आपल्या देशाचा सर्वेसर्वा नेता राजधानीतून वाहणाऱ्या नदीत गळ टाकून, मासेमारी करत बसला आहे.. एखादा मासा गळाला लागल्यावरच उठायचे, हे त्याने ठरवलेले आहे.. तासन्तास एकही मासा गळाला तोंड लावत नाही, तेव्हा हा नेता संतापून काही तरी बोलतो.. मासा न मिळाल्याचा त्याचा राग येणाऱ्या जाणाऱ्यांनाही कळतो आणि एक माणूस दुसऱ्याला म्हणतो, ‘पाहिलंस, आपल्या हिटलरपुढे पाण्यातले मासेसुद्धा तोंड उघडायला घाबरतात!’
हा विनोद आम्ही एकमेकांना सांगत असू, अशी आठवण १९१७ साली जर्मनीत जन्मलेल्या, १९३५ मध्ये शिक्षण पूर्ण होऊन हिटलरशाही अगदी जवळून पाहणाऱ्या, तिचे चटके सोसलेल्या आणि अखेर बर्लिनची भिंत उभी राहत असल्याचे पाहून मगच मायदेश सोडून अमेरिकेत स्थायिक झालेल्या डोरोथी लॉसन यांनी त्या देशात ठिकठिकाणी सांगितलेला आहे. ओरेगॉन या अमेरिकी प्रांतातील ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यमिक शाळा, नागरी संघटना असे कोणतेही व्यासपीठ वर्ज्य न मानता डोरोथी आठवणी सांगत.  ‘असे विनोद आम्ही तरुण जर्मन- पण नाझीविरोधी मंडळी एकमेकांना सांगत असू, म्हणूनच त्या महायुद्धाचे चटके सुसह्य झाले.’ हेही त्या आवर्जून सांगत. आदल्या रात्रीपासून उपाशीच लपून बसल्यावर, दिवसा आठ किलोमीटर चालून एका खेडय़ात गेल्यावरच ताजे अन्न पहिल्यांदा मिळाले, असा अनुभव असलेल्या डोरोथी यांना हिटलरच्या सैनिकांनी प्रचार मात्र कसा चोख केला होता, हेही आठवे.. ‘स्वेच्छेने देशासाठी वर्गणी देण्याची सक्तीच होती’ हे त्या सांगत आणि ‘कोणीही कुडकुडत, उपाशी मरणार नाही’ ही नाझींची घोषणा ऐकून आम्ही ‘कुडकुडल्याशिवाय कोणताही उपाशी मरणारच नाही’ असा पाचकळ विनोद कुडकडतच कसा करायचो, हे त्या सांगत. या डोरोथींचे संपूर्ण नाव डोरोथी व्हॉन ष्वानेन्फ्लूगेल लॉसन. अमेरिकेत सैनिकांना जर्मन शिकवण्याचे तसेच जर्मन-इंग्रजी भाषांतराचे काम त्यांनी केले. नृत्यकलेतही पारंगत असल्याने, चार प्रकारचे नाच त्या शिकवीत. दोन घटस्फोट झाले, दोन्ही मुली स्थिरस्थावर झाल्या.. त्यांचे हे दु:खाला हसणारे आठवण-कथन ऐकून ‘ट्रायकॉर प्रेस’ने त्यांना पुस्तक लिहिण्याची गळ घातली. ‘लाफ्टर वॉजन्ट रेशन्ड- अ पर्सनल जर्नी थ्रू जर्मनीज वर्ल्ड वॉर्स अँड पोस्टवॉर इयर्स’ हे ते पुस्तक.
या डोरोथींचा मृत्यू १३ फेब्रुवारी रोजीच झाला, हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अन्य प्रसारमाध्यमांना मात्र गेल्या शनिवारीच समजले. त्याआधी ओरेगॉनमधल्या एका अगदी स्थानिक पत्राने २३ फेब्रुवारीला ही मृत्युवार्ता दिली होती. तिच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही; परंतु ‘पोस्ट’ने उशिरा का होईना, चूक सुधारली!