अंकुर नर्सरीचे, ‘क’च्या उकारात झाडाच्या मुळाचा आणि ‘अ’च्या अनुस्वारात पानाचा आकार सूचित करणारे बोधचिन्ह आजसुद्धा काही जणांना आठवत असेल. पांढऱ्यावर अंकुरहिरव्या रंगाच्या त्या बोधचिन्हामागची सौंदर्यदृष्टी १९८० वा १९९०च्या दशकाच्या पुढलीच होती, हेही यापैकी थोडय़ांना आठवत असेल.. या नर्सरीचे संस्थापक गजानन भागवत हे ‘दीप अ‍ॅडव्हर्टायझिंग’ या जाहिरात संस्थेचे संस्थापक होते, त्याहीआधी प्रतिष्ठित जे जे कला महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयासाठी सर्व दृश्यकलांच्या ‘पायाशुद्ध अभ्यासक्रमा’चे मराठीतील पहिलेवहिले पाठय़पुस्तक तयार केले होते आणि त्याहीपूर्वी- म्हणजे १९६२ ते ६७ या काळात ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंग अँड ग्राफिक्स आर्टस् या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले होते.
असे वैविध्यपूर्ण आयुष्य जगलेल्या, प्रत्येक व्यवसाय शिस्त-सचोटी आणि सौंदर्यदृष्टीसुद्धा शाबूत ठेवून केलेल्या मोठय़ा माणसाला ओळखण्यात महाराष्ट्र कमी पडला. इतका की, ‘दृश्यकला- पायाभूत अभ्यासक्रम’ हे त्यांच्या प्रयत्नांतून सिद्ध झालेले पुस्तक गेली २० वर्षे कोठेही मिळत नाही, पण कला संचालनालयाच्या गोदामांत त्याच्या कैक प्रती आजही धूळ खात पडलेल्या काही जाणकारांनी पाहिल्या आहेत. ‘जेजे’त कलाध्यापकांचा संप १९७९-८० मध्ये झाला, त्यात भागवत यांनी पुढाकार घेतला होता. त्याच कारणाने त्यांनी राजीनामाही दिला. परंतु त्यानंतर या उत्कृष्ट पुस्तकाचे नष्टचर्य विनाकारणच सुरू झाले, ते आजतागायत. याबद्दल चकार शब्दही न काढता भागवत पुढे जात राहिले. त्यांनी मुंबईतच जाहिरात संस्था काढली, मग अलिबागनजीक मनवली येथे त्यांनी फुलवलेल्या बागेतून नर्सरी अवतरली. जवळपास निवृत्तीच्या वयात त्यांनी देवरुखमध्ये ‘डी-कॅड’ ही व्यवसायाभिमुख कलाशिक्षण देणारी संस्था उभारण्यात हातभार लावला. परंतु प्रकृतीच्या कारणाने थोडय़ा काळातच त्यांनी तेथून पुण्यास वास्तव्य हलवले आणि तेथेच ते अखेपर्यंत राहिले.
प्रकाशन-मुद्रण व्यवसायातील ‘मौज’च्या भागवत घराण्यापैकी ते एक, परंतु त्या व्यवसायाशी थेट संबंध त्यांनी ठेवला नाही. ‘मौज’च्या मांदियाळीत अनेक चित्रकारांचा समावेश झाला, त्याचे श्रेय भाऊसाहेब ऊर्फ गजानन यांना जाते. अर्थात, श्रेय घेणे/ वागवणे हा त्यांचा स्वभाव नव्हताच. अन्यथा ‘जर्मनीतल्या बाउहाउसचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात प्रत्यक्ष आणणारे कलायोगी’ असे बिरुद त्यांना आजन्म मिरवता आलेच असते. सोमवारी रात्री झालेल्या त्यांच्या निधनाने, कलाक्षेत्रातील एक अनाग्रही तारा निखळला आहे.