आत्मसाक्षात्कारासाठीच मनुष्यजन्म लाभला असूनही माणूस त्यासाठी सरळ प्रयत्न का करीत नाही, असा प्रश्न प्रभूंना पडला आहे. ते अर्जुनाला सांगतात, ‘‘परि अमृतकुहां पडिजे। कां आपणपयांते कडिये काढिजे। ऐसे अर्थी काय कीजे। अप्राप्तासी।। ग्रासा एका अन्नासाठीं। अंध धांवताहे किरिटी। आडळला चिंतामणी पायें लोटी। आंधळेपणें।।’’ (अ. ९/ ओवी ३०३, ३०४). एखाद्यानं अमृतानं भरलेल्या विहिरीत पडावं आणि नाकातोंडात एकही थेंब जाऊ नये, अशी धडपड करीत बाहेर यावं, तसा अमूल्य लाभ देणारा माणसाचा जन्म लाभूनही त्याचा योग्य उपयोग माणूस का करीत नाही? भुकेनं कासावीस होऊन अन्नाच्या शोधात वणवण फिरत असलेला एखादा दृष्टीहीन सर्वइच्छांची पूर्ती करू शकणाऱ्या चिंतामणी या मण्याला ठेचकाळावा आणि त्यानं दगड मानून त्या मण्याला लाथाडून द्यावं, तसा या अमूल्य जन्माला माणूस का लाथाडून जगत आहे? प्रभूंनी या प्रश्नांतून आपल्याला आपल्या जगण्याबद्दल सजग केलं आहे. तेव्हा जर सरळ मार्गानं चाललं, म्हणजेच ज्या कारणासाठी माणसाचा जन्म मिळाला आहे त्या कारणासाठीच तो व्यतीत केला तरी काही अपाय नाही (जैसें मार्गे चि चालतां। अपावो न पवे सर्वथा।), असं प्रभू सांगतात. आपण मात्र सरळ मार्गानं जात नाही. मोह आणि भ्रमापायी आडवाटाही आपल्याला खुणावत ंअसतात. त्या वाटांवर अपेक्षाभंगाचे काटेकुटेही विखुरले असतात. आडवाटांमुळे मुक्कामाला पोहोचणंही कठीण होऊन बसतं. त्या आडवाटा तुडवत खाचखळगे, काटय़ाकुटय़ांतून मार्ग काढत सरळ रस्त्याला येणं अवघड होऊन जातं. मग अशा अज्ञानाच्या अंध:कारानं भरलेल्या, काटेकुटे, खाचखळगे यांनी भरलेल्या आडवाटांवरून कसं जावं, हे या ओवीच्या उत्तरार्धात सांगितलं आहे. ‘कां दीपाधारें वर्ततां। नाडळिजें।।’ म्हणजे हातात दिवा असेल तर रस्त्यात ठेचकाळायला होत नाही. इथे दिवा आहे तो सद्गुरूच्या बोधाचा. म्हणजेच सद्गुरूंच्या बोधाच्या प्रकाशात जगायचा प्रयत्न केला तर ठेचकाळण्याची भीती कमी असते. अर्थात हा अभ्यासही चिकाटीनं करावा लागतो. बोधाची जाणीव अंतरंगात सतेज ठेवून जगणंही प्रत्येक क्षणी साधेलच, असं नाही. तरी ध्येय आणि प्रयत्न तोच असला पाहिजे. यापुढच्या ओवीत सरळ मार्गानं चालणं वा सद्गुरूबोधाच्या प्रकाशात चालणं, याबरोबरच स्वधर्माचरणाचं महत्त्व मांडलं आहे. ती ओवी अशी- ‘‘तयापरी पार्था। स्वधर्मे राहाटता। सकळकामपूर्णता। सहजें होय।।’’ हिचा प्रचलितार्थ आपण मागेच पाहिला की, (ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोहोचत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही) त्याचप्रमाणे पार्था, स्वधर्मानुसार चाललं असता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात! आता इथे प्रश्न असा की, स्वधर्म म्हणजे नेमका कोणता धर्म? स्वामी स्वरूपानंद यांचे एक मुसलमान शिष्य होते बाबालाल पठाण. पावसला ज्ञानेश्वरी वाचत असता स्वधर्माचरणाचं महत्त्व सांगणारी ओवी आली तेव्हा त्यांना प्रश्न पडला की, मी स्वधर्म म्हणजे कोणता मानू? स्वामींनीच त्याचं उत्तर दिलं ते पाहू.