वी गडचिरोलीत धानोराजवळ १६ पोलीस शिपायांना ठार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यातील सात महिला शिपायांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. या शहीद महिलांच्या अंगावरचे दागिने लुटून नेताना त्यांनी त्यांचे अवयवच कापून नेले होते. या महिलांच्या मृत शरीरासोबत नक्षलवाद्यांनी केलेले अमानवीय व्यवहार शब्दातसुद्धा सांगता येणे तेव्हा कठीण झाले होते. नंतर मात्र, आम्ही तसे काही केले नाही, असा साळसूद खुलासा नक्षलवाद्यांनी केला होता. प्रत्यक्षात ही चळवळ व त्यात सक्रिय नक्षलवादी किती खोटारडे आहेत हे लातेहारच्या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आमचा लढा गरिबांसाठी आहे असे सांगणाऱ्या या चळवळीचे मुख्य ध्येयच आता हिंसा झाले आहे. ठार मारलेल्या जवानांच्या मृतदेहाखाली प्रेशर बॉम्ब ठेवणे, रस्त्यावर पाडून ठेवलेल्या झाडांच्या खाली स्फोटके ठेवणे असे प्रकार नक्षलवादी आजवर अनेकवार करीत आले आहेत. त्यामुळे सुरक्षा दले हिंसक घटना घडल्यानंतर परिस्थिती हाताळताना बरीच काळजी घेतात. या वेळी नक्षलवाद्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. युद्धाची भाषा करणाऱ्या नक्षलवाद्यांना त्यातील नीती व संकेतांशी काही घेणे-देणे नाही. युद्धात लहान मुलांचा, बालकांचा वापर सर्रास करणारी संघटना अशीच नक्षलवाद्यांची आजवर ओळख राहिली आहे. ‘बालदस्ते’ तयार करून त्यांच्या हातून हिंसक घटना घडवून आणण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मध्यंतरी संयुक्त राष्ट्रसंघानेही यावर चिंता व्यक्त केली होती. युद्धात आम्ही कोणताही स्तर गाठू शकतो हेच दाखवून देणाऱ्या नक्षलवाद्यांच्या या कृत्यांवर मानवाधिकाराच्या नावाने सतत गळा काढणाऱ्या संघटनांनी बाळगलेले मौन मात्र आश्चर्यकारक आहे. याच संघटना व त्यांचे तथाकथित कार्यकर्ते आजवर नक्षलवाद्यांच्या भूमिकेचे समर्थन करीत आले आहेत. क्रौर्यालाही लाजवेल अशा घटना समोर आल्या की मग हेच कार्यकर्ते मौन धारण करतात. यातून त्यांचे दुटप्पीपण स्पष्ट होते. लातेहारच्या घटनेतून समोर आलेली आणखी एक बाब चिंता वाढवणारी आहे. नक्षलवाद्यांना पाकिस्तानातून शस्त्रपुरवठा होत आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले. आजवर झालेल्या हिंसक कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली शस्त्रे व स्फोटके चिनी बनावटीची असायची. चीनचा या चळवळीला केवळ पाठिंबाच नाही तर सक्रिय मदतसुद्धा आहे हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. आता पाकिस्तानचे नाव समोर आले आहे. शस्त्रपुरवठा नियमित व्हावा यासाठी नक्षलवाद्यांनी पूर्वेत्तर राज्यांतील दहशतवादी संघटनांशी काही वर्षांपूर्वी करार केला आहे. आता शस्त्रासाठी नक्षलवाद्यांनी पाकिस्तानशीसुद्धा संबंध प्रस्थापित केल्याचे दिसून आल्याने सुरक्षा दलांसकट सर्वाचीच चिंता वाढली आहे. चळवळीची वैचारिक भूमिका मांडताना मध्य आशियात सुरू असलेल्या दहशतवादाचे समर्थन करणे शक्य नाही, असा विचार मांडणारे नक्षलवादी प्रत्यक्षात वेगळीच पावले टाकत असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे. यामुळेच दहशतवादी व नक्षलवादी यांच्यात फरक काय, असे विचारण्याची वेळ आता आली आहे.